आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, २८ जानेवारी, २०२२

४० वर्षानंतर SSC चा वर्ग भरला...पुन्हा घंटा वाजली, धडे गिरवले

     

कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु होणार की नाहीत असा राज्यात संभ्रम असताना .... प्रभादेवी म्युनिसिपल सेकंडरी स्कुलमधील ४० वर्षापूर्वीच्या १९८२ च्या SSC च्या शाळेच्या वर्गाची बॅच पुन्हा एकदा त्यावेळचे शिक्षक सर्वश्री वासुदेव दिंडोरे सर, भालचंद्र पिळणकर सर, चौधरी सर, अरुणा केळकर मॅडम, अस्मिता गोविंदेकर मॅडम यांच्या उपस्थितीत घंटा वाजली...वर्ग भरला...यस सर - यस मॅडम 'हजर' म्हणत पट भरला...फळ्यावर त्याची नोंद झाली. ओळख परेड होत सर्वांना  करीत 'पास' करीत गोल्ड मेडल प्रदान करण्यात आले, मधली सुट्टी झाली, डब्यातून खाऊ खाल्ला, टेबलावरचे डस्टर दाखवत शिक्षकांनी पुन्हा एकदा उर्वरित आयुष्यासाठी सुखी जीवनाचे धडे आपल्या भाषणातून दिले, राष्ट्रगीत होऊन शाळा सुटली. त्यावेळी व्रात्य असलेले प्रशांत भाटकर-गणेश तोडणकर कार्यक्रमाच्या प्रसंगी 'मॉनिटर' होते त्यामुळे अपेक्षेपेक्षा जास्त कार्यक्रम यशस्वी झाला,...

      आज तुमच्यापैकी काहींचे चेहरे तर काहींची नावे आठवताहेत, निसर्गाचा आणि काळाचा हा महिमा आहे, पण शाळेतील गोड आठवणींना उजाळा देण्यासाठी तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने हजर राहिलात, आपल्या एकमेकांना भेटण्याचे प्रचंड कुतूहल असणार, त्यामुळेच हे आज घडले. तुम्ही होतात म्हणून शाळा आणि आम्ही होतो. त्यामुळे बदल घडला असला तरी तुम्ही आताच्या शाळेच्या इमारतीत आठवणींना उजाळा देण्यासाठी तुम्ही इच्छा होईल तेव्हा जात जा असे भावनिक उदगार वासुदेव दिंडोरे सर यांनी आपल्या भाषणात काढले. गोविंदेकर मॅडम आपल्या भाषणात म्हणाल्या की, जुन्या आठवणी अत्तरासारख्या  कुपीमध्ये साठवून ठेवा, आणि जेव्हा केव्हा मनात निराशा येईल तेव्हा त्यांची स्मरण करा, नक्कीच ताजेतवाने व्हाल. ४० वर्षानंतर तुम्ही पुन्हा शाळेचा वर्ग भरवत आहात व तुम्ही भेटणार असे समजल्यानंतर एक शिक्षिका म्हणून मला जास्त आनंद झाला आहे. हे माझे शिक्षक आहेत असे जेंव्हा तुम्ही अभिमानाने आमची ओळख करून देता त्यावेळच्या भावना मला शब्दात व्यक्त करता येत नाहीत.

माझ्या मुलांच्यावर जसे प्रेम होते तीच भावना तुमच्याही बाबतीत होती, तुम्ही नावलौकिक मिळवावा आणि महापालिका शाळेत शिकलो आहोत याचा न्यूनगंड न राहता तुम्ही भविष्यात मोठे व्हावे याहेतूने कदाचित तुम्हाला मी त्यावेळी मारले असेल, परंतु आज विठ्ठलाच्या भेटीसाठी जी तळमळ असते तीच ओढ आणि हुरहूर आज माझ्या मनात दाटली आहे. असे भावुक उदगार केळकर मॅडम यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले. 

तर चौधरी सर म्हणाले की, मी वर्गाकडे येतो आहे असे दिसले की, तुमच्या वर्गात शांतता पसरायची त्यामुळे मला नक्कीच विसरला नसाल, खरं तर मी खाजगी शाळेतली चांगल्या पगाराची नोकरी सोडून गरीब मध्यमवर्गीय मुलांना चांगले शिक्षण देता यावे हे एक धेय्य मनाशी बाळगून महापालिका शाळेत शिक्षक म्हणून रुजू झालो. अनेकांना त्यावेळी याचे आश्चर्य वाटले होते पण, माझ्या कार्यकाळात तुमच्यातले अनेक गुणी विद्यार्थी भेटले त्यांची नावेही मी अजून विसरू शकलो नाही, त्यामुळे प्रभादेवी ही शाळा माझी आवडती शाळा ठरली. 

     सुप्रसिद्ध कलाशिक्षक भालचंद्र पिळणकर सर यांनी ४० वर्षांपूर्वी सेंडऑफ देताना 'तुज पंख दिले देवाने कर विहार सामर्थ्याने' आणि 'या लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार नव हिंद युगाचे तुम्हीच शिल्पकार' ही दोन गाणी म्हटली होती ती पुन्हा वाढत्या वयातही सुरेल आवाजात म्हटली. 

तर विद्यार्थ्यांच्या वतीने रवींद्र मालुसरे हे कार्यक्रमाची प्रस्तावना करताना म्हणाले की, शाळा सोडल्याच्या दाखल्यावर शाळेच्या नावाचा फक्त शिक्का आहे परंतु आमच्या मनामनात आणि आठवणीत कायमचे गेली ४० वर्षे तुम्ही राहिलात याचे एकमेव कारण म्हणजे तुम्ही निरपेक्षपणे आम्हाला घडण्या-बिघडण्याच्या वयात चांगले संस्कार देण्याचे काम केलेत. आज आशीर्वाद देण्यासाठी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलात आम्हाला स्मरणरंजन करण्याची संधी दिलीत, तोच आनंद आमच्या चेहऱ्यावर दिसतो आहे. 

      सांस्कृतिक कार्यक्रमाच्या तासाला महेश पै, प्रशांत भाटकर, गणेश तोडणकर, उमेश शिरधनकर यांनी गाणी तर संगीता पाटणकर, मीनाक्षी बोरकर यांनी आपले विचार मांडले. 

      कार्यक्रमाला शुभांगी पेडणेकर-विलणकर, शुभांगी भुवड-बैकर, मिनाक्षी बोरकर-मोपकर, साधना बोरकर, सविता गाड-धुरी, संगीता पाटणकर-जाधव, सुनंदा धाडवे, सुरेखा चव्हाण, कल्पना किर-आंबेरकर, शोभा पोटे, रेखा चव्हाण-सुभेदार, प्रतिभा खाटपे-बहिरट, कांचन शिर्के-शिंदे, भारती चव्हाण या माजी विद्यार्थीनी तर रविंद्र मालुसरे, प्रशांत भाटकर, सचिन पाताडे, रमेश राऊळ, नरेश म्हात्रे, महेश पै, जगन्नाथ कदम, अविनाश हुळे, गणेश तोडणकर, विजय विलणकर, संतोष गुरव, गुरुनाथ पटनाईक, नंदकुमार लोखंडे, उमेश शिरधणकर, पांडुरंग वारिसे, दिनेश पांढरे, शेखर भुर्के, अनिल कदम, किशोर किर, हनुमंत नाईक, दिनकर मोहिते, शैलेश माळी, राजू दोडे, संजय धामापूरकर, दिनेश मोकल, दीनानाथ शेळके, दत्ताराम बोरकर, विश्वनाथ म्हापसेकर, संदीप केणी हे माजी विद्यार्थी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संदीप परब यांना राज्यस्तरीय "शिक्षण दर्पण" पुरस्कार प्रदान

मुंबई (गणेश हिरवे)  दि.०१ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद, उल्हासनगर आणि कवयि...