आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, २९ नोव्हेंबर, २०२३

माझ्या कुटुंबाचा आधारवड म्हणजे माझी पत्नी - सौ. संजीवनी

तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो.
नाहीच असं नाही पण तुझ्या
येण्याने आयुष्याची बाग खर्‍या अर्थाने बहरून आली….
पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात नव्या आनंदाने बहरून आले…
पूर्वीचेच दिवस तुझ्याप्रमाणे नव्या चैतन्याने सजून गेले…
आता आणखी काही नको,
हवी आहे ती फक्त तुझी साथ आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं !
बस्स ! आणखी काही नको… काहीच !
सौ. संजीवनी (संगिता )लग्नाच्या ३० व्या वाढदिवसाच्या प्रेमपूर्वक शुभेच्छा....!

               आभारी आहे', 'थँक यू', हे आपल्या जीवनात नेहमी वापरले जाणारे शब्द.अगदी सकाळी घरातून बाहेर जाताना रिक्षावाल्याने १०० रूपये सुट्टे दिले तरी त्याचे आपण आभार मानतो. ट्रेनमधील मित्र, ऑफिसमधील मित्र रस्त्यावर जाता-येता आपल्याला मदत करणारी व्यक्ती अशा सर्वांचे आपण आभार मानतो. पण कोणीतरी आपल्या मार्गावर सतत सावली बनून आपल्याला हात देत जगण्याचा मार्ग सुकर आणि आनंददायी करत असते. अशा व्यक्तीचे मला आभार मानायचे आहेत.ती व्यक्ती म्हणजे माझी पत्नी सौ. संजीवनी आज २९ नोव्हेंबरला आमच्या लग्नाला ३० वर्षं पूर्ण होत आहेत.म्हणूनच तिला जाहीरपणे तिचे आभार मानायचे आहेत.ती माझ्या जीवनात आल्यानंतर तिने मला आणि घरातील सर्वांना, माझ्या मित्र मंडळींना, नातेवाईक या सर्वांना आपलंस केले. लग्नानंतर काही दिवसातच माझ्या जीवनाची रुपरेषा तिला समजली.रात्री उशिरा येणं,सतत बाहेर असणे तरीही हसतमुखाने होणारा तिचा वावर.खरंच यासाठी मी तिचा आभारी आहे.मुली निशा, सुचिता आणि मुलगा उत्कर्ष त्याच्या शिक्षणासाठी तिने केलेली धडपड. मुख्य म्हणजे तिच्या हातचे सुग्रस जेवण.अगदी माझ्या आईच्या जेवणाची आठवण करु देणारं. या सगळ्यासाठी पुन्हा एकदा तिला धन्यवाद. खरंच तिच्यामुळेच मी हा माझा प्रवास मनमुराद अनुभवतोय. जीवनाचा आनंद घेतोय. यासाठी सौ. संजीवनी तुझे पुन्हा एकदा मनापासून आभार.
              २९ नोव्हेंबर १९९३ रोजी लांजा तालुक्यातील भांबेड शिवगण वाडी)येथील कु.संगिता काशिराम शिवगण हिचा माझ्याशी विवाह होऊन ती सौ. संजीवनी शांत्ताराम गुडेकर झाली.पहिल्या दिवसापासून आजपर्यंत ती माझ्या प्रत्येक सुखदुःख मध्ये माझ्या सोबत खांदयाला खांदा लावून साथ देत आहे.नव्हे तीने तर मला मरणाच्या दारातून परत आणले आहे असे म्हटले तर ती अतिशोक्ती होणार नाही.कारण डाँक्टरांकडून सांगितले गेले होते की,आता जास्त दिवस नाही काढू शकत हे...तुमचे नशिब असेल तर...किंवा तुमच्या हातुन घडलेले पुण्यकार्य उपयोगात येऊन हे वाचले तर...!मात्र माझी पत्नी हार मानायला तयार नव्हती.तिने मला वाचविण्यासाठी आपले प्रयत्न सुरुच ठेवले.बायकांना सोन्याचे दागिने खूपच प्रिय असतात असे ऐकून होतो...पण माझी पत्नी याला अपवाद ठरली.तिने एक मणीमंगलसुत्र सोडले तर सर्व दागिने विकून मला वाचविण्यासाठी प्रयत्न केले.१२ वर्षे भाड्याने राहत असताना अनेक समस्यांवर मात करत सौ.संजीवनी नेहमी यशस्वी होत होती.माझ्याकडून तिला कायम त्रासच झाला हे मी स्वःताच कबूल करतो.त्रास म्हणजे मी व्यसनी नाही.कोणतेही मला व्यसन नाही.तरीही मी जास्त वर्षे आजारी असल्याने तिलाच संसाराची गाडी संभाळावी लागली.त्यामुळे माझ्यामुळे झालेल्या त्रासाबद्दल मी तिची माफी मागतो. आम्हाला निशा( सौ.निशा सुरज घोडेस्वर),सुचिता(सौ. सुचिता सोमनाथ सावंत )या दोन मुली,कु. उत्कर्ष शां. गुडेकर हा मुलगा आणि सूरज घोडेस्वार आणि सोमनाथ सावंत असे दोन जावई व सिध्दांत सूरज घोडेस्वार हा नातू आहे.आता सर्व काही व्यवस्थितरित्या चालले आहे.संजीवनीमुळे माझ्या जीवनाला जणू "संजीवनी"च प्राप्त झाली."गुडलक"म्हणतात अगदी त्याचप्रमाणे माझी उत्तरोत्तर प्रगती होत गेली.सुख,समृद्धी,आरोग्य या सर्वांचीच प्रचती तिच्यामुळेच झाली.
               कोरोना काळात तर तीने स्वतः सह संपूर्ण कुटुंबाची काळजी घेऊन व्यवस्थितरित्या जबाबदारी पार पडली. कोरोना संकट मधून बाहेर पडून सावरतो न सावरतो तेवढ्यात दोन वर्ष पूर्वी मला ब्रेन प्रॉब्लेम होऊन घाटकोपर पश्चिम येथील हिंदू सभा हॉस्पिटल मध्ये तात्काळ ऍडमिट करावे लागले.परिस्थिती खूप बिकट होती.जगणे कठीण होते.मला अति दक्षता विभागात ऍडमिट केले.माझ्या पत्नी सोबत माझी मुलगी निशा, सुचिता, मुलगा उत्कर्ष आणि साडू संतोष भिवा रेवाळे, मेव्हणी सौ. स्नेहा (विजया )संतोष रेवाळे होते.मुख्य डॉक्टरने माझ्या पत्नीला स्पष्ट सांगितले आणि रेकॉर्डिंग पण करून घेतलं की, आता रुग्ण या परिस्थितीत आहे. पण पुढील २४ तासात खुप काही चांगले -वाईट बदल होऊ शकतात. माझ्या पत्नीने सांगितले की, जे असेल ते असेल पण... तुम्ही सर्व उपचार तात्काळ सुरु करून आम्हाला मदत करा.पत्रकार, समाजसेवक श्री.समीर वि. खाडिलकर (श्री स्वामी भक्त )यांच्याशी फोनवर बोलणे झालं होते. त्यांचे आणि स्वामी आशीर्वाद पाठीशी होते. शिवाय श्री अनिरुद्ध बापू यांचे लाख लाख आभार... कारण त्यांचे शुभ आशीर्वाद होते म्हणून कठीण परिस्थिती असतानाही माझ्यात फक्त १८ तासात थोडे -फार चांगले बदल होऊन मी दुसऱ्या दिवशी अति दक्षता विभागातुन बाहेर आलो.पण यासाठी माझ्या पत्नीने काय -काय करून हॉस्पिटल मध्ये पैसे जमा केले हे डोळ्यातून पाणी आणणारे आहे. तिने यावेळी पण तीने आपले सर्व दागिने मारवाडी कडे गिरवी ठेवले.आवश्यक रक्कम हॉस्पिटल मध्ये भरली.दोन दिवसांनी पुन्हा हॉस्पिटल ने पुन्हा मोठी रक्कम भरायला सांगितले.आमच्यावर सतत मदतीचा हात ठेवणाऱ्या आमडेकरताई आणि त्यांचे कुटुंब सदस्य यांनी तात्काळ मदत केली.शिवाय संतोष रेवाळे आणि परिवार, माझी मुलगी निशा आणि जावई, सुचिता आणि जावई, मुलगा आणि त्याचे मित्र मंडळी (वर्षा पाटील, शुभांगी,रोहन,उर्मी, धनश्री, बंधिनी, विठ्ठल), मेव्हणी सौ.अंजली दिलीप पेजे आणि परिवार, मेव्हणा संदीप शिवगण आणि परिवार यांनी आर्थिक मदत करून हॉस्पिटल मध्ये पैसे जमा केले. उपचार सुरु होते. माझ्या तब्बेतीत सुधारणा होत होती. काही दिवसांनी हॉस्पिटल मधून सोडणार पण हॉस्पिटल बील खूप झाले होते. अशा वेळी घाटकोपर विभाग मधील समाजसेवक शरद भावे (कुणबी बांधव )यांना फोन करून मदतीचा हात द्यायला विनंती केली. त्यांनी तात्काळ हॉस्पिटल व्यवस्थापनाला फोन करून बील बाबत चर्चा केली आणि बील रक्कम थोडी कमी झाली. माझ्या मुलाने आणि पत्नीने बील भरलं आणि मला घरी घेऊन आले.सोबत साडू रेवाळे होते.घरी आलो तरी आता मरेपर्यंत गोळया आणि औषधे, डॉक्टर चेकअप कायमस्वरूपी पाठी लागले आहे.माझ्या पत्नी सह संपूर्ण परिवार ला याचा खूप त्रास सहन करावा लागला. लागत आहे.... आणि मरेपर्यंत लागणार आहे. तरीसुद्धा माझी पत्नी हे सर्व कोणताही राग.. रोष न करता.. न थकता(असं बोलून चालणार नाही. कारण ती पण माणूस आहे.थकवा तर येणारच.. न थकवा येणे साहजिक आहे.पण ती तसं दाखवत नाही फक्त कुटूंबासाठी... कारण तीच आता कुटूंब प्रमुख आहे) नित्यनेमाने करत आहे.१९९५ ते आजपर्यंत तिने मला साथ देत माझ्या आजारपणवर मात केली आहे. मला वाचवण्यासाठी जीवाचे रान करून.. दिवस -रात्र एक करून सेवा केली आहे. करत आहे. त्याबद्दल तिचे मनःपूर्वक आभार...!
       माझी संजीवनी उत्तम सुगरण आहे. घरातील जेवणाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले की,संपूर्ण जेवणाची तयारी ती एकटीच करते.रात्रभर जागरण झाले तरी चालेल पण स्वयंपाक करण्यासाठी आवश्यक सर्व तयारी ती करायला तयार असते.तिच्या हातचे जेवण जेवलेली व्यक्ती पुन्हा-पुन्हा आल्याशिवाय राहणार नाही.एकादया नामवंत हाँटेलात मिळणाऱ्या जेवणाला जी चव असते त्यापेक्षा जास्तच पण कमी नाही अशी चव संजीवनीने बनवलेल्या जेवणाला असते.३० वर्षात मला हाँटेलात जाऊन खाण्याची इच्छाच कधी झाली नाही.कारण हे बनव ते बनव असे म्हटले तर दुस-या दिवशीच ते घरात बनवते.शिवाय आजवर हट्ट कोणत्याही गोष्टींचा तीने केलेला नाही.एकाद्या दिवशी ती घरात नसेल तर घर खाली खाली जाणवते.माझ्याकडून ब-याचवेळा चुका झाल्या असतील पण ३० वर्षात तीने एकही चुक केलेली नाही.सासु-सासरे,दिर,जावूबाई यांनाही तिच्या विषयी तक्रार कधीच नाही.आज आमच्या आयुष्याला जी स्थिरता लाभली आहे ती फक्त तिच्या मेहनतीने व कष्टाने साठवलेल्या प्रत्येक गोष्टीमुळेच.त्यात तिच्या काटकसरीचे कौतुक जेवढे करावे तेवढे कमीच आहे.
       आज आम्ही आमच्या लग्नाचा ३० वा वाढदिवस(२९ नोव्हेंबर) साजरा करणार करणार आहोत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सौ.संजीवनी(संगिता) ने मला साथ दिली.जसा आहे तसा मला स्वीकारले.माझ्या संसाराला आकार आणि उकार दिला.कधी ऊन तर कधी सावली असेच माझ्या जीवनात चढ उतार आले.सामाजिक कार्य करताना तिला तिच्या अनेक अपेक्षाना आवर घालावी लागली.कुरकुर न करता मला तिने समजावून घेतले आहे म्हणूनच मी आज सामाजिक कार्यात झोकून देऊन काम करू शकलो.आमच्या जीवनाची ही संजीवनी अशीच कायम राहवी,अशी मी श्री मार्लेश्वर चरणी प्रार्थना करतो व वडिलधा-यांचे आशिर्वादात कायम राहण्याची अपेक्षा ठेवत तिच्यासाठी एवढंच म्हणू शकतो
 तू माझ्या सोबत असलीस
कि आभाळ ठेंगणे होतं
तु माझ्या जवळ असल्यानं
अवघड गणित सोपं होतं.
माझ्या सर्वच कठीण प्रसंगी सोबत करणा-या माझी पत्नी सौ.संजीवनी (संगिता )हिला मानाचा मुजरा..!

-शांत्ताराम गुडेकर
विक्रोळी पार्क साईट
मुंबई

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

प्रथम पुण्यस्मरण : कै.विष्णू शंकर पाटील

दोन ओळी बाबासाठी .... बाबा आमचे आधार स्तंभ हरवले .आज राहून राहून डोळ्यात पाणी येते .कोणालाही दुखवले नाहीत. नेहमीच हसत मुख जीवन जगलात ! नेहमी...