आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, १ जानेवारी, २०२१

महाराष्ट्र गुजरात सीमावाद उफाळला

   गेली साठ वर्ष महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चालू आहे. साठ वर्ष उलटूनही दोन्ही राज्यातला सीमावाद मिटलेला नाही. महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादावर अद्याप कोणताही तोडगा निघाला नसताना आता महाराष्ट्र गुजरात मध्ये सीमावाद उफाळला आहे. या सीमावादाला कारणीभूत ठरले आहे ते वेवजी हे गाव. महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांच्या सीमा लागून आहेत. पालघर जिल्ह्यातील वेवजी हे गाव महाराष्ट्र गुजरात सीमेवर आहे. वेवजी या गावात गुजरात राज्यातील सोलसुंभा या ग्रामपंचायतीने विजेचे खांब उभारले आहेत. वास्तविक गुजरात राज्यातील सोलसुंभा ग्रामपंचायतीने महाराष्ट्रात अतिक्रमण करुन विजेचे खांब उभारणे चुकीचे आहे. असे खांब उभे करणार आहोत याची कल्पना तरी त्यांनी वेवजी ग्रामपंचातीला द्यायला हवी होती. वेवजी ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच त्यांनी विजेचे खांब उभारायला हवे होते पण तसे न करता वेवजी गावात विजेचे खांब उभारून त्यांनी वेवजी गावात अतिक्रमण केले. सोलसुंभा गावाने अनधिकृतपणे अतिक्रमण  केल्याने वेवजी गावातील ग्रामस्थ चिंतेत आहेत. ग्रामस्थांनी सोलसुंभा ग्रामपंचातीला खांब काढून नेण्यास सांगितले असता त्या ग्रामपंचायतीने खांब काढण्यास स्पष्ट नकार दिला इतकेच नाही तर ज्या भागात खांब उभे केले आहेत तो भाग महाराष्ट्राच्या हद्दीत नसून गुजरातच्या हद्दीत येत असल्याचे कळवले त्यामुळे वेवजी गावचे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. हा वाद मिटवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, स्थानिक ग्रामपंचायत, भूमी अभिलेख आणि महसुल खात्याने दोन्ही राज्याची हद्द निश्चित करावी अशी मागणी वेवजी ग्रामस्थांनी केली आहे. तलासरी - उंबरगाव राज्यमार्गावर गुजरातच्या सर्वे नं १३३ चा ३०० मीटर चा त्रिकोणी आकाराचा भूखंड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याला जोडला आहे त्यानंतर ३०० मीटर नंतर हा रस्ता पुन्हा महाराष्ट्र राज्याच्या सर्वे नं २०४ ला जोडतो. मात्र या दोन्ही राज्याची हद्द कायम केलेली नाही. परिणामी या त्रिकोणी कोपऱ्याचा आधार घेऊन महाराष्ट्र सीमेत १५०० मीटर गुजरातचे अतिक्रमण झाले आहे. वेवजी सीमेवर महाराष्ट्राची हद्द सांगणाऱ्या फलकासमोरच गुजरात राज्याच्या इमारती उभ्या राहत आहेत. गुजरात राज्याच्या सीमेवर महाराष्ट्र सीमेचा हद्द सांगणारा दिशादर्शक चिराही तोडण्यात आला आहे याबाबत वेवजी ग्रामस्थांनी महाराष्ट्र सरकारशी अनेकवेळा पत्रव्यवहार केला असूनही  गुजरातच्या या अतिक्रमणाविरुद्ध महाराष्ट्र सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही त्यामुळे वेवजीचे ग्रामस्थ नाराज आहेत. महाराष्ट्र आणि गुजरात या राज्याच्या सीमेवरील हद्द निश्चित नसल्याने वेवजी आणि सोलसुंभा गावच्या ग्रामपंचायतीमधील रहिवाशांमध्ये अतिक्रमणाचे तंटे निर्माण होतात. हे अतिक्रमण आणि तंटे वाढत चालल्याने दोन्ही गावात तणाव निर्माण होत आहे त्यामुळे या महाराष्ट्र गुजरात सीमेवरील हद्द निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पावले उचलायल हवीत. महाराष्ट्राच्या भूमीत गुजरात अतिक्रमण करणार नाही यासाठी महाराष्ट्र सरकारने गुजरात सरकारशी चर्चा करायला हवी. जर या सीमावादावर लवकर तोडगा काढला नाही तर भविष्यात हा वाद आणखी  उग्र स्वरुप धारण करेल. 

-श्याम बसप्पा ठाणेदार,दौंड जिल्हा पुणे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

गोरेगाव येथे श्री स्वामी पुण्यतिथी उत्साहात संपन्न!

मुंबई : गोरेगाव (पूर्व) येथील, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) व नागरी निवारा परिषद गणेश...