मुंबई (सतीश पाटील) : आतुरतेने वाट बघत असलेला आगरी युथ फोरम या सेवाभावी संस्थेचा आगरी महोत्सव डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात दिमाखात रंगणार आहे. गेली २० वर्ष आपली वेगळी छाप उमटवणारा आगरी महोत्सव यंदाही डोंबिवलीतील ह.भ.प. सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुलनात १२ डिसेंबर ते १९ डिसेंबर या कालावधीत संपन्न होणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुलाब वझे व यंदाच्या आगरी महोत्सवाचे नवनिर्वाचित अध्यक्ष :शरद पाटील यांनी दिली.
आगरी समाज मुंबई-कर्जत-कसारा पासून थेट ठाणे रायगड जिल्ह्यात विखुरलेला असल्याने आगरी समाजाची संस्कृती परंपरा टिकविण्याचे कार्य आगरी युथ फोरम ही संस्था गेली दोन दशकांहून अधिक काळा पासून अविरत करीत आहेत. यंदाच्या आगरी महोत्सवाचे उद्घाटन भारतीय क्रिकेट संघातील माजी कसोटी क्रिकेट पट्टू नीलेश कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्यासह आगरी समाजाचे ज्येष्ठ नेते राम ठाकूर, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, ज्येष्ठ नेते दशरथ पाटील, माजी केंद्रीय मंत्री कपील पाटील, वनमंत्री गणेश नाईक, खासदार सुरेश म्हात्रे, संजय पाटील, श्रीकांत शिंदे आदी उपस्थित राहणार आहेत.
आगरी महोत्सवात आगरी संस्कृती आणि परंपराचे दर्शन घडविले जाते. सांस्कृतिक कार्यक्रमांसह आगरी खाद्य पदार्थ्यांची मेजवानी असते. तसेच समाज प्रबोधनपर चर्चा सत्रे आणि व्याख्यानेंचे आयोजन केले जाते. नव कलाकरांना एक सांस्कृति व्यासपीठ उपलब्ध करुन दिले जाते अशी माहिती महाेत्सवाचे आगरी युथ फाेरमचे अध्यक्ष :गुलाब वझे यांनी दिली आहे. यंदा महोत्सवाचे अध्यक्षपद शरद पाटील यांना देण्यात आले आहे. हा आगरी महाेत्सव म्हणजे आगरी कोळी संस्कृतीचा मिलाप असतो.
या महोत्सवात दि. बा. पाटील एक व्यक्तीमत्व या परिसंवादात दि. बा. पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील सहभागी हाेणार आहेत. भजन संध्या कार्यकर्म ही पार पडणार आहे. दत्ता पाटील सिद्ध हस्त गीतकार या कार्यक्रमातून दत्ता पाटील यांच्या स्मृतींना उजाळा दिला जाणार आहे. १५ डिसेंबर रोजी प्रगती कॉलेजमध्ये आगरी बोलीभाषा साहित्य संमेलन आयोजित केले आहे. त्याचबराेबर बाेलीभाषा साहित्य व समाज या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादात डॉ. मिलिंद जोशी यांच्यासह डॉ.श्रीपाद जोशी, डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. वर्षा तोडमल आदी सहभागी होणार आहेत. एआय या विषयावर डॉ.अच्युत गोडबोले हे मार्गदर्शन करणार आहेत. वयात येताना काय काळजी घ्यावी या विषयावर डॉ. गायत्री पाटील यांचे व्याख्यान होणार आहे .
आगरी महोत्सवातून जमा होणारा निधी हा समाज कार्यासाठी खर्च केला जातो. एक लाखाहून अधिक निधी पुरस्कारावर खर्च केला जातो. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो. समाजातील होतकरु गरजू विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये या प्रमाणे पाच लाखाचा निधी खर्च केला जातो.
यासाठी संस्थेचे अध्यक्ष गुलाबराव वझे, कार्याध्यक्ष जालिंदर पाटील, उपाध्यक्ष विश्वनाथ रसाळ, खजिनदार पांडुरंग म्हात्रे, शरद पाटील, विजय पाटील, नारायण महाये, कांता पाटील, अनंत पाटील, दीपक पवार, वासुदेव पाटील यांच्यासह सल्लागार आणि त्यांचे सर्व सहकारी महोत्सव सुनियोजन करून महोत्सव यशस्वी करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत.
दररोज राजकिय, सामाजिक, साहित्यिक, कला-क्रिडा क्षेत्रातील अनेक नामवंत मान्यवर याच व्यासपीठावर गप्पागोष्टी साधणार आहेत. याशिवाय विविध गृहोपयोगी वस्तू, इलेक्ट्रानिक वस्तू, आगरी समाज संस्कृतीचे दर्शन घडवणारे स्टाल, वैशिष्ठेपूर्ण सुकी मासळी बाजार, खवैय्यांसाठी स्वादिष्ट आगरी पद्धतीच्या व इतर खाद्य पदार्थांचे स्टॉल तसेच सामाजिक संस्थांचेही स्टॉल आहेत. सर्वांसाठी सर्वकाही, मनोरंजनासाठी आकाश पाळण्यासारखी अनेक साधने असणारा आगरी महोत्सव नव्या रंगात, नव्या ढंगात डोंबिवलीत धुमधडाक्यात 12 डिसेंबर मध्ये होत आहे. तरी सर्व समाज, संस्कृती,खवय्ये , संगीतप्रेमी, कलाप्रेमी,क्रीडा, साहित्यप्रेमी एकाच प्लॅटफॉर्मवर याचा मनमुराद अवश्य लाभ घ्यावा!