मुंबई (अधिराज्य) बौद्धजन पंचायत समिती आणि शिवडी गटक्रमांक १३, शिवडी विभाग कमिटी व विभागातील संलग्न सर्व शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने "६८ वा धम्मचक्र अनुवर्तन दिन" विभागाचे गटप्रमुख आदरणीय राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, भोईवाडा, परेल, मुंबई -१२ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सदर प्रसंगी अध्यक्ष राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे यांच्या वतीने महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून ज्योत प्रज्वलित करण्यात आली तद्नंतर संस्कार समितीचे बौद्धाचार्य संदीप गमरे, प्रवीण तांबे यांनी धार्मिक विधी सुमधुर, सुश्राव्य वाणीने पार पाडला.सदर प्रसंगी बौद्धाचार्य संदीप गमरे हे "१४ ऑक्टोबर १९५६ (अशोक विजयादशमी) हा धम्मचक्र प्रवर्तन दिन की धम्मचक्र अनुवर्तन दिन?" या विषयावर बोलत असता "धम्मचक्र प्रवर्तन व धम्मचक्र अनुवर्तन म्हणजे काय हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. धम्मचक्र प्रवर्तन म्हणजे नवीन धम्माची स्थापना करून त्या धम्माचा उपदेश जनतेला करणे व सदर धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे व धम्मचक्र अनुवर्तन म्हणजे अस्तित्वात असलेल्या धम्माचे अनुकरण, अनुसरण म्हणजेच स्विकार करून त्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन हे केवळ तथागत सम्यक संबुद्धच करू शकतात, अन्य कोणीही बोधिसत्व किंवा अर्हत पश्चेक बुध्द धम्मचक्र प्रवर्तन करु शकत नाही. बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला वयाच्या ३५ व्या वर्षी बुद्धगयेला वैशाख पौर्णिमेला पिंपळाच्या झाडाखाली (बोधिवृक्षाखाली) सम्यक संबोधी प्राप्त झाली व ते तथागत सम्यक संबुद्ध झाले व तथागत भगवान गौतम बुद्धांनी आषाढी पौर्णिमेला पाच परिव्राजकांना बौद्ध धम्माची दिक्षा देऊन बौद्ध धम्माची स्थापना केली अशाप्रकारे आषाढी पौर्णिमा हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो. आजही महाराष्ट्र वगळता इतर राज्यांमध्ये तसेच ईतर बौद्ध धर्मीय लोकवस्ती असलेल्या देशात आषाढ पौर्णिमा हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो, अशोक विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे आपल्या ५ लाख अनुयायांसह बौद्ध धम्माची दिक्षा घेतली व त्यासंदर्भात काढण्यात आलेल्या तत्कालीन पत्रकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मचक्र प्रवर्तनाचा समारंभ असा उल्लेख न करता धम्मदीक्षा समारंभ असा उल्लेख केला होता याचाच अर्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दि. १४ ऑक्टोबर १९३५ रोजी धर्मांतराची सिंहगर्जना केली होती व त्याप्रमाणे २१ वर्षे विविध धर्मांचा सखोल अभ्यास करून त्यांनी आदरणीय भन्ते चंद्रमणी यांच्या हस्ते प्रथम स्वतः तथागतांच्या बौद्ध धम्माची दिक्षा घेतली व नंतर उपस्थित आपल्या सुमारे ५ लाख अनुयायांकडून स्वतः २२ प्रतिज्ञा वदवून घेऊन त्यांना बौद्ध धम्माची दिक्षा दिली व आपल्या भारत देशातून उत्तर - पूर्व राज्ये वगळता इतर राज्यांतून लुप्त झालेल्या बौद्ध धम्माचे चक्र गतिमान केले. अशाप्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दि. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी अर्थात अशोक विजयादशमी दिनी दिलेल्या धम्मदिक्षेचा दिवस हा "धम्मदीक्षा दिन" किंवा "धम्मचक्र अनुवर्तन दिन" असून त्यानंतर साजरा करण्यात येणाऱ्या अशोक विजयादशमी दिनाला "धम्मदीक्षा वर्धापन दिन" किंवा "धम्मचक्र अनुवर्तन वर्धापन दिन" असे संबोधणे यथोचित होईल. महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपणास बौद्ध धम्माची दिक्षा देऊन आपल्या गोरगरीब समाज बांधवांवर अनंत उपकार केलेले आहेत. व त्याबद्दल समाज त्यांचा सदैव ऋणी राहील. व धम्मदिक्षेच्या दिवसाचे महत्त्व आपल्या जीवनात अनन्य साधारण असे आहे याबद्दल कोणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. असे असले तरी धम्मचक्र प्रवर्तन व धम्मचक्र अनुवर्तन किंवा धम्मदीक्षा यामधील असलेला फरक दुर्लक्षित करून चालणार नाही." असे प्रतिपादन केले, त्यानंतर प्रवीण तांबे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला ज्या २२ प्रतिज्ञा दिल्या त्यातील ७ व्या व १० व्या प्रतिज्ञेवर सखोल असे मार्गदर्शन केले, त्यानंतर उपाध्यक्ष राजू धोत्रे, कार्याध्यक्ष संतोष जाधव, सरचिटणीस संदीप मोहिते यांनी देखील बौद्ध धम्मावर मौलिक असे मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास विभागाचे उपाध्यक्ष हरीश मोरे, चिटणीस अजय पवार, शाखा अध्यक्ष नरेश मोहिते, राहुल कदम, अनंत मोहिते, काशिनाथ पवार, प्रकाश तांबे, ज्ञानेश्वर सकपाळ, राजाभाऊ शेळके, रामचंद्र पवार, किरण दिलीप जाधव, मिलिंद जाधव, संलग्न सर्व शाखांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात अध्यक्ष राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे उपस्थितांना संबोधित करत असताना "गटक्रमांक १३ च्या वतीने सातत्याने जे कार्यक्रम, उपक्रम यशस्वीपणे पार पाडले जातात त्यामागे सर्व शाखा, त्यांचे पदाधिकारी आपल्या मागे खंबीरपणे उभे राहिल्या मुळे आपण सर्व कार्यक्रम, उपक्रम यशस्वीपणे पार पाडत आहोत, आताही ६८ वा धम्मचक्र अनुवर्तन दिन आपण साजरा करत असतानाही सर्व शाखा, त्याचे पदाधिकारी, सभासद, कार्यकर्ते यांचा सिंहाचा वाटा आहे" असे प्रतिपादन केले. सरतेशेवटी सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे आभार मानून सरचिटणीस संदीप मोहिते यांनी कार्यक्रमाची सांगता केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा