आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, ३१ जुलै, २०२०

साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

          

     आज लोकशाहीर व समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांची जयंती. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात १ ऑगस्ट १९२० रोजी भाऊ शिदोजी शिंदे व वालुबाई यांच्यापोटी अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला. म्हणजे हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. अण्णाभाऊंची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची व गरिबीची होती. त्यामुळे अण्णाभाऊ शिक्षण घेऊ शकले नाही. अण्णाभाऊ फक्त दीड दिवस शाळेत गेले. पुढे आण्णाभाऊंचे कुटुंब मुंबईला गेले. तेथील झोपडपट्टीतच ते लहानाचे मोठे झाले. अण्णाभाऊ हे मातंग समाजातले, हा समाज त्यावेळेच्या  विषमतावादी  संस्कृतीत तळाशी असणारा समाज  त्यामुळे अण्णाभाऊंनाही या विषमतावादी संस्कृतीचे, जातिभेदाचे चटके सहन करावे लागले. याच विषमतावादी संस्कृतीचा अण्णांना राग होता. आम्हीही माणसे आहोत आम्हालाही स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार आहे असे ते म्हणत हा अधिकार मिळत नसल्याने ते पेटून उठले. १९४४ साली त्यांनी लाल बावटा पथक स्थपन केले आणि बघता बघता ते शाहीर झाले. माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची झालिया काहिली....ही त्यांची लावणी खूप गाजली. त्यांनी लिहिलेल्या  लावण्या, पोवाडे खूप गाजले. अण्णाभाऊ जरी दीड दिवस शाळेत गेले असले तरी ते जगात महान साहित्यिक म्हणून ओळखले जाऊ जातात. अण्णाभाऊंनी आपले उभे आयुष्य चिराग नगरच्या झोपडपट्टीत घालवले. तिथेच एकापेक्षा एक अशा दर्जेदार कलाकृतींची निर्मिती झाली. ग्रामीण भागातील पददलित व लाचारीचे जीवन जगणारी माणसे, अन्यायाविरुद्ध पेटून उठणारी माणसे त्यांनी आपल्या खास शैलीतून उभी केली. फकिरा सारखा जन्माने मातंग असणारा नायक, एक अजस्त्र ताकदीचा व धैर्याचा महामेरू भारतीय स्वातंत्र्याच्या रणांगणात दिन दलितांच्या व उपेक्षितांच्या वतीने लढणारा नायक म्हणून त्यांनी फकिरा मध्ये उभा केला. फकिरा ही कादंबरी म्हणजे त्यांच्या साहित्य कलेचा कळस आहे. ही कादंबरी आजही लोकप्रिय आहे. बेस्ट सेलर म्हणून विकली जाणारी ही कादंबरी अनेक विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आहे. मास्तर, माकडीचा माळ, भुताचा माळ, गुलाम,  वारणेचा वाघ, चिराग नगरची भुते, चित्रा या त्यांच्या कादंबऱ्या देखील खूप लोकप्रिय झाल्या. त्यांनी ३५ कादंबऱ्या, ३ नाटके, ११ लोकनाट्ये, १३ कथासंग्रह आणि ७ चित्रपट कथा लिहिल्या. जगातील २७ भाषांमध्ये अण्णाभाऊंच्या साहित्याचे भाषांतर झाले आहे. १९५७ मध्ये झालेल्या दलित साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांचे योगदान अनन्यसाधारण असे आहे.  संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्यांनी कामगार जागा करून त्यांची एकजूट संघटना निर्माण केली. डॉ बाबासाहेब आंबेडकरांना ते आपला गुरु मानत. डॉ आंबेडकरांच्या महानिर्वानानंतर त्यांचे कवन जग बदल घालुनी घाव,  सांगून गेले मज भीमराव... प्रसिद्ध झाले. फकिरा ही कादंबरी अण्णाभाऊंनी डॉ आंबेडकरांच्या विचारांना अर्पण केली होती. गोरगरीब, दिन दलितांच्या मनावर आपल्या लेखणीने अधिराज्य गाजवणाऱ्या या महान लोकशाहिराचे निधन १८ जुलै १९६९ रोजी झाले. हे वर्ष लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे या वर्षाचे औचित्य  साधून केंद्र सरकारने त्यांना मारोणोत्त भारतरत्न किताब देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करावा. साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! 

-श्याम बसप्पा ठाणेदार 
 पुणे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फिलिप रॉड्रिग्ज यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

मुंबई (गणेश हिरवे) शिक्षक नेते शिवाजी शेंडगे आयोजित नुकताच शिक्षक स्नेहमिलन कार्यक्रम दहिसर येथील पूजा हॉल मध्ये संपन झाला.यावेळ...