आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, २८ जून, २०२१

सुधागड-पाली ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामासाठी रु.20 कोटी 27 लक्ष चा निधी मंजूर ; पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आरोग्य मंत्री श्री.राजेश टोपे यांच्याकडे केलेली मागणी फलद्रूप

 सुधागड - सुधागड तालुक्यातील पाली येथे 30 खाटांची रुग्ण क्षमता असलेल्या ग्रामीण रूग्णालयाची मुख्य इमारत व निवासी गाळे बांधण्याकरीता रू. 20 कोटी 27 लक्ष 33 हजार 315  इतक्या रक्कमेच्या अंदाजपत्रक व आराखड्यास शासनाकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. 

      पाली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय कार्यान्वित करण्यासाठी शासनाने सन 2008 मध्ये मान्यता दिली होती त्या अनुषंगाने या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाची सुसज्ज इमारत उभी राहून येथे येणाऱ्या रुग्णांना आरोग्यविषयक अद्ययावत सुविधा मिळाव्यात, याकरिता पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी या संदर्भात राज्याचे आरोग्य मंत्री ना. श्री.राजेश टोपे यांच्याकडे झालेल्या बैठकीत मागणी केली होती. त्यानुषंगाने आज (दि.28 जून) रोजी  शासनाने शासन निर्णयाद्वारे रू.20 कोटी 27 लक्ष 33 हजार 315  इतक्या रक्कमेच्या बांधकाम अंदाजपत्रक व आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे.

    पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचे रायगड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला बळकट करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला आवश्यक आरोग्य सोयी सुविधा मिळाव्यात, यासाठी त्या कसोशीने प्रयत्न करीत आहेत, शासनास सादर केलेल्या प्रस्तावांचा सातत्याने पाठपुरावा करीत आहेत.

     या पार्श्वभूमीवर त्यांनी आरोग्य सोयीसुविधांविषयक गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी धडाडीने निर्णय प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली. याचाच एक भाग म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालयांच्या बांधकामासाठी शासकीय जमीन उपलब्ध करून देणे, यासाठी पालकमंत्री कु. आदिती तटकरे या विविध शासकीय जमिनींच्या स्थळांना प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी करीत आहेत व त्याप्रमाणे जनतेला सोयीस्कर ठरेल, अशा ठिकाणाची शासकीय जागा प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालयासाठी देण्याचे निर्णय घेत आहेत.

    वाकण-पाली-खोपोली हा  राष्ट्रीय महामार्ग तयार होत आहे, आदिवासी वाड्या-वस्त्या, औद्योगिक पट्टा, जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण, आजूबाजूची ग्रामीण वस्ती, अष्टविनायक देवस्थानापैकी हे एक देवस्थान, अशा सर्व तऱ्हेने सुधागड-पाली या तालुक्याला वेगळे महत्व प्राप्त आहे. सध्या या परिसरात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांनाही अद्ययावत आरोग्य सोयीसुविधांची नितांत गरज आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य सोयीसुविधांपासून वंचित असलेल्या या भागातील नागरिकांना हे मंजूरी मिळालेले ग्रामीण रुग्णालय निश्चितच उपयुक्त ठरेल, यात शंकाच नाही. तसेच सुधागड  तालुक्याच्या विकासासाठी हे ग्रामीण रुग्णालय वरदान ठरेल. यामुळे येथील मानव निर्देशांकातही सुधारणा होऊ शकेल. याशिवाय पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या प्रयत्नातून सुधागड-पाली तालुक्यातील नाडसूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी तर रासळ, राबगाव, दहिगाव आणि पेडली येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांसाठी शासकीय जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

     भविष्यात या व आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात शहरीकरणास व नागरीकरणास वाव आहे. त्यामुळे भविष्यातील या परिसराचा विकास लक्षात घेता येथे आरोग्य सोयीसुविधा उत्तम असणे, ही काळाची गरज आहे,अशी अभ्यासपूर्ण दूरदृष्टी ठेवून रायगड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणाचा ध्यास घेतलेल्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देवून पुढील निर्णय प्रक्रिया तातडीने राबविली. या ग्रामीण रूग्णालयाच्या बांधकामामुळे लवकरच सुधागड-पाली भागातील नागरिकांना आरोग्यविषयक सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फिलिप रॉड्रिग्ज यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

मुंबई (गणेश हिरवे) शिक्षक नेते शिवाजी शेंडगे आयोजित नुकताच शिक्षक स्नेहमिलन कार्यक्रम दहिसर येथील पूजा हॉल मध्ये संपन झाला.यावेळ...