आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, २७ जानेवारी, २०२१

डॉ जयंत नारळीकर यांची निवड सर्वार्थाने योग्य

     

नाशिक येथे होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात खगोल शास्त्रज्ञ आणि विज्ञानकथा लेखक पद्मविभूषण डॉ जयंत नारळीकर यांची झालेली निवड सर्वार्थाने योग्य आहे. डॉ जयंत नारळीकर हे रुढार्थाने साहित्यिक नसले तरी त्यांनी केलेले लेखन हे दर्जेदार साहित्यिकापेक्षा कमी दर्जाचे नाही.  विज्ञानकथेसारखा वेगळा प्रवाह मराठी साहित्यात रुजविण्याचे मोठे काम त्यांनी केले. विज्ञानासारखा  रुक्ष आणि अवघड विषय  ललित साहित्याच्या अंगाने मांडून त्याला सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहचवण्याचे अवघड व महत्वाचे कार्य त्यांनी केले. त्यांनी केलेले विज्ञानविषयक लेखन व सुरस विज्ञान कथा यामुळे विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागली. खगोल शास्त्रात सातत्याने संशोधन करत असताना डॉ जयंत नारळीकरांनी लेखनही चालू ठेवले. त्यांनी अनेक विज्ञानकथा लिहिल्या. त्यांची यक्षाची देणगी, अंतराळवीर, भस्मासुर, टाइम मशीनची किमया, प्रेषित, अभयारण्य, याला जीवन ऐसे नाव, वामन परत आला, गणितातील गमतीजमती, नभात हसरे तारे, नव्या सहस्त्रकाचे नवे विज्ञान, विज्ञान आणि वैज्ञानिक, विज्ञानगंगेचे अवखळ वळणे, विज्ञानाची गरुडझेप, विज्ञानाचे रयचिते ही पुस्तके गाजली. त्यांनी लिहिलेले  आकाशाशी जडले नाते व  अंतराळ आणि विज्ञान  ही पुस्तके  प्रचंड गाजले. ही  पुस्तके म्हणजे त्यांच्या दर्जेदार साहित्याचे उत्तम उदाहरण आहेत. तीन नगरातील माझे विश्व हे त्यांचे आत्मचरित्रही प्रसिध्द आहे. यक्षाची देणगी या त्यांच्या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला होता. सामान्य माणसाला खगोल शास्त्र समजवण्यासाठी त्यांनी अनेक वर्ष प्रयत्न केले. आपल्या लेखनातून त्यांनी अंधश्रद्धा दूर करण्याचाही प्रयत्न केला. बहुविध प्रतिभेचे धनी असलेले डॉ जयंत नारळीकर यांच्यासारख्या व्रतस्थ व्यक्तीमत्वास अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळणे हा त्यांच्या बहुविध प्रतिभेचा गौरव आहे. डॉ जयंत नारळीकर  यांच्यासारखे जेष्ठ विज्ञानविषयक लेखक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाल्यामुळे यापुढे विज्ञान साहित्याला अधिकाधिक प्रतिष्ठा लाभेल तसेच विज्ञानाचा प्रसार तर होईलच पण तरुण पिढीमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यास खूप मदत होईल. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ जयंत नारळीकर यांचे मनापासून अभिनंदन! 

-श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फिलिप रॉड्रिग्ज यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

मुंबई (गणेश हिरवे) शिक्षक नेते शिवाजी शेंडगे आयोजित नुकताच शिक्षक स्नेहमिलन कार्यक्रम दहिसर येथील पूजा हॉल मध्ये संपन झाला.यावेळ...