आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, १५ डिसेंबर, २०२५

कोल्हापूर येथे ग्रामीण डाक सेवक संमेलन संपन्न ; केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी ग्रामीण डाक सेवकांना (GDS)केले संबोधित!!

प्रतिनिधी: केंद्रीय दळणवळण मंत्री तसेच ईशान्य क्षेत्र विकास मंत्री  ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी 13 डिसेंबर 2025 रोजी कोल्हापूर येथे आयोजित ग्रामीण डाक सेवक संमेलनात गोवा व पुणे प्रदेशातील सुमारे 6000 ग्रामीण डाक सेवकांना (GDS) संबोधित केले.
     आपल्या प्रभावी आणि ओघवत्या मराठी भाषणात माननीय मंत्र्यांनी टपाल कर्मचाऱ्यांच्या अखंड सेवाभावाचे कौतुक केले. पोस्टमन हे “केवळ पत्रंच नव्हे तर बँकिंग, विमा आणि शासकीय सेवा देशातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणारे विश्वासाचे सेतू आहेत,” असे त्यांनी सांगितले. ग्रामीण भारताला जोडण्यात आणि देशाच्या विकासाला चालना देण्यात टपाल कर्मचाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
      टपाल कर्मचाऱ्यांसाठी राबविण्यात आलेल्या विविध कल्याणकारी सुधारणांचा आढावा घेताना  सिंधिया यांनी ग्रामीण डाक सेवकांच्या मुलांना केंद्रीय विद्यालयांमध्ये प्रवेश, भत्त्यांमध्ये वाढ, नवीन गणवेश व जॅकेटची रचना, तसेच ‘प्रोजेक्ट ॲरो’ यांसारख्या उपक्रमांचा उल्लेख केला. गावागावांत कार्यरत कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकून त्यांना सक्षम करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेतूनच या सर्व सुधारणा झाल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
        देशभरात 1.65 लाख टपाल कार्यालये आणि 6.5 लाख गावांपर्यंत पोहोच असलेल्या भारतीय डाक विभागाच्या अद्वितीय सक्षमतेचा उल्लेख करत, विभागाला आधुनिक लॉजिस्टिक्स आणि सेवा केंद्र म्हणून रूपांतरित करण्याचे आवाहन त्यांनी केले. नावीन्य, विश्वासार्हता आणि मूल्याधिष्ठित दृष्टिकोन यांवर भर देत, पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या “डाकिया अब बँक लाया”या दूरदृष्टीची आठवण करून देताना, त्यांनी स्पष्ट केले की भारतीय डाक विभागाने केवळ टपाल वितरणाच्या पलीकडे जाऊन आर्थिक समावेशन आणि नागरिक सेवा पुरविणारा एक विश्वासार्ह माध्यम म्हणून स्वतःचा विकास केला आहे. त्याचबरोबर, भारतीय डाक विभागाने “सेवा भाव”— जनतेच्या सेवेसाठीची बांधिलकी — ही आपली मूलभूत मूल्ये सातत्याने जपली आहेत.
      संमेलनाचे एक प्रमुख आकर्षण म्हणजे महाराष्ट्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 10 ग्रामीण डाक सेवकांचा सत्कार. प्रत्येक पुरस्कारार्थींशी वैयक्तिक संवाद साधत माननीय मंत्र्यांनी स्वतःच्या हातांनी प्रत्येकाला नवीन इंडिया पोस्ट जॅकेट व कॅप घातली आणि पोस्टमन बॅग परिधान करून दिली. टपाल सेवेतील सन्मान, ओळख आणि अभिमानाचे प्रतीक ठरलेल्या या कृतीला उपस्थितांकडून जोरदार टाळ्या आणि मनापासून दाद मिळाली.
       या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर श्री छत्रपती शाहू महाराज, माननीय खासदार, कोल्हापूर;  धनंजय महाडिक, माननीय खासदार, कोल्हापूर;  जितेंद्र गुप्ता, महासंचालक, टपाल सेवा;  सुवेंदू कुमार स्वैन, सदस्य (कार्मिक), टपाल सेवा मंडळ; तसेच  अमिताभ सिंह, मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल उपस्थित होते.
      कार्यक्रमादरम्यान इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY) अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या एआय-आधारित “भाषिणी” प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात आला. या उपक्रमातून भाषिक आणि सांस्कृतिक दरी मिटवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करण्याची सरकारची दृष्टी अधोरेखित झाली, ज्यामुळे खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक आणि बहुभाषिक डिजिटल इंडिया साकारण्याकडे वाटचाल होत असल्याचे सिद्ध झाले.
      समारोपाच्या भाषणात  सिंधिया यांनी सर्व टपाल कर्मचाऱ्यांना अभिमान, समर्पण आणि नावीन्यपूर्ण दृष्टिकोनातून सेवा देत राहण्याचे आवाहन केले आणि परिवर्तन व राष्ट्रीय सेवेची भावना पुढे नेण्यास प्रोत्साहित केले. आभार व्यक्त करत त्यांनी आपले भाषण “धन्यवाद, जय हिंद” या शब्दांत समाप्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

डॉ सुरेश पाटील यांना कोकणरत्न पुरस्कार प्रदान

मुंबई - भांडुप येथील शिक्षक , पत्रकार, साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ सुरेश भिवाजी पाटील यांना मुंबई मराठी पत्रकार भवन येथे...