आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, २५ नोव्हेंबर, २०२०

हनुमान कोळीवाडा या गावाचे कायदेशीररीत्या पुनर्वसन करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश ; रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केली होती गावाच्या पुनर्वसनाची मागणी

उरण -  रायगड जिल्ह्यातील हनुमान कोळीवाडा या गावाचे पुनर्वसन जवाहरलाल नेहरू पतन न्यासाने करावी अशी मागणी पालकमंत्री तथा राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी केल्यानंतर त्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गावक-यांवरील अन्याय दूर करण्यासाठी शासन सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे सांगितले. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट या केंद्राच्या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी गावक-यांची जमिन संपादित करण्यात आली होती. कायदेशीररित्या घेण्यात आलेल्या निर्णयानुसार १६.८०   इतक्या जमिनीत त्यांचे पुनर्वसन करण्याबाबतचा सकारात्मक प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिका-यांना दिले.

    उरण तालुक्यातील ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा  यांच्या कायदेशीर पुनर्वसनाबाबत आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. या बैठकीस मदत व पुनर्वसन मंत्री ना. श्री. विजय वडेट्टीवार, खासदार सुनिल तटकरे, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक, महसूल विभागाचे उपसचिव अजित देशमुख, जेएनपीटीचे उपाध्यक्ष श्री वाघ, रायगड जिल्हाधिकारी श्रीमती निधि चौधरी आदिसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

     राज्यमंत्री तटकरे यांनी सांगितले, रायगड जिल्ह्यातील उरण येथील हनुमान कोळीवाडा हे गाव जेएनपीटी बंदराच्या विकासासाठी विस्थापित करण्यात आले होते. ३५ वर्षांपूर्वी उरण शहराजवळ बोरी-पाखाडी (भवरा) गावाजवळ चिखल व वाळवीग्रस्त मातीत भराव टाकून या गावाचे पुनर्वसन करण्यात आले होते. ग्रामस्थांना पुनर्वसनासाठी सोई-सुविधांसह १६.८० हेक्टर जागेची आवश्यकता होती. मात्र जेएनपीटीने २ हेक्टर जागेत पुनर्वसन केल्याने येथे अनेक वर्ष ग्रामस्थ दाटीवाटीने रहात आहेत. या संपूर्ण गावालाच वाळवीने पोखरले असून तेथील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने त्यांना न्याय मिळावा अशी मागणी पालकमंत्री आदिती तटकरे व खासदार सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती.

       या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार यांनी गावक-यांवरील अन्याय दूर करण्यासाठी शासन सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे सांगितले असून त्यांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासह कायदेशीररित्या घेण्यात आलेल्या निर्णयानुसार १६.८० हेक्टर इतक्या जमिनीचे अधिग्रहण करून त्यांचे पुनर्वसन करण्याबाबतचा सकारात्मक प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्याचे निर्देश संबंधित अधिका-यांना दिले आहेत. पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच संबंधित मंत्री महोदयांनी यात जातीने लक्ष घातल्याने हनुमान कोळीवाडा गावातील ग्रामस्थांनी यांचे आभार व्यक्त केले आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा गावचे कायदेशीर पुनर्वसन करण्याचे आदेश दिल्याने आता हा अनेक वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला प्रश्न निकाली लागणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संदीप परब यांना राज्यस्तरीय "शिक्षण दर्पण" पुरस्कार प्रदान

मुंबई (गणेश हिरवे)  दि.०१ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद, उल्हासनगर आणि कवयि...