आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, २९ मे, २०२०

ऋषीतुल्य व्यक्तीमत्व लोपले !


 काविळ उतरवणे ही अंधश्रद्धा वाटते आजही, काहींना. पण ज्याचे शरीर खंगते, गुडघे वेदना ओकत असतात. जेवणावरची इच्छा उरते आणि कधी कधी जगण्याची आशाही सुटते, तेव्हा हजारो विज्ञानवादी अंधश्रद्धा बाजूला सारून धुतुमला येत असतात. त्यात काही सिनेकलाकारही असत. एकेकाळचा सुपरस्टार राजेश खन्ना हे सुद्धा अनुभव घेण्यासाठी आले होते. जिथे विज्ञानाशी सीमा येते तेव्हाच अध्यात्म सुरू होतो. काविळ उतरवणे ही आध्यात्मिक शक्ती आहे, तो दिक्षेतील उत्तम प्रकार आहे.
 ...................................................................


 ‘सेवेशी तत्पर, हरिश्‍चंद्र ठाकूर’, अशी अविरत जीवनधारा जगून सुख, समाधानाने जगाचा शांतपणे निरोप घेताना धुतूम येथील एका ऋषीतुल्य व्यक्तिमत्वाला दाटलेल्या कंठाने आणि डबडबलेल्या अश्रू नयनांनी काल निरोप देण्यात आला. तेव्हा काही क्षणांसाठी स्वर्गलोकही हळहळले असेल. आयुष्यभर ज्या भगवान दत्तात्रेयांवर दृढ श्रध्दा ठेवून लाखो लोकांना मृत्यूच्या दाढेतून परत आणले आणि त्याचा हिशेब ठेवताना चक्क चित्रगुप्तही गडबडले असतील, ते सेवाव्रती हरिश्‍चंद्र कृष्णा ठाकूर उर्फ आप्पा यांचे काल देहावसन झाले. तेव्हा खरंच त्यांच्यासाठी भगवंताने पुष्पक पाठविले असेल.
 ऋषीतुल्य माणसं जेव्हा वानप्रस्थाला निघतात तेव्हा यमराज त्यांना नेण्यासाठी येत नसतो, तर ती आपत्कालीन व्यवस्था साक्षात वैकुंठपती स्वतः हाताळत असतात. तेच पुष्पकाची यंत्रणा कार्यान्वित करतात आणि स्वतः सारथ्य करतात. इतक्याचसाठी, ‘मरावे परी कीर्तीरुपी उरावे’, असे सत्कार्य हातून घडावे असा जीवनाचा साधा सरळ अर्थ आहे.
   मोह, मायेसारख्या षड्रिपुंना कोहळून प्यालेली ही माणसं सत्कार्य आणि परोपकाराकरिता जन्माला येतात. त्यांना स्वतःसाठी काहीच नको असते. समाज म्हणून ते गुलमोहरासारखे सदैव टवटवीतपणे फुलत असतात आणि इतरांना तो टवटवीतपणा, ती प्रसन्नता देत असतात. चंदनाच्या वनात विषासोबत राहूनही लाखो लोकांच्या आयुष्यात सुगंध वाटणारे हे बहुआयामी व्यक्तिमत्व होते.
   धुतुमचे काविळ उतरवणारे आप्पा, हे नाव खरं तर एव्हाना गिनिज बुकमध्ये असायला हवे होते. इतकी कार्याची विशालता. पण अंगी विरक्तपणा आला की, ही सारी सुखे त्या व्यक्तित्वाला विषासारखी भासू लागतात. त्यात ते दत्तभक्त, म्हणजे विरक्तीचे परमोच्च शिखर असल्याने प्रसिद्धीच्या वावटळीपासून दूर राहून दारासमोर नदीसारख्या वाहणार्‍या खडकावर चुन्याच्या माध्यमातून माणसांचे मळे पिवळ्या पानातून फुलवत राहिले, निर्व्याजपणे.
   आप्पा यांचे वडील कृष्णाजी ठाकूर यांच्या तरुणपणाच्या काळात, माणसं आज जशी पृथ्वीतलावर कोरोनाने मरत आहेत तशी पटकी, काविळने मरत होती. ते दृश्य पाहून ते कासाविस झाले. त्यांनी काविळ उतरवून घेण्याचे मंत्रोंपच्चार अंगिकारले. ज्याला काविळ झाली आहे, त्याच्या हाताला साधा चुना लावून आपल्या मनगटावरुन ओढून काविळ उतरवण्याची प्रथा त्यांनी सुरू केली. तोपर्यंत भारतात काय जगाच्या पाठीवर कुठेच हेपीटायसीस-बी ची लस उपलब्ध नव्हती. तेव्हा हा अवलिया हे सत्कार्य करत होता. त्यांच्यानंतर आप्पांनी वडिलांकडून दीक्षा घेतली. आज आप्पांचे चिरंजीव दत्ता हा वारसा समर्थपणे पुढे चालवत आहेत.
 आप्पा अलीकडे वार्धक्याकडे झुकत चालले होते, तरीही त्यांची सेवा सुरूच होती. वयाच्या 81 व्या वर्षांपर्यंत म्हणजे जवळपास त्यांनी साठ वर्षांहून अधिक काळ हा यज्ञ मांडला आहे.
 ज्ञानेश्‍वर माऊलीने भिंत चालवली, रेड्याच्या तोंडून मंत्रघोष करून घेतला. काशी येथे गेल्यावर तेथील पुजार्‍याने माऊलीच्या हाती पेंढा दिला आणि मंदिरातील पाषाणाच्या नंदीच्या मुर्तीला तो भरविण्यास सांगितले. तेव्हा माऊली म्हणाली असले काही चमत्कार आपल्याला जमत नाही. यावर त्या पुजार्‍यांनी गुरु निवृत्तीनाथांना विनंती करून, भिंत चालविणार्‍या, रेड्याला बोलते करणार्‍या योग्याला हे अशक्य कसे असेल? आपणच आज्ञा करावी असे सुचविले. तेव्हा गुरूच्या आज्ञेनुसार माऊलीने ते सुके गवत नंदीच्या तोंडाशी धरले आणि हलक्याशा स्पर्शाने दीक्षा दिली नंदीला. ... आणि आश्‍चर्य वर्तले, नंदीने ते गवत सर्वांसमक्ष खाल्ले. माऊलीच्या डोक्यावर पगडी असलेला आपण एक फोटो पाहतो, ती पगडी काशीच्या ब्राह्मणांनी देऊन आळंदीच्या लेकरांचा केलेला तो सन्मान होता. तोच हा स्पर्श दिक्षेतील प्रकार आहे. यात थोतांड नाही, अंधश्रद्धा तर मुळीच नाही. यात निखळ त्याग आहे.
 नेहमी विडा खाणारे असले तरी एखाद दिवशी चुकून विड्याला चुना जास्त लागला तरी तोंडाची आग होते. इथे दररोज हजारो माणसं मुंगी सारखी रांग लावून चुना त्यांच्या मनगटावरुन दोन्ही हाताने जोर लावून घासून ओढत असतात. त्याची वेदना आप्पा कधी कुरवाळत बसले नाही, त्यांची चिंता त्या भगवंताने वाहिली होती. सकाळपासून दुपारपर्यंत आणि संध्याकाळी हे सत्कार्य अव्याहतपणे न थकता सुरूच होते.
 आप्पांनी जर प्रत्येकाकडून एक-एक रुपया जरी घेतला असता तरी आप्पांच्या घरावर सोन्याची कौले पडली असती. ते त्यांच्या हातून घडणे शक्य नव्हते. घडले नाही. म्हणूनच लाखो लोकांना आप्पांच्या जाण्याची बातमी कळत गेली तशी ती हळहळली. याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा.
 आप्पांचे आयुष्यच गोड होते, तोच गोडवा त्यांची पुढची पिढीसुद्धा ‘कर्मण्येवाधीकारस्ते’ या गीतेतील तत्वाने जगत आहे. तेव्हा आप्पा समाधानाने पुढच्या प्रवासाला निघाले. त्यांच्या जाण्याने एका ऋषीतुल्य व्यक्तिमत्वाचा अस्त झाला असला भौतिकदृष्ट्या तरी ते कार्याने चिरंजीवी राहतील.
 त्यांच्या चरणी आम्ही नतमस्तक आहोत!

- कांतीलाल कडू (संपादक -दै. निर्भीड लेख )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संदीप परब यांना राज्यस्तरीय "शिक्षण दर्पण" पुरस्कार प्रदान

मुंबई (गणेश हिरवे)  दि.०१ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद, उल्हासनगर आणि कवयि...