आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, २७ मार्च, २०२१

महान सुर

 

  मानवी मनातील सुख, दुःख, राग, अनुराग इत्यादी भावनांनी शब्दबद्ध झालेल्या गीतांना तेव्हढ्याच समर्थपणे आपल्या चिरतरूण स्वर किमयेने रसिकांपर्यंत पोहोचवून त्यांची कर्णतृप्ती करणाऱ्या आशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' हा किताब मिळावा ही गोष्ट प्रत्येक भारतीयाला अभिमानास्पद आहे एकाच घराण्यातील दोन व्यक्तींना महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च पुरस्कार मिळणे ही घटना खरंच कौतुकास्पद आहे.  १९५० च्या दशकात 'माझे बाळ' या चित्रपटाद्वारे सुरू झालेला हा स्वरप्रवास आजही म्हणजेच जवळपास ७ दशके होऊनसुद्धा तेव्हढ्याच तडफेने, उत्कटतेने व समरसतेने आपल्या जादुई स्वराने ओथंबलेली गाणी गाऊन रसिकांना डोलायला लावत आहेत.  चित्रपटगीतांच्या शब्दांतील भावना तसेच चित्रपटातील प्रसंगानुरूप खट्याळ, खोडकर, मादक, गंभीर, गहिऱ्या इत्यादी विभ्रम आपल्या मधाळ, चतुरस्त्र गायकीच्या स्वरांवाटे रसिकांच्या मनात ठसविणे ही किमया आशा भोसले यांनी मेहनतीने आत्मसात केली आहे.  तसेच आपल्या मधाळ स्वरांनी रसिकांना जखडून ठेवणाऱ्या तसेच सर्व प्रकारातील गाणी तेव्हढ्याच ताकदीने रसिकांना बहाल केलेल्या सुरेल बालगीत, भावगीत, विरहगीत, गझल, उडत्या लयीतील गाणी, कॅब्रेगीत इत्यादी सर्व प्रकार सुरांच्या माध्यमातून रसिकांचे कान तृप्त करण्याची हातोटी त्यांना साधली आहे.  सूर, लय, ताल याचा सुंदर मिलाप झाल्यावर त्या गीतांनी रसिकांच्या मनाचा ठाव तर घेतलाच पण त्याचबरोबर कानही तृप्त केले.  या अशा गीतांनी लोकप्रियतेचे शिखर गाठले नसले तरच नवल.  गीतातील शब्दांमागे असलेल्या भाव भावना आपापल्या अमृततुल्य स्वरातून रसिकांना जाणवून देणे हीच खरी आशा भोसलेची ओळख.  गाणी गाण्यातील विलक्षण माधुर्याने शिगोशीग भरलेली हातोटी अतीव परिश्रमाने आत्मसात तर केलीच पण जोपासली देखील.  गाण्यांच्या सुरील्या दुनियेत आपली एक वेगळी छाप उमटविली.  आपल्या गायकीने आशा भोसले यांनी स्वतःचे असे वेगळे स्थान रसिकांच्या मनात निर्माण केले.  त्यांनी गायिलेल्या काही गाण्यांच्या बाबतीत असे वाटते की ही गाणी दुसऱ्या एखाद्या गायिकेने गायली असती ती एव्हढा मनाचा ठाव घेणारी झाली नसती.  

     हिंदी चित्रपटातील गाण्यांमध्ये तर त्यांनी आपली वेगळी अशी नाममुद्रा उमटविली आहे.  त्यांचा लवचिक आणि सुरेल कंठ कोणत्याही प्रकारच्या गाण्यांना पुरेपूर न्याय देणारा आहे.  सुरुवातीचा काळ हा त्यांचा खूप संघर्षाचा गेला.  गीता दत्त, शमशाद बेगम, लता मंगेशकर, नूरजहाँ, सुरय्या इत्यादी गायिकांच्या काळात त्यांच्या वाट्याला गाणी फार कमी आली.  पण हळूहळू संगीतकारांनी या आवाजाची पट्टी, सुमधुरता, लवचिकता ओळखली.  त्यानंतर आशा भोसले यांनी मागे वळून पहिले नाही.  चित्रपटातील प्रसंगानुरूप गाण्यातील स्वरांना चढ-उतार देण्यात त्या तरबेज झाल्या.  कव्वाली / विरहगीत / प्रेमगीत / खोडकर गीत / आर्त गीत इत्यादी प्रकारची गीते ऐकतांना हा स्वरातील चढ-उतार, हेलकावे, मुरक्या इत्यादी कानाला सहज जाणवितात. आपल्या उडत्या चालींच्या गाण्यांवर थिरकणाऱ्या तरूणाईच्या हृदयावर राज्य केले.  त्या काळात जवळ जवळ सर्वच आघाडीच्या संगीतकारांच्या संगीत दिग्दर्शनाखाली त्यांनी वेगवेगळ्या प्रकारातील गाणी गेली.  त्यातही ओ. पी. नय्यर तसेच आर. डी. बर्मन या संगीतकाराबरोबर त्यांचे सूर फार छान जुळले होते.  त्या जोडीची गाणी ऐकणे हा मोठा अवर्णनीय आनंद आहे.  हिंदी चित्रपटाप्रमाणे त्यांनी मराठीतील वेगवेगळ्या प्रकारातील गीतांवर आपला अमिट असा ठसा उमटविला आहे. त्यांच्या अवीट गोडीच्या भावगीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.  काही भावगीते तर अशी आहेत कि ती ऐकतांना वाटते की आशा भोसलेंना डोळ्यासमोर ठेवून ती लिहिली तर आहेतच पण त्याचबरोबर संगीतकारांनीदेखील त्यांच्या आवाजाची अफाट रेंज ओळखून तितक्याच ताकदीची बांधली आहेत.  भावगीत गायनाला त्यांनी एक वेगळी ओळख मिळवून दिली.  बालगीते, भक्तिगीते, भावगीते, कोळीगीते, भजने, लावण्या इत्यादी मूडची गाणी गाऊन आशा भोसले यांनी आपल्या स्वर माधुर्याने त्या गीतांना एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे.  त्यांनी त्या त्या प्रकारातील गाण्यांना आपल्या स्वर चातुर्याने त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे. कधी अल्लड स्वरात तर कधी खटयाळ स्वरात गीतकारांच्या शब्दांना सुरांच्या कोंदणात स्वरबद्ध केले. त्याचबरोबर कधी अभिसारिका होऊन तर कधी विरह भावनेशी एकजीव होऊन त्या गीतांना सूर, लय आणि ताल यात गुंफले.  गीतकारांनी शब्दांतून व्यक्त केलेल्या भावना आपल्या सुरांतून रसिकांपर्यंत पोहोचवण्याची त्यांची हातोटी विलक्षण भावते.  त्याचबरोबर शब्दांमागील अव्यक्त भावना मनाला भिडतील  एव्हढी उत्कटता त्यांच्या सुरांतून सहज उमटते. 

    आपल्या वडिलांकडून वारसा हक्काने मिळालेल्या नाट्यगीत या प्रकारात तर त्यांनी आपला वेगळाच ठसा उमटविला आहे. त्यांच्या स्वरमाधुर्याने ओथंबलेली शास्त्रीय संगीतावर आधारलेली नाट्यगीते ऐकणे म्हणजे एक स्वर्गीय आनंदच आहे. मराठीतील त्यांची सुधीर फडके म्हणजेच सर्वांचे लाडके 'बाबूजी' यांच्या बरोबरची द्वंद गीते ऐकणे म्हणजे रसिकांना पर्वणी वाटते. या द्वंद गीतांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. त्यांच्या सुरुवातीच्या काळातील हुस्नलाल भगतराम, सी. रामचंद्र इत्यादी सारख्या प्रगल्भ संगीतकारांपासून आजच्या आघाडीच्या संगीतकारांकडे आपल्या जादुई आवाजाने गाऊन आपल्या स्वरांचा अफाट आवाक्याने रसिकांना कर्णमधुर गाण्यांची मेजवानी दिली.   नवे गीतकार, नवे संगीतकार, नवे सहगायक यांच्याशी सुरांचे नाते जोडून रसिकांना मधुर सुराने भिजवून काढत आहेत आणि यातच आशा भोसलेंचे वेगळेपण आहे.  

    शेवटी एव्हढेच सांगता येईल की जादुई सुरांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आशा भोसले.  गीत गायनातील कोणताही प्रकार या सुरील्या गळ्याला व्यर्ज नाही.  प्रत्येक गाण्यातील हळुवारपणा, ठसका, खोडकरपणा यासारखे विभ्रम त्या आपल्या स्वरांनी उलगडून दाखवितात.  गीतकारांचे अर्थवाही तसेच भाववाही शब्दांना या मधुर सुरांचे कोंदण लाभल्यावर ती गाणी श्रवणीय होतातच.  तेव्हढी किमया तसेच रसिकप्रियता या कंठाला लाभली आहे. 

-मिलिंद कल्याणकर 
नेरूळ, नवी मुंबई 
९८१९१५५३१८ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उद्यान शिवाजी पार्क दादर मुंबई येथे संपन्न

मुंबई (शांताराम गुडेकर /समीर खाडिलकर)  शिवसेना सचिव,प्रवक्ता,मा.आमदार राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.आ.श्री. किरण पावसकर ...