आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, १ जून, २०२०

शाहिरीतून कोरोनाशी लढणारा कोवीड योध्दा शाहीर शंकर भारदे गुरुजी


कोरोना,कोविड१९ संकट येऊन दोन महिने उलटून गेले असले तरी अजूनही आपण लॉकडाऊन मध्ये घरीच थांबलेलो आहोत.एका प्रकारे हे शीत युद्ध असून अराजकतेची चाहूल म्हणावी लागेल.ज्यावेळी कोरोनाचा भारतात शिरकाव झाला तेव्हापासून आजतागायत या घडीचे देवदूत असणारे डॉक्टर्स, नर्स, पोलीस, सफाई कर्मचारी आणि प्रशासन कोरोनाशी दोन हात करून लढत आहेत.हे संकट  एवढ्यात न संपणारे असून सुद्धा कुणीही हार मानलेली नाही.उलट त्याहीपेक्षा जास्त निकराने सारेजण झुंज देत आहेत.ही लढाई आपण जिंकणारच यात शंका नाही.पण हे बळ,प्रेरणा,आणि मनोबल वाढवणारी वीररस गीतं सुद्धा देश सेवेचे कार्य करीत असतात हे ही खरे.देशभक्तीपर गाण्यातून, आपल्या लेखणीतून देशसेवेचे कार्य करणारी ही कलाकार मंडळी एका प्रकारे योध्येच आहेत.याचपैकी कार्यरत असणारे एक योध्ये म्हणजे जाखडी कलेतील सर्वोच्च पदी विराजमान असलेले लोकशाहिर शंकर भारदे गुरुजी होय.


महाराष्ट्र गौरव भूषण पुरस्कार प्राप्त भारदे गुरूजीनी देखील या लॉकडाऊनच्या काळात एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल आठ स्वरचित गाणी संगीतबद्ध केली आहेत.या महामारी काळात धैर्य,उमेद,आणि लढण्याची ताकद देऊन खऱ्या अर्थाने महाराष्ट्रासाठी या गाण्यांमधून सामाजिक संदेश देऊन भरीव योगदान दिले आहे असेच म्हणावे लागेल. एका कलावंत म्हणून कलेच्या माध्यमातून दोन महिन्यात आठ गाण्यांची निर्मिती करणारा पहिलाच अवलिया कलाकार असू शकेल. हे शाहिरांनी केलेले लोकजागरण म्हणावे लागेल. निश्चितच हे कार्य कौतुकास्पद आहे.याची दखल आज ना उद्या नक्कीच घेतली जाईल.महाराष्ट्राला लोककलेची परंपरा लाभलेली आहेच.ज्या ज्यावेळी राष्ट्रावर,राज्यावर  नैसर्गिक आपत्ती आली, फाळणी समर झाली,आणीबाणी आली त्या त्यावेळी लोकशाहिरांनी त्यांच्या गीतातून समाज प्रबोधन केले.जनजागृती केली आणि आपल्या कलेतून त्यांनी चळवळ उभी केली. डफावर थाप मारीत, बेफाम होऊन,भारदस्त आवाजाने वादळे उठवून, चांगल्या गोष्टींना समर्थन देऊन,देशहिताचे मौलिक काम आजवर अनेक शाहिरांनी केले आहे.आजच्या घडीला भारदे गुरुजींनी हा अतुल्य वारसा पुढे चालू ठेवला आहे.त्यांनी शाहिरी कला जतन करताना त्यांच्या शिक्षकीपेशा बरोबर शाहिरीपेशा अविरत जपून कलेचे पावित्र्य राखले आहे. म्हणूनच महाराष्ट्राच्या मातीत त्यांचा आस्मानी सूर या कोरोनाच्या संकट काळात नवी उभारी आणि चैतन्य निर्माण करण्याचे बळ देत आहे मात्र नक्की.


या आठ गाण्यांमधील सर्वात मनाला भिडणारे हृदयस्पर्शी गाणे म्हणजे..


"पोलीस डॉक्टर शेतकरी

झालेत आमचे कैवारी

तेच वाचवतील आपला देश

आजला हेच आपले 

ब्रम्ह विष्णू महेश"


साक्षात दत्ताची उपमा देऊन त्यांचे मनोबल वाढवले आहे.या गाण्यात नर्स, डॉक्टर यांचे विशेष उपकार देशावर आहेत असे म्हटले आहे.तर पोलिसांना "खाकीवर्दीतला विघ्नेश" संबोधले आहे.शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून "विश्वाचा परमेश" उपाधी देऊन त्याचे आभार मानले आहेत.हे गीत सर्वाना आवडले असून भावना व्यक्त करण्यासाठी विविध स्तरातून  गुरुजींना फोन आणि मॅसेज येत आहेत. 


तर दुसरे गाणे हे 'घरी थांबा सुरक्षित रहा' यावर आधारित आहे. गुरुजी म्हणतात


"देवासारखे देव मंदिरात

दार लावूनी बसले

मग तुम्हाला घरी बसायचे

संकट कसले

कोरोनाच्या विळख्यात

सारे विश्व हे फसले

मग तुम्हाला घरी बसायचे 

संकट कसले"


या गाण्यातून गुरुजींनी लोकांना लॉकडाऊन काळात घरी बसण्याचे आव्हान केले आहे.

त्यांचे तिसरे गाणे हे घरी बसून काळजी कशाप्रकारे घ्यावी याचे अचूक वर्णन कमी शब्दांत तंतोतंत केले आहे.यावर ते भाष्य करताना म्हणतात..


"कोरोनाची महामारी

देशावर संकट भारी

बाहेर पडू नका घरात बसा

कुटुंबात बसुनी खेळा हसा"


यामध्ये मास्क लावणे,साबणाने हात धुवणे,सोशल डिस्टन्स पाळणे ही तत्व सहज आणि सोप्या भाषेत शब्दांची रचना गुंफली आहे


कोरोनाच्या काळात अनेक नात्यांची ताटातूट झाली यावर मायलेकाची भेट होत नाही.जे मुंबई आणि पुण्यात अडकून पडले आहेत पण आपल्या गावाकडे जाता आले नाही त्यांची व्यथा या गाण्यातून मांडली आहे.गुरुजीनी आईची तळमळ व्यक्त करून तिच्या भावनांची वाट सदर रचनेतून मोकळी करून दिली आहे.आजपर्यंत आईवरून रचलेली गुरुजींची सर्व गाणी जशी डोळयातून पाणी आणतात तसेच हे ही गाणे  ऐकून डोळ्यातील पाणी गालावर कधी ओघळवते कळत नाही.ह्या गाण्याचे बोल काळीज चिरणारे आहेत.


"तुला भेटण्याची मजला 

झाली रे घाई

गावी कधी येशील बाळा

वाट बघते आई"


सहज सुंदर,साधी चाल ही गुरुजींची खासियत असून त्यांच्या शब्दात एवढी प्रतिभा आहे की रसिकांच्या मनातील उचंबळून आलेली भावना गाण्यातून सहजरित्या मांडतात.लिहितात.गातात.


महाविकास आघाडी सरकार कोरोना काळात आपली जबाबदारी चोख बजावत आहेत. त्यालाच धरून पुढचे गाणे गुरुजीने लिहले आहे.त्या शब्दांची जुगलबंदी खालील गाण्यात बघायला मिळते.

"घड्याळ बांधून हातामध्ये

घेतलाय धनुष्यबाण

शासन आपली कोरोनाची

उडवील दाणादाण"

त्याचप्रमाणे या लॉकडाऊन दिवसात पोलिसांवर खुप हल्ले झाले.या हल्ल्याचा निषेध म्हणून कायद्यात आवश्यक बदल करणे गरजेचे आहे.त्यांच्या शब्द सुमनातून गाण्याची माळ तयार होते. यावर गुरुजी कडाडतात..


"कायदा कडक बनवा

त्याची गरज आहे आज

पोलिसांवर हात उगारील

त्याचा उतरा माज..."


या काव्यातून त्यांनी महाराष्ट्र पोलीस देशात अव्वल असल्याचे  म्हटले आहे. कोरोनात शहीद झालेल्या पोलिसांना मानवंदना दिली आहे.
त्याचबरोबर "मुंबईचा नवरा हवा" "साहेब आम्हाला गावाला जाऊ द्या" अश्या आशयाची गाणी सुद्धा खूप गाजत आहेत.
तसेच "करोना वायरस देवा नको येउ दे गावात" हे गाणं तर प्रचंड लोकप्रिय झाले . या गाण्याचे टिक टॉक तसेच हॅलो अँप वर शेकडो व्हिडीओज बघायला मिळतात.
या कोरोना काळातच नाही तर अनेक संकटसमयी गुरुजींनी आपली लेखणी धारधार करून अनेक गीतांची निर्मिती स्वतः केली आहे. मग महाड पूल दुर्घटना असो,तिवरे धरण फुटी असो वा त्सुनामी.कोकणातील अन्यायाला वाचा फोडण्याचे काम गुरुजी अनेक वर्षे जाखडी कलेतून आणि त्यांच्या प्रखर गीतातून करत आले आहेत.
आज कोरोना वायरसचे जगावर संकट आले असून प्रत्येकाला त्याची भीती आहे.अनेक करोना योद्धे आपल्या जीवाची बाजी लावून या लढाईत सामील होत आहेत.त्या सर्वांना माझा सलाम आहेच.पण जगण्याची थोडीतरी प्रेरणा कुठून मिळत असेल तर ती गीतातून,कवितेतून.अन हीच प्रेरणा देण्याचे काम भारदे गुरूजी यांनी त्यांचा गाण्यातून केली आहे.खऱ्या अर्थाने ते ह्या कोविड युद्धात घरात राहून खरी देशभक्ती गीतातून अर्पण केली आहे.ते आणि त्यांची गाणी "कोविड योध्दा" म्हणून गीत भावनेतून लढत आहेत. म्हणून या

लोक शाहिर भारदे गुरुजींना माझा त्रिवार सलाम!!

-लेखक -भावेश द.लोंढे (भावी)
उन्हवरे दापोली
संकलन- शांताराम गुडेकर 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

गोरेगाव येथे श्री स्वामी पुण्यतिथी उत्साहात संपन्न!

मुंबई : गोरेगाव (पूर्व) येथील, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) व नागरी निवारा परिषद गणेश...