आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, ७ सप्टेंबर, २०२६

गुरुवर्यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात संपन्न!; ओतूर परिसरातील सुमारे ३०० कार्यरत व सेवानिवृत्त शिक्षकांचा यथोचित गौरव

ओतूर (सुभाष हांडे देशमुख): शिक्षक दिनाचे औचित्य साधून जय बजरंग गणेश मंडळ व कवठे यमाई उत्सव मंडळ ओतूर आयोजित, परिसरातील कार्यरत तसेच सेवानिवृत्त शिक्षकांचा भव्य सत्कार समारंभ शनिवार, दिनांक ५ सप्टेंबर २०२६ रोजी ओतूर येथील श्री कवठे यमाई मंदिराच्या प्रांगणात उत्साही आणि भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
       गुरुवर्य श्री. प्रतापराव खंडेराव हांडे देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन सेवानिवृत्त प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक श्री. बबनराव गणपतराव पानसरे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास ज्येष्ठ महिला नागरिक संघाच्या अध्यक्षा श्रीमती सुनंदा बबन डुंबरे, उद्योजक श्री. जनार्दन खामकर यांच्यासह अनेक मान्यवर आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी ओतूर व परिसरातील सुमारे ३०० शिक्षकांचा यथोचित सत्कार करून त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाचा गौरव करण्यात आला.
       कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री. विठ्ठल भिकाजी शितोळे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. तसेच उपस्थित मान्यवरांचा परिचय करून देत त्यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे कुशल सूत्रसंचालन केले. त्यांच्या प्रभावी निवेदनामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
       यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. प्रतापराव हांडे देशमुख यांनी शिक्षक आणि शिक्षक दिनाचे महत्त्व विशद केले. ते म्हणाले, “ज्ञान, विद्या आणि शिक्षण देतो तो शिक्षक. विद्यार्थ्यांना अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातो तो खरा शिक्षक. समाजाच्या विचारसरणीत व वर्तनात सकारात्मक बदल घडवून आणत राष्ट्राच्या विकासाला हातभार लावण्याचे महान कार्य शिक्षक करीत असतो.”
प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीत गुरुचे स्थान सर्वोच्च राहिले असून काळ बदलला तरी गुरुचे महत्त्व अबाधित असल्याचे त्यांनी सांगितले. पुढे शिक्षक दिनाविषयी बोलताना त्यांनी नमूद केले की, ५ सप्टेंबर हा दिवस भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. भारताचे माजी राष्ट्रपती, महान तत्त्वज्ञ व शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि शिक्षणक्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यासाठी हा दिवस शिक्षकांना समर्पित करण्यात आला आहे.
        “डॉ. राधाकृष्णन यांचा शिक्षक ते राष्ट्रपती हा प्रवास प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे,” असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या प्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती सुशीला बाजीराव डुंबरे, ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष भिवाजी माळवे गुरुजी, बबन फापाळे सर आदी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त करून सत्काराने गौरविण्यात आलेल्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.
      कार्यक्रमाच्या शेवटी माजी मुख्याध्यापक श्री. विलास नामदेव सुतार यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षक, नागरिक तसेच कार्यक्रमाचे आयोजक संस्था व मंडळांचे यथोचित आभार मानले.
शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि गुरूजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सोहळा ओतूर परिसरात संस्मरणीय ठरला.

बहिर्जी नाईक आणि महाराष्ट्र पोलिसांवर पार्थ भगरे यांची शब्दांजली; ‘काव्यमोती’ संमेलनात गौरव !!

मुंबई (विलास देवळेकर): ठाणे पश्चिम येथील संदीप स्टुडिओ येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या ‘काव्यमोती’ कवी संमेलनात युवा कवी पार्थ मिलिंद भगरे यांनी हिंदवी स्वराज्याचे गुप्तहेर बहिर्जी नाईक आणि महाराष्ट्र पोलीस अशा दोन स्वतंत्र विषयांवर सादर केलेल्या कवितांना उपस्थित मान्यवरांसह काव्यरसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बहिर्जी नाईक यांचे हिंदवी स्वराज्यासाठीचे योगदान, त्यांचा पराक्रम आणि स्वराज्यनिष्ठा यांना एका कवितेतून शब्दांजली अर्पण करतानाच दुसऱ्या कवितेतून महाराष्ट्र पोलिसांचे शौर्य, कर्तव्यनिष्ठा आणि बलिदान यांना भगरे यांनी काव्यात्मक सलाम केला. त्यांच्या दोन्ही कवितांना उपस्थितांनी भरभरून दाद देत कौतुकाची थाप दिली.  
           ‘काव्यमोती’ कवी संमेलनाची संकल्पना, आयोजन आणि नियोजन सौ. विद्या डोंबे यांनी केले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालनाची जबाबदारीही त्यांनी समर्थपणे सांभाळली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कवी संमेलनाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा आयोजकांच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. या कवी संमेलनाला ज्येष्ठ पत्रकार व लेखक डॉ. सुकृत खांडेकर, ज्येष्ठ साहित्यिका व कवयित्री अनघाताई राणे, ज्येष्ठ समाजसेवक शशिकांत सावंत, माजी सेन्सॉर बोर्ड सदस्य विलास खानोलकर, सहाय्यक करनिर्धारक व संकलक अधिकारी (मनपा) नासिर खान आणि मैत्री संस्था मुंबईचे अध्यक्ष सूरज भोईर आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच वास्ट मीडियाचे सीईओ अमोल राणे यांचीही कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती. या दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीमुळे पहिल्याच ‘काव्यमोती’ कवी संमेलनाला विशेष स्वरूप प्राप्त झाले. काव्यसादरीकरणानंतर पार्थ मिलिंद भगरे यांचा सन्मानचिन्ह प्रदान करून गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे मुंबईचे सहाय्यक पोलीस आयुक्त (असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस) रामचंद्र नागरगोजे यांच्या हस्ते भगरे यांनी हे सन्मानचिन्ह स्वीकारले. महाराष्ट्र पोलिसांच्या शौर्य आणि बलिदानाला आपल्या कवितेतून मानवंदना दिल्यानंतर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याच्याच हस्ते सन्मान स्वीकारण्याचा योग आल्याने हा क्षण विशेष ठरला. यावेळी काव्यमंचावर सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र नागरगोजे यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार व लेखक डॉ. सुकृत खांडेकर, ज्येष्ठ साहित्यिका व कवयित्री अनघाताई राणे, सहाय्यक करनिर्धारक व संकलक अधिकारी (मनपा) नासिर खान आणि मैत्री संस्था मुंबईचे अध्यक्ष सूरज भोईर आदी मान्यवर पार्थ भगरे यांच्यासमवेत उपस्थित होते.

आगरी कवितांचे बादशाह पुंडलीक म्हात्रे यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान

नवी मुंबई : शिवतुतारी प्रतिष्ठान नवी मुंबई संचलित, संवाद नात्यांचा ‘कविता डॉट कॉम' या साहित्य संस्थेचा ४था वर्धापन दिवस, कविता डॉट कॉमचा...