आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, २६ मार्च, २०२१

बंधने फक्त महिलांवरच का?

   गुडघ्यावर फाटलेले कपडे घालून महिला वापरतात, हे कसले संस्कार आहेत ? असा प्रश्न उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथ सिंग रावत यांनी जाहीर कार्यक्रमात विचारला आहे. त्यांच्या जाहीर प्रश्नामुळे देशभर  वादंग उठले आहे. मुख्यमंत्री पदासारख्या घटनात्मक पदावर बसलेल्या व राज्याचा प्रमुख असलेल्या व्यक्तीकडून अशा प्रकारच्या वक्तव्याची अपेक्षा नव्हती. कोणी कोणते कपडे वापरायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. सार्वजनिक ठिकाणी गुडघ्यावर फाटलेली जीन्स फक्त महिलाच वापरतात का? पुरूषही फाटलेली जीन्स वापरतात, बरमुडा किंवा शॉर्ट पॅन्ट घालून गावभर फिरतात पण त्यांच्या कपड्यावर मात्र कोणीच आक्षेप घेत नाही. तिरथ सिंग रावत हे ज्या संस्थेचे स्वयंसेवक आहेत त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गणवेश देखील हाफचड्डी व शर्ट हाच होता हे  तिरथ सिंग रावत विसरलेत का ? बंधने फक्त महिलांवरच का ? महिलांनी कोणते कपडे घालावेत हे ठरवण्याचा अधिकार यांना कोणी दिला ? २१ व्या शतकातही महिलांना समान अधिकार मिळू नयेत हेच या वक्तव्यातून सूचित होते. महिलांनी कोणते आणि कसे कपडे घालावेत, महिलांनी कोठे फिरावे, काय खावे, काय प्यावे हे पुरुषांनी ठरवावे ही तर अठराव्या शतकातील मानसिकता झाली. २१ व्या शतकातही महिलांना समान अधिकार मिळत नाही त्यांना त्यांच्या अधिकारासाठी झगडावे लागते ही दुर्दैवाची बाब आहे. स्त्री पुरुष समानता हे  फक्त बोलण्या करीताच आहे हेच यातून दिसून येते. जगात एकीकडे स्त्रियांना समान अधिकार मिळावेत यासाठी चळवळ उभी केली जात आहे तर आपल्याकडे  महिलांनी कसे राहायचे, तिने काय कपडे घालायचे, कसे कपडे घालायचे यावर चर्चा केली जाते. प्रश्न महिलांनी कोणते आणि कसे कपडे घालावेत हा नसून प्रश्न आहे त्यांच्या निवडीच्या स्वातंत्र्याचा महिलांच्या मानवी हक्काचा. महिलांचे हे हक्क कोणीही हिरावून घेऊ नये.  महिला  गुडघ्यावर  फाटलेली जीन्स वापरतात,  तोकडे कपडे वापरतात त्यामुळे त्यांच्यावर लैंगिक अत्याचार होतात असा तर्क लढवला जातो. महिला संध्याकाळी बाहेर जातात म्हणून त्यांच्यावर बलात्कार होतो असाही दावा तथाकथित संस्कृती रक्षक करतात पण ते सोयीस्करपणे हे विसरतात की आपल्या देशात अंगभर कपडे घातलेल्या साठ सत्तर वर्षाच्या वृद्धेवर देखील बलात्कार होतो. विकृत मानसिकता असलेले लोक अंगभर कपडे घातलेल्या महिलांकडे देखील विकृत नजरेने पाहतात. अंगभर कपडे असोत की तोकडे कपडे असोत ज्यांची मानसिकता विकृत आहे त्या नराधमांना महिला म्हणजे केवळ भोगवस्तू वाटते. महिलांच्या कपड्यावर भाष्य करण्याऐवजी ही पुरुषी मानसिकता बदलली तर देशात महिला अत्याचाराच्या घटना घडणार नाहीत. 

-श्याम ठाणेदार,दौंड जिल्हा पुणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उद्यान शिवाजी पार्क दादर मुंबई येथे संपन्न

मुंबई (शांताराम गुडेकर /समीर खाडिलकर)  शिवसेना सचिव,प्रवक्ता,मा.आमदार राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.आ.श्री. किरण पावसकर ...