आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, ३१ जुलै, २०२०

गोड गळ्याचे अजरामर गायक मोहम्मद रफी

       हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वश्रेष्ठ गायक मोहम्मद रफी यांचा आज स्मृतिदिन. आजच्याच दिवशी म्हणजे ३१ जुलै १९८० रोजी रसिकांना दुःख सागरात लोटून मोहम्मद रफी  पैगंबरवासी झाले. मोहम्मद रफी म्हणजे भारतीय सिने संगीत क्षेत्रातील अजरामर व्यक्तिमत्व. भारतीय गीत, संगीत विषयाचा इतिहास मोहम्मद रफी यांच्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. मोहम्मद रफी यांचा जन्म २४ डिसेंबर १९२४ रोजी अमृतसर जवळील कोटला सुलतान सिंह येथे झाला.तिथेच त्यांचे बालपण गेले.  मोहम्मद रफी आणि संगीत यांचा दुरान्वये संबंध नव्हता. त्यांच्या घरातील कोणताही व्यक्ती  संगीत क्षेत्राशी संबंधित नव्हता. ते लहान असताना आपल्या भावाच्या केश कर्तनलयात आपला फावला वेळ घालवीत. तेंव्हा त्या दुकानाच्या परिसरात एक फकीर आपल्या पहाडी आवाजात गाणी गाताना  रफी यांना दिसायचा. मग हा लहानगा रफी त्यांच्या मागे मागे त्यांची गाणी  ऐकत फिरायचा. ऐकलेली गाणी मग तो आपल्या भावाच्या केश कर्तनालयाच्या दुकानात बसून गायचा.  येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्याचे कौतुक वाटायचे. आपल्या भावाचे होणारे हे कौतुक पाहून त्यांचा भावाने  त्यांना उस्ताद अब्दुल वाहिद खान  यांच्याकडे त्यांना संगीताचा अभ्यास  करण्यासाठी पाठवले. तिथेच त्यांनी संगीताचे प्राथमिक धडे गिरवले. मोहम्मद रफी यांच्या आवाजात गोडवा होता. त्यामुळे त्यांनी गायलेली गाणी लोकांना आवडायची. मोहम्मद रफी यांचा पहिला जाहीर कार्यक्रम वयाच्या अवघ्या  १३ व्या वर्षी लाहोर मध्ये झाला.१९४५ साली गाव की गोरी या चित्रपटात त्यांनी आपले पहिले गाणे गायले.  या दरम्यान त्यांनी दोन चित्रपटात भूमिकाही केल्या. १९४७ मध्ये फाळणीनंतर त्यांनी भारतात राहण्याचा निर्णय घेतला. १९५१ मध्ये संगीतकार नौशाद यांनी बैजू बावरा या चित्रपटात  त्यांना गाण्याची संधी दिली. या संधीचे त्यांनी सोने केले. या चित्रपटातील सर्व गाणी लोकप्रिय झाली.  बैजू बावरा च्या गाण्यांनी रफीजींना मुख्य गायकाच्या रुपात कला क्षेत्रात कायमस्वरूपी स्थान मिळवून दिले. मग मात्र त्यांनी मागे वळून पाहिले नाही.  या चित्रपटानंतर  त्यांना अनेक चित्रपटात गाणी गाण्याची संधी मिळाली. आपल्या जादुई आवाजाने त्यांनी रसिकांवर मोहिनी घातली. त्यांचे गाणी लोकप्रिय होऊ लागली. १९४७ ते १९७० च्या दरम्यान रफीजींनी चित्रपट क्षेत्रात आपल्या जबरदस्त गायनाने चांगला जम बसवला. १९६० चे दशक तर रफीजींचेच होते. १९६० सालीच चौदहवी का चांद या चित्रपटातील शीर्षक गीतासाठी त्यांना फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला.या दशकात त्यांनी गायलेली सर्वच गाणी सुपरहिट झाली. त्यांनी हिंदी भाषेबरोबरच उर्दू, पंजाबी, मराठी आणि तेलगू भाषेत देखील गाणी गायली.गैरफिल्मी, गझल, भजन, क्लासिकल, सेमी क्लासिकल या सर्व प्रकारात त्यांनी गाणी गायली.  आपल्या ३५ वर्षाच्या गायनाच्या कारकिर्दीत रफीजींनी ४००० च्या वर गाणी गायली. रफीजींनी अशोक कुमार, देवानंद, दिलीप कुमार,प्रदीप,विश्वजित,परीक्षित साहनी, बलराज साहनी, भारत भूषण, पृथ्वीराज कपूर  आय एस जोहर, शम्मी कपूर, गुलशन बावरा,जगदीप, गुरुदत्त, गुलशन बावरा, जॉय मुखर्जी, जॉनी वाकर, तारिक हुसेन, नवीन निश्चल, फिरोज खान, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र , जितेंद्र, मनोज कुमार, फिरोज खान, रणधीर कपूर, राजकपूर,  शशी कपूर,  ऋषी कपूर, राजेंद्र कुमार, राजेश खन्ना, विनोद मेहरा,  सुनील दत्त, संजय दत्त,  संजय खान, संजीव कुमार,  आदी सर्व प्रमुख अभिनेत्यांना आपला आवाज दिला. रफीजींना देश विदेशातील अनेक पुरस्कार मिळाले. रफीजींनी आपल्या जादुई आवाजाने मागील चार पिढ्यांना मंत्रमुग्ध केले आहे.  त्यांनी आपला स्वतःचा वेगळा असा चाहता वर्ग निर्माण केला. त्यांची गाणी आजही लोकप्रिय आहेत. अशा या महान भारतीय गायकाचा आवाज ३१ जुलै १९८० रोजी स्तब्ध झाला.  आज रफिजी जरी आपल्यात नसले तरी त्यांच्या आवाजाने ते आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. मोहम्मद रफी यांना स्मृतिदिनानिमित्ताने विनम्र अभिवादन..! 

-श्याम बसप्पा ठाणेदार 
दौंड जिल्हा पुणे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फिलिप रॉड्रिग्ज यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

मुंबई (गणेश हिरवे) शिक्षक नेते शिवाजी शेंडगे आयोजित नुकताच शिक्षक स्नेहमिलन कार्यक्रम दहिसर येथील पूजा हॉल मध्ये संपन झाला.यावेळ...