आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, २७ जानेवारी, २०२२

नाविन्यपूर्ण उपक्रम, योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबध्द -पालकमंत्री कु.आदिती तटकरे

अलिबाग (जिमाका) :- समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी शासनाकडून विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वांच्या सहकार्याने येणाऱ्या काळात नाविन्यपूर्ण उपक्रम, योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सर्वांगिण विकास साधण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज येथे केले.

     अलिबाग येथील पोलीस परेड मैदान येथे प्रजासत्ताकदिनाच्या 72 व्या वर्धापनदिनी मुख्य ध्वजारोहण त्यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.

     यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीम.योगिता पारधी, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, जिल्हा नियोजन अधिकारी ज.द.मेहत्रे, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव म्हस्के-पाटील, उपजिल्हाधिकारी (रोहयो) सुषमा सातपुते, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती स्नेहा उबाळे,  जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे, जिल्हा कृषी अधीक्षक श्रीम.उज्वला बाणखेले, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग जगदीश सुखदेवे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी चिंतामणी मिश्रा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, डॉ.ज्ञानदा फणसे, मुख्य वित्त लेखा अधिकारी  श्री.घाडगे, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, उप वनसंरक्षक आशिष ठाकरे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एस.हरळय्या, व्यवस्थापक श्यामकांत चकोर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, तहसिलदार विशाल दौंडकर, श्रीमती मिनल दळवी, सतिश कदम, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद वाकडे, प्रवीण बोणे आदी मान्यवर उपस्थित होते.

     सर्वप्रथम ध्वजारोहणानंतर पोलीस दलाच्या पथकांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. त्यानंतर पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी स्वातंत्र्यदिनाच्या 72 व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.

     या सोहळ्याप्रसंगी उपस्थितांना संबोधीत करताना पालकमंत्री कु.आदिती तटकरे म्हणाल्या की, विविध धर्म, भाषा, प्रांत, संस्कृती जोपासणाऱ्या भारतीयांचा जगातील सर्वात मोठी लोकशाही असणारा आपला भारत देश. आपण साजरा करीत असलेला प्रजासत्ताक दिन हा लोकशाहीचा उत्सव असून विविध प्रयत्नांमुळे आपली लोकशाही अधिकाधिक मजबूत होत आहे.  सर्व मतदारांनी राष्ट्रीय कर्तव्य भावनेतून मतदानात सहभाग घेणे आवश्यक आहे. तसेच स्वत:बरोबर इतर नागरिकांना मतदानाच्या कर्तव्यासाठी प्रोत्साहित करणे आवश्यक आहे.

     त्या पुढे म्हणाल्या, सर्वत्र पसरलेल्या कोरोना संसर्ग व वेळोवेळी नैसर्गिक आव्हानांवर संघर्ष करीत आपले राज्य प्रगतीपथावर मार्गक्रमण करीत आहे. याची दखल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेण्यात आली. या महामारी बरोबरच अलिकडील काळात संपूर्ण कोकण किनारपट्टीसह आपल्या जिल्ह्यात नैसर्गिक संकटांमुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करावा लागला. प्रत्येक प्रसंगास सामोरे जाताना पालकमंत्री व रायगडवासी म्हणून जिल्हाहितार्थ अनेक निर्णय घेत आहे. राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कुशल नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यासह रायगड जिल्ह्याला प्रगतीपथावर नेण्याचा व परिस्थिती कोणतीही असो ‘महाराष्ट्र थांबला नाही व थांबणार नाही’ ही संकल्पना सिद्धीस नेण्याचा माझा प्रयत्न आहे. समाजातील शेतकरी, कामगार, कष्टकरी, व्यापारी, व्यावसायिक, नोकरदार, दुर्बल घटकांच्या विकासासाठी शासन कटीबद्ध आहे.

     पालकमंत्री कु.तटकरे पुढे म्हणाल्या की, औद्योगिक जिल्हा अशी रायगडची ओळख आहे. विविध उद्योगांसाठी गुंतवणूक जिल्ह्यात होणार आहे. रोजगार निर्मितीसह वाढत्या नागरीकीकरणाचा सर्वकष विचार करुन  जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून मागील वर्षाच्या तुलनेत जास्तीच्या सुमारे 295 कोटी इतक्या निधींची तरतूद सन 2022-23 या आर्थिक वर्षात करण्यात येत आहे. जिल्ह्याचा मानबिंदू असलेला स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ल्याच्या विकासासाठी समितीच्या माध्यमातून स्वतंत्र 5 कोटींचा निधी येत्या वर्षी प्राप्त होत आहे, असे सांगून पालकमंत्री कु.तटकरे पुढे म्हणाल्या,अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या शंभर विद्यार्थ्यांच्या पहिल्या तुकडीची प्रवेश प्रक्रिया यावर्षी सुरू होत आहे, ही बाब जिल्हासाठी अभिमानास्पद आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, तंत्रनिकेतन, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, विभागीय क्रिडा संकुल या सर्व माध्यमातून जिल्ह्यातील व कोकणातील तरुणांना शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात भविष्यातील वाटचाल निश्चित करण्यास नक्कीच मदत होणार आहे.

     त्या म्हणाल्या, पर्यटकांना पर्यटनमुग्ध करणारा जिल्हा असा जिल्ह्याचा लौकिक आहे. समुद्रकिनारे, तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले, वन्यजीव अभयारण्य व पक्षी अभयारण्य या माध्यमातून जिल्ह्याचे प्राकृतिक सौंदर्य अधिक खुलविण्यासाठी अनेक महत्त्वाची कामे प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून पूर्णत्वास येत आहेत.  किहीम येथे पक्षीप्रेमी व पर्यटकांसाठी डॉ.सलीम अली पक्षी अभ्यास व संशोधन केंद्र, अलिबाग येथे कान्होजी आंग्रे समाधी परिसर विकास, आक्षी येथील शिलालेख परिसराचे सौंदर्यीकरण, उमरठ येथे तानाजी मालुसरे यांचे समाधीस्थळ व परिसराचे सुशोभिकरण, साखर येथे सुर्याजी मालुसरे समाधीस्थळ व परिसराचे सुशोभिकरण, दिवेआगर येथील कासव संवर्धन प्रकल्प उभारणी, जिल्हा पक्षी म्हणून ओळख मिळालेल्या तिबोडी खंड्याचे शिल्प उभारणी करणे आदी विविध कामांचा यात समावेश आहे. आपले सण, उत्सव, खाद्य संस्कृतीचा अनुभव येणाऱ्या प्रत्येक पर्यटकास अधिक चांगल्या प्रकारे सेवा देत पर्यटन व्यवसायातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.

     आरोग्य सुविधा बळकटीकरणासाठी आरोग्य संस्थांना शासकीय जागा प्रदान केल्या आहेत  व संस्थांच्या उभारणीसाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे/उपकेंद्रे व ट्रॉमाकेअर सेंटर, रुग्णवाहिका, पशुवैद्यकीय दवाखाने या माध्यमातून आरोग्य संपन्न रायगड जिल्हा करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्या म्हणाल्या.

     मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यात 73 रस्त्यांच्या कामांचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. रेवस-रेड्डी सागरी महामार्गाच्या प्रकल्प आराखड्यात अलिबाग मधील महत्त्वाचे जोडरस्ते, 93 पर्यटन स्थळांना जोडणारे रस्ते व खाड्यांवरील पूल यांचा समावेश करून जिल्ह्यातील दळणवळण अधिक सुलभ करण्याचा प्रयत्न आहे. विरार ते अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिक प्रकल्पाच्या नवघर ते बलवली प्रकल्पास मान्यता देण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

     राज्यातील ग्रामीण डोंगराळ व आदिवासी भागामधील विद्यार्थ्यांना दर्जेदार उच्च शिक्षण सहज उपलब्ध व्हावे, यासाठी “नवीन सॅटेलाईट केंद्राची निर्मिती” या शैक्षणिक वर्षापासून नवीन सॅटेलाईट केंद्र मंजूरीसाठी कार्यपध्दती व निकष जाहीर करण्यात आले आहेत, असे सांगून पालकमंत्री म्हणाल्या, महसूल आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांच्या 7/12 वर जलद व सुलभरितीने पीक पाहणी नोंदविण्यात खातेदाराचा प्रत्यक्ष सहभाग शक्य करणारी “ई-पीक पाहणी सुविधा 15 ऑगस्ट 2021 पासून राज्यात सुरू झाली आहे.

     पुढील 5 वर्षांमध्ये अपारंपारिक उर्जास्रोतांचा वापर करून जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयात परवडण्या जोगी, खात्रीची, शाश्वत व स्वच्छ ऊर्जा यासाठी सुनिश्चिती करण्यासाठी शासन सदैव कटिबध्द आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून प्रस्तावित योजनेंतर्गत दरडग्रस्त गावांमध्ये बांबू वृक्ष लागवड करून भावी काळात दरडप्रवण गावांमध्ये जीवितहानी होवू नये यासाठी नियोजन केले जात आहे, असेही त्या म्हणाल्या.

     जिल्हा नियोजन विकास समितीच्या उपलब्ध निधीपैकी 3 टक्के निधी महिला व बालविकासांतर्गत कामांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाकडून कोविड-19 रोगाबाबत बालकांची काळजी व संरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या कृती दलामार्फत जिल्हयातील 18 बालकांच्या खात्यावर प्रत्येकी 5.00 लक्ष रुपयांप्रमाणे 90.00 लक्ष रुपये जमा करण्यात आले आहेत, असे सांगून पालकमंत्री कु.तटकरे पुढे म्हणाल्या की, आपल्या देशाची संस्कृती खूप प्राचीन आहे. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा मोठा इतिहास आपल्या पुढे उभा आहे. सुमारे दीडशे वर्षाचे पारतंत्र्य आणि त्यातून मुक्ततेसाठीचा व्यापक संघर्ष आपण सगळे जण जाणून आहोत. 'भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत'. ही सर्व व्यापी प्रतिज्ञा आणि संविधानावर आपली कमालीची निष्ठा आहे. 'सार्वभौम, समाजवादी, धर्म निरपेक्ष लोकशाही गणराज्य' असल्याचा आपल्याला अभिमान आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातील या प्रजासत्ताक दिनाचे आपण देशाप्रती एकनिष्ठता, एकात्मता व समतेच्या भावनेतून स्वागत करु या.

        शेवटी कोरोनाशी सामना करण्यास आपण परिपूर्ण प्रयत्न करीतच आहोत. सुजाण जिल्हावासियांनी लसीकरणासाठी पुढे येणे गरजेचे आहे. सौर ऊर्जेचा वापर, वनसंवर्धन, प्लास्टिकचा कमीत कमी वापर करणे हे आपले कर्तव्य आहे. नाविन्यपूर्ण उपक्रम, योजनांतून जिल्ह्यांचा सर्वांगिण विकास साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न माझ्याकडून कायम असेल. यासाठी आपलेही सहकार्य लाभेल, सर्वांच्या सहकार्याने येणाऱ्या काळात रायगड जिल्हा अधिक प्रगतीच्या दिशेने आगेकूच करताना दिसेल, असा विश्वास व्यक्त करुन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी सर्वांना  पुन:श्च प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

 

“परिवर्तन” या कार्यपुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्री कु.तटकरे यांच्या हस्ते संपन्न

     यावेळी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या विविध लोकोपयोगी उपक्रम, कार्यक्रमांवर आधारित “परिवर्तन” या कार्यपुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्री कु.तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाले. या पुस्तिकेत जिल्हा प्रशासनाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, कातकरी उत्थान अभियान, माझी वसुंधरा व सुप्रशासन या अभियानांतर्गत राबविलेल्या विविध योजना, उपक्रम आणि कार्यक्रमांची छायाचित्रे व संक्षिप्त माहिती स्वरूपात मांडणी करण्यात आली आहे.

     या पुस्तिकेची संकल्पना जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांची असून यासाठी त्यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले आहे. तसेच अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव म्हस्के-पाटील, उपजिल्हाधिकारी (रोहयो) सुषमा सातपुते, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती स्नेहा उबाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, तहसिलदार विशाल दौंडकर, सचिन शेजाळ, सतिश कदम, गोविंद वाकडे, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व सर्व शासकीय कार्यालयांचे कार्यालय प्रमुख यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. तर जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी या पुस्तिकेचे संपादन केले असून जिल्हा माहिती कार्यालयाचे कर्मचारी श्री.विठ्ठल बेंदुगडे, श्री.जयंत ठाकूर, श्री.प्रसाद ठाकूर यांनी आवश्यक माहिती व समर्पक छायाचित्रांच्या संकलनाची जबाबदारी पार पाडली आहे.

     या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे सूत्रसंचलन श्रीमती करंदीकर यांनी केले. करोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर या सोहळयात करोना प्रतिबंधक नियमांचे व सूचनांचे काटेकोर पालन करीत विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी तसेच ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, विद्यार्थी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संदीप परब यांना राज्यस्तरीय "शिक्षण दर्पण" पुरस्कार प्रदान

मुंबई (गणेश हिरवे)  दि.०१ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद, उल्हासनगर आणि कवयि...