आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, २१ ऑक्टोबर, २०२५

कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या हस्ते ‘धगधगती मुंबई’ दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन

परळ (प्रतिनिधी)सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम म्हणून ‘धगधगती मुंबई’ या वृत्तपत्राच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन परळ येथील श्री संत गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्ट येथे एक आगळ्यावेगळ्या पद्धतीने करण्यात आले. या वेळी विशेषांकाचे प्रकाशन टाटा कॅन्सर रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या हस्ते करण्यात आले.
   परळ येथील श्री संत गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्टमध्ये बाहेरगावावरून आलेले अनेक रुग्ण व त्यांचे नातेवाईक उपचार काळात वास्तव्य करतात. त्यांच्या जीवनात थोडासा आनंदाचा क्षण निर्माण करण्यासाठी ‘धगधगती मुंबई’ वृत्तपत्राच्या टीमने हा उपक्रम राबविला. प्रकाशन सोहळ्यानंतर रुग्णांना दिवाळी विशेषांकाचे वाटप,तसेच लाडू वाटप करण्यात आले तसेच छोटीशी आर्थिक मदत देऊन त्यांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्नही करण्यात आला.
      या प्रसंगी माहीम विधानसभा निरीक्षक (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे) यशवंत विचले, ज्येष्ठ पत्रकार प्रा. हेमंत सामंत, तसेच ‘धगधगती मुंबई’चे संपादक भीमराव धुळप आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
     रुग्णांच्या हस्ते दिवाळी अंकाचे प्रकाशन ही कल्पना उपस्थित मान्यवरांनी कौतुकास्पद ठरवली. समाजातील दुर्बल घटकांना आनंदाचे क्षण देणाऱ्या या उपक्रमाबद्दल सर्वत्र ‘धगधगती मुंबई’च्या टीमचे अभिनंदन करण्यात येत आहे.

रविवार, १९ ऑक्टोबर, २०२५

कुणाल पाटील युवा सामाजिक संस्था पागोटेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व दिवाळी फराळ वाटप ;विद्यार्थ्यांची दिवाळी झाली गोड !!

उरण  (विठ्ठल ममताबादे) सन २०२२ साली सामाजिक कार्य करण्याच्या हेतूने कुणाल पाटील युवा सामाजिक संस्थेची स्थापना झाली. जेव्हा पासून या संस्थेची स्थापना झाली तेव्हा पासून अनेक विविध लोकोप‌योगी उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात आले. या संस्थेने गोरगरिबांना नेहमी मदतीचा हात दिला आहे.अशा या कुणाल पाटील यूवा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दिवाळी सण जवळ आला की विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व दिवाळी फराळाचे वाटप केले जाते. दरवर्षी प्रमाणे यंदाही संस्थेच्या माध्यमातून पागोटे ग्रामपंचायतचे कार्यसम्राट सरपंच तथा कुणाल पाटील यूवा सामाजिक संस्थेचे संस्थापक सामाजिक कार्यकर्ते कुणाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उरण तालुक्यातील पागोटे गावातील जिल्हा परिषद शाळा,नवघर जिल्हा परिषद शाळा,कुंडेगाव जि.प.शाळा, उरण शहरातील बोरी येथे असलेल्या स्वामी ब्रह्मानंद प्रतिष्ठान सिबर्ड उरण विशेष मुलांची शाळा येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. शैक्षणिक साहित्य व दिवाळी फराळ वाटपाचे यंदाचे हे ३ रे वर्ष आहे. शैक्षणिक साहित्य व दिवाळी फराळ मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. समाजातील उपेक्षित, वंचित समाजाची दिवाळी आनंदात जावी. त्यांच्या या सुख दुःखात सहभागी होउन त्यांच्या सोबत दिवाळी सण आनंदात साजरा करता यावी या उद्देशाने सामाजिक बांधिलकी जपत दरवर्षी विविध शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व दिवाळी फराळ वाटप करण्यात येत असल्याची माहिती कार्यसम्राट सरपंच कुणाल पाटील (संस्थापक कुणाल पाटील युवा सामाजिक संस्था पागोटे ) यांनी दिली. या कार्यक्रम प्रसंगी कार्यसम्राट सरपंच कुणाल पाटील,संस्थेचे पदाधिकारी महेश पाटील, विनय पाटील, प्रणय पाटील, ऋषिकेश म्हात्रे, प्रथम तांडेल, ऋषिकेश पाटील, नकुल पाटील, अमित पाटील, रोशन म्हात्रे, दर्शन म्हात्रे, आकाश म्हात्रे, सुमित पाटील, राज पाटील (फोटोग्राफर ), ज्योतेश पाटील, आतिष पाटील यांच्यासह संस्थेचे अन्य पदाधिकारी सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते. शैक्षणिक साहित्य व दिवाळी फराळ वाटप कार्यक्रमाचे उत्तम नियोजन व उत्तम आयोजन असल्याने विविध शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी वर्गांनी कुणाल पाटील युवा सामाजिक संस्थेच्या कार्याचे, पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे.

रायगडच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय लाठी स्पर्धेमध्ये सुयश

उरण (विठ्ठल ममताबादे ) दिनांक १४,१५, १६ ऑक्टोबर २०२५ रोजी राजस्थान मधील अलवर परशुराम बाबा हॉलमध्ये राष्ट्रीय पारंपारिक लाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली. सदर या स्पर्धेसाठी साडेतीनशे विद्यार्थी विविध राज्यातून स्पर्धेत सहभागी झाले होते.या स्पर्धेमध्ये रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले आहे.रोहित शरद घरत लाठी वार मध्ये गोल्डमेडल व पट्टा बाजी यात सिल्व्हर मेडल, नेहा रोहित घरत एक लाठी मध्ये ब्रॉन्झमेडल, गोपाळ दिनकर म्हात्रे याने एकलाठी प्रकारात सिल्व्हर मेडल, व पट्टा बाजी मध्ये सिल्व्हर मेडल 
प्राप्त केले. या विजयी उमेदवारांना सिहान राजूकोली यांनी मार्गदर्शन केले.ही स्पर्धा राजस्थान अलवर फेडरेशन यांनी भरविली होती.या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्र सिंग तोमर,प्रदेश प्रवक्ता भाजपा राजपाल सिह सिसोदिया,कार्यकारणी अध्यक्ष ठाकूर विश्वप्रताप सिंग चोहान,सहआयोजक विशाल सिह सोळंकी,महासचिव राहुल दुबे, फाऊंडर अरविंद जोशी,राष्ट्रीय पंचप्रमोद विश्वकर्मा, किशोर साकेत आदी मान्यवर उपस्थित होते.विजयी सर्व उमेदवारांचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.राष्ट्रीय रेफ्रि कमिशन मध्ये गोपाळ म्हात्रे याची सभासद म्हणून व महाराष्ट्र महासचिव राजू कोळी यांची राष्ट्रीय मॅनेजमेंट कमिटी मध्ये चेअरमन पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे सर्व स्तरातून स्वागत होत असून त्यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

काँग्रेसच्या महिला रायगड जिल्हाध्यक्ष पदी रेखा घरत यांची नियुक्ती ;सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव !!

उरण (विठ्ठल ममताबादे )महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसची नवी कार्यकारिणी आणि जिल्हाधक्ष्यांच्या नियुक्त्या जाहिर करण्यात आल्या असून यवतमाळच्या संध्या सव्वालाखे यांची राज्य अध्यक्ष म्हणून तर सांगलीच्या शैलजा पाटील, नागपूरच्या सुनीता गवांडे यांची सल्लागार समितीच्या सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे.महाराष्ट्रातील २३ महिला जिल्हाधक्ष्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.या मध्ये महिला रायगड जिल्हाध्यक्ष पदी उरण तालुक्याचे खंबीर, आक्रमक महिला नेतृत्व असलेल्या रेखा घरत यांची निवड झाली आहे. काँग्रेस पक्षाचे संप, आंदोलन, विविध सभा, बैठका यामध्ये रेखा घरत यांचा नेहमी सक्रिय सहभाग असतो. काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरणे, पक्षाचे विचार व कार्य तळागाळात पोहोचविण्याचे महत्वाचे अविरत कार्य रेखा घरत यांनी केले आहे. कोणत्याही निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारात प्रत्यक्ष सहभागी होऊन उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत असतात. शासनाच्या अनेक सेवा सवलती, शासनाच्या योजना गोर गरिबांपर्यंत पोहोचविण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील राहतात. रेखा घरत या काँग्रेस पक्षाच्या सुरवातीपासून एकनिष्ठ कट्टर व प्रामाणिक कार्यकर्त्या आहेत. सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून सुरवातीपासून त्यांनी काम केले. आज जिल्हाध्यक्ष पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली आहे. एक सर्वसामान्य कार्यकर्ता ते जिल्हाध्यक्ष पदा पर्यतचा त्यांचा संघर्षमय प्रवास थक्क करणारा आहेच. शिवाय सर्वांसाठी आदर्श व प्रेरणादायी सुद्धा आहे.रेखा घरत यांच्या या सर्व कामांची दखल घेत काँग्रेसने त्यांच्यावर जिल्हाध्यक्ष या महत्वाच्या पदाची जबाबदारी सोपवली आहे. काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी करून काँग्रेस पक्षाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी व आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेखा घरत यांची नियुक्ती महत्वाची मानली जात आहे. रेखा घरत यांच्या नियुक्तीमुळे सर्वसामान्य व सर्वच घटकांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. स्वच्छ चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व, उत्तम महिला नेतृत्व, सर्वसमावेशक नेतृत्व,दांडगा जनसंपर्क, विविध समस्यांची उत्तम जाण,उत्तम प्रभावी भाषणे ही रेखा घरत यांच्या जमेच्या बाजू आहेत.रेखा घरत यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याने सर्वच स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
     राष्ट्रीय काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या माननीय सोनियाजी गांधी, अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जन खरगे , खासदार राहुजी गांधी, अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबाजी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे , रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांच्या सौजन्याने आज माझी रायगड जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाली त्याबद्दल मी सर्वांची खूप खूप ऋणी आहे.वरिष्ठांनी ठेवलेला विश्वास मी नक्कीच सार्थ ठरवेन.आणि काँग्रेस पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी समर्पितपणे कार्य करेन अशी भावना नवनियुक्त महिला जिल्हाध्यक्ष रेखा घरत यांनी व्यक्त केली आहे.

सिडकोच्या साडेबावीस टक्के योजनेच्या विरोधात उच्च न्यायालयाचा निकाल ; शेतकर्‍यांना भरीव मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा

शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण,
ऐतिहासिक निकालचे सर्वत्र स्वागत ;
पत्रकार परिषदच्या माध्यमातून निकाला संदर्भात देण्यात आली माहिती
उरण (विठ्ठल ममताबादे ) सिडकोच्या साडेबारा टक्के आणि साडेबावीस टक्के भूसंपादन तत्वास आव्हान देणाऱ्या उरण तालुक्यातील दादरपाडा गावातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मुंबई उच्च न्यायालयातील याचिकेवरील ऐतिहासिक निकालाची माहिती देण्यासाठी तसेच सदर याचिकेतील निकालामुळे उरण, पनवेलसह नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना अमुलाग्रह फायदा होणार आहे.याची माहिती देण्यासाठी याचिकाकर्ते शेतकरी वसंत मोहिते व प्रकल्पग्रस्तांचे वकील ऍड. राजेश झाल्टे, ऍड. शरद सोनावणे यांच्या माध्यमातून शासकीय विश्रामगृह डाऊरनगर उरण येथे रविवार दिनांक १९ ऑक्टोबर २०२५ रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले.यावेळी ऍड राहुल झाल्टे, ऍड शरद सोनावणे, ऍड विजय पाटील, ऍड संचिता ठाकूर, ऍड प्रतीक झाल्टे, इंडियन सोशल मूव्हमेंटचे संस्थापक अध्यक्ष ऍड. आनंद ओव्हाळ, वेश्वी ग्रामपंचायतचे सरपंच अजित पाटील, शेतकरी वसंत मोहिते, गावठाण चळवळीचे अभ्यासक तथा सामाजिक कार्यकर्ते राजाराम पाटील, रमेश ठाकूर, प्रकाश कदम, सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार व याचिकाकर्ते शेतकरी उपस्थित होते.
      सिडकोने मौजे बैलोंडाखार, कौलीबांधन, पोंडखार, जासई, धुतूम, चिर्ले, गावठाण, जांभूळपाडा या गावांची एकुण क्षेत्र २७७-९०-५ हेक्टर जमिन लॉजिस्टीक पार्क प्रकल्पासाठी २२.५% विकसित भुखंड मोबदल्यापोटी सहमतीने अधिग्रहित (संपादित) करण्यासंदर्भात शेतकऱ्यांना दि. १८/०२/२०२१ रोजी शेतकऱ्यांना वृत्तपत्राच्या माध्यमातून कळविले होते व त्यानंतर शेतकऱ्यांना रितसर नोटीसाही देण्यात आल्या होत्या.सिडकोच्या या प्रस्तावाला दादरपाडा (बैलोंडाखार) या गावातील वसंत माया मोहिते व इतर १९ शेतकऱ्यांनी जुलै २०२३ साली हायकोर्टात आव्हान देणाऱ्या याचिका दाखल केल्या होत्या. त्या याचिकांची सुनावणी होऊन दि. २५/०९/२०२५ रोजी याचिकेचा निकाल देण्यात आला असून त्या निकालान्वये शेतकऱ्यांना २२.५% विकसित भूखंड नव्हे तर भुमिसंपादन कायदा २०१३ च्या कायद्यातील पूर्ण तरतुदी नुसार मोबदला देण्यात यावा असा आदेश देण्यात आला आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत ऍड राहुल झाल्टे, ऍड शरद सोनावणे यांनी दिली.
     उरण तालुकयातील ८ गावांच्या शेतकऱ्यांचा बाजूने व तसेच संपादित होणाऱ्या २७० हेक्टर जमीनीचा भूसंपादना बाबत सिडको विरुध्दात मा. उच्च न्यायालय (बॉम्बे) मुंबई येथील White & Brief, Advocates & Solicitors या Law Firm ने याचिका दाखल केली. व त्यांचे ऍड.शरद सोनवणे व त्यांचे सहकारी यांनी याचिका नं. ८८९१/२०२५ व इतर याचीका दाखल करुन यांनी संयुक्त प्रयत्न करून शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व केले, आणि हा लढा मुंबई उच्च न्यायालयापर्यंत नेऊन ऐतिहासिक निकाल मिळवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
     आठ गावातील शेतकऱ्यांनी आपल्या बैलोंडाखार प्रकल्पग्रस्त आठगाव संघटनेच्या माध्यमातून सिडकोच्या अधिकाऱ्यांकडे २२.५% चं धोरण कसं फसवं आहे. शेतकऱ्यांना नागवणार आहे हे सांगण्यासाठी शेतकऱ्यांची सिडकोचे अधिकारी सतिश कुमार खडके यांच्यासोबत सिडको भवन येथे एकवेळा, दादरपाडा गावात श्री जाधव व श्री देशमुख यांच्या सोबत दोनवेळा, जांभूळपाडा गावात एकवेळा मिटिंग झाले. सिडकोचे एम.डी. श्री. मुखर्जी यांच्यासोबत नरिमन पॉईंट येथील निर्मल भवनात मिटींग घेऊन चर्चा करण्यात आली व शेतकऱ्यांना २०१३ च्या कायद्याप्रमाणे वा तत्सम योग्य तो मोबदला दिल्यास शेतकरी विकासासाठी जमीन देण्यास तयार आहेत असे शेतकऱ्यांनी सांगितले, पण सिडकोचे अधिकारी २२.५% च्या वरच आडून बसले.या प्रक्रियेस विलंब होऊ लागल्याने व कोणताच योग्य तोडगा दृष्टीपथात दिसत नसल्याने शेवटी दादरपाडा (बैलोंडाखार), वेश्वी गावातील एका व मोठीजुई गावातील एक अशा २१ शेतकऱ्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केल्या व त्यातील १९ शेतकऱ्यांनी शेवटपर्यंत पाठपुरावा करून विजय खेचून आणला.या आदेशानुसार शेतकऱ्यांना मोबदला म्हणून प्रचलित भावाच्या चारपट रोख आर्थिक मोबदला अधिक शेतीवर असलेली झाडे, विहिरी, मळा इ. नुकसान भरपाई अधिक २०% विकसित भुखंड स्वतच्या मालकी हक्काचा (भाडेपट्ट्याने नव्हे) शेतकऱ्यास सिडकोने देणे व त्या भुखंडापोटी सिडकोने विकासाचा चार्ज म्हणून आलेल्या आर्थिक मोबदल्यातून २०% रक्कम कापून घेणे, अधिक पुनर्वसन, पुनःस्थापना व तरूणांच्या नोकरीचा हक्क अबाधित ठेवणे तसेच जमिनीचे नोटीफिकेशन झाल्यापासून ते शेतकऱ्यांच्या हातात मोबदल्याची रक्कम मिळेपर्यंतच्या कालावधीपर्यंत मिळणाऱ्या एकुण भरपाईच्या रक्कमेवर १२% व्याज असा मोबदला मिळू शकतो.या अगोदर हायकोर्टात गेलेल्या अटल सेतू बाधीत शेतकऱ्यांना व वहाळ गावातील शेतकऱ्यांनाही २०१३ च्या कायद्याप्रमाणे भरपाई देण्याचा निर्णय हायकोर्टने दिलेला आहे.
     २०१७ साली काही जमिनीना सिडकोने कमी भाव दिलेला आहे. त्यावेळी उरण विभागात रेल्वे आली नव्हती, अटल सेतू नव्हता, विमानतळाचे काम मार्गी लागलेले नव्हते. प्रस्तावित कॉरिडोर रोडही नव्हता. आता एवढ्या सुविधा उरण विभागात वाढल्यानंतर व आता रूपयाचे अवमुल्यनही झाले असतांना शेतकऱ्यांच्या जमिनीचे भाव त्या पटीने वाढणे क्रमप्राप्त होते.या सर्व बाबीचा विचार उच्च न्यायालयाने केला आहे. व त्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिला आहे.या निकालाचा लाभ केवळ याचिका दाखल केलेल्या शेतकऱ्यांनाच नव्हे तर नव्या मुंबईतील सर्व शेतकऱ्यांना एवढेच नव्हे तर महाराष्ट्रात कोणत्याही प्राधिकरणाने शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन करण्याचा निर्णय घेतल्यास त्या सर्व शेतकऱ्यांना ह्या कायद्याच्या तरतुदी लागू आहेत. फक्त शेतकऱ्यांनी योग्य ती जागृती व धीर धरून निर्णय घेण्याची गरज आहे. दादरपाडा गावातील १९ शेतकऱ्यांनी धाडस दाखवून व चिकाटीने पाठपुरावा करून स्वतःच्या फायद्याबरोबरच सामाजिक हित जोपासण्यास चालना दिली म्हणून त्यांचे अनेक शेतकऱ्यांकडून व शेतकऱ्यांच्या संघटनांच्या अनेक प्रतिनीधींकडून मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे.
      या संदर्भात हायकोर्ट ने दिलेल्या आदेशामुळे,हायकोर्टच्या निर्णयामुळे अनेक फायदे झाले आहेत.यापूढे जमीन संपादन करताना या पुढे सिडकोला मनमानी करता येणार नाही.शेतकऱ्यांना शासनाची मनमानी सोडून कायद्याप्रमाणे मोबदला मागण्याचा अधिकार आहे हा संदेश सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत गेला.कायद्याप्रमाणे मोबदला न देता सिडकोने प्रकल्प रद्द केल्यास शेतकऱ्यांपुढे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत.


शेतकऱ्यांच्या वतीने या याचिकांचे कामकाज white & Brief,Advocates & Solicitors या law firm 
ने पाहिले. तसेच शेतकऱ्यांना परवडेल अशा अत्यंत माफक शुल्कात व वकीलीच्या धंद्यातील नैतिकता सांभाळून, सामाजिक बांधीलकीचं भान ठेवून शेतकऱ्यांना अपेक्षित न्याय मिळवून दिला. त्याच बरोबर या खडतर प्रवासात आधार म्हणून ज्यांनी कागदपत्रांची पुर्तता, माहिती, मार्गदर्शने व शेतकऱ्यांना धीर दिला त्यात इंडियन सोशल मूव्हमेंटचे संस्थापक आनंद ओव्हाळ, निवृत्त न्यायाधीश डि.के. सोनावणे - नाहुर, ऍड.प्रकाश कदम, ऍड.विजय पाटील, कॉ. रमेश ठाकूर, कॉ. सत्यवान ठाकूर,ऍड.सुचित्रा ठाकूर, किरण केणी, नरेश परदेशी, ऍड.डि.के. पाटील, विलास मुंबईकर, सुधाकर पाटील,ऍड.राजेंद्र मढवी , संदेश ठाकूर, मधुसुदन म्हात्रे आदी मान्यवरांचे विशेष सहकार्य लाभले आहे.



कोट (चौकट ):- 


१. प्रकरणाची पार्श्वभूमीः-

सिडकोकडून उरण तालुक्यात लॉजिस्टिक पार्क विकसित करण्यासाठी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. मात्र, या भूसंपादनासाठी भूसंपादन, पुनर्वसन व पुनस्थापन यामधील न्याय्य भरपाईचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (ज्याला आपण २०१३ चा कायदा म्हणतो) नुसार बाजारभावानुसार रोख मोबदला देण्याऐवजी सिडकोकडून शेतकऱ्यांना २२.५% विकसित भूखंडाची योजना स्वीकारण्यास सांगण्यात आले होते.



२. शेतकऱ्यांची भूमिकाः-

येथील शेतकऱ्यांनी विकास प्रकल्पाला कधीच विरोध केला नाही. त्यांचा विरोध हा केवळ मोबदल्याच्या अन्यायकारक पद्धतीला होता. २०१३ च्या कायद्यानुसार शेतकऱ्यांना योग्य व बाजारभावानुसार रोख मोबदला मिळणे हा त्यांचा कायदेशीर हक्क आहे आणि हीच शेतकऱ्यांची भूमीका सुरुवातीपासून ठाम होती.२२.५% योजनेचा पर्याय स्वीकारायचा की रोख मोबदला घ्यायचा, हा निर्णय घेण्याचा अधिकार शेतकऱ्यांचा आहे, तो कोणत्याही संस्थेकडून लादला जाऊ शकत नाही, हेही शेतकऱ्यांनी स्पष्ट केले होते.


३. न्यायालयीन लढा आणि ऐतिहासिक निकालः-

सिडकोच्या या भूमिकेविरोधात शेतकऱ्यांनी माननीय मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. या प्रकरणात सुनावणी होऊन, दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी माननीय न्यायमूर्ती ज. एस. कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आर. साठे यांच्या खंडपीठाने शेतक-यांच्या बाजूने अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निकाल दिला आहे.


४. न्यायालयाच्या निकालातील प्रमुख मुद्देः-

२२.५% योजना सक्तीची नाही :- न्यायालयाने स्पष्ट केले आहे की सिडकोची २२.५% विकसित भूखंडाची योजना ही शेतकऱ्यांसाठी केवळ एक पर्याय (option) आहे. शेतकऱ्यांवर जबरदस्ती लादली जाऊ शकत नाही.

५. शेतकऱ्यांच्या इच्छेचा सन्मानः-

जर शेतकऱ्यांना ही योजना मान्य नसेल, तर सिडको त्यांना जबरदस्तीने सहभागी होण्यास भाग पाडू शकत नाही.असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

६. कायद्यानुसार प्रक्रियाः-

न्यायालयाने सिडकोला स्पष्ट निर्देश दिले आहेत की, जर त्यांना जमिनीची खरी गरज असेल, तर त्यांनी २०१३ च्या भूसंपादन कायद्यानुसार री-सर्व्हे आणि प्रक्रिया पार पाडावी व शेतकऱ्यांना कायद्यानुसार योग्य रोख मोबदला द्यावा.

७. शेतकऱ्यांना निश्चितता मिळावीः-

न्यायालयाने हेही नमूद केले आहे की भूसंपादनाची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण केली जावी, जेणेकरून शेतकऱ्यांना अनिश्चिततेत ठेवले जाणार नाही.

८. निकालाचे महत्वः-

हा निकाल केवळ संबंधित गावांतील शेतकऱ्यांसाठीच नाही, तर संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण आहे विशेषतः ज्या शेतक-यांवर विकास प्राधिकरणांकडून सक्तीच्या योजनेचा ताण आणला जातो. या निकालामुळे शेतकऱ्यांच्या मालमत्तेच्या हक्कांचे कायदेशीर आणि घटनात्मक संरक्षण झाले आहे.

९. पुढील दिशाः

शेतकऱ्यांनी सिडकोकडून अपेक्षा केली आहे की त्यांनी माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाचे तात्काळ पालन करावे, भूसंपादनाची प्रक्रिया २०१३ च्या कायद्यानुसार पार पाडावी आणि शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा मोबदला द्यावा.हा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा, न्यायावरील विश्वासाचा आणि कायदेशीर हक्कांच्या रक्षणाचा विजय आहे.असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

जॉय संस्थेने केली वंचितांची दिवाळी गोड


मुंबई ( सुभाष मुळे): जॉय ऑफ गिविंग संस्था मुंबई यांच्या वतीने रस्त्यावर राहणाऱ्या कामगारांच्या मुलांची शाळा जोगेश्वरी पूर्व सुभाषनगर आणि गोरेगाव पूर्व फिल्मसिटी विभागात डोअर स्टेप स्कूल च्या बसमध्ये भरते. या दोन्ही ठिकाणी १०० मुले शिक्षण घेत आहेत.त्यांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने त्यांना किराणा किट आणि दिवाळी फराळ वाटप करण्यात आले.जॉय ने आतापर्यंत वृद्ध, रोजंदारीवर काम करणारे कामगार, आदिवासी आश्रमशाळा, वृद्धाश्रम, वंचित लोक यांना नेहमीच किराणा किट, शैक्षणिक साहित्य वितरीत केले असून वर्षभर संस्थेचे काम सुरूच असते असे संस्थापक अध्यक्ष गणेश हिरवे गुरुजी सांगतात.जॉय चे सभासद आणि समाजातील देणगीदार स्वतः पदरमोड करून कार्यक्रम यशस्वी करीत असतात म्हणून हिरवे यांनी त्यांचे कौतुक केले आहे. लॉक डाऊन काळात खास करून संस्थेने उल्लेखनीय काम केलं होत. नुकताच जॉय संस्थेला आदर्श संस्था पुरस्कार अंबरनाथ येथे आदर्श रायगड वृत्तपत्राच्या वर्धापन दिवसा निमित्त देण्यात आला.शंभर विद्यार्थ्यांची दिवाळी गोड झाल्याने जॉय सभासद आणि संबंधित सर्वांनीच समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांना सामान वितरित करण्यासाठी असुंता डिसोजा, शीला येरागी, छाया राणे, मीना भुतकर, चंद्रशेखर सावंत, सुनील चव्हाण, विजय शानभाग, भूषण मुळ्ये, अविनाश करगुटकर, आदी कार्यकर्ते वेळात वेळ काढून उपस्थित होते.आदर्श रायगड वृत्तपत्राच्या वतीने जाहीर करण्यात आलेले पुरस्कार यानिमित्ताने असुंता डिसोजा, चंद्रशेखर सावंत यांना सुपुर्द करण्यात आले.या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व देणगीदारांचे जॉय संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

जॉय दिवाळी विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते झाले प्रकाशन

मुंबई (वैभव पाटील) जॉय ऑफ गिव्हींगच्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन रविवार दिनांक १९ ऑक्टोबर २०२५ रोजी नेरे (पनवेल) येथील शांतीवनमधील कुष्ठरोग निवारण समितीच्या कै. चंद्रशेखर धर्माधिकारी सभागृहात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाले. वाशी येथील श्री गजानन महाराज भक्त मंडळ, नेरुळ येथील जेष्ठ नागरिक संघ आणि नेरुळ युथ कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने शांतीवनमधील कुष्ठरुणांना दिवाळीनिमित्त गोड पदार्थांचे तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या वाटप उपक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. यावेळी पार पडलेल्या सर्वांगसुंदर कार्यक्रमात विचारमंचावर कुष्ठरोग निवारण समितीचे चेअरमन ऍड प्रमोद ठाकूर, १६३ वेळा रक्तदान करणारे, मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प केलेले, ३०० पेक्षा अधिक रक्तदान शिबीरे आयोजित करणारे तसेच चार हजारहून जास्त व्याख्याने देणारे, बुलढाणा खामगाव येथे जन्मलेले पनवेलचे सिनिअर सर्जन डॉ अरुण रानडे, पत्रकार व दै नवे शहरचे उपसंपादक राजेंद्र घरत, जॉय विशेषांकाचे संपादक वैभव पाटील, कार्यकारी संपादक गणेश हिरवे, माजी सैनिक तसेच जॉय सभासद चंद्रशेखर सावंत तसेच तिन्ही आयोजक संस्थांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राजेंद्र घरत लिखित ब्रेल लिपीतील पुस्तकाचेदेखील प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाचे अत्यंत नेटके आणि सुटसुटीत सूत्रसंचालन युथ कौंसिलचे सुभाष हांडे देशमुख यांनी केले. 
       जॉय सामाजिक संस्थेच्या वतीने यंदा पहिल्यांदाच दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले असून अनेक नामवंत लेखक, कवींचे साहित्य त्यात समाविष्ट करण्यात आले आहे. अंकातील सर्वच लेख, कथा, कविता वाचनीय असून त्या माध्यमातून वाचकांना दिवाळीचा वाचनीय फराळ उपलब्ध करण्यात आलेला आहे व जॉयचा हा पहिला अंक अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा अशी अपेक्षा विशेषांकाचे कार्यकारी संपादक आणि जॉय संस्थेचे अध्यक्ष गणेश हिरवे यांनी व्यक्त केली. जॉयचा हा पहिलाच दिवाळी विशेषांक वाचकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल आणि उत्तम कौटुंबिक साहित्याची मेजवानी ह्या अंकाच्या माध्यमातून त्यांना मिळेल याची खात्री असल्याचे संपादक वैभव पाटील यांनी सांगितले. अंक मिळवण्यासाठी गणेश हिरवे (९९२०५८१८७८) किंवा वैभव पाटील (९८१९११२८८५) या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या हस्ते ‘धगधगती मुंबई’ दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन

परळ (प्रतिनिधी)सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम म्हणून ‘धगधगती मुंबई’ या वृत्तपत्राच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन परळ...