आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, २८ एप्रिल, २०२१

भारतीय खेळाडूंनी पॅट कमिन्सचे अनुकरण करावे

भारतात वाढणाऱ्या कोरोनामुळे परदेशी खेळाडू आयपीएल अर्ध्यावरच सोडून जात असताना पॅट कमिन्स नावाचा परदेशी खेळाडू भारताच्या मदतीला धावून आला आहे.  आयपीएलमध्ये कोलकता नाईट रायडर या संघाकडून खेळणारा ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याने  कोरोनाचा सामना करण्यासाठी  पी एम केअर निधीत  ३८ लाख रुपयांची मदत केली आहे. भारतात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकोपापुढे देशातील आरोग्य व्यवस्था अपुरी पडू लागली आहे. कोरोनाबाधित  रुग्णांना कोव्हीड सेंटरमध्ये बेड मिळत नसल्याने हजारो रुग्णांना गृहविलगीकरणात राहावे लागत आहे. देशात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. ऑक्सिजन अभावी रुग्णांचे प्राण जात आहेत. कोरोनावावर प्रभावी असणारी रेमडेसिव्हर ही इंजेक्शन देखील मिळत नाही अशावेळी पॅट कमिन्स याने पी एम केअर निधीला लाखो रुपयांची मदत करून एक  आदर्श निर्माण केला आहे. "भारतामध्ये मी गेली अनेक वर्ष येत आहे आणि इथल्या लोकांनी मला खूप प्रेम दिले एव्हढ्या जणांन त्रास होत असताना मला खूप दुःख होत आहे. आयपीएलमुळे आम्हाला कोट्यवधी लोकांपर्यंत पोहचता आले यामुळेच मी पी एम केअर निधीत मदत जमा करत आहे" असे ट्विट त्याने मदतनिधी जमा करताना केले आहे. पॅट कमिन्सच्या या ट्विटमधून  त्याच्या मनात असलेली सामाजिक बांधिलकीच  दिसून येते शिवाय तो किती संवेदनशील मनाचा आहे हे ही दिसून आले. पॅट कमिन्स हा जरी भारतीय खेळाडू नसला तरी त्याने भारताला मदत करून दातृत्वाचा आदर्श निर्माण केला आहे. आपत्तीच्या वेळी पॅट कमिन्सने जी माणुसकी दाखवली आहे तिला तोड नाही.  त्याने दिलेल्या ३८ लाखांमध्ये ४०० ऑक्सिजन सिलेंडर येतील आणि शेकडो कोरोनाबाधित रुग्णांचे  प्राण वाचतील. पॅट कमिन्स याने भारतीयांप्रति जी आपुलकी दाखवली ती वाखाणण्याजोगी जोगीच आहे. त्याचे जितके कौतुक करावे तितके कमी आहे.  पॅट कमिन्स हा ऑस्ट्रेलियाचा असूनही त्याला भारताप्रति आपुलकी आहे या आपुलकीतूनच त्याने ही मदत केली आहे. त्याने ही मदत करून भारतीय खेळाडू आणि सिलिब्रेटींच्या सणसणीत कानशिलात मारली आहे. देशात इतकी मोठी आपत्ती आली असताना आयपीएलमध्ये करोडो रुपये कमावणाऱ्या भारतीय खेळाडूंना मात्र  आपल्याच बांधवांना मदत करावी असे वाटत नाही. ज्यांना भारतीय लोक आपला आयडॉल मानतात ते मनाने किती खुजे आहेत हेच पॅट कमिन्सने दाखवून दिले आहे. आतातरी भारतीय खेळाडूंनी आपली तिजोरी देशवासीयांसाठी खुली करावी. पॅट कमिन्सने केलेल्या आदर्श कृतीचे अनुकरण भारतीय खेळाडूंनी करावे.

-श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: