आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, २४ ऑक्टोबर, २०२०

काळोखाला भेदून टाकू

 मिशन सेव्ह द अर्थ - एक अनोखे अभियान




           विराग मधुमालती, हे नाव आज आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी ऐकले असेल. अनेक विश्वविक्रम आपल्या नावावर केलेले विराग मधुमालती हे नाव केवळ मुंबई महाराष्ट्रासाठीच नव्हे तर देशासाठी भूषणावह ठरले आहे. नवी मुंबई येथे वास्तव्यास असणारे व सामाजिक उपक्रमांची प्रचंड ओढ असलेल्या विराग यांना समाजिक बांधीलकीतून इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करण्याच्या इर्षेने पछाडले आहे. पेशाने इंजिनिअर असलेल्या विराग यांनी गेल्या काही वर्षांत विपरीत परिस्थितीवर मात करत आपल्या जिद्दीच्या जोरावर अनेक विश्वविक्रमाँना गवसणी घातली आहे. मग तो चीनचा ४५६ तासांचा सलग गायनाचा विक्रम मोडीत काढून ५५५ तासांचा सलग गायनाचा विक्रम स्थापित केलेला असो की ३०० गायकांच्या सहभागाने रिले पद्धतीने गायलेले चित्रपटगीत असो. सुप्रसिद्ध गायक, निर्माता, दिग्दर्शक, गायन अभिनय प्रशिक्षक या सर्वच पातळ्यांवर ते प्रचंड यशस्वी ठरले आहेत. नेत्रदान चळवळीमध्ये त्यांनी दिलेले योगदान नक्कीच दखलपात्र होते. नेत्रदानाचे आवाहन घेऊन त्यांनी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना भेटी दिल्या. स्वतः डोळ्यावर पट्टी बांधून नेत्रदानाचा संकल्प व आवाहन करताना आम्ही त्यांना पाहिले आहे. नेत्रदानाबाबतच्या जनजागृतीसाठी त्यांनी संगीताचे अनेक अनोखे कार्यक्रम सादर केले. पद्मश्री डॉ तात्याराव लहाने यांच्या कार्याने प्रचंड प्रभावित असलेले विराग डॉ लहाने यांना आदर्श व पितृतुल्य मानतात. त्यांच्याच जीवनचरित्रावर आधारित अलका कुबल, मकरंद अनासपुरे अशा दिग्गज कलाकारांना घेऊन त्यांनी "डॉ तात्याराव लहाने.. एक अंगार" या चित्रपटाची निर्मिती दिग्दर्शन केले. याच चित्रपटातील "काळोखाला भेदून टाकू" ह्या लोकप्रिय गीताला घेऊन 'एक शब्द एक गायक' या संकल्पनेतून ३०० गायकांच्या सहभागाने त्यांनी वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत आणखी एक विश्वविक्रम नुकताच रचला. अभिनय, गायनाची आवड असलेल्या, हरहून्नरी, समाजासाठी काहितरी करण्याची इच्छा असलेल्या कलाकारांना सोबत घेऊन अनेक अनोखे उपक्रम हाती घेणाऱ्या विराग यांची बातच काही और आहे. त्यांच्या ह्या वेगळेपणामुळेच ते कायम लक्षात राहतात. त्यांची ओळख व उद्देश कळणाऱ्या लोकांना त्यांच्या कार्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा न झाली तरच नवल. अर्थात यासाठी त्यांच्या अर्धांगिनी सौ वंदना यांची साथ तितकीच मोलाची असल्याची ते मानतात. सध्या त्यांनी मिशन सेव्ह मदर अर्थ म्हणजेच मातृभूमी वाचवण्याच्या मोहिमेचा ध्यास घेतलेला आहे. पर्यावरण संरक्षणासाठी विराग आणि त्यांच्यासोबत असंख्य गायक मंडळी लॉकडाऊन काळात आपली धरती माता वाचवण्याच्या ध्येयाने सातत्याने सलग गायनाचे अनोखे कार्यक्रम सोशल माध्यमावर सादर करत आहेत. आज आपण ऐहिक सुखाकडे इतक्या तन्मयतेने ओढलेलो आहोत की धरती मातेविषयी कुणाला फारसे काही घेणेदेणे राहिलेले नाही. पर्यावरणाकडे होत असलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे निसर्ग आज वेगाने विनाशाकडे वाटचाल करत आहे. वाढते शहरीकरण व सिमेंट काँक्रीटच्या जंगलात निसर्ग लुप्त होत आहे. ही परिस्थिती कुठेतरी बदलायला हवी. त्यासाठी हातावर मोजणारे पर्यावरण प्रेमी प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यात आता विराग मधुमालती या नावाचा समावेश झाला आहे. लॉकडाऊन काळात मानवी हस्तक्षेप व क्रिया थांबल्याने या काळामध्ये आपल्याला निसर्गात बरेच सकारात्मक बदल बघावयास मिळाले व सर्वांना आत्मचिंतन करण्यास भाग पाडले. यात वायू, ध्वनी, जलप्रदूषण कमालीचे घटल्याने वातावरण निर्मळ झाल्याचे पाहायला मिळाले. अश्यावेळी या परिस्थितीचा लाभ घेत गायक वीराग मधुमालती, ज्यांनी संगीत क्षेत्रात विविध सामाजिक जनजागृतीसाठी आजवर ५ वेळा जागतिक विश्वविक्रम भारताच्या नावे नोंदविले आहेत, त्यांनी आज एका आगळ्या वेगळ्या संकल्पनेची सुरुवात केली आहे. निसर्ग वाचवण्यासाठी त्यांनी अनेक संकल्प सोडलेले आहेत त्यात त्यांनी स्वतः गेल्या वर्षापासून प्लास्टिक डिस्पोजेबल बॉटलमध्ये आजन्म पाणी न पिण्याचा संकल्प केलेला आहेत. सन २०११ पासून  पाण्याचे होणारे प्रदुषण टाळण्याकरिता ते गणपती बाप्पाचे विसर्जन करीत नाहीत. आणि आता संपूर्ण विश्वातील गायक कलाकारांना एकत्रित करून
        धरती मातेच्या रक्षणासाठी "मिशन सेव्ह मदर अर्थ" चा मोहिमेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी यू टयूब  वर सलग १२ तास गीत गायन करून इतरांना देखील पर्यावरण संरक्षणासाठी संकल्प घेण्यास व प्रोत्साहित करण्यासाठी मालिका आखली आहे. यात ते विविध वयोगटातील, विविध पेशाच्या सर्वसामान्य कलाकारांना एकत्रित करून गीत गायनाचे लाईव्ह कार्यक्रम यु ट्यूब च्या माध्यमातून सादर करत आहेत.  या गायकांनीदेखील पर्यावरण रक्षणासाठी वेगवेगळे संकल्प केले असून सेव्ह द अर्थच्या मोहिमेत अमूल्य योगदान दिले आहे. यात अभियंते, डॉक्टर्स, लहान मुले व सर्वच वयोगटातील कलाकारांचा विशेषत्वाने सहभाग आहे. विराग मधुमालती यांचा धरती रक्षणाचा हा ध्यास अनेकांना विचारमंथन करण्यास भाग पडणारा आहे. विराग मधुमालती यांचा जीवन व कार्यप्रवास गेल्या काही वर्षांपासून जवळून न्याहाळत असताना त्यांच्या कार्याविषयी थोडे लिहिण्याच्या मोहातून हा लेखप्रपंच झालेला आहे. 
डॉ तात्याराव लहाने.. एक अंगार या त्यांच्या चित्रपटातील गीताच्या खालील ओळी आपल्याला बरेच काही शिकवून जातात.

काळोखाला भेदुन टाकु,
जिवनाला ऊजळुन टाकु,

उँच भरारी , ....चला घेऊया,
मानवतेची सेवा करूया,,

वेदना जिवाच्या , दुख: जगाचे
माझ्या अंतरंगी भासते मला.

दुर सारन्या आ.... शक्ति मला दे,
विश्व विधाता पुजिते तुला...

दिन दुबळ्यांचे आश्रय बनुनी,
करुना दयेचे दिप लाउया.

विकार मनाचे जिंकुनी सारे, भारत मातेची सेवा करुया....

काळोखाला भेदुन टाकु,
जिवनाला ऊजळुन टाकु....

     विराग मधुमालती यांच्या कार्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी व त्यांच्या विविध उपक्रमांत सहभागी होण्यासाठी सौ वंदना वानखडे यांचेशी ९८६७८७५७८७ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.



-वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संदीप परब यांना राज्यस्तरीय "शिक्षण दर्पण" पुरस्कार प्रदान

मुंबई (गणेश हिरवे)  दि.०१ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद, उल्हासनगर आणि कवयि...