आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, १० ऑक्टोबर, २०२६

आंदोलनासाठी १२ ऑक्टोबरला सेझ बाधित पेण मध्ये एकवटणार ! शेतकऱ्यांची जमीन हडप कारस्थानाच्या विरोधात शेतकऱ्यांचा संघर्ष

 पेण (विशेष प्रतिनिधी) : राष्ट्राच्या विकासाचे आणि सार्वजनिक प्रयोजनाचे खोटे आमिष दाखवून सन २००६ मध्ये महामुंबई विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्पासाठी साठेखताच्या माध्यमातून घेतलेल्या पेण, उरण आणि पनवेल तालुक्यातील ४५ गावां मधील हजारो शेतकऱ्यांच्या हक्काच्या सुपीक जमिनी बेकायदेशीरपणे 'शासन जमा' करण्याचा अथवा एमएमआरडीए (MMRDA) सारख्या परक्या प्राधिकरणांच्या घशात घालण्याचा अत्यंत गंभीर प्रशासकीय आणि राजकीय घाट राज्य सरकारने घातला आहे. केंद्र सरकारचा मूळ सेझ परवाना केव्हाच मृत झाला असून, १८ फेब्रुवारी २०११ रोजी भूसंपादन अधिसूचना अधिकृतपणे रद्द झाली आहे' तरीही गेल्या १५ वर्षांत महसूल प्रशासनाने शेतकऱ्यांची नावे ७/१२ उताऱ्यावर पूर्ववत दाखल न करता चालवलेली अक्षम्य दिरंगाई आता शेतकऱ्यांच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेली आहे. या पार्श्वभूमीवर, महसूल विभागाच्या दडपशाही आणि कारस्थानाला तीव्र विरोध करण्यासाठी 'सेझ विरोधी शेतकरी हक्क संघर्ष समिती, रायगड' च्या नेतृत्वा खाली सोमवार, दिनांक १२ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ठीक १०:०० वाजता उपविभागीय अधिकारी (प्रांत) कार्यालय, पेण समोर शेतकऱ्यांचे शांततामय पण अत्यंत तीव्र धरणे आंदोलन छेडण्यात येणार असल्याची अधिकृत नोटीस प्रशासनाला देण्यात आली आहे.
      या ऐतिहासिक लढ्याचे कायदेशीर गांभीर्य मांडताना संघर्ष समितीने प्रशासकीय दुटप्पीपणावर थेट बोट ठेवले आहे. याच प्रकल्पांतर्गत बाधित झालेल्या १५० पेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या ७/१२ उताऱ्या वरील सेझचे बेकायदेशीर नाव कमी करून महसूल विभागाने त्यांचे नाव मालक सदरी पूर्ववत दाखल केले आहे. त्यामुळे भारतीय राज्यघटनेच्या 'कलम १४' (समानतेचा हक्क) नुसार, सर्व बाधित खातेदारांना तोच समान आणि घटनात्मक न्याय लागू करून उर्वरित ४,५०० पेक्षा अधिक एकर जमिनीच्या मूळ शेतकरी मालकांना विनाअट पूर्ववत नावे करणे' महसूल प्रशासनावर कायदेशीररित्या बंधनकारक आहे. एकाच प्रकल्पातील काही शेतकऱ्यांना जमिनी परत द्यायच्या आणि बहुतांश गरीब शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडायचे, हा प्रशासनाचा उघड भेदभाव असून या विरुद्ध आता तिन तालुक्यातिल सेझ बाधित शेतकरी एकवटला आहे. या आंदोलना मागे केवळ जमिनीचा तुकडा वाचवण्याचा प्रश्न नसून, पुढील पिढ्यांचे अस्तित्व आणि कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक हक्कांचे रक्षण करण्याचा हा व्यापक लढा आहे. मंत्रालयातील १० जून २०२६ च्या बैठकीचे बेकायदेशीर इतिवृत्त आणि २९ जुलै २०२६ रोजी रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवलेला एकतर्फी, सदोष अहवाल या आधारे, राज्य सरकार 'कुळकायदा सुधारणा २०१६' चा छुपा आडोसा घेत आहे. हा प्रकार 'केंद्रीय भूसंपादन कायदा, २०१३ चे कलम १०१' आणि नैसर्गिक न्यायतत्त्वांचा उघडपणे भंग करणारा आहे. आजच्या घडीला या संपूर्ण जमिनीवर मूळ शेतकरी मालकांचाच पिढ्यान पिढ्यांचा पारंपरिक व प्रत्यक्ष भौतिक ताबा शाबूत असताना, आजच्या वाढीव UDCPR (FSI 1.1) च्या नियमा नुसार भविष्यात जमिनीला मिळणाऱ्या करोडो रुपयांच्या हक्काच्या मिळकती पासून शेतकऱ्यांना वंचित ठेवण्याचा आणि त्यांचे अस्तित्वच मिटवण्याचा हा शासकीय कट असल्याचा गंभीर आरोप समितीने केला आहे. दिनांक ६ ऑक्टोबर २०२६ रोजी महात्मा गांधी मंदिर, पेण येथे झालेल्या ४५ गावांच्या सेझ बाधित शेतकऱ्यांच्या महा बैठकीत या आंदोलनाचा निर्णय सर्वानुमते आणि ठामपणे घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी यापूर्वी दिलेले ई-पीक पाहणीचे पुरावे, जागेवरील पंचनामे हे सर्व कायदेशीर व वस्तुस्थिती दर्शक अर्ज प्रशासनाने स्वीकारले असले, तरी त्यावर अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही किंवा न्याय प्रशासना कडून देण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेची ही टाळाटाळ आणि कॉर्पोरेट कंपन्यांना अभय देणारी भूमिका अत्यंत संशयास्पद असून, या विरोधात शेतकऱ्यांनी आता अधिक तीव्रतेने आणि संघटित लढा उभारण्या येत आहे त्यामुळे, जो पर्यंत सात-बाऱ्या वरून महामुंबई सेझ कंपनीचे बेकायदेशीर नाव पुसून जमिनी मूळ शेतकऱ्यांच्या नावे पूर्ववत होत नाहीत आणि २०२६ चे ते गोलमाल परिपत्रक व जिल्हा अधिकारी रायगड यांचा दिनांक २९/०७/२०२६ रोजीचा सेझ बाधित शेतकरी विरोधी अहवाल पूर्णपणे मागे घेतला जात नाही, तो पर्यंत हा लढा थांबणार नाही, असा ठाम संघर्ष समितीने केला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही गंभीर प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून शासन-प्रशासनाने या नोटीसची तातडीने दखल घेऊन सकारात्मक व कायदेशीर तोडगा काढावा, असे आवाहन समस्त सेझ बाधित शेतकरी खातेदारांनी केले असून या आंदोलनाकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले गेले आहे.

श्री जगदंबा देवीची मूळ मूर्ती बदलण्याच्या निर्णयाला विरोध : भाविक व ग्रामस्थांची मागणी; मूर्ती बदलण्याऐवजी वैज्ञानिक पद्धतीने संवर्धन करण्याचा आग्रह

गडब ( अवंतिका म्हात्रे)- पेण तालुक्यातील ऐतिहासिक वाशी गावाचे तसेच संपूर्ण वाशी खारपाट पंचक्रोशीतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री भगवती जगदंबा देवी मंदिर परिसरात असलेली प्राचीन मूर्ती बदलून नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयाला भाविक व ग्रामस्थांकडून तीव्र विरोध व्यक्त होत आहे. 
    मंदिरातील अतिशय प्राचीन, जागृत आणि ऐतिहासिक महत्त्व असलेली श्री जगदंबा देवीची मूर्ती बदलण्याचा निर्णय काही प्रमुख व्यक्तींकडून मनमानी पद्धतीने सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे देवस्थान मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थापन अधिनियम, १९५० अंतर्गत धर्मादाय आयुक्त, रायगड-अलिबाग कार्यालयाकडे नोंदणीकृत ‘सार्वजनिक न्यास’ असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
    इतिहासाचा अमूल्य वारसा जपण्याऐवजी मूळ मूर्ती बदलणे हे कायदेशीर, धार्मिक तसेच पुरातत्त्वीय दृष्टिकोनातून योग्य नसल्याचे अभ्यासक व सुजाण नागरिकांचे म्हणणे आहे. शतकानुशतके भाविक ज्या मूर्तीची श्रद्धेने पूजा-अर्चा करीत आले आहेत, त्या मूर्तीला धार्मिक परंपरेत विशेष महत्त्व आहे.
       मूर्ती बदलण्याऐवजी संवर्धनाची मागणी
    आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात प्राचीन मूर्तीला नैसर्गिक अथवा भौतिक नुकसान झाले असल्यास ती थेट बदलण्याची गरज नाही. ‘केमिकल कन्झर्वेशन’ अर्थात वैज्ञानिक संवर्धन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मूळ मूर्तीचे जतन करून ती पुढील अनेक शतके सुरक्षित ठेवणे शक्य आहे, असा मुद्दा भाविकांकडून मांडण्यात आला आहे. 
    भारतीय पुरातत्त्व विभागाचे तज्ज्ञ आणि मूर्तिशास्त्राचे जाणकार यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचीन मूर्तीचे संवर्धन करता येऊ शकते. त्यामुळे मूर्ती बदलण्याऐवजी तिच्या शास्त्रोक्त संवर्धनावर भर देण्याची मागणी जोर धरत आहे.
धर्मादाय आयुक्तांच्या परवानगीची मागणी
सार्वजनिक न्यासातील धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व असलेल्या मूर्तीमध्ये मोठा बदल करण्यासाठी संबंधित कायदेशीर प्रक्रिया व आवश्यक परवानग्या घेणे गरजेचे असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच ग्रामपंचायतीसह स्थानिक स्वराज्य संस्थांनी सार्वजनिक हिताचा विचार करून कोणताही निर्णय घेऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे.
    श्री जगदंबा देवीची प्राचीन मूळ मूर्ती ही पेणसह वाशी विभागाच्या परिसराची ओळख, अस्मिता आणि पूर्वजांचा अमूल्य ठेवा आहे. त्यामुळे ‘हाकेचा धावणाऱ्या व नवसाला पावणाऱ्या’ देवीच्या मूर्तीला कोणत्याही प्रकारे बदलण्याऐवजी तिचे वैज्ञानिक पद्धतीने जतन करण्यात यावे, अशी मागणी भाविकांनी केली आहे.

“ जगदंबा देवीची मूर्ती बदलली जाऊ नये,” अशी मनोमन वाटणाऱ्या हजारो देवी भक्तांची भावना असून, मूळ मूर्तीचे संरक्षण करून धार्मिक व ऐतिहासिक वारसा जपावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

आदर्श वार्ताहर

ज्येष्ठानी आपल्या मालमत्तेचे इच्छापत्र करावे.........ऍड. निर्मला सामंत प्रभावळकर

मुंबई : " ज्येष्ठ नागरिकांवर होणारे अत्याचार, मन:ताप, त्यांचे शारीरिक व मानसिक आजार, हे समाजात नित्याचे झाले आहे. भविष्याची...