आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, २६ नोव्हेंबर, २०२०

आमचा मान..सन्मान.. संविधान ! संविधान !!


       तोडून भेदाभेद सारे 

       दिला आम्हा सन्मान 

       माणूस झालो आम्ही 

       जय हो संविधान 

       जय हो संविधान 

    हजारो वर्षाच्या अज्ञानयुगात  खितपत पडलेल्या मुक्याना ज्याने वाचा दिली,  माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला,  विविध जाती धर्मात विभागलेल्या देशाला एका माळेत  गुंफले त्या भारतीय संविधानाचा विजय असो असा आशय वरील ओळीमधून  व्यक्त होत आहे.ज्या संविधानाचा  गौरव साऱ्या विश्वात होतो त्या  भारतीय संविधानाचे  शिल्पकार,  विश्वरत्न , भारतरत्न , डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम.


 

     जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा इंग्लंंडचे पंतप्रधान राहिलेले  विन्स्टन चर्चिल असे म्हणाले होते "india is not nation it is geographical expression" म्हणजे भारत देश हा एक भौगोलिक जमिनीचा  तुकडा असून हा देश जेव्हा स्वतंत्र होईल तेव्हा भारतातील लोक एकमेकांवर तुटून पडतील त्यावेळच्या भारताच्या एकूण  परिस्थितीनुसार त्यांचा हा अंदाज बरोबरच असावा असे मानले पाहिजे  कारण त्यावेळची स्थिती वेगळी होती.  अनेक प्रकारची विविधता , सामाजिक विषमता , प्रचंड प्रमाणात गरिबी व निरक्षरता  , संस्थानिकांचे सवते सुभे या सर्वांमधून  मार्ग काढून एक राष्ट्र म्हणून लोकांमध्ये एकात्मतेची भावना निर्माण करणे, राष्ट्रीय एकात्मता साधणे या गोष्टी त्यावेळी तरी अशक्यप्राय वाटत होत्या. स्वातंत्र्याच्या चळवळीमुळे देशात  ऐक्य तयार होण्यासाठी हळूहळू सुरुवात झाली होती पण याला एका गुलदस्तत्यात बांधणे व एकसंघ देश म्हणून प्रगती साधणे आवश्यक होते आणि  हेच महत्वाचे काम भारतीय संविधानाने  केले  आहे. आज विचार केल्यास  देशाला स्वातंत्र्य मिळून आज ७३ वर्षानंतर भारत एक प्रबळ लोकशाही  राष्ट्र म्हणून तसेच सर्वच  क्षेत्रात अग्रेसर व प्रगतीशील राष्ट्र म्हणून जागतिक विश्वात उदयास येते आहे. याचे सारे श्रेय  भारतीय संविधान आणि संविधानाचे शिल्पकार  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जाते.

  घटनेचा शिल्पकार तू 

  दिनदुबळ्यांंचा  मुक्तीदाता। 

  अजोड तुझी बुद्धी 

  नतमस्तक हा माथा। । 

 महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अथक परिश्रमातून ,कुशाग्र बुद्धीमत्तेच्या  जोरावर भारतीय घटनेची निर्मिती केली. आज त्याच लोकशाहीची  गोड फळे आपण चाखत आहोत.

     भारतीय संविधान निर्मितीची  प्रक्रिया ही सन १९०९ च्या मोर्ले मिण्टो सुधारणा कायद्याने  सुरू होऊन शेवट हा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी अंतिम मसुदा सादर करण्यापर्यंत व २६ जानेवारी १९५० ला देशभर लागू करण्यापर्यत चालली.९ डिसेंबर १९४६ साली संविधान सभेचे पहिले सत्र सुरू झाले.११ डिसेंबरला  डॉ. राजेंद्रप्रसाद यांची संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून निवड  करण्यात आली.पुढे २९ ऑगस्ट रोजी बाबासाहेबांची  संविधान मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. २ वर्ष ११ महिने १७दिवस अखंड परिश्रम करून भारतीय संविधान तयार झाल.२६ नोव्हेंबर १९४९ रोजी संसदेत संविधान मसुद्याला  मान्यता देण्यात आली.  त्यामुळे हा दिवस  संपून देशात संविधान दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

   भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान असून  समता, बंधुता, स्वातंत्र्य, लोकशाही,न्याय, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, राष्ट्रीय एकात्मता  या मूल्यांची राज्यघटनेत बीजे रोवून भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यात आली आहे . मुळ घटनेत १ प्रास्ताविका, ८ अनुसुची, २५ भाग आणि ३९५ कलमे होती. सध्या भारताच्या घटनेत १ प्रास्ताविका, १२ अनुसुची, २५ भाग, ४४८ कलमे, ५ परिशिष्टे आहेत.नागरिकाचे मूलभूत हक्क -अधिकार कर्तव्य , संघराज्य प्रणाली, मार्गदर्शक तत्वे , प्रशासकीय रचना, विधिमंडळ, न्यायव्यवस्था, पंचायत राज,सामाजिक न्याय, आरक्षण,निवडणुका, आणीबाणीची परिस्थिती इत्यादी विविध बाबींचा अंतर्भाव आहे. एक सार्वभौम, प्रजासत्ताक,  लोकशाहीप्रधान,धर्मनिरपेक्ष, समाजवादी राष्ट्रासाठी वरील बाबी  आवश्यक  असून यावरच भारतासारख्या १३० कोटी लोकसंख्या असलेल्या विविधरंगी देशाला एका धाग्यात गुंफण्यात आले आहे.परकीय आक्रमण,देशातील आणीबाणीची परिस्थिती,नैसर्गिक आपत्ती,गरीबी , बेरोजगारी, निरक्षरता, इत्यादी विविध संकटे येवून सुध्दा देश सक्षमपणे उभा राहिला आहे आणि वेगाने प्रगती करीत आहे.देशातील प्रत्येक नागरिकाला सन्मान देणारे,त्याच्या मूलभूत हक्कांना अधिकारांना संरक्षण देणारे, नागरिकांच्या प्रगतीसाठी विविध कायदे करणारे आपले भारतीय संविधान चिरायु होवो हीच आपल्या सर्व भारतीयांची भूमिका असली पाहिजे.

    आमचा मान ..

    आमचा सन्मान ...

    संविधान !संविधान  !!

आमचा मान, सन्मान,शान  हे आमचे संविधान आहे.त्याच्याशी कटिबद्ध राहण्याचा आम्हा भारतवासीयांचा अखंड प्रयत्न राहिल.

      -प्रा.प्रदीप महादेव कासुर्डे 

        घणसोली नवी मुंबई 

             मो.7738436449

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संदीप परब यांना राज्यस्तरीय "शिक्षण दर्पण" पुरस्कार प्रदान

मुंबई (गणेश हिरवे)  दि.०१ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद, उल्हासनगर आणि कवयि...