आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२०

पं. दीनदयाळ उपाध्याय मार्ग व नाहूर पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य

मुलुंड /शेखर भोसले : दरवर्षी पावसामुळे पडणारे खड्डे गणेशोत्सव काळात बुजविण्यात येतात मात्र यावर्षी पालिकेच्या टी वॉर्डने अद्यापही खड्डे बुजविले नसल्यामुळे मुलुंड टी वॉर्ड हद्दीतील नाहूर ब्रिजवरील रस्ता व पंडित दीनदयाळ उपाध्याय मार्ग येथून प्रवास करणारे वाहनचालक हैराण झाले आहेत. येथील खोल खड्ड्यात धक्के खात व गाडीचे टायर आपटत वाहनचालकांना प्रवास करावा लागत असल्यामुळे वाहनांचे नुकसान होत आहेच, त्याशिवाय वाहनचालक व प्रवाशांना देखील शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे येथून प्रवास करणाऱयांमध्ये असंतोष निर्माण झाला असून, रस्ते दुरुस्त न करता संबंधित रस्ते विभाग एखादी मोठी दुर्घटना होण्याची वाट पाहात आहे का? असा सवाल संतप्त स्वरात प्रवाशांनी विचारला आहे.
       यासंदर्भात अधिक माहिती देताना सामाजिक कार्यकर्ते अनिल म्हस्के यांनी सांगितले की, नाहूर पुलावरील रस्ता व पंडित दीनदयाळ उपाध्याय मार्ग या दोन्ही रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. काही खड्डे तर खोल आहेत. कित्येक वेळा संबंधित अधिकाऱयांना सांगूनही येथील खड्डे बुजवले जात नाही आहेत. खड्ड्यात पेव्हर ब्लॉक टाकून तात्पुरती मलमपट्टी केली जात आहे. दररोज वाहनचालकांना येथून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. तसेच येथील खड्ड्यांमुळे रस्त्यावरील वाहतूक मंद होत असून अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. नाहूर पूल आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय मार्गावरील खड्ड्यांमुळे गंभीर अपघात होऊन जीवितहानी होवू शकते, त्यामुळे टी वॉर्ड पालिका अधिकाऱयांनी तातडीने याप्रश्नी लक्ष घालून रस्ते दुरुस्त करून घ्यावेत, अशी मागणी अनिल म्हस्के यांनी यानिमित्ताने केली आहे. 
      पालिका रस्त्यावरील खड्ड्यात पेव्हर ब्लॉक्स टाकून तात्पुरती मलमपट्टी करत आहे, परंतु हे पेव्हर ब्लॉक्स पुन्हा उखडले जात असल्यामुळे सदर ठिकाणी पुन्हा खड्डे निर्माण होत आहेत. त्यामुळे वाहनचालक व प्रवाशांमध्ये असंतोष निर्माण झाला असून लवकरच रस्ते शास्त्रोत्त पद्धतीने दुरुस्त नाही झाले तर या असंतोषाचा स्फोट होऊन भडका होवू शकतो, असेही काही वाहनचालकांनी सांगितले.   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उद्यान शिवाजी पार्क दादर मुंबई येथे संपन्न

मुंबई (शांताराम गुडेकर /समीर खाडिलकर)  शिवसेना सचिव,प्रवक्ता,मा.आमदार राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.आ.श्री. किरण पावसकर ...