आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, २८ जुलै, २०२१

परोपकारीवृत्ती जोपासणारं खंबीर कोकण..!

'कोकण म्हणजे स्वर्गच जणू' हे वाक्य कोकणाला भेट  दिलेल्या प्रत्येकाच्या तोंडी सहज येऊन जातं.अर्थात ते सुख,ते वातावरण इथे आपसूक नांदतंय. हे जरी खरं असलं तरी गेली अनेक  नैसर्गिक संकटे पाहता इथल्या यातना नरकयातनांहून भयानक आहेत. चक्रीवादळ, धरणफुटी, पावसाचं तांडव अशा कैक संकटांनी शिकस्त करून इथलं साम्राज्य बेचिराख करण्याचा प्रयत्न केला. पण हिंमत हारेल तो कोकणकर कसला.? धीरोदात्तपणे तोंड देत प्रत्येक संकटाला नामोहरम करण्याचं बळ इथल्या मातीने ज्याला-त्याला दिलंय. अशावेळी सगळ्यात पहिल्यांदा जागृत होते ते इथल्या मातीने शिकवेलेली परोपकारीवृत्ती.
   संकट कोणतंही असो, वेळेस घरच्यांच्याही अगोदर तिथे शेजारी हजर असतो. भावकीत-गावकीत भले कितीही कट्टर वाद असोत; वेळेला सगळं बाजूला ठेवून कामी येणं, हे इथल्या संस्कृतीतलं मूल्य असावं. आजवर शासनाच्या अनेक योजना आल्या, GR निघाले, विकास कार्यक्रम आखले गेले. काही वाडीवस्तीवर पोचल्याही. तर काही अवघड वळणात, उभ्या घाटीत तर काही श्रेयवादाच्या गर्दीत मुक्कामी राहिल्या. परंतू या सगळ्याचा इथल्या मुरलेल्या माणसाने कधी बाऊ केला नाही किंवा त्याच्या जगण्याला कधी फरक पडला नाही. एखाद्या वाडीत कोणी शिक-खोक पडला तर जवळपास उपायाचा काहीच आसरा नसतो. प्राथमिक आरोग्य केंद्र कित्येक किलोमीटरवर असतात. समजा एखादं वाहन उपलब्ध झालंच तरी ते घरापर्यंत जाणार कसं.? इथे काहीठिकाणी धड चालायला वाट नाही तर रस्ता दूरच. अशावेळी रडत न बसता इथला समजदार माणूस पुढाकार घेऊन आपली ताकद पणाला लावतो. मग स्वातंत्र्यानंतरच्या इतक्या वर्षांनंतरही डोलीसारखे पर्यायच आपले वाटतात. हे झालं एक उदाहरण. एखादी दुःखद घटना घडल्यास पुढील जबाबदारी ही त्या अख्ख्या वाडीवर अवलंबून असते. प्रसंगातल्या माणसाला धीर देणं म्हणजे काय.? ते इथल्या 'त्या' वातावरणाने शिकवावं. पुढील किमान आठेक दिवस अख्खी वाडी दुःखी कुटुंबाला सांभाळत असते. काय म्हणावं या जबाबदार वृत्तीला.?
    गेल्यावर्षी चक्रीवादळाने कंबरडे मोडून टाकले, यंदाही तेच. कुणाच्यातरी बेजबाबदारपणामुळे धरण फुटतं, अख्खा गाव उध्वस्त होतो. सरकारी यंत्रणा सतर्क होतात, मदतकार्य सुरू होतंही. परंतू सतर्कता ही दुर्घटनेच्या अगोदर हवी ना.? ज्यामुळे अशी वेळच येऊ नये. आत्ता महाप्रलय आलाय. चिपळूण कित्येक दिवस समुद्रात असल्यागत होतं, महाडला एक अख्खं गाव नावालाही उरलं नाही. तिथली अवस्था पाहून काळीज सुन्न होतं. मेंदूला मुंग्या आल्यागत झिणझिण्या येतात. मरण ज्याला त्याला येणारच हे सत्य असलं तरी  का स्वीकारावं असलं मरण या लोकांनी.? काय पहावं मागे उरलेल्या घरच्यांनी, कसं सावरावं नातेवाईकांनी.? 
     इथे पुन्हा एकदा जागी होते इथल्या मातीतली परोपकाराची शिकवण. काल-परवा घडलेल्या दुर्घटनेत जो जमेल त्यापरीने मदतीला धावतोय. ज्याला शक्य आहे तो घटनास्थळी पोचलाय, कुणी तिथे रात्रंदिवस अंगमेहनत घेतोय. ज्याला ह्यातलं जमत नाहीये तो पदरमोड करून रुपयातले आठाणे का होईना, पण पुढे करतोय. काहीजण जाणीव ओळखत पुढाकार घेऊन मदतीसाठी इतरांकडे हात पुढे करतायत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मदतीचे हात पुढे येतायत. हे कुणासाठी चाललंय.? काय फायदा ह्यातून ह्या बापड्या पोरांचा.? ह्यातून एकच सिद्ध होतं, त्यांना आतली तळमळ शांत बसू देत नाही जी इथल्या मातीने रुजवलीय. जी कधीच थंड बसू देणार नाही. आज ह्यात विशेषतः तरुणाई पुढे आहे. दंडवत करून पाय धरावेशे वाटतात ह्या कालच्या पोरांचे. मुंबईतली, परदेशातली परंतू इथल्याच मातीतली असणारी Well Educated मुलं. अनेक चांगल्या पदावर असणारी ही तरुणाई जेव्हा स्फूर्तीने पेटून उठते. ऑफिसातल्या थंडगार AC मध्येही जेव्हा त्याला इथल्या वेदनांचे चटके बसतात तेव्हा त्यांच्यातली ही वृत्ती आपसूकच बाहेर येते. सोशल मीडियाचा वापर केवळ मनोरंजन, स्वतःचे फोटो आणि स्टेटस ठेवण्यापुरता नसून पध्दतशीरपणे ह्या कार्यातही कसा करावा, हे ही मंडळी शिकवून जातेय. परिस्थिती आटोक्यात येतेय, थोडयाच दिवसांत इथे काही खरंच घडलं होतं का.? हेही कळणार नाही इतकं सारं सुरळीत होणार आहे. अशावेळी इथल्या सरसावलेल्या हातांना कधीच विसरता येणार नाही; किंबहुना इथली परोपकारी भावना कधीच दुर्लक्षित करता येणार नाही..
      मीडियावर दिसणारे अनेक व्हिडीओ,फोटो पाहून आपल्याला तिथल्या भावना बोचतात. अनेकदा मदतगारांवर फोटोबद्दल टीकाही होताना दिसते. निव्वळ शोबाजी करणाऱ्यांना खडसावलंच पाहिजे, परंतू जो आपल्या घासातला एखादा घास तिथे पोचवत असेल आणि त्यात एखादा फोटो काढून इतरांना मदतीसाठी प्रोत्साहित करत असल्यास काय हरकत आहे.? अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपलं नियोजित कार्य सुरू ठेवणं हेच उत्तम. आणि निव्वळ घरी बसून किंवा ह्यातला काहीच भाग न बनता निव्वळ असल्या टीकाटिप्पणी करणाऱ्यांना असा मुळी हक्कच उरत नसतो.
कोकणातल्या राजकारणाबद्दल खरंतर बोलण्याची ही वेळ नव्हे; आपण नंतर ह्यावर सविस्तर बोलूच. तरीही ह्या सगळ्याची जबाबदारी ज्यांच्याकडे असते त्यांचा ह्यात रोल काय.? ह्यातही काहीजण आपली पुढची सीट पक्की करण्यासाठी धावताना दिसले, काहीजण पक्षश्रेष्ठींच्या नजरेत येण्यासाठी सरसावले, तर काहीजण निश्चितपणे प्रामाणिकपणे आपली जबाबदारी म्हणून तिथे तळ ठोकून राहिले. परंतू ह्यातून एक निष्पन्न होतंच की, अशा घटना घडू नयेत म्हणून ज्या यंत्रणा आहेत, ज्या गोष्टी विकासात्मक दृष्टीने Upgrade व्हायला हव्यात जेणेकरून असे धोके टाळता येतील त्या होतच नाहीत. मग ह्या सगळ्याचा उपयोग नक्की कोणासाठी होतोय.? एकतर तुमचा ह्यावर वचक नाही, तुमचे ह्यात साटेलोटे असू शकतात किंवा तुमच्यावर जबाबदारी सोपवून आम्ही चूक केलीय असंच म्हणता येईल. मी कोणत्याच राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नसल्याने हे कोणत्या एकाच पक्षाला उद्देशून नसून सर्वच पक्षांनी ह्याचा विचार करावा हेच सांगणं आहे. आणि दरवर्षी जर असंच घडणार असेल तर मग ही सगळी नाटकं बंद करा आणि प्रत्येकवेळेस आमच्या पोरांनीच जर ही जबाबदारी घ्यायची असेल तर तुमची दुकानं बंद करा. इथली जनता, इथली शिकवण आणि इथल्या जनमाणसात भिनलेली जाणीव समर्थ आहे ह्या सगळ्यासाठी.
सरतेशेवटी निसर्गाला, राजकीय मंडळींना आणि कोकणाकडे विनाशी नजरेने पाहणाऱ्या वृतींना हात जोडून एकच विंनती आहे. तुम्ही भले इथलं सगळं धुवून न्या; परंतू इथली परोपकारी शिकवण देणारी आमची माती तेवढी शिल्लक ठेवा. इथून पुढच्या पिढीकडे हा वारसा संक्रमित होण्यासाठी..!

 ✒️ रामचंद्र तुकाराम जांगळी
 भ्रमणध्वनी - ९९२०९४४६७८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उद्यान शिवाजी पार्क दादर मुंबई येथे संपन्न

मुंबई (शांताराम गुडेकर /समीर खाडिलकर)  शिवसेना सचिव,प्रवक्ता,मा.आमदार राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.आ.श्री. किरण पावसकर ...