आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, २३ एप्रिल, २०२१

एमजीएम कामोठे,रुग्णालयासोबत २०० आयसीयू बेड व दररोज ३०० आरटीपीसीआर टेस्ट मिळण्यासाठी पनवेल महानगरपालिकेचा झाला करारनामा

पनवेल, दि.22 : पनवेल महानगरपालिकेने दिनांक २० एप्रिल च्या सभेत घेतलेल्या निर्णयानुसार आज एमजीएम रुग्णालय, कामोठे व पनवेल महानगरपालिका यांच्यामध्ये कोरोना रुग्णांसाठी जास्तीजास्त मोफत वैद्यकीय सुविधा मिळवून देण्याच्या दृष्टीने २०० आसीयू बेड मिळण्यासाठी करारनामा करण्यात आला. सध्या एमजीएम रुग्णालय कामोठे येथे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत (MJPJAY) २५० बेड सुविधा उपलब्ध असून नवीन करारामुळे आणखी २०० आयसीयू बेड उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे पनवेल मधील नागरिकांना लवकरच दिलासा मिळेल. सदर बेड १ मे २०२१ पासून टप्प्याटप्प्याने महापालिकेला प्राप्त होतील. 

    पनवेल महानगरपालिका हद्दीतील कोरोना बाधित किंवा कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तींच्या दररोज ५०० आरटीपीसीआर चाचण्या जे जे रुग्णालयात तर २०० चाचण्या अलिबाग येथील प्रयोगशाळेत केल्या जात जात आहेत. चाचण्या करण्याची सुविधा अपुरी पडू लागल्यामुळे कोरोना बाधित किंवा कोरोनाची लक्षणे असलेल्या नागरिकांची मोफत आरटीपीसीआर टेस्ट करण्याकरिता दररोज ३०० टेस्ट एमजीएम रुग्णालयामार्फत मिळण्याकरिता सुद्धा यावेळी करार करण्यात आला. त्याच प्रमाणे तेरणा मेडिकल कॉलेज यांच्याकडून सुद्धा दररोज ३०० आरटीपीसीआर टेस्ट मिळण्याकरिता करारनामा करण्यात आला. त्यामुळे पनवेल महापालिकेतील नागरिकांना उद्यापासून अधिकच्या ६०० आरटीपीसीआर टेस्ट मोफत करून मिळतील. त्यासोबतच आवश्यकतेप्रमाणे ॲटीजीन टेस्ट करण्यात येत आहेत. 

   सध्या वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना जास्तीत जास्त मोफत टेस्ट उपलब्ध करून देण्याकरिता पनवेल महापालिका प्रयत्न करत असून एमजीएम व तेरणा मेडिकल कॉलेज यांच्यासोबत प्रत्येकी ३०० आरटीपीसीआर टेस्ट मिळण्याकरिता करारनामा केल्यामुळे पनवेलमधील नागरिकांना दररोज १३०० आरटीपीसीआर टेस्ट मोफत करून मिळतील. 

    पनवेल मधील वाढती कोरोना रुग्णांची संख्या विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाने ८०० बेडचे जम्बो फॅसिलिटी सेंटर सिडकोच्या मदतीने उभे करण्याकरीता मान्यता दिली असून कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या गोडाऊनमध्ये कळंबोली येथे २०० आयसीयू बेड व ६००ऑक्सीजन बेडचे जम्बो फॅसिलिटी सेंटर निर्माण करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात महापालिकेला एमजीएम कडील २०० आयसीयू बेड व जम्बो फॅसिलिटीतील ८०० बेडस् असे एकूण १००० बेड कोरोना उपचारासाठी उपलब्ध होतील. याशिवाय एमजीएम मध्ये २५० बेड महात्मा ज्योतिबा फुले आरोग्यदायी योजना (MJPJAY) या अंतर्गत पनवेल करांसाठी मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध राहतील.

  आज एमजीएम सोबत करारनामा करतेवेळी मा. महापौर श्रीमती कविता किशोर चौतमोल,मा. उपमहापौर श्री जगदीश गायकवाड, मा.आयुक्त श्री सुधाकर देशमुख, मा. सभागृहनेते श्री परेश ठाकूर, मा.स्थायी समिती सभापती श्री संतोष शेट्टी ,नगरसेवक श्री गणेश कडू,उपायुक्त श्री संजय शिंदे,वैद्यकीय अधिकारी श्री आनंद गोसावी

एमजीएम रुग्णालयाचे ट्रस्टी मा.श्री सुधीर कदमडीन श्री नरशेट्टी ,श्री सलगोत्रा उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: