आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, २९ ऑगस्ट, २०२१

अष्टपैलू व्यक्तिमत्व जयंत पवार यांच्या अकाली निधनाची बातमी धक्कादायक !!

पत्रकार, नाटककार, नाट्य समीक्षक, कथा- कादंबरीकार  जयंत  राजाराम  पवार  यांच्या  अकाली  निधनाची  दुःखद  बातमी  आम्हाला  निश्चितच  धक्कादायक  आहे !पवार  कुटुंब  आमच्या  चाळीत  राहत  होते. जयंतचा  जन्म  व  त्याचे  बालपण  आम्ही  जवळून  पाहिले  होते. त्याचे  बालपण  लोअर परळच्या  मानाजी  राजूजी(कामाठी)  चाळीत  गेले. त्याचे  वडील  श्रीनिवास  मिल्समधे  नोकरी  करीत  होते. भांगेतून  तुळस  उगवते  तसे   एका  चाळीत  हे  साहित्यिक-पत्रकार  रत्न  जन्मले  होते. जयंत  याची  नाटके , चित्रपट  कथा-पटकथा, सुरुवातीला  याच  चाळीत  त्याने  लिहिली. कालांतराने  जयंत  बोरिवली(पूर्व) येथे  स्थायिक  झाला. त्याची  पत्नी  संध्या  नरे  ही  देखील  पत्रकार  आहे. जयंत  मला  आंगचेकर काका  म्हणून  संबोधीत  होता. तो  पुरोगामी  विचारांचा  होता.

  २००५ मध्ये  मानाजी  राजूजी  चाळीत  आम्ही  S.S.C. व्याख्यानमाला  करायचे  ठरवले. तशी  कामाठी चाळ  म्हणजे  गुंडांचा  अड्डा  म्हणून  ओळखली  जायची. त्या  व्याख्यानमालेच्या  उदघाटनाला   जयंताला  बोलवायचे  असे  ठरले. ती  जबाबदारी  माझ्यावर  टाकण्यात  आली  होती. मी  जयंतला  फोन  लावून  सांगितले . जयंतला  त्याचे  आश्चर्य  वाटले ! " काका  काय  सांगता ? आपल्या  चाळीत  S.S.C. व्याख्यानमाला ?"  त्याने  उदघाटनाला  नाही जमणार, पण  मध्येच  येऊन  जाईन  म्हणाला. अखेर  आम्ही  जयंतला  समारोपाला  बोलावले. आणि  तो  वेळ  काढून  आला.जयंत  महाराष्ट्र टाइम्स मध्ये  वरिष्ठ  उपसंपादक  होता. माझ्या  ब-याच  बातम्या  तो  मटामधे  छापत  होता. एक  पत्रकार, साहित्यिक , नाटककार  आमच्या  चाळीत  राहतो  याचा  आम्हाला  अभिमान  वाटत  होता. जयंत  सुप्रसिद्ध  दिवंगत अभिनेते  सुहास  भालेकर  यांचा  भाचा  होता. तो  अत्यंत  बुद्धीमान  तरीही  साधा  व  निगर्वी  होता. वसा दिवाळी  अंकाचे  संपादन  जयंत  पवार  करीत  होता. असा  एक  सव्यासाची व  साक्षेपी  मित्र  आम्ही  गमावला  आहे. जयंत  पवार  यांना  माझी  भावपूर्ण  श्रध्दांजली ! 

 - अनंत  आंगचेकर, भाईंदर (ज्येष्ठ वृत्तपत्रलेखक-पत्रकार  )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संदीप परब यांना राज्यस्तरीय "शिक्षण दर्पण" पुरस्कार प्रदान

मुंबई (गणेश हिरवे)  दि.०१ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद, उल्हासनगर आणि कवयि...