आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, ३१ जुलै, २०२०

पहिलेपणा - एक सुखद भावना



         प्रत्येकाच्या आयुष्यात या पहिलेपणाच्या घटना असतातच.  आपण जेव्हा मागे वळून पहातो तेव्हा या घटना आपल्याला आठवतातच.  वयाचे एक वर्ष पूर्ण होईपर्यंत प्रत्येक यशाचं आई-वडील व घरातील इतर थोर मंडळींकडून मोठ्या प्रमाणात कौतुक होत असे.   जेव्हा आपण पहिल्यांदा 'हुंकार' देतो तो आनंद आपल्याला जाणवत नाही.  पहिल्या हुंकाराला साक्ष साहजिकच आपली आईच असते.  आपले आई-वडील, काका-काकू तसेच इतर ज्येष्ठ मंडळी यांच्या चेहऱ्यावर जी आनंदाची छटा उमटते व हास्याचा बहर येतो तो आपल्याला आठवत नाही पण आई-वडिलांसाठी ती चिरस्मरणीय घटना असते.  स्वतःच्या स्वतः उठून बसणे ही क्रियाही लक्षात रहाणारी असते.  गळ्यातून बोबडा का होईना पण पहिला शब्द जेव्हा बाहेर पडतो तो क्षण आपण जगत असलो तरी त्याचा आनंद बाकीचे मंडळी जास्त घेतात.  या गोष्टीचा आनंद फार मोठ्या प्रमाणात घेतला जातो.   त्यानंतरचा मोठा आनंद म्हणजे पहिले पाऊल.  लहान बाळ उठून बसले म्हणजे चालणारच.  पण बाळाने पहिले पाऊल टाकले तो दिवस सर्वांच्या तोंडी आज बाळाने पहिले पाऊल टाकले हाच असतो.  दाराला लावलेला अडसर ओलांडून पलीकडे पाऊल टाकलेले असते तोही क्षण फार कौतुकाने सांगितलं जातो.  बाळाला प्रथमच गोळी, चॉकलेट, बिस्कीट इत्यादीची चव लागल्यावर बाळ ते मागून घेते ही गोष्ट सुद्धा उत्साहाने सांगितली जाते.  नंतर बाळाचा पहिला वाढदिवस मोठ्या दणक्यात साजरा केला जातो.  भरपूर प्रमाणात छायाचित्र काढली जातात.  परिस्थितीनुरूप चलतचित्रणही केले जाते.  जन्मभर सांभाळाव्या अशा या आठवणी असतात.  यथावकाश एखाद्या चांगल्या शाळेत नाव नोंदवून शाळेचा पहिला दिवसही चांगल्या प्रकारे साजरा केला जातो.  शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे साहजिकच आई-वडिलांनी मुद्दाम सुट्टी घेतलेली असते.   शाळेत ठोकळ्यावर ठोकळे चढवून मनोरा करतो व तो मनोरा उभा राहाताच टाळल्या पिटून आनंद व्यक्त करतो कारण आपण पहिल्यांदाच त्यात यशस्वी झालेलो असतो.  या सगळ्या पहिलेपणाच्या घटना असतात पण अजाण वय असल्यामुळे त्या लक्षात राहत नाहीत.  आई-बाबानी या आठवणींना मनात जपून ठेवलेले असतात आणि कालांतराने मुलासमोर / मुलीसमोर त्या उलगडून सांगतात. 
        यथावकाश आपल्या मनाची जडणघडण होण्यास सुरवात होते.  विचार परिपक्व होण्यास नुकतीच सुरवात झालेली असते.  आपण स्वतंत्रपणे विचार करू शकतो ही जाणीव पहिल्यांदाच झालेली असते.  वयाप्रमाणे हळूहळू शारीरिक बदल होण्यास सुरवात होते.  प्रत्येक बदल आरशात पहिल्यांदा आपलेच डोळे पहातात.  हा पहिलेपणाचा आनंद विलक्षण आकर्षक असतो.  विशिष्ठ वय झाले की चेहऱ्यावर पुटकुळ्या अथवा तारुण्यपिटिका येतात व महत्त्वाचे म्हणजे पहिल्या प्रथम त्या आपल्यालाच जाणवतात.  पहिल्यांदाच आलेल्या  तारुण्यपिटिकेबरोबरच आपण वयात आल्याची जाणीव आपल्याला होते.  शरीरात होणाऱ्या बदलांकडे जरा निराळ्या रीतीने पहिले जाते.  हे बदल आरशात बघून निरखण्याची ओढ शांत बसू देत नाही.  या वयाला पौगंडा अवस्था असे सर्रास म्हटले जाते.  वयात आल्यावर शरीरात बदल होणे हे निसर्गचक्र आहे.  हे निसर्गचक्र कोणीही बदलू शकत नाही किंवा थांबवूही शकत नाही.  ओठांवर मिसरूड फुटणे त्याचबरोबर गालांवर / हनुवटीवर दाढी येणे हा हा निसर्गक्रमच आहे.   आरशात पाहतांना मिसरूड फुटल्याची जाणीव पहिल्यांदा आपल्यालाच होते.   हा आनंद प्रत्येक पुरूष काही विशिष्ठ वयात घेतच असतो.  मिसरूड फुटल्याचा आनंद समवयस्क मित्रांबरोबर घेण्याचे ते वय असतात.   साधारणतः काही दिवसाच्या अंतराने प्रत्येकाला मिसरूड फुटलेले असते अथवा फुटणार असते.  पण हा पहिलेपणाचा आनंद मित्रांबरोबरच घेण्याचे ते वय असते. मुलींच्या बाबतीतही वयोमानाप्रमाणे बदल घडत असतात पण त्याची चर्चा करणे उचित नाही.  त्यांच्यात होणारे बदलाचा आनंद त्यांना समवयस्क मैत्रीणींबरोबरच वाटत असेल तर त्यात काहीच चूक नाही. असो.   या बदलांमुळे मिळणारे समाधान नेहमीच आनंद द्विगुणित करणारे असते.   तसेच सर्व छान छान दिसू लागते.  प्रत्येक गोष्टीचा आनंद घेण्याकडे कल वाढू  लागतो.   तसेच विविध प्रकारची आकर्षणे त्याचबरोबर मोह आयुष्यात पहिल्यांदाच निर्माण होण्याचे वय.  शाळेत पहिल्यांदा परीक्षा देतांना जी उत्सुकता मनात निर्माण होते अथवा जो आनंद मनात निर्माण होतो तो खरोखरच सुखावणारा असतो.  आपण काही वेगळे करू शकतो  मनोमन पटते.   अर्थात ते वयच तसे असते की थोड्याशा का होईना पण त्या यशानेही हुरळून जाण्यात धन्यता मानली जाते.  अशा वेळेस शाळेकडून / पालकांकडून त्याला चार गोष्टी सांगून तसेच त्याची समजूत काढून  त्याच्यात / तिच्यात निर्माण झालेली 'ग' ची बाधा पहिल्यांदा काढली गेली पाहिजे.  
         आपण आतापर्यंत निसर्गचक्राप्रमाणे लाभलेल्या बदलांचा विचार केला.   प्रत्येक बदल निसर्गबरहुकूम झाल्यामुळे त्याचा आनंद त्या त्या वेळेस पुरेपूर घेतला गेला.  साधारणतः वयाच्या १५ व्या वर्षाप्रमाणे  निसर्गचक्राप्रमाणे लाभलेल्या पहिलेपणाचा आनंद घेता येतो.  शालेय जीवन संपल्यावर पहिलेपणाचा कस लागतो.  शालेय जीवनातील महत्त्वाची शालांत परीक्षा पहिल्यांदा देतांना साहजिकच मनात थोडी धुकधुक, हुरहूर असते.  शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर कोणी महाविद्यालयात प्रवेश घेतात तर कोणी व्यवसायाभिमुख शिक्षणाला पसंती देऊन त्या त्या प्रकारच्या संस्थेत प्रवेश घेतात.   शालेय जीवन संपवून पहिल्यांदाच आपण खऱ्या अर्थाने जीवनातील महत्त्वाच्या टप्प्यावर उभे असतो.  शालेय जीवनात स्पर्धा त्यामानाने सीमित असते पण महाविद्यालय /  व्यवसायाभिमुख शिक्षण यात स्पर्धा खूपच अटीतटीची असते आणि पहिल्यांदाच या स्पर्धेला आपण तोंड देणार असतो.  यात शिक्षण घेणारे शाळेतील विद्यार्थी / विद्यार्थिनींपेक्षा खूपच जास्त प्रमाणात असतात.   पहिल्यांदाच महाविद्यालयात /  व्यवसायाभिमुख शिक्षण संस्थेच्या प्रांगणात प्रवेश करतांना थोडे का होईना पण मनावर दडपण आलेले असते.   मनात पहिल्यांदा एकच विचार येतो की उच्च शिक्षण घेऊन आपली कारकीर्द घडवायची किंवा व्यवसायाभिमुख शिक्षण घेऊन आवडीच्या व्यवसायात नैपुण्य प्राप्त करून यशाचे शिखर गाठायचे याकरता प्रचंड मेहनतीची गरज असते.  कारकीर्द घडविण्याच्या पहिल्या टप्प्यावर आपली विद्वत्ता दाखवून यशस्वी होण्याचा मान मिळवणे ही प्रत्येकाची / प्रत्येकीची इच्छा असते.  साहजिकच पहिल्यांदाच अनोळखी विद्यार्थी / विद्यार्थिनींसमवेत शिकण्याची वेळ असल्यामुळे थोडे अवघडल्यासारखे होते.  अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वयाच्या विशिष्ठ टप्प्यावर निसर्गनियमाप्रमाणे प्रेमभावना नकळत निर्माण होते.  पहिले प्रेमही याच टप्प्यावर आकार घेऊ लागते.  याचाच अर्थ प्रेमाच्या पहिलेपणाचा अनुभव, जाणीव, मनाची तरलता,  भावनिक गुंतागुंत या भावनाही याच टप्प्यावर मनावर गारूड करून जातात.   
      त्यामुळेच पहिल्यांदाच अशी जाणीव होते की शालेय जीवनात पहिला येणार / येणारी महाविद्यालय /  व्यवसायाभिमुख शिक्षण घेतांना प्रथम क्रमांकांनी उत्तीर्ण होईलच याची शाश्वती कोणालाही देता येणार नाही.   एव्हढे मात्र खरे की पहिल्या प्रथम जाणीव होते की उच्च शिक्षण घेऊन आपली कारकीर्द घडवायची किंवा व्यवसायाभिमुख शिक्षण घेऊन आवडीच्या व्यवसायात नैपुण्य प्राप्त करून यशाचे शिखर गाठायचे याकरता प्रचंड मेहनतीची गरज असते.  कारकीर्द घडविण्याच्या पहिल्या टप्प्यावर आपली विद्वत्ता दाखवून प्रथम येण्याचा मान मिळवणे ही प्रत्येकाची / प्रत्येकीची इच्छा असते. 
       जसजशी परिपक्वता वाढत जाते त्याप्रमाणात पहिला येण्याचा मान मिळवणे यामागील प्रचंड मेहनत तसेच विद्वत्ता याची फार जवळून ओळख करून घ्यावी लागते.   महाविद्यालय /  व्यवसायाभिमुख शिक्षण घेतांना पहिल्याच प्रयत्नात प्रथम क्रमांकांनी उत्तीर्ण झाल्यावर समाजात जो मान मरातब मिळतो ती अवीट भावना मनातील एका कोपऱ्यात जपून ठेवलेली असते.  समाजात / व्यवसायात फार अदबीने नाव घेतले जाते.  अशावेळेस आपण पहिल्यांदा एव्हढे मोठे यश मिळविले आहे ही भावनाच सुखावून जाते.  पहिला येणे ही भावना काय असते हे कोणत्याही स्पर्धेतील खेळाडूंना विचारले तर ते त्याचे महत्त्व फार चांगल्या रीतीने पटवून देऊ शकतील.  धावण्याच्या स्पर्धेतील धावपटूच सांगू शकतो की पहिला येणे ही काय भावना आहे ते.  पण हेही महत्त्वाचे आहे की तो पहिल्यांदा या शर्यतीत सहभागी झाला तेव्हा त्याची भावना काय होती किंवा त्याने मनाशी काय ठरविले होते.  
         तसेच एखाद्या वाद विवाद स्पर्धेत पहिल्यांदा भाग घेतल्यावर जो आनंद मिळतो तो शब्दात वर्णन करणे कठीण आहे.  त्यातच प्रथम क्रमांक मिळविला तर त्याच्या विद्वत्तेचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होते.  तीच गोष्ट लेख, कथा, कविता अथवा इतर साहित्य या बाबतीत सांगता येईल.  आयुष्यात पहिल्यांदा हातून काही लिखाण झाले तर ती फार अभिमानाची गोष्ट वाटते.  बक्षिसे मिळो अथवा न मिळो पण मी पहिल्यांदाच काही लिहिले आहे याचा आनंद पुढील लिखाणाला स्फूर्ती देणारा ठरतो.  स्पर्धेत पहिले बक्षिसे मिळणे म्हणजे तुमचा शब्दसंग्रह, भाषेवरील प्रभुत्व,  विचार मांडण्याची कला इत्यादी गोष्टींना त्या त्या क्षेत्रातील प्रथितयश व्यक्तींनी दिलेली पावती / शाबासकी असते.  अशा पहिल्या आलेल्या व्यक्तींचे गोडवे गायले जातात.  त्यांचा यथोचित मानसन्मान ठेवला जातो.  
        शेवटी एव्हढेच सांगता येईल की प्रथम पुरस्कार मिळविणे अथवा पहिला नंबर पटकाविणे यापेक्षाही पहिल्यांदा प्रयत्न करणे हे जास्त समाधान देणारे असते.  यास आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे.  काही वयस्कर मंडळींकडून असेही सांगितले जाते की प्रथम क्रमांक मिळवणे हे जरी यशस्वितेचे गमक असले तरी पहिल्यांदा जेव्हा प्रयत्न केला त्यात या यशाचे मूळ आहे. 

-मिलिंद कल्याणकर 
नेरुळ, नवी मुंबई 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फिलिप रॉड्रिग्ज यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

मुंबई (गणेश हिरवे) शिक्षक नेते शिवाजी शेंडगे आयोजित नुकताच शिक्षक स्नेहमिलन कार्यक्रम दहिसर येथील पूजा हॉल मध्ये संपन झाला.यावेळ...