आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, ३० जून, २०२१

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

अलिबाग-   कोकणामध्ये फळबागांचे क्षेत्र वाढ करण्यासाठी शेतकऱ्यांना मनरेगा अंतर्गत फळबाग योजनेचा मोठा आधार झाला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना शासनाची अतिमहत्वाकांक्षी योजना आहे. वैयक्तिक लाभार्थीच्या शेतावर कृषी विभागामार्फत फळबाग लागवड कार्यक्रम राबविण्यात येत असून जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, रायगड श्रीमती उज्वला बाणखेले यांनी केले आहे.

     महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवडीची अंमलबजावणी रायगड जिल्ह्यात सुरु आहे. फळबाग लागवड कार्यक्रमामुळे लाभार्थ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन सहभागी लाभार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होते. वैयक्तिक लाभाच्या योजनेंतर्गत शासनाने 2012 मध्ये रोहयो मधून फळबाग लागवडीचा निर्णय घेतला. फळबाग लागवडीच्या कामाकरीता कृषी विभाग हा अंमलबजावणी यंत्रणा म्हणून कार्यरत राहणार आहे. तालुका कृषी अधिकारी यांना कार्यक्रम अधिकारी म्हणून घोषित केले असून ई-मस्टर निर्गमित करणे, भरणे, पारीत करणे, कुशल / अकुशल बाबी असे विविध अधिकार प्रदान करण्यात आले आहे. तांत्रिक मान्यता देण्याचे अधिकार तालुका कृषी अधिकारी, प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार उपविभागीय कृषी अधिकारी यांना देण्यात आले आहे.

        महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत कोकणातील प्रामुख्याने आंबा, काजू, नारळ, सुपारी, चिकू, कोकम, बांबू, फणस, चिंच, आवळा, कागदी लिंबू इत्यादींचा समावेश करण्यात आलेला आहे. फळपिकांचा समावेश करुन शेतकऱ्यांच्या मागणीनुसार घनपध्दतीने लागवडीकरीता तसेच कलमे रोपे लागवडीचे प्रति हेक्टरी सुधारीत मापदंडास शासनाने मान्यता दिली आहे. या पिकांच्या लागवड, रोपे खरेदी, मजुरी, सामुग्री करीता तिसऱ्या वर्षापर्यंत अनुदान देण्यात येते.

     फळबाग लागवड कार्यक्रम या योजनेच्या लाभासाठी लाभार्थीचे नाव असलेले मग्रारोहयो योजनेचे जॉब कार्ड, शेतीचा 7/12, 8-अ, आधारकार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स प्रत आदि कागदपत्रांची आवश्यकता आहे. या योजनेंतर्गत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचे ऑनलाईन सनियंत्रण केले जाते.

      वैयक्तिक लाभार्थी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दारिद्रय रेषेखालील लाभार्थी, भू-सुधार योजनेचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी, स्री कर्ता असलेली कुटुंबे, अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वनवासी (वन हक्क मान्य असलेले) अधिनियम, 2006 खालील लाभार्थी आणि वरील प्रवर्गातील पात्र लाभार्थीना प्राधान्य देण्यात आल्यानंतर कृषी कर्ज माफी व कर्ज सहाय्य योजना, 2008 यामध्ये व्याख्या केलेल्या लहान व सीमांत भूधारक शेतकऱ्यांच्या जमिनीवरील कामांना, शर्तीच्या अधीनतेने प्राधान्य देण्यात येईल.

      या योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यासाठी सन 2021 - 22 मध्ये 4 हजार 140 हेक्टर इतका फळबाग लागवडीचा लक्षांक प्राप्त झालेला असून दि. 15 जून अखेर 235 हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड झालेली आहे. 

      तरी या योजनेत जास्तीत जास्त भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवड या योजनेत सहभागी होऊन फळबाग लागवड करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रायगड-अलिबाग श्रीमती उज्वला बाणखेले यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फिलिप रॉड्रिग्ज यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

मुंबई (गणेश हिरवे) शिक्षक नेते शिवाजी शेंडगे आयोजित नुकताच शिक्षक स्नेहमिलन कार्यक्रम दहिसर येथील पूजा हॉल मध्ये संपन झाला.यावेळ...