आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, २९ नोव्हेंबर, २०२१

अमन पोलिक्लिनिक उरण शहर आयोजित आरोग्य शिबिराला उत्तम प्रतिसाद

उरण -नागरिकांचे आरोग्य निरोगी राहावे, त्यांचे जीवन सुखी, आनंदी व्हावे व आरोग्यविषयक जनजागृती व्हावी या दृष्टिकोनातून रविवार दिनांक 28/11/2021 रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत तेरापंथी हॉल,अमन पॉलीक्लिनिक, यश मेडिकल जवळ,ठाकूर अपार्टमेंट, उरण शहर येथे अमन पॉलीक्लिनिक व क्वीन्स केअर क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या आरोग्य शिबिराअंतर्गत नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली.इसीजी, बीपी, डायबेटीस, बी एम डी आदीची मोफत तपासणी या शिबिरात करण्यात आली .तर विविध रोग व त्या रोगावर उपाययोजना याबाबत मोफत मार्गदर्शन तज्ञ डॉक्टर द्वारे करण्यात आले.हेलपिंग स्टार फॉउंडेशन अंतर्गत सुरु असलेल्या अमन पॉलीक्लिनिकचे हे तिसरे वर्ष असून क्वीन्स केअर क्लिनिक यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या आरोग्य शिबिराचा नागरिकांनी जास्तीत जास्त फायदा घेतला.एकंदरीत या आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.डॉ आतिफ मोहिनतूले, डॉ तारीफ सुर्वे, डॉ कनक मिश्रा,डॉ तालिब सुर्वे,डॉ नितीन जैन,डॉ जास्मिन सुर्वे, डॉ मुद्दशिर राऊत, सामाजिक कार्यकर्ते अब्रार शिलोत्री,संतोष पवार, अखलाख शिलोत्री, मिलिंद पाडगावकर, आयजास मुकादम, हनिफ भाटकर, अलीम भाईजी,अफशा मुकरी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

वंचिताना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्र या. -श्रुती म्हात्रे

उरण -कामगारांना, प्रकल्पग्रस्तांना आज योग्य न्याय मिळत नाही. अनेक वर्षांपासून येथील वंचित घटक विविध सेवा सुविधा पासून वंचित राहला आहे.कामगारांवर,प्रकल्पग्रस्तांना गृहीत धरले जात आहे. त्यामुळे सर्व कामगारांनी एकत्र येऊन आपली शक्ती दाखवायची वेळ आली आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन अन्याया विरोधात लढा उभारूया असे आवाहन कामगार नेत्या श्रुती म्हात्रे यांनी केले.

    दिवंगत कामगार नेते श्याम म्हात्रे यांच्या प्रेरणेतून स्थापन केलेल्या एकता कॅटलीस्ट या संघटनेच्या 7 व्या वर्धापन दिनानिमित्त जे.एन.पी.टि टाउनशिपच्या मल्टीपर्पज हॉल मध्ये प्रकल्पग्रस्त, कामगार व ओबीसी समाजाच्या मेळाव्याचे व एकता कॅटलीस्टच्या पुरस्काराचे वितरण करण्यात आले यावेळी ते बोलत होते.

    जेष्ठ कामगार नेते पनवेल उरण रायगडचे भाग्य विधाते लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील साहेब यांची संघर्षाची धग धगती मशाल त्यांच्या पश्चताप दिवंगत जेष्ठ कामगार श्याम म्हात्रे साहेब यांनी हातात घेतली आणि ती धग धगत ठेवली. दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील साहेब आणि दिवंगत कामगार नेते श्याम म्हात्रे यांचा ओबीसी, वंचित घटकांचा अपूर्ण लढा पूर्ण करण्यासाठी, प्रकल्पग्रस्तांचे, कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी आगामी काळात ही चळवळ संघर्षाच्या रूपाने व्यापक करण्याचा दृष्टीकोण असल्याचे कामगार नेत्या श्रुती म्हात्रे यांनी यावेळी सांगितले.

    ओबीसी समाज, इतर मागासवर्ग /व्ही जे एन टी समाजाला राजकीय सत्तेत त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात योग्य वाटा मिळत नाही त्यासाठी ओबीसीचे राजकीय हक्काचा लढा उभारण्यासाठी व चळवळ पुढे चालू ठेवण्यासाठी या लढ्याचा एक भाग म्हणून श्रुती म्हात्रे यांची ओबीसी /व्ही जे एन टी जनमोर्चा संघटनेच्या महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी नेमणूक करण्यात आली. या नेमणूकी बद्दल त्यांचा जाहीर सत्कार यावेळी करण्यात आले.

   नवी मुंबई, पनवेल, उरण, रायगड जिल्ह्यातील कामगार, मच्छिमार, एम आय डी सी प्रकल्पग्रस्त, शेतकरी, महाराष्ट्रातील ओबीसीचे विविध संघटना व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्व कामगारांना, प्रकल्पग्रस्तांना कामगार कायदे, कामगारांच्या विविध समस्यांवर तज्ञ व्यक्तीकडून मार्गदर्शन करण्यात आले.

     ओबीसी /व्ही जे एन टी जनमोर्चा संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब सानप, उपाध्यक्ष राजूभाऊ साळुंके,महासचिव बालाजी शिंदे,राज्य संघटक -अनिल पवार,प्रदेश सरचिटणीस - संजीवकुमार जाधव,मल्हार आर्मी अध्यक्ष सुरेश भाऊ कांबळे,काकासाहेब मारकड,सदानंद भोपी,रामनाथ पाटील आदी मान्यवर तसेच कोकण श्रमिक संघ, बी एम टी सी कर्मचारी पुनर्वसन समिती, ओबीसी व्हिजे एन टी जनमोर्चा संघटनेचे पदाधिकारी सदस्य यावेळी  उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीवकुमार जाधव, मारुती शेरकर तर आभार प्रदर्शन पंकज भगत यांनी केले.

आदिवासी बांधवांना नारळ पाणी, ज्यूस, शाम्पू, किड्स, गुलाबपाणीचे वाटप

उरण (विठ्ठल ममताबादे )- केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था वेश्वि व श्री समर्थ कृपा सखी स्वयं सहाय्य संस्था उरण यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल, पेण विभागातील माडभूवन व निफाड वाडी येथे आदिवासी बांधवांना व तेथील चिमुकल्यांना नारळपाणी, ज्यूस, किड्स, शाम्पू, गुलाबपाणीचे वाटप करण्यात आले.ह्या अनोख्या कार्यक्रमात ह्या भेंट वस्तूंची आनंददायी मदत त्या चिमुकल्यांना आणि आदिवासी बांधवांना मिळाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्याजोगा होता. ह्या आनंददायी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  उत्कृष्ट निवेदक सुनिलजी वर्तक (अध्यक्ष - गोवठणे विकास मंच )यांनी तर कार्यक्रमाची प्रस्तावना संदेश घरत( उपाध्यक्ष - केअर ऑफ़ नेचर सा.संस्था) यांनी केली. यावेळी केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक रायगड भूषण राजू मुंबईकर,जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत,श्री समर्थ कृपा सखी स्वयं सहाय्य संस्थेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्त्या संगीता ढेरे,विलासजी ठाकूर (सेक्रेटरी - केअर ऑफ़ नेचरसंस्था ), अनिल घरत ( उरण तालुका सचिव - आगरी,कोळी,कराडी संघर्ष सा.संस्था ), हिराचंद म्हात्रे ( उपाध्यक्ष - गोल्डन ज्युबली मित्र मंडळ सारडे ), गोपाळ म्हात्रे, ( आंतरराष्ट्रीय कराटे कोच ), हेमंत ठाकूर (श्री छत्रपती शिवाजी महाराज सा.संस्था ), क्रांती म्हात्रे (सामाजिक कार्यकर्ते सारडे ), अरविंद पाटील(सामाजिक कार्यकर्ते कासू मोरा कोटा ), समाधान पाटील (सामाजिक कार्यकर्ते पिरकोन ), कु.गुड्डू आणि निफाडवाडीचे माजी सरपंच  मारुती कुऱ्हाडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. निफाडवाडी आणि माडभुवन आदिवासी वाडीवरील आदिवासी बांधव आणि लहान बाळगोपाळांच्या  उपस्थितीत हा अनोखा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि उत्तम प्रतिसादात संपन्न झाला.

शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग कल्याण महामंडळाच्या रु.1 लक्ष थेट कर्ज योजनेंतर्गत लाभार्थ्यास निधी वितरीत

अलिबाग:- राज्यातील इतर मागासवर्गीय समाजातील दुर्बल घटकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी शासनाने शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग कल्याण महामंडळाची स्थापना केली आहे. या योजनेंतर्गत आज जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने रु.1 लक्ष थेट कर्ज योजनेंतर्गत अलिबाग तालुक्यातील खानाव येथील श्री.हरेश मारुती थळे या लाभार्थ्यास पहिला हप्ता म्हणून रु.75 हजार इतका निधी त्यांच्या खात्यात जमा करण्यात आला.

     जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव म्हस्के-पाटील, शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ लिमिटेड चे जिल्हा व्यवस्थापक श्री.निशिकांत नार्वेकर व इतर समिती सदस्यांच्या उपस्थितीत श्री.हरेश मारुती थळे या लाभार्थ्यास हॉटेल व्यवसायाकरिता हा निधी आवश्यक कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर मंजूर करण्यात आला होता.

     समाजातील इतर मागासवर्गीयांच्या आर्थिक उन्नतीसाठी महामंडळामार्फत स्वयंरोजगाराच्या विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. छोटे व्यावसायिक व स्वयंरोजगाराकरिता रु.1.00 लक्ष ची थेट कर्ज योजना (नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थीना व्याज नाही) व 20 टक्के बीज भांडवल योजना तसेच ऑनलाईन योजनांमध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (रु. 10.00 लक्ष पर्यत), गट कर्ज व्याज परतावा योजना (रु. 10.00 लक्ष ते 50.00 लक्ष पर्यंत) या योजनांचा समावेश आहे.

     या निमित्ताने इच्छुक, गरजू इतर मागासवर्गीय (ओ.बी.सी.) प्रवर्गातील जास्तीत जास्त लाभार्थींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.

     तसेच जिल्ह्यातील इच्छुक, गरजू इतर मागासवर्गीय (ओ.बी.सी.) प्रवर्गातील व्यक्तींनी योजनेच्या अधिक माहितीसाठी www.msobcfdc.org या संकेतस्थळाला भेट देवून  शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ लिमिटेड चे जिल्हा कार्यालय, श्रीराम समर्थ गृहनिर्माण संस्था मर्या., सदनिका क. 101, पहिला मजला, चेंढरे, अलिबाग, (दूरध्वनी क्र.-02141-224448) अथवा ई-मेल आयडी- dmobcalibagraigad@gmail.com येथे शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक निशिकांत नार्वेकर (मो.9869281787) तसेच उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव म्हस्के-पाटील (मो.9096261053) यांच्याशी संपर्क साधावा.

कोविडच्या धोकादायक नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा , केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागा -- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनाला निर्देश

लॉकडाऊन येऊ द्यायचा नाही या निर्धाराने आरोग्याचे नियम पाळा ; विमानतळांवर येणाऱ्या सर्व प्रवाशांकडे काटेकोर लक्ष देण्याची देखील निर्देश 

मुंबई : कोविडच्या दोन्ही लाटांचा आपण चांगला मुकाबला केला आहे, मात्र आता या विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे आव्हान चिंता वाढवणारे असून याची घातकता लक्षात घेता कोणत्याही परिस्थितीत संसर्ग वाढू नये म्ह्णून मुंबईसह सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाने अतिशय काळजी घ्यावी. परत एकदा संसर्गाचा वाढ झाली तर लॉकडाऊनसारखे पाऊल परवडणारे नाही, त्यामुळे परत लॉकडाऊन लागू द्यायचा नाही या निर्धाराने  नियमित मास्क वापरणे, अनावश्यक गर्दी न करणे, सुरक्षित अंतर पाळणे अशी काही बंधने पाळावीत लागतील असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लसीचे दोन्ही डोस प्रत्येकाने घेणे, विशेषतः विमानतळावरून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत प्रवाशांची काटेकोर चाचणी करणे यादृष्टीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले. यासंदर्भात केंद्राकडून येणाऱ्या सूचनांची वाट न पाहता युद्धपातळीवर जे जे गरजेचे वाटते ते निर्णय घेऊन आवश्यक पाऊले लगेच टाकावीत असेही त्यांनी स्पष्ट केले. 

    आपल्या सर्वांमधीलच बेसावधपणा वाढला आहे. "कुछ नही होता यार" असा पवित्रा मोठ्या संकटात टाकू शकतो असे सावधगिरीचे बोल सांगून मुख्यमंत्री म्हणाले की मास्क न वापरणे आणि नियम तोडून अनावश्यक गर्दी करणे यावर काटेकोर कारवाई झालीच पाहिजे असे पहा. 

   करोना विषाणूच्या ओमायक्रॉन या नव्या उत्परिवर्तित प्रकारामूळे संसर्गाचा धोका वाढणार असून त्याला प्रतिबंध घालण्यासाठी कुठल्या उपाययोजना करता येतील याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, राज्याच्या टास्क फोर्सचे डॉ संजय ओक, डॉ शशांक जोशी, डॉ राहुल पंडित, डॉ अजित देसाई, डॉ खुस्राव्ह बजान, डॉ केदार तोरस्कर, डॉ झहीर अविराणी , डॉ वसंत नागवेकर, डॉ नितीन कर्णिक, मुख्य सचिव सीताराम कुंटे, प्रधान सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदींची उपस्थिती होती.

     राज्य सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली, यामध्ये प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांचा देखील सिंहाचा वाटा आहे त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठकीच्या प्रारंभी सर्व अधिकाऱ्यांना धन्यवाद दिले. 

 ऑक्सिजन, औषध उपलब्धता तपासा, अग्निसुरक्षा ऑडिट पूर्ण करा 

कोविडशी अव्याहतपणे लढत असल्याबद्धल मुख्यमंत्र्यांनी प्रशासनातील सर्वांचे कौतुक केले. ते म्हणाले की, नवा व्हेरिएंट हा उंबरठा ओलांडून आला आहे का हे काळजीपूर्वक पाहावे लागेल. दोन्ही लाटांमध्ये आपल्याला कुठं कमी पडलो ते कळत होते. ऑक्सिजनचा साठा वाढविण्यासाठी धावपळ करावी लागली होती.  त्यामुळे आता या नव्या विषाणू प्रकारामुळे शहरे असो किंवा दुर्गम भागातली रुग्णालये असोत, आपल्याला ऑक्सिजन निर्मिती, ऑक्सिजन साठा, आगीच्या घटना घडू नयेत म्ह्णून अग्निसुरक्षा तसेच स्थापत्य विषयक ऑडिट, औषधांची उपलब्धता हे सर्व प्रत्येक जिल्हा प्रशासनाने जातीने पाहावे. 

मास्क आवश्यकच, अनावश्यक गर्दी होऊ देऊ नका

महाराष्ट्रातील जनता समजूतदार आहे. यापूर्वीही सरकारच्या सर्व सूचनांचे पालन त्यांनी केले आहे. कोविडचे रुग्ण कमी झाल्यामुळे लोकांमध्ये बेसावधपणा आला आहे. या विषाणूशी कसे लढायचे , कोणते उपचार करावेत हा नंतरचा भाग झाला पण मुळात हा संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर मास्क अनिवार्य आहेच असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आता लग्नसराईचे दिवस आहेत. मित्र- आप्तेष्ट परदेशातून देखील येतील त्यामुळे आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे. 

परदेशातून आलेल्या व्यक्तींवर लक्ष ठेवणे गरजेचे 

परदेशातून लोक मोठ्या प्रमाणावर मुंबईत व इतर ठिकाणी येणे सुरू झाले आहे . त्यापैकी अनेक जण देशांत इतरत्र उतरून देशांतर्गत विमान सेवेने , रस्ते व रेल्वेमार्गे येतात. त्यांच्यात कुणी विषाणूचा वाहक असेल तर इतरांना मोठा धोका होऊ शकतो त्यामुळे अशा प्रवाशांची तपासणी करणे, त्यांच्याकडे लक्ष ठेवणे अत्यावश्यक आहे , त्यादृष्टीने लगेच युद्ध पातळीवर कामाला लागा असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

चाचण्या वाढवा, आवश्यक किटस पुरवा

यावेळी मुख्यमंत्र्यांनी मधल्या काळात कमी झालेल्या चाचण्यांवर चिंता व्यक्त केली व चाचण्या वाढविण्याचे निर्देश दिले. विषाणूच्या नव्या प्रकाराला ओळखणारे किटस राज्यातील प्रयोगशाळांना मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. 

लसीकरण करून घ्याच 

छोट्या छोट्या गोष्टींनी या विषाणूला प्रतिबंध होऊ शकतो हे लक्षात ठेवा असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, दोन्ही डोससह लसीकरण करून घेणे अतिशय आवश्यक असून प्रत्येकाने ही काळजी घेतलीच पाहिजे

का आहे ओमायक्रॉन घातक?

टास्क फोर्सच्या डॉ शशांक जोशी यांनी बैठकीत या विषाणूविषयी माहिती दिली:

कोविडच्या या नव्या विषाणूने दक्षिण आफ्रिकेतील यापूर्वीच्या डेल्टा व्हेरिएंट प्रकाराची जागा घेतली असून त्याचा संसर्ग कितीतरी अधिक आहे

डेल्टा ची जागा ओमायक्रॉनने अवघ्या दोन आठवड्यात घेतली यावरून त्याची घातकता लक्षात येते 

दुसऱ्या लाट्स कारणीभूत असलेल्या डेल्टाचे दोन म्युटेशन होते. बेटा प्रकाराचे तीन म्युटेशन होते पण ओमायक्रॉन या प्रकाराचे पन्नासहून अधिक म्युटेशन आहेत. 

हा व्हेरिएंट सध्याच्या औषधांना, लसीला दाद देतो किंवा नाही ते डॉक्टर्स आणि तज्ञ जाणून घेत आहेत पण घाबरून न जाता आपण काळजी घेण्याची गरज आहे कारण याचा संसर्गाचा वेग पूर्वीच्या डेल्टापेक्षा कितीतरी जास्त आहे 

डबल मास्क घालणे योग्य राहील. सर्जिकल 3 प्लाय मास्क आणि एन 95 प्रकारातील एक मास्क घालणे उचित ठरेल 

खाताना किंवा जेवताना जेव्हा मास्क काढलेला असेल तेच अधिक संधानात बाळगणे गरजेचे

आवश्यक गर्दी टाळा, आवश्यक असेल तरच प्रवास करा 

ज्यांनी लस घेतली नाही त्यांनी ती त्वरित घ्यावी

ओमायक्रॉनला रोखण्याचा एकच मार्ग आहे - दुहेरी मास्क घाला, मोकळ्या हवेत राहा, आणि लसींचे दोन्ही डोस घ्या 

बैठकीच्या प्रारंभी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी ही बैठक बोलविण्यामागे संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचे सांगितले. डॉ प्रदीप व्यास यांनी सादरीकरण करून युरोप तसेच दक्षिण आफ्रिकेत वेगाने पसरणाऱ्या विषाणूविषयी माहिती दिली. यावेळी टास्क फोर्सच्या डॉ संजय ओक, डॉ शशांक जोशी व डॉ राहुल पंडित यांनी देखील यासंदर्भात काळजी घेण्यासाठी मार्गदर्शन केले.

इतर मागासवर्गीय उद्योजकांना सूवर्णसंधी ; शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग कल्याण महामंडळाच्या विविध कर्ज योजनेंतर्गत एकूण 20 लाभार्थ्यांची प्रकरणे मंजूर

 अलिबाग - राज्यातील इतर मागासवर्गीय समाजातील दुर्बल घटकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी शासनाने शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग कल्याण महामंडळाची स्थापना केली आहे. या योजनेंतर्गत आज जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने वैयक्तीक कर्ज व्याज परताव्याची 19 लाभार्थ्यांची तसेच गट-कर्ज व्याज परताव्याच्या 1 लाभार्थ्याची अशा एकूण 20 लाभार्थ्यांची प्रकरणे मंजूर केली.

     जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव म्हस्के-पाटील, शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ लिमिटेड चे जिल्हा व्यवस्थापक श्री.निशिकांत नार्वेकर व इतर समिती सदस्यांनी  या  20 लाभार्थ्यांची प्रकरणे मंजूर केली.

     समाजातील इतर मागासवर्गीयांच्या आर्थिक उन्नतीसाठी महामंडळामार्फत स्वयंरोजगाराच्या विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. छोटे व्यावसायिक व स्वयंरोजगाराकरिता रु.1.00 लक्ष ची थेट कर्ज योजना (नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थीना व्याज नाही) व 20 टक्के बीज भांडवल योजना तसेच ऑनलाईन योजनांमध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (रु. 10.00 लक्ष पर्यत), गट कर्ज व्याज परतावा योजना (रु. 10.00 लक्ष ते 50.00 लक्ष पर्यंत) या योजनांचा समावेश आहे.

    या निमित्ताने इच्छुक, गरजू इतर मागासवर्गीय (ओ.बी.सी.) प्रवर्गातील जास्तीत जास्त लाभार्थींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.

     तसेच जिल्ह्यातील इच्छुक, गरजू इतर मागासवर्गीय (ओ.बी.सी.) प्रवर्गातील व्यक्तींनी योजनेच्या अधिक माहितीसाठी www.msobcfdc.org या संकेतस्थळाला भेट देवून  शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ लिमिटेड चे जिल्हा कार्यालय, श्रीराम समर्थ गृहनिर्माण संस्था मर्या., सदनिका क. 101, पहिला मजला, चेंढरे, अलिबाग, (दूरध्वनी क्र.-02141-224448) अथवा ई-मेल आयडी- dmobcalibagraigad@gmail.com येथे शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक निशिकांत नार्वेकर (मो.9869281787) तसेच उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव म्हस्के-पाटील (मो.9096261053) यांच्याशी संपर्क साधावा.

जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने कसली कंबर

ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटचा धोका लक्षात घेऊन नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांचे आवाहन

अलिबाग :- दक्षिण आफ्रिकेसह जगातील इतर काही देशांमध्ये कोविड-19चा घातक ओमायक्रॉन व्हेरिएंट आढळल्यामुळे महाराष्ट्रात विशेष काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील आरोग्य यंत्रणेला दिले आहेत. या संदर्भात गठीत टास्क फोर्सने नव्याने काही मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. जागतिक स्तरावर सध्या ओमिक्रोन व्हेरीयंटचे एकूण 59 रुग्ण सापडले असून त्यामुळे करोनाची नवीन लाट येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

     या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी निवासी उप जिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, जिल्हा शल्य चि‍कित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे हे उपस्थित होते.

     यावेळी प्रसारमाध्यम प्रतिनिधींना जिल्ह्यात झालेले एकूण लसीकरण, पहिला डोस झालेल्या व्यक्तींची माहिती तसेच दुसरा डोस प्रलंबित असलेल्या व्यक्तींची माहिती देण्यात आली. त्यानुसार अलिबाग तालुका 21 हजार 029,पेण तालुका 10 हजार 382, पनवेल महानगरपालिका क्षेत्र 72 हजार 592, उरण तालुका 14 हजार 78, खालापूर तालुका 14 हजार 995, कर्जत व रोहा तालुका 23 हजार 565, तळा तालुका 2 हजार 489, श्रीवर्धन तालुका 5 हजार 951, म्हसळा तालुका 5 हजार 252, माणगाव तालुका 10 हजार 516, महाड तालुका 12 हजार 035, पोलादपूर तालुका 4 हजार 725, सुधागड तालुका 4 हजार 755 आणि मुरुड तालुका 4 हजार 757 असे एकूण मिळून 2 लाख 7 हजार 171 नागरिकांचा दुसरा डोस अद्याप प्रलंबित असल्याची माहिती देण्यात आली.

     जिल्हाधिकारी डॉ.कल्याणकर यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे यांना कोविड लसीकरण मोहीम अधिक गतीने व नियोजनबद्ध लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या, तहसिलदार, प्रांताधिकारी यांनीही कोविड लसीकरण, कोविड प्रतिबंधक उपाययोजना व्यवस्थितपणे राबविण्याबाबत सूचना दिल्याचे सांगितले तसेच त्यांनी कोविडविषयी भविष्यातील परिस्थितीचा विचार करता जिल्ह्यातील आरोग्य सोयीसुविधांबाबतच्या तयारीचीही माहिती दिली. 

     ओमायक्रॉन या विषाणूच्या नव्या व्हेरिएंटचे आव्हान चिंता वाढविणारे आहे. ओमायक्रॉन या व्हेरिएंटची घातकता लक्षात घेता कोणत्याही परिस्थितीत संसर्ग वाढता कामा नये, यासाठी एकूण परिस्थिती पाहता अजूनही ज्यांनी कोविड-19 लसीचा एकही डोस घेतला नाही त्यांनी आपल्या विभागातील शासकीय वैद्यकीय अधिकारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका किंवा तहसिलदार, प्रांत अधिकारी यांच्याशी त्वरित संपर्क साधावा. तसेच दुसरा डोस प्रलंबित असलेल्या नागरिकांनी त्यांच्या दुसऱ्या डोसबाबतचा विहित कालावधी पूर्ण झाल्याबरोबर आपला दुसरा डोसही घ्यावा. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेत नव्याने सापडलेल्या ओमायक्रॉन व्हेरीएन्टचे रुग्ण पाहता जिल्ह्यातील नागरिकांनीही याबाबत हलगर्जीपणा न दाखवता सामाजिक अंतर पाळणे, हात वारंवार स्वच्छ धुणे, मास्क वापरणे याबाबत काटेकोरपणे सतर्कता बाळगावी, जबाबदारीने वागावे, जिल्ह्यात जास्तीत जास्त अँटीजन, आरटीपीसीआर चाचण्या कराव्यात, परदेशातून लोक मोठ्या प्रमाणावर मुंबईत व इतर ठिकाणी येणे सुरू झाले आहे. त्यापैकी अनेक जण देशांत इतरत्र उतरून देशांतर्गत विमान सेवेने, रस्ते व रेल्वेमार्गे येतात. त्यांच्यात कुणी विषाणूचा वाहक असेल तर इतरांना मोठा धोका होऊ शकतो त्यामुळे अशा प्रवाशांची माहिती नागरिकांना मिळाल्यास तात्काळ स्थानिक प्रशासनाला द्यावी, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नागरिकांना केले आहे.

     जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे यांनी ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटबाबत पुढीलप्रमाणे विस्तृत माहिती दिली-

     ओमायक्रॉन घातक का आहे ?

* कोविडच्या या नव्या विषाणूने दक्षिण आफ्रिकेतील यापूर्वीच्या डेल्टा व्हेरिएंट प्रकाराची जागा घेतली असून त्याचा संसर्ग कितीतरी अधिक आहे

* डेल्टा ची जागा ओमायक्रॉनने अवघ्या दोन आठवड्यात घेतली यावरून त्याची घातकता लक्षात येते 

* दुसऱ्या लाट्स कारणीभूत असलेल्या डेल्टाचे दोन म्युटेशन होते. बेटा प्रकाराचे तीन म्युटेशन होते पण ओमायक्रॉन या प्रकाराचे पन्नासहून अधिक म्युटेशन आहेत. 

* हा व्हेरिएंट सध्याच्या औषधांना, लसीला दाद देतो किंवा नाही ते डॉक्टर्स आणि तज्ञ जाणून घेत आहेत पण घाबरून न जाता आपण काळजी घेण्याची गरज आहे कारण याचा संसर्गाचा वेग पूर्वीच्या डेल्टापेक्षा कितीतरी जास्त आहे 

* डबल मास्क घालणे योग्य राहील. सर्जिकल 3 प्लाय मास्क आणि एन 95 प्रकारातील एक मास्क घालणे उचित ठरेल 

* खाताना किंवा जेवताना जेव्हा मास्क काढलेला असेल तेच अधिक संधानात बाळगणे गरजेचे

* आवश्यक गर्दी टाळा, आवश्यक असेल तरच प्रवास करा 

* ज्यांनी लस घेतली नाही त्यांनी ती त्वरित घ्यावी

* ओमायक्रॉनला रोखण्याचा एकच मार्ग आहे - दुहेरी मास्क घाला, मोकळ्या हवेत राहा, आणि लसींचे दोन्ही डोस घ्या 

 

सह्याद्री कुणबी संघ,पुणे शहर आयोजित रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !


मुंबई - ( दिपक कारकर )- "रक्तदान" म्हणजे सर्वश्रेष्ठ दान होय.आजच्या घडीला रक्तदान काळाची गरजच आहे.एकाने रक्तदान केल्यास त्यातून चौघांना जीवदान मिळते.अनेकदा वेळेवर रक्त मिळत नसल्याने मृत्यू होण्याच्या असंख्य घटना कानी येतात.रक्तदान काळाची गरज आहे,ही जनजागृती करत,व पुणे शहरातील कमी होत चाललेला रक्तपुरवठा या कर्तव्यपर सामाजिक भावनेतून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून  प्रतिवर्षी प्रमाणे पुणे शहरात भव्य रक्तदान शिबिर याग आयोजित करणाऱ्या सह्याद्री कुणबी संघ,पुणे शहर ( महाराष्ट्र ) उपरोक्त संस्थेचा "रक्तदान शिबिर" कार्यक्रम नुकताच रविवार दि.२८ नोव्हेंबर २०२१ रोजी म.न.पा.शाळा जनता वसाहत,पर्वती पायथा गल्ली क्र.४७/४८ येथे पार पडला.या रक्तदान शिबिराला एकूण ७३ रक्तदात्यांनी रक्तदान केले.सर्व रक्तदात्यांना भेटवस्तू देऊन संस्थेतर्फे सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमासाठी मोलाचं सहकार्य सह्याद्री हॉस्पिटल डेक्कन ब्लड बँक यांचे लाभले.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सह्याद्री कुणबी संघाचे सर्व पदाधिकारी/कार्यकर्ते व महिला आघाडी यांनी विशेष मेहनत घेतली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे पुणे शहर चिटणीस संतोष रामाणे यांनी केले.

बेस्ट कला आणि क्रीडा मंडळ आयोजित "प्र.ल.मयेकर स्मृती अभिवाचन स्पर्धा" संपन्न

मुंबई : बेस्ट कला आणि क्रीडा मंडळाच्या संगीत व साहित्य विभागाच्या वतीने नाटककार स्वर्गीय प्रभाकर लक्ष्मण मयेकर यांच्या ७५ व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या लेखन साहित्यावर आधारित "स्वर्गीय प्र. ल.मयेकर स्मृती अभिवाचन स्पर्धा" शनिवार दिनांक २७ नोव्हेंबर २०२१ रोजी कै.रमेश रणदिवे  कलादालन, आणिक आगार येथे फार मोठ्या उत्साहात  पार पडली, सदर स्पर्धेत एकूण १६ स्पर्धकांनी भाग घेतला होता, या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून ख्यातनाम अभिनेते श्री.संजय मोने आणि श्री.अनिल गवस यांनी काम पाहिले. सदर स्पर्धेला बेस्ट समिती सदस्य मान.श्री.अनिल कोकीळ साहेब आवर्जून उपस्थित राहिले व त्यांनी सर्व स्पर्धकांचे कौतुक करुन सर्वांना शुभेच्छा दिल्या.

तसेच सभापती (कला) डॉ.राजेंद्र पाटसुते, सभापती (क्रीडा) श्री.धनंजय पवार, श्री.प्रकाश मयेकर, सौ.विशाखा सहस्त्रबुद्धे, श्री.निखिल मयेकर, श्री.विजय बोरकर, कु.निकेता बोरकर या मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली.

स्पर्धेतील विजयी स्पर्धक पुढील प्रमाणे

प्रथम क्रमांक: प्रमोद सुर्वे, द्वितीय क्रमांक: वीणा जवकर, तृतीय क्रमांक: धनंजय पवार, उत्तेजनार्थ १: संविध नांदलस्कर, उत्तेजनार्थ २: संदेश नाईक, प्रशस्तीपत्रकं: प्रभाकर धांगडे, गणेश मिंडे. सर्व विजेत्यांचे अभिनंदन.!

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मानद सचिव शेखर कवळे, सरचिटणीस (कला) विजय सूर्यवंशी तसेच उदय हाटले, अभय चव्हाण, भूषण मेहेर, संदीप खराडे, चारुदत्त वैद्य, यतीन पिंपळे, पांडुरंग दाभोळकर, सुरेश अढळराव, विवेक पितांबरे, दिलीप लिगम, योगेश पाटील, गणेश जांभे, वसंत राणे, दीपक कारेमोरे, सुदर्शन पाटील, वीरेंद्र बेंद्रे व अनिल चौगुले यांनी विशेष मेहनत घेतली.

3 स्टार इंटरटेनमेंट आणि राशी स्टुडिओ आयोजित आणि मॅजेस्टिक एअरवेज प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत सेलिब्रिटी क्रिकेट स्पर्धा संपन्न......!

मुंबई : 3 स्टार इंटरटेनमेंट आणि राशी स्टुडिओ आयोजित आणि मॅजेस्टिक एअरवेज प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत गुरुवार दिनांक २५ नोव्हेंबर रोजी पुरंदरे मैदान, नायगाव , दादर पूर्व येथे संपन्न झालेल्या CCDL सेलिब्रिटी क्रिकेट डोनेशन लीगमध्ये अनेक मराठी अभिनेते, तंत्रज्ञ आणि पत्रकार यांनी एकही रुपया मानधन न घेता केवळ जनसेवा म्हणुन सहभाग दर्शविला होता. शिवाय या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळणारे पैसे मदतनिधी म्हणून बालकाश्रमांना देण्यात येणार असून या लीग मध्ये प्रामुख्याने विजय पाटकर, अंगद म्हसकर, प्रभाकर मोरे, सुदेश म्हशीलकर, जयवंत भालेकर, अतुल आगलावे, कैलास वाघमारे, अंकुर वाढवे, महेश्वर तेटांबे, प्रणव रावराणे, ओम जंगम, महेश कोकाटे, आनंद मयेकर, जयवंत वाडकर, सनीभूषण मुणगेकर, सचिन पाताडे, सुरेश डाळे, अनिकेत केळकर ह्यांसारखे एकाहून एक कलाकार मंडळी खेळली गेले. ज्या ज्या संस्था लहान मुलांच्या शिक्षणाची तरतूद करतात अश्या लाभार्थी संस्थांना CCDL चे आयोजक श्री.संचित यादव, श्री. अमर पारखे , श्री. राकेश शेळके, सौ.शितल माने शेळके तसेच सचिन मोहिते, संदीप मोहिते, संदेश मोहिते, पूर्णिमा वाव्हळ ह्यां तर्फे ही मदत दिली जाणार असून त्या पैकी नमस्ते फाउंडेशन,  फॅमिली होम,  तर्पण फाउंडेशन, मंगेश भगत प्रतिष्ठान ह्या संस्था आहेत. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सनी मुणगेकर आणि अनिकेत केळकर यांच्या ऑस्ट्रिक या अंतिम विजेत्या संघास आणि विजय पाटकर आणि जयवंत वाडकर यांच्या ईगल या अंतिम पराभूत संघास आकर्षक ट्रॉफी प्रदान करून उत्साही वातावरणात CCDL सेलिब्रिटी क्रिकेट डोनेशन लीग सोहळा संपन्न झाला.



कै.सुविद्या दत्तात्रय तळेकर यांच्या नावाने आणि विजय पाध्ये यांच्या हस्ते व् उपस्थितीत संपन्न होणार अभियान सन्मान सोहळा....!

मुंबई : स्वातंत्रसैनिक डॉ. परशुराम पाटील यांच्या कला केंद्राच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या कलाश्रमच्या वतीने अभियान सन्मान आणि अव्वल पुरस्काराचे आयोजन ३० नोव्हेंबर २०२१ या दिवशी संध्याकाळी ७.०० वाजता पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजित केले आहे. या कार्यक्रमाला बि. वाय. पाध्ये पब्लिसिटीचे संचालक विजय पाध्ये हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अभिनेते, कथाकार, स्तंभलेखक भालचंद्र घाडीगावकर आणि पत्रकार, नाट्य समिक्षक, लेखक रमेश उदारे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने पुरस्कार आणि स्पर्धेचे आयोजन केले आहे. ज्येष्ठ रंगकर्मी उपेंद्र दाते यांना अव्वल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या निमित्ताने नोव्हेंबर महिन्यांतील स्मृतिदिन लक्षात घेऊन गायिका माणिक वर्मा यांना संगितमय आदरांजली वाहिली जाणार आहे. यात मृण्मयी पुंडे , ऋजुता पुंडे या भगिनिंचा सहभाग आहे. निवेदन तपस्वी राणे, आदर्श शिक्षिका सुविद्या तळेकर या दिवंगतांच्या नावाचे दखलपत्र निवेदक मंदार खराडे आणि आदर्श शिक्षिका गीता शेलार यांना देण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभावरी खरडे तर दखलपत्रचे वाचन प्रसाद पवार, प्रितिका वरणकर, अभिजित धोत्रे हे कलाश्रमचे सदस्य करणार आहेत. कार्यक्रम शासनाच्या नियमांचे पालन करून केले जाणार आहे.  अशी माहिती कलाश्रमच्या संचालिका नंदिनी नंदकुमार पाटील यांनी दिली.अभियान सन्मानचे हे चाळीसावे पुष्प आहे. 



वरळीतील किन्नराना मिळणार मतदानाचा अधिकार

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने नवीन मतदार नोंदणी व मतदार यादी अद्ययावत करण्याचे अभियान सुरू केले आहे.१८२ वरळी विधानसभा मतदार संघातील सामाजिक कार्यकर्ते- साईभाई रामपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवशक्ती फाउंडेशन, यांनी १८२-वरळी विधानसभा कार्यक्षेत्रात प्रत्यक्ष भेटी देऊन, मतदार नोंदणीत नावे नसलेल्या  किन्नर, अपंग व अंधाचा  पन्नास नागरिकांचा शोध घेतला. त्यांना १८२ वरळी विधानसभा संघाचे  नोंदणी अभियान मतदार अधिकारी डॉ. शिवाजी पाटील व वरळी विधानसभा संघाचे निवडणूक अधिकारी- महारुद्र वारे हस्ते मतदार नोंदणी फॉर्म देण्यात आले.

     सामाजिक कार्यकर्ते साईभाई रामपूरकर व शिवशक्ती फाउंडेशन  चे अध्यक्ष - विकी शिंदे व पदाधिकारी-  कार्यकर्तेचे हे कार्य कौतुकास्पद असून वरळीतील किन्नराना प्रथमच मतदान करण्याचा हक्क मिळणार आहे.

लग्नाचा वाढदिवस शुभेच्छा !!

रविवार, २८ नोव्हेंबर, २०२१

सौ.पल्लवीताई कुणाल सरमळकर नवराष्ट्रतर्फे महिला पुरस्कार-२०२१ ने सन्मानित

मुंबई (समीर खाडिलकर /शांताराम गुडेकर )
                 मुंबईसह पश्चिम उपनगर मध्ये विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यां   मान. सौ.पल्लवीताई कुणाल सरमळकर यांच्या जन्मदिवसाच्या दिनी पल्लवीताई सरमळकर यांना "महिला पुरस्कार" मुंबई शहर पालकमंत्री श्री.अस्लम शेख तसेच काँग्रेस मुंबई प्रदेश अध्यक्ष श्री. भाई जगताप यांच्या शुभहस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.वाढदिवसाच्या दिवस आणि पुरस्कार हा जुळवून आलेला  योगायोग  आहे.कार्यक्रम विलेपार्ले येथील ऑरचिड पंचतारांकित हॉटेलमध्ये नवराष्ट्र तर्फे "महिला पुरस्कार सोहळा- २०२१" पार पडला या सोहळ्यास अनेक दिग्गज आणि सिनेअभिनेत्री उपस्थित होते.पल्लवीताई सरमळकर यांना "महिला पुरस्कार -२०२१"प्राप्त झाल्याबद्दल त्यांना अनेकांकडून अभिनंदनासह शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

शुक्रवार, २६ नोव्हेंबर, २०२१

ग्रीनसोल ट्रेस मोड संस्थेच्या वतीने(ग्रीनसोल फाऊंडेशन)जि.प.केंद्र शाळा वेहेळे येथील विद्यार्थ्यांना चप्पल वाटपचा आगळा-वेगळा कार्यक्रम संपन्न

भिवंडी(गुरुनाथ तिरपणकर)- विद्यादानाचे काम करत असताना विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा,शारीरिक, बौद्धिक पात्रता वाढावी म्हणुन शिक्षक वर्ग मेहनत घेत असतात,त्यांना पदस्पर्श करुन विद्यार्थी आशिर्वाद घेत असतात,त्याच विद्यार्थ्यांच्या पायातील चप्पल आगळवेगळ साधन आहे.अशावेळी शहरातील वेहेळे गावातील जि.प.केंद्र शाळेत ग्रीनसोल ट्रेस मोड संस्थेच्यावतीने(ग्रीनसोल फाऊंडेशन)येथील विद्यार्थी-विद्यार्थींनींना चप्पल वाटपचा आगळा-वेगळा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी जनजागृती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर, समितीच्या सहखजिनदार सौ.श्रुती सतिश उरणकर,ग्लोबल मालवणीचे सदस्य प्रफुल्ल मोरे, सदस्या सौ.संध्या शंकर मोरे, सरपंच सौ.पल्लवी जितेंद्र पाटील,मुख्याध्यापिका सौ.ममता किरण निकावडे, सौ.जयश्री मनोहर ढाके यांच्या हस्ते मुलांना चप्पल वाटप करण्यात आले. तसेच सौ.चंचला पाटील,सौ.नमता पाटील, सौ.विजयलक्ष्मी सुर्यवंशी, श्री.निलकमल मेघश्याम,श्री.राजेंद्र सातपुते, सौ.माधुरी पाटील,संजना पाटील,सौ.छाया जाधव,सौ.स्नेहल तारी आदी शिक्षक वर्ग उपस्थित होते. जयश्री ढाके व प्रफुल्ल मोरे यांच्या प्रयत्नाने हा चप्पल वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. जनजागृती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन सौ.जयश्री ढाके यांनी केले.या कार्यक्रमासाठी ग्रीनसोल फाऊंडेशन व त्यांचे सहकारी अंकीत कुमार व रुपाली मोरे यांचे विशेष सहकार्य लाभले. भारतीय संविधान दिनानिमित्त डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन कार्यक्रमाची सांगता झाली.

शिवसेना प्रणित शिव सामर्थ्य सेनाच्या पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर

मुंबई (शांताराम गुडेकर)-  हिंदू हृदयसम्राट,सरसेनापती मा.श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने,पक्षप्रमुख,महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा.श्री.उद्धव साहेब ठाकरे, व युवासेना अध्यक्ष,पर्यावरण मंत्री मा.श्री.आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि शिवसेना सचिव, खासदार मा.श्री.विनायकजी राऊत यांच्या मार्गदर्शनाने संघटनेच्या घाटकोपर कार्यालयात मुंबई,सातारा,ठाणे जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आल्या त्यात सातारा उपजिल्हा अध्यक्षपदी श्री.प्रकाश सोपान पाटील,महिला जिल्हा अध्यक्षपदी सुलोचना चंद्रकांत पवार,पुणे महिला जिल्हा अध्यक्षपदी अनन्या गणपत दीक्षित,कराड दक्षिण तालुका अध्यक्षपदी विजय भिवराम पाटील,पाटण तालुका अध्यक्ष पदी गौरव महादेव खराडे,सातारा तालुका अध्यक्ष पदी राहुल संपत इंगवले,ठाणे महिला तालुका अध्यक्षपदी सौ.अमृता विलास पवार,मुंबई मीडिया उपाध्यक्षपदी ऋषिकेश किशोर महाजन,मुंबई आग्रिपाडा विभाग अध्यक्षपदी उद्धव राजाराम झगडे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली. तसेच मुंबई कुर्ला येथील नवनिर्वाचित शिवसेना उपशाखाप्रमुख शाखा क्र.167 आविष्कार वांगडे,शाखा क्र.167 राहुल गुप्ता यांचा शिव सामर्थ्य सेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी शिव सामर्थ्य सेनेचे अध्यक्ष श्री.संदीप भोज,सरचिटणीस जितेंद्र दगडू सकपाळ,कोषाध्यक्ष मनोज घोडेस्वार,मुंबई सरचिटणीस अमोल वंजारे,मुंबई चिटणीस पूजा दळवी, ईशान्य मुंबई अध्यक्ष हितेश गायकवाड, आग्रीपाडा शिवसेना उपशाखाप्रमुखं राजाभाऊ झगडे व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

शहापूर काँग्रेस तर्फे आज कीर्तनातून संविधान जागर

शहापूर -(एस. गुडेकर)-  देशात लोकशाही अस्तित्वात आल्यानंतर देशातील तमाम बहुजन वर्गाला व गावकुसबाहेरील माणसाला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला त्या संविधानाचे महत्व व राष्ट्रीय एकात्मता टिकविण्यासाठी संविधान दिनानिमित्त काँग्रेसने विविध उपक्रम हाती घेतले असून ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या नेतृत्वाखाली शहापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष महेश धानके यांनी कीर्तनातून संविधान जागर करण्यासाठी शुक्रवार दिनांक 26 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी 6:30 वाजता खातीवली ठाकूर पाडा येथे कीर्तनाचे आयोजन केले आहे.

       काँग्रेसने दिनांक 14 ते 29 नोव्हेंबर पर्यंत जनजागरण अभियान सुरू केले असून ठाणे ग्रामीण जिल्ह्यात या निमित्ताने विविध कार्यक्रम होत आहेत याच अभियान  अंतर्गत सामाजिक प्रबोधन करणारे हभप भास्कर महाराज जाधव हे कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता,संविधान जागर आणि वाढती महागाई यावर कीर्तनाच्या माध्यमातून भाष्य करणार आहेत.

    या कार्यक्रमास अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप,प्रदेश उपाध्यक्ष सुभाष कानडे,ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे,माजी खासदार सुरेश टावरे,प्रदेश सचिव निलेश पेंढारी,राजेश घोलप यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.तरी या कीर्तन सोहळ्यास आवर्जुन उपस्थित रहावे असे आवाहन काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महेश धानके यांनी केले आहे.

विक्रोळीत वनिता फाउंडेशन च्या वतीने संविधान दिनानिमित्त नगर राज बिल व मतदाता जागृती कार्यशाळा संपन्न


मुंबई (प्रतिनिधी)-  विक्रोळी टागोर नगर येथे वनिता फाउंडेशन ,एरिया सभा समर्थन मंच  , तक्षशिल बुद्ध विहार समिती च्या वतीने संविधान दिनानिमित्त भारतीय संविधान ७४ वी घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने वार्ड निहाय एरिया सभा द्वारे नगर राज बिल व मतदार जागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले  होते . यावेळी  कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी स्थानिक वार्ड नंबर ११९ च्या नगरसेविका मनिषा ताई रहाटे होत्या. यावेळी त्यांनी आपल्या वार्डातील सोयीसुविधा व समस्या कोण- कोणत्या प्रकारच्या आहेत याची माहिती   दिली.                  भारतीय   संविधान 74 वी घटनादुरुस्ती नुसार महानगरपालिका प्रशासन यांच्या निर्णय प्रक्रियेत नगराज विधेयकाच्या माध्यमातून लोकांचा प्रत्यक्ष सहभागासाठी क्षेत्र सभा ,/एरिया सभा वार्ड निहाय कमिट्या स्थापन करून कायद्याची अंमलबजावणी  करून आपल्या विभागाचा विकास होऊ शकतो म्हणून या सभेचे आयोजन करून  स्थानिक नगरसेविका मनिषा ताई रहाटे यांच्यासोबत करून वार्ड क्रमांक ११९  ची सर्व प्रकारची माहिती घेण्यात आल्याचे वनिता फाउंडेशनचे संस्थापक प्रभाकर कांबळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.         कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन व संविधानाच्या उद्देशिकेचे  वाचन मैत्री सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व एरीया सभा समर्थन मंचाचे  सुरज भोईर यांनी केले . या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मध्ये डॉ. श्रीपाल कांबळे, मनसेचे वार्ड अध्यक्ष संतोष देसाई मा. हुसेन शेख, राजेंद्र भिसे , प्रीती क्षीरसागर ,सिताराम शेलार समाजसेवक डॉक्टर योगेश भालेराव वनिता फौंडेशनच्या अध्यक्षा वनिता ताई कांबळे तक्षशिला बुद्ध विहारचे  मनोज भाऊ निकाळे ,अरुण कांबळे ,प्रदीप हिरे ,पत्रकार अविनाश  माने आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी मार्गदर्शनपर विचार मांडले व सर्वांना भारतीय संविधान उद्देशिकेचे वाटप करण्यात आले .शेवटी सर्वांचे आभार फाऊंडेशनचे डॉ. श्रीपाल कांबळे यांनी मांडले . राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

भारतीय संविधानाची प्रास्ताविका

 

आमचा मान,आमचा सन्मान

 भारतीय संविधान, भारतीय संविधान"

    ९ डिसेंबर १९४६ साली संविधान सभेचे पहिले सत्र सुरू झाले. २वर्ष ११महिने १७दिवस अखंड परिश्रम करून भारतीय संविधान तयार झाले.२६ नोव्हेंबर १९४९ रोजी  संविधान मसुद्याला  मान्यता देण्यात आली आणि २६ जानेवारी १९५०पासून संविधान अंमलात आले आणि आपला देश प्रजासत्ताक झाला. 

   भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान असून  समता, बंधुता, स्वातंत्र्य, लोकशाही,न्याय, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, राष्ट्रीय एकात्मता  या मूल्यांची घटनेत बीजे रोवून  संविधानाची निर्मिती करण्यात आली आहे . मुळ घटनेत १ प्रास्ताविका, ८ अनुसुची, २५ भाग आणि ३९५ कलमे होती. सध्या भारताच्या घटनेत १ प्रास्ताविका, १२ अनुसुची, २५ भाग, ४४८ कलमे, ५ परिशिष्टे आहेत.

      आपल्या संविधानचा आत्मा कशात आहे असे म्हटल्यास संविधानाचा  आत्मा हा  प्रास्ताविकेत आहे  असे म्हणता येईल जसे एखाद्या मंदिराचे सौंदर्य  त्याचा कळस पाहिल्यावर आपण ठरवतो त्याचप्रमाणे beauty of indian constitution असे म्हटल्यास premble असे म्हणता येईल.

     आपले  प्रास्ताविक हे वेगळे  आणि वैशिष्ट्यपूर्ण असे आहे.मग प्रश्न पडतो ही घटना  कुणाची आहे तर ही आम्हा भारतीय लोकाची आहे.आम्ही म्हटल्यावर  आपलेपणा एकजूटपणा निर्माण होतो. कोणताही धर्म या प्रेषित याचे नाव न घेता व्यक्तीला सर्वोच्च स्थान देणारी ही घटना आहे.म्हणून याची सुरुवात आम्ही भारतीय लोक अशी करण्यात आली आहे.मग ही कोणत्याही देशाची आहे तर जो देश सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य आहे अशा आमच्या भारत देशाची आहे. प्रास्ताविकेतून देशाची वाटचाल, ध्येयधोरणे, इच्छा आकांक्षा प्रतिबिंबीत होतात.देशातील नागरिकाला ही घटना स्वातंत्र्य, समानता , न्याय,एकता, बंधुता या मुल्याची हमी देते आहे आणि त्यानुसार घटनेत  विविध कलमाद्वारे  तरतुदी करण्यात आल्या आहेत.व्यक्तीला मुक्त व विकासाला  पोषक असे वातावरण हवे असेल तर  ही चार ही तत्व आवश्यक आहेत.यात सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय आहे. दर्जा  व संधीची समानता आहे. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य आहे तसेच व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता अबाधित राखणारी बंधुता अपेक्षित असून या सर्व तत्वाची पूर्तता करण्याचा निर्धार केला जात आहे. शेवटी  संविधानाचा आम्ही स्वीकार करीत असून स्वताप्रत अर्पण करीत आहोत. म्हणजेच या प्रास्तविकेची सुरुवात ही आम्ही पासून होऊन शेवट हा स्वतः पर्यंत होत आहे आणि मला वाटतं हेच आपल्या प्रास्ताविकेचे वैशिष्ट्य आहे.देशातील प्रत्येक नागरिकाला सन्मान देणारे,त्याच्या मूलभूत हक्कांना अधिकारांना संरक्षण देणारे, नागरिकांच्या प्रगतीसाठी विविध कायदे करणारे आपले भारतीय संविधान चिरायु होवो हीच आपल्या सर्व भारतीयांची भूमिका असली पाहिजे.

    आमचा मान, सन्मान,शान  हे आमचे संविधान आहे.त्याच्याशी कटिबद्ध राहण्याचा आम्हा भारतवासीयांचा अखंड प्रयत्न राहिल.

   -प्रदीप महादेव कासुर्डे , घणसोली, नवी मुंबई 

     मो.7738436449






गुरुवार, २५ नोव्हेंबर, २०२१

शालार्थ आयडीची सक्ती न करता शिक्षक प्रशिक्षण शुल्क माफ करण्याची खाजगी शिक्षक संघटनेचे शिक्षण मंत्र्यांना साकडे

मुंबई | प्रतिनिधी : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने पत्र काढून बारा वर्षे झालेल्या शिक्षकांना वरिष्ठ व चोवीस वर्षे झालेल्या शिक्षकांना निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणी सुरू करण्याबाबत सूचना केल्या आहेत. वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण याकरिता प्रति प्रशिक्षणार्थी रुपये दोन हजार इतके शुल्क आकारले आहे. आज पर्यंत अशा प्रशिक्षणासाठी शुल्क आकारलेली नव्हती. राज्यातील विनाअनुदानित , अंशतः अनुदानीत , स्वयंअर्थसाय्यित  शाळांतील शिक्षकांना शालार्थ आयडी नसल्याने हे शिक्षक प्रशिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शालार्थ आयडीची सक्ती करू नये. राज्यातील सर्व शिक्षकांना नि:शुल्क प्रशिक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष ज्ञानदेव हांडे यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांना पत्र लिहून मागणी केली आहे.

रत्नेश्वरी देवीच्या मंदिराच्या संरक्षणासाठी हजारो ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

उरण - उरण तालुक्यातील जसखार गावाचे जागृत देवस्थान असलेल्या रत्नेश्वरी देवीच्या मंदिराच्या संरक्षणासाठी दिनांक 23/11/2021 रोजी संध्याकाळी 7.30 वाजता प्राथमिक बैठक रत्नेश्वरी मंदिर जसखार -उरण तालुका येथे घेण्यात आली.बैठकीसाठी जसखार गावातील आणि आजू बाजूच्या गावातील हजारो नागरिकांनी उपस्थित राहून सहभाग दाखवला. मंदिराच्या अगदी जवळून जाणाऱ्या ब्रीज मुळे मंदिराचे सौंदर्य धुळीला मिळाले असून त्या ब्रीज साठी खोदण्यात आलेल्या पायलिंग मुळे मनिराच्या मुख्य पिलर आणि बिमना तडे गेलेले असून भिंतीचे देखील खुप नुकसान झालेले आहे. ग्रामपंचायत जसखार, जेएनपीटी, सिडको, NHAI यांना अनेक वेळा पत्र व्यवहार करूनही कोणत्याही प्रकारचे उत्तर मिळाले नसून अनागोंदी कारभार सुरू आहे. उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते तथा उरण सामाजिक संस्थेचे सरचिटणीस संतोष पवार यांना जसखार मधील तरुणांनी मार्गदर्शनासाठी बोलावले होते. दोघांनीही मंदिराची पाहणी करून झालेल्या दुरावस्थेवर चिंता व्यक्त केली. जर ह्या ब्रीज चे काम त्वरित थांबविले नाही आणि त्याचा मार्ग मंदिराच्या दुरून नेला नाही तर भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.अमित ठाकूर यांनी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की  रत्नेश्वरी देवीने जसखार गावाचे संरक्षण वर्षानुवर्ष केलेले आहे. आता त्याच्या मंदिराच्या संरक्षणाची जबाबदारी आपल्यावर आली आहे. म्हणून सर्वांनी जागृत राहून उरण सामाजिक संस्थेच्या मार्गदर्शनाखाली जी काही आंदोलनाची दिशा ठरवली जाईल त्यात मोठ्यात मोठ्या संख्येने हजर राहावे असे आवाहन करण्यात आले. प्रा राजेंद्र मढवी यांनी सर्वांचे आभार मानले.

जासई येथील शिवस्मारक जनतेसाठी खुले करावे - महेंद्रशेठ घरत

उरण - उरण तालुक्यातील जासई येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे 'शिवस्मारक' रायगड जिल्ह्यात प्रसिद्ध असून जासई येथील शिवस्मारक जनतेसाठी लवकरात लवकर खुले व्हावे यासाठी जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी जे. एन.पी.टी प्रशासनाकडे मागणी केली आहे.या संदर्भाचे निवेदन घेऊन जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, उरण विधानसभा प्रभारी अखलाक शिलोत्री, फिशर मॅन काँग्रेस महाराष्ट्र उपाध्यक्ष मार्तंड नाखवा यांच्या शिष्ठमंडळाने आज जे. एन.पी.टी चे उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांची भेट घेऊन त्यांना या बद्दल चे निवेदन दिले.उन्मेष वाघ यांनी सदर मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन सदरचे शिवस्मारक येत्या 1 डिसेंबर 2021 पासून जनतेसाठी खुले करण्याचे आश्वाशित केले आहे.जे.एन.पी.टी चेअरमन संजय सेठी यांनाहि या बाबतचे निवेदन दिले असुन त्यांचे स्वीयसहाय्यक पद्मनाभान यांच्या कडे निवेदन देण्यात आले आहे. त्यांनीहि याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिले आहे. यावेळी काँग्रेस शिष्ठमंडळाने जे. एन.पी.टीप्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले.आता 1 डिसेंबर पासून शिवस्मारक सर्वांसाठी खुले होणार असल्याने दास भक्तांमध्ये, शिव भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

द्रोणागिरी सेक्टर 30 येथील ट्रान्सफॉर्मर चे दुरुस्तीकरण अथवा नुतनीकरण

उरण - माजी आमदार तथा शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख मनोहर शेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि द्रोणागिरी शहर प्रमुख जगजीवन भोईर यांच्या वारंवार केलेल्या पाठपुराव्यामुळे एम.एस.सी.बी.अधिकारी केतन थत्ते यांनी ट्रान्सफॉर्मर ची पाहणी करून लवकरात लवकर दुरुस्तीकरण करून देऊ असे आश्वासन दिले आहे. डेपो च्या आजूबाजूला खूप गवत वाढले असून त्यामुळे स्पार्क होऊन विजेचा खोळंबा होत आहे म्हणून येत्या मंगळवारी गवत साफसफाई करण्यात येईल असे केतन थत्ते यांनी सांगितले.

  यावेळी एम.एस.सी.बी अधिकारी केतन थत्ते, शिवसेना द्रोणागिरी शहर सचिव धनंजय शिंदे, द्रोणागिरी सेक्टर ५० चे शाखाप्रमुख अंकुश चव्हाण, सन्नी पार्टे,राहुल पाटील आणि कार्यकर्ते उपस्थित होते.शिवसेना शाखा द्रोणागिरीने सतत केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून ट्रान्सफॉर्मरची व इतर समस्या सुटणार असल्याने द्रोणागिरी परिसरातील नागरिकांनी शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आभार मानले आहे.

मागेल त्याला शेततळे शेतकऱ्यांना संजीवनी देणारी योजना

अलिबाग :- जिल्ह्यात काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण निश्चित झाले आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या कोरडवाहू क्षेत्रातील पिकांवर व त्यांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. पावसात पडलेला खंड व पाण्याच्या टंचाईमुळे पिकाचे नुकसान होऊ नये, यासाठी मागेल त्याला शेततळे योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे.

    शेती उत्पादनामध्ये शाश्‍वतता आणण्यासाठी तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे उपयुक्त असल्याने पर्जन्यावर आधारित शेतीसाठी जलसंवर्धन करून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

    रायगड जिल्ह्यात सन 2017-18 ते 2020-21 या कालावधीत एकूण 648 शेततळ्यांची कामे पूर्ण झाली असून सन 2017-18 मध्ये रु.102.25 लाख, सन 2018-19 मध्ये रु.89.37 लाख, सन-2019-20 मध्ये 59.69 लाख,  सन 2020-21 मध्ये 15.50 लाख व सन 2021-22 मध्ये 33.41 लाख याप्रमाणे एकूण 300.22 लाख अनुदान वाटप करण्यात आले आहे. या शेततळ्यांमुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी, मत्स्योत्पादन व पशुसंवर्धन इत्यादी शेती पूरक उद्योगासाठी फायदा झाला असून उत्पादनात काही प्रमाणात शाश्वतता आली आहे.

    रायगड जिल्ह्यात शेततळे निर्माण केल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्नात वाढ होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे. त्यामुळे शेततळे ही योजना शेतकऱ्यांस संजीवनी देणारी योजना ठरली आहे. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा व लेखी निधी मागणी करावी,  असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्वला बाणखेले यांनी केले आहे.


धान खरेदी योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदणीस दि.30 नोव्हेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ

अलिबाग :- जिल्ह्यात दि.महाराष्ट्र स्टेट को-ऑप मार्केटिंग फेडरेशन मुंबई व महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ मर्या. प्रादेशिक कार्यालय जव्हार या दोन अभिकर्ता संस्थांमार्फत किमान आधारभूत किंमत धानखरेदी योजनेंतर्गत अनुक्रमे 38 धान खरेदी केंद व 01 धान खरेदी केंद्र शासनाने मंजूर केले आहे. दि.महाराष्ट्र स्टेट को-ऑप मार्केटिंग फेडरेशन मुंबई यांचे अजून 05 धानखरेदी केंद्र मंजूरीची कार्यवाही शासनस्तरावर सुरु आहे.

   जिल्हयातील शेतकऱ्यांकडून त्यांच्या शेतात पिकवलेले धानाची (भाताची) खरेदी ही खरीप पणन हंगाम: दि.01 ऑक्टोंबर 2021 ते दि.31 जानेवारी 2022 व रब्बी/उन्हाळी हंगाम:- दि.01 मे 2022 ते दि.30 जून 2022 या कालावधीत केली जाणार आहे.

    तालुका हद्दीमध्ये कोणत्याही गावातील शेतकरी त्याच्या इच्छेनुसार तालुक्यातील कोणत्याही खरेदी केंद्रावर धान विक्री करु शकतो. त्यानुसार धान खरेदी केंद्रावर धान विक्रीसाठी नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांची गावनिहाय नोंद खरेदी केंद्रावरील रजिस्टरमध्ये करण्यात यावी,  जिल्हयातील सर्व शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यावी.तसेच पणन हंगाम 2021-2022 मध्ये विकेंद्रित धान खरेदी योजनेंतर्गत पुरेशा प्रमाणावर शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदी झालेल्या नसल्याने शासनाने शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदणीस दि.30 नोव्हेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यापुढे मुदतवाढ देण्यांत येणार नाही. सर्व इच्छुक व पात्र शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदी करुन घ्याव्यात.

   जिल्ह्यातील धान खरेदी केंद्र स्थापन करणे, धान खरेदी करणे, शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदी करणे, शेतकऱ्यांना विहित कालावधीत त्यांनी विक्री केलेल्या धानाचा मोबदला मिळणे व बोनस मिळणे व इतर बाबींच्या अनुषंगाने काही अडचणी आल्यास शेतकऱ्यांनी जिल्हा पणन अधिकारी रायगड, श्री.केशव बी. ताटे, मो.7718064716 व  प्रादेशिक व्यवस्थापक जव्हार, श्री. विजय गांगुर्डे, मो.7738285566 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके यांनी केले आहे.

जिल्ह्यातील 6 नगरपंचायतींसाठी 21 डिसेंबरला होणार मतदान

अलिबाग :- विविध 32 जिल्ह्यांतील 105 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान तर 22 डिसेंबर 2021 मतमोजणी होणार आहे. त्यासाठी संबंधित नगरपंचायतींच्या क्षेत्रात दि.24 नोव्हेंबर 2021 पासून आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली आहे.

   यानुसार रायगड जिल्ह्यातील खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, पाली (नवनिर्मित) या नगरपंचायत क्षेत्रात सार्वत्रिक निवडणूक होईल.राज्यातील एप्रिल 2020 ते मे 2021 या कालावधीत मुदत संपलेल्या 81 आणि डिसेंबर 2021 मध्ये मुदत संपणाऱ्या 18; तसेच नवनिर्मित 6 अशा एकूण 105 नगरपंचायतींच्या प्रत्येकी 17 सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होईल. त्यासाठी 1 ते 7 डिसेंबर 2021 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील. 4 व 5 डिसेंबर 2021 रोजी सुट्टी असल्याने नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 8 डिसेंबर 2021 रोजी होईल. मतदान 21 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत असेल. 22 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल.

   राखीव जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. त्याचबरोबर कोविड-19 संदर्भात केंद्र व राज्य शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार व आवश्यक त्या उपाययोजना करून या निवडणुकांचा कार्यक्रम राबविण्यात यावा, त्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने 15 डिसेंबर 2020 रोजी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करावी, असेही निर्देश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.


"स्वराज्य ग्रुप" तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप !

कोकण  - (दिपक कारकर)- विविध उपक्रम राबवत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कोकण सुपूत्र युवा समाजसेवक वैभव राऊत यांच्या उपरोक्त समूहातर्फे  चिपळूण तालुक्यातील जि.प.आदर्श शाळा करंबवणे नं.१ येथे सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.या  कार्यक्रमास सरपंच सौ.खळे मॅडम,केंद्रियप्रमुख,थोर सर,शा.व्य.अध्यक्षा सौ.स्मितल सन्नाक,उपाध्यक्षा सौ.कीर्ती जाधव,शा.व्य.सदस्य व माजी सरपंच श्री.शिगवण,ग्रामस्थ श्री.प्रतीक आयरे,सदस्या सौ.समीक्षा सन्नाक,सौ.जान्हवी पवार,सौ.शर्मिला सन्नाक आदी उपस्थित होते.स्वराज्य ग्रुपचे संस्थापक/अध्यक्ष वैभव राऊत यांचे शाळा व्य.समिती,शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांनी अभिनंदनासह कौतुक केले.

मंगळवार, २३ नोव्हेंबर, २०२१

श्री पाणबुडी देवी कलामंच तर्फे "श्री पाणबुडी चषक -२०२१" या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन !

मुंबई : ( दिपक कारकर )मुंबई सारख्या शहरात कोकणची लोककला जाखडी नृत्य/बहुरंगी नमन/सामाजिक-शैक्षणिक उपक्रम सातत्याने राबविण्यात अग्रेसर असणाऱ्या श्री पाणबुडी देवी कलामंच तर्फे मुंबईत कोव्हिड - १९ च्या दिवसांत शासकीय नियमांचे पालन करून भव्य-दिव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे एकदिवसीय आयोजन करण्यात आले आहे.रविवार दि.५ डिसेंबर २०२१ रोजी ही स्पर्धा मुंबईतील चर्चगेट ( ओव्हल मैदान - साईड पिच ) येथे होणार असून एकूण ३२ संघाचा या स्पर्धेत सहभाग असणार आहे.ही स्पर्धा ४ गटात खेळवली जाईल ज्यामध्ये वाडी मार्यदित २ गट,गाव मर्यादित १ गट, व १ खुला गट अशा स्वरूपाची ही स्पर्धा असेल.

  या स्पर्धेतील ४ गटातून विजयी प्रथम क्रमांकाचे चार संघ यांना प्रत्येकी रोख रक्कम रुपये १०,००० / व आकर्षक चषक व मालिकावीर खेळाडूला आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी व अधिक माहितीसाठी प्रदिप कातकर - ८८५०४३४९८८,सुनिल डिंगणकर - ९७०२१५५९५९ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन श्री पाणबुडी देवी कलामंचा तर्फे करण्यात आले आहे.

प्रत्येक संकटावर मात करुन महाराष्ट्र निर्धाराने अन् एकजुटीने पुढे जात राहणार - उपमुख्यमंत्री ना. अजित दादा पवार

अजितदादांच्या हस्ते सपत्नीक सुवर्ण गणेश मुखवटा प्रतिष्ठापना सोहळा  संपन्न

अलिबाग :- या महाराष्ट्राने अनेक संकटे पाहिली, अनेक संकटे झेलली. परंतु हा महाराष्ट्र कधी थांबला नाही. यापुढेही हा महाराष्ट्र निर्धाराने, एकजुटीने प्रत्येक संकटावर मात करून पुढे जात राहील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री ना.अजित दादा पवार यांनी आज येथे केले.

    श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगार येथील सुवर्ण गणेश मंदिरातील सुवर्ण गणेश मुखवटा प्रतिष्ठापना सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, पालकमंत्री कु.आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार भरत गोगावले, आमदार अनिकेत तटकरे, सरपंच उदय बापट, सुवर्ण गणेश मंदिराचे ट्रस्टचे अध्यक्ष महेश पिळणकर, उपाध्यक्ष निलेश वाणी, श्रीमती सुनेत्रा पवार, श्रीमती वरदा तटकरे, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, पोलीस अधीक्षक अशोक दुधे आदी उपस्थित होते.

     आज अंगारकी चतुर्थी आणि याच दिवशी दिवेआगारचे वैभव असलेल्या सुवर्ण गणेश मुखवट्याचा प्रतिष्ठापना सोहळा,म्हणूनच आजचा दिवस दिवेआगारवासियांसाठी सुवर्ण क्षण मानला जात आहे. येथील चोरीस गेलेल्या सुवर्ण गणेश मूर्तीच्या मुखवट्याच्या प्रतिष्ठापना सोहळ्याप्रसंगी उपमुख्यमंत्री ना. अजित दादा पवार यांना सपत्नीक सुवर्ण गणेशाची पूजा करण्याचा मान मिळाला. 


    याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, अंगारकी चतुर्थीच्या मुहूर्तावर आज हा सुवर्ण दिन आपल्या सर्वांना पाहायला मिळतो आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने कोकण आणि कोकणवासियांचा विकास अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्यादृष्टीने विविध योजनांच्या माध्यमातून कोकणचा विकास साध्य करण्यासाठी हे शासन सदैव प्रयत्नशील आहे.

     दिवेआगार ग्रामपंचायत व ग्रामसचिवालय कार्यालयासाठी एक कोटी रुपये निधीची घोषणा करून उपमुख्यमंत्री श्री.पवार पुढे म्हणाले की, फलोत्पादन योजनेचे यश हे खरंतर कोकणवासियांमुळेच पाहायला मिळाले आहे. राष्ट्रीय गोवा महामार्गाचे रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. एसटी कामगारांचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्न करीत आहे. रायगडच्या भौगोलिक दृष्टीने येथे राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक कायमस्वरूपी स्थापित करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही सुरू असून शासन या कामात सर्व प्रकारचे सहकार्य करीत आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये करावयाच्या मदतीबाबत एनडीआरएफच्या निकषांमध्ये काही बदल काही सुधारणा आवश्यक आहेत, त्याकरिता प्रयत्न करण्यात येत आहेत. रायगडमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लवकरच सुरू होत आहे. त्याचबरोबर फळप्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. 

       तसेच कृषी पर्यटन धोरण, समुद्रकिनाऱ्यावरील बीच शँक, निसर्ग पर्यटन धोरण, शामराव पेजे महामंडळासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद, अष्टविनायक तीर्थक्षेत्राचा विकास, जेट्टी विकास कार्यक्रम, रेवस ते रेड्डी सागरी महामार्ग, मॉडेल आश्रमशाळा, वसई-विरार- अलिबाग मल्टिमॉडेल कॉरिडॉर, अशा विविध विकास कामांविषयी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी आश्वासक भाष्य केले.

     दिवेआगर समुद्रकिनारा विकसित करण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करावा, त्याचबरोबर करोनाबाबत सावधगिरी बाळगा, काळजी घ्या. शाळा-कॉलेजेस सुरू करायचे आहेत, यासाठी लसीकरण महत्वाचे आहे. यानुषंगाने दुसऱ्या लससाठी प्रभावी मोहीम राबवावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र  कल्याणकर यांना यावेळी केल्या.

   उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, कोकण विभागातील विकासकामांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मोठे सहकार्य मिळत असून महा विकास आघाडीचे हे शासन राज्यातील प्रत्येक संकटात खंबीरपणे उभे राहिले आहे. करोनाचा प्रादूर्भाव कमी झाला असून आता कोकण विभागात पर्यटनाबरोबरच शैक्षणिक विकासासाठीही उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले.

    यावेळी पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या सहकार्यामुळे रायगड तसेच कोकण विभागातील सर्वच जिल्ह्यांना आवश्यक ती मदत वेळोवेळी मिळत असून येथील पर्यटन विकास, शैक्षणिक विकास त्याचबरोबर इतर विकास कामेही येत्या काळात मोठ्या प्रमाणावर विकसित होताना दिसून येतील, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे मिळणारे मार्गदर्शन हे अनमोल आहे, या शब्दात त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

    दि.24 मार्च 2012 रोजी सुवर्ण गणेश मंदिरातील मुखवट्याच्या चोरीनंतर या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी शासनाने तसेच जिल्हा प्रशासनाने केलेल्या अथक प्रयत्नांची सविस्तर माहिती पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी उपस्थितांना दिली व आजच्या या सुवर्ण गणेश मुखवटा प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी योगदान असलेल्या सर्वांचे आभार मानले.

      त्या पुढे म्हणाल्या की, सन 2012 साली सुवर्ण गणेश मुखवट्याच्या चोरीची दुर्दैवी घटना घडली. तपास सुरू झाला, काही काळ थांबला, मात्र महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर त्याचा तपास युद्धपातळीवर करण्यात आला. आणि आज श्री गणेशाच्या मुखवट्याची प्रतिष्ठापणा करण्यात येवून आपल्या सर्वांना या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होता आले. निसर्गरम्य दिवेआगार पर्यटनाला चालना मिळाली होती, मात्र चोरीच्या या घटनेमुळे येथील पर्यटनाला ब्रेक लागला होता. परंतु आजच्या दिवसानंतर पुन्हा एकदा श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटनाला उभारी प्राप्त होईल ती आजच्या या दिवेआगार सुवर्ण गणेश मुखवटा प्रतिष्ठापना सोहळ्यामुळे.

      याप्रसंगी खासदार सुनील तटकरे म्हणाले की, आजचा अंगारकीचा योग विशेष आहे. गेली 9 वर्षे दिवेआगार येथील वर्ण मुखवट्याच्या चोरीच्या घटनेनंतर येथील अंगारकी चतुर्थी उत्साहात साजरी होऊ शकत नव्हती. मात्र आजच्या या सोहळ्याने येथील नागरिकांमध्ये पूर्वीचा उत्साह पुन्हा संचारला आहे. 

       दिवेआगार येथील पर्यटनाला पुन्हा एकदा उभारी मिळण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी शासनाकडून आम्हाला बळ मिळत आहे असे सांगून श्रीवर्धन तालुक्याला लाभलेल्या समुद्र किनाऱ्यामुळे येथील पर्यटनाला चालना मिळाली आहे, त्यासाठी महाविकास आघाडी शासन विशेष प्रयत्नशील आहे. येत्या काही काळात सागरी महामार्गाचा विकास, कोकण विभागातील समुद्रकिनाऱ्यांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास अशा विविध माध्यमातून कोकणचा कॅलिफोर्निया झाल्याशिवाय राहणार नाही. चिपी विमानतळामुळे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून कोकणातील अनेक भागात पर्यटकांची गर्दी वाढल्यामुळे पर्यटन व्यवसाय आता बहरु लागला आहे. दिवेआगर येथील साडेचार किलोमीटरचा समुद्रकिनारा विकसित केल्यास येथील पर्यटनही विकसित होऊ शकेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

       रायगड जिल्ह्यातील दिवेआगार येथे सन 1997 साली अंगारकी चतुर्थीच्या दिवशी एका नारळ पोफळीच्या बागेत सुवर्ण गणेशाची मूर्ती सापडली आणि जिल्ह्यातील दिवेआगार हे ठिकाण प्रसिद्धी झोतात आले. सुवर्ण गणेश पाहण्यासाठी पर्यटकांची या ठिकाणी गर्दी सुरू झाल्यामुळे येथील पर्यटन व्यवसायालाही चालना मिळाली. मात्र सन 2012 साली येथील सुवर्ण गणेश मूर्तीच्या सोन्याच्या मुखवट्याची चोरी झाली आणि पर्यटनाच्या माध्यमातून प्राप्त झालेले येथील वैभव लयास गेले. तब्बल 9 वर्षांचा काळ लोटल्यानंतर रायगड पोलीस, विविध शासकीय यंत्रणा आणि स्थानिक पत्रकार या सर्वांच्या सांघिक प्रयत्नांमुळे आज मंगळवार, दि.23 नोव्हेंबर 2021 रोजी अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने शासकीय अधिकाऱ्यांच्या, पोलीस प्रशासनाच्या, स्थानिक पत्रकार आणि नागरिकांच्या साक्षीने सुवर्ण गणेशाच्या सुवर्ण गणेश मुखवट्याचा प्रतिष्ठापना सोहळा संपन्न झाला. यामुळे पुन्हा एकदा दिवेआगार पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होणार आहे. येथे चोरीसारखी घटना पुन्हा घडू नये म्हणून या ठिकाणी रायगड पोलीस दलामार्फत पोलीस चौकीची व्यवस्था करण्यात आली आहे. या नूतन पोलीस चौकीचे उद्घाटन देखील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले, तसेच पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या प्रयत्नातून 2 कोटी रुपये खर्च करून नळपाणी योजना मंजूर करण्यात  आली असून यावेळी या योजनेचे देखील अजित दादा पवार यांच्या हस्ते भूमीपूजन संपन्न झाले. 

      कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे जेष्ठ प्रसिद्ध गायक श्रीधर फडके यांच्या अभंगवाणीने करण्यात आली. प्रास्ताविक दिवेआगार चे सरपंच उदय बापट यांनी केले तर सूत्रसंचालन सुधीर शेठ यांनी केले.

       सुवर्ण गणेश मूर्तीच्या मुखवट्याची चोरी झाल्यापासून ते त्या मुखवट्याची पुन्हा प्रतिष्ठापना होईपर्यंत ज्या व्यक्तींनी आपले प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षरित्या योगदान दिले, त्या सन्मानमूर्तींचा या कार्यक्रमाच्या निमित्ताने विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. यामध्ये सहाय्यक धर्मादाय आयुक्त श्री.कांबळे, तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल गायकवाड, संजय शुक्ला, संजय शितोळे, ॲड. प्रसाद पाटील, ॲड.ए.सी.गावंड, ॲड.भूषण साळवी, ॲड.विलास नाईक, श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी अमित शेडगे, श्रीवर्धन तहसिलदार सचिन गोसावी,सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण, पु.ना.गाडगीळ ज्वेलर्स, पोलीस निरीक्षक  धर्मराज सोनके, महेंद्र शेलार, विराज काशिनाथ पाटील, श्रीमती अनिता घडशी, श्रीमती उषा भगत, माया हिऱ्या चौगुले, सचिन निजामपूर, सचिन खैरनार, संजय खोपकर, रत्नाकर शिरकर, उल्हास खोपकर, देवेंद्र नार्वेकर, परिमल भावे, पत्रकार वैभव तोडणकर आदिंचा सन्मान करण्यात आला.

अहिल्याबाई होळकर संस्था आणि आकृती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही सावित्रीच्या लेकी अंतर्गत विविध योजनांची जनजागृती ;समाज परिवर्तनाचा उदय

मुंबई (शांताराम गुडेकर)- अहिल्याबाई होळकर संस्था आणि आकृती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही सावित्रीच्या लेकी अंतर्गत समाजातील सर्व सामान्य लोकांना शासनमान्य विविध योजनांचा  लाभ मिळावा म्हणून श्री संदिपकुमार नाचन व सौ. सरिता खेडेकर यांनी  विषेश परिश्रम केले.व्यसनमुक्ती केंद्र,कौशल्य, विकास प्रशिक्षण केंद्र,मुक्त शिक्षण केंद्र,पोळी भाजी केंद्र,वृदाआश्रम केंद्र, महिला सक्षमीकरण केंद्र अशा दशसूत्री योजनांचा  लाभ या संस्थेतर्फे मिळणार आहे.

      अशा संस्थेच्या ऑफिसचे  उद्घाटन बोरिवलीचे प्रसिद्ध संसदपटू खा.मा.गोपाळ शेट्टीसाहेब यांच्या हस्ते दीपप्र्जवलनाने पार पडले. संस्थेंला सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे त्यांनी आश्वासनही  दिले.कुणबी समाजाचे श्री.मटकर,सेंनचुरेचे पारकर यांनी संस्थेला येणाऱ्या अडचणीत मदत करू असे  यनिमित्ताने मत व्यक्त केले.

      शिक्षण संस्थेच्या आध्यक्षा नगरसेविका सौ.संध्या दोषी यांनी शिक्षणाला लागणाऱ्या सुविधांच सहकार्य करेन असे  सांगितल.सौ.बिना महाले यांनी महिलांच्या प्रकृतीबदल मागदर्शन करण्याचे दर्शविले .संगीतकार सौ.अमिता जोशी आणि एकपात्रीचे बादशाह श्री. सुरेश परांजपे यांनी आपापल्या कलेने  उपस्थित शेकडो जनसमुदायस मंत्रमुग्ध केले.अशा बेरोजगार युवक युवतींना आत्मनिर्भर बनवणाऱ्या कार्यक्रम पार पाडण्यासाठी सर्व विश्वस्त'.  श्री.सुनील भोसले.सौ.मानसी राणे.श्री पांडुरंग शिंदे  व सौ. शारदा विश्वकर्मा यांनी मोलाचे  योगदान दिले.

विद्यार्थी भारतीच्या वर्धापन दिनानिमित्त बालविवाह विरोधी 'उल्काकल्लोळ' कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई : विद्यार्थी भारतीचा १५ वा वर्धापन दिन शनिवार दिनांक २७ नोव्हेंबर रोजी कस्तुरबा हॉल ,माटुंगा येथे सकाळी १०:०० ते संध्याकाळी ०७:०० या वेळेत संपन्न होणार आहे.

  या निमित्ताने "बालविवाह एक क्रूर प्रथा" या एकाच विषयावर कोणतीही प्रवेश फी न आकारता चित्रकला ,निबंध, लघुचित्रपट , फेसपेंटिंग, रिल्स, फोटोग्राफी, वक्तृत, कविता,एकपात्री,व्यंगचित्र अश्या अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या स्पर्धा ऑनलाईन पध्दतीने होणार असून डान्स आणि पथनाट्य कार्यक्रमाच्या दिवशी ऑफलाईन पध्दतीने होणार आहेत.  किमान ५०० शब्दात निबंध लिहून निबंध स्पर्धेसाठी शुद्धलेखनाचे नियम पाळले जाणार नाहीत आपल्या प्रत्येक स्पर्धेचे असेच काहीसे खास आणि वेगळे नियम असणार आहेत. असेही या निमित्ताने राज्यध्यक्षा पूजा जया गणाई यांनी सांगितले आहे. 

   तरी इच्छुकांनी आपले साहित्य २४ नोव्हेंबर पर्यंत Mail id : vidyarthibharti@gmail.com वर पाठवावी अशी विनंती स्पर्धा प्रमुख साक्षी भोईर यांनी केली आहे.तरी या स्पर्धेत भाग घेऊन बालविवाह विरोधी लढा तीव्र करण्याचे आवाहन राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरि धुरी यांनी केले आहे 

    या कार्यक्रमात सामाजी क कार्यकर्ते मा.लता प्र. म. पत्रकार मा.मुकेश माचकर  , राष्ट्रवादीच्या नेत्या मा. विद्या चव्हाण ताई. राष्ट्रवादी पक्षाचे नेते मा. जितेंद्र आव्हाड साहेब,प्रसिद्ध अभिनेत्री  हेमांगी कवी ,मा.अलका गाडगीळ ताई.,प्रसिद्ध लेखिका  वंदना खरे ,भारत बचाव आंदोलन अध्यक्ष फिरोज मिठीबोरवाला सर, प्रसिद्ध कवी महेश केळुसकर , कवी मा.अरुण म्हात्रे , कवी प्रशांत मोरे  इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती कार्यक्रम प्रमुख शुभम राऊत यांनी दिली.तरी बालविवाह विरोधी चळवळीला आपण कार्यक्रमास उपस्थित राहून साथ द्यावी असे आवाहन अर्जुन बनसोडे यांनी विद्यार्थी भारतीच्या पत्रकाद्वारे केले आहे.

अधिक माहिती साठी संपर्क- साक्षी भोईर :- 8830640563 ,शुभम राऊत : - 9029616190,आरती गुप्ता :- 8104571787,अक्षय घाणेकर:-7066935624, जागृती भाट :- 9545577723

28 नोव्हेंबर रोजी अमन पोलिक्लिनिक उरण शहर येथे आरोग्य शिबिराचे आयोजन

उरण - नागरिकांचे आरोग्य निरोगी राहावे, त्यांचे जीवन सुखी, आनंदी व्हावे व आरोग्यविषयक जनजागृती व्हावी या दृष्टिकोनातून रविवार दिनांक 28/11/2021 रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत अमन पॉलीक्लिनिक, यश मेडिकल जवळ,ठाकूर अपार्टमेंट, उरण शहर येथे  आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या आरोग्य शिबिराअंतर्गत नागरिकांची मोफत तपासणी होणार आहे.इसीजी, बीपी, डायबेटीस, बी एम डी आदीची मोफत तपासणी या शिबिरात होणार आहे.तर विविध रोग व त्या रोगावर उपाययोजना याबाबत मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.अमन पॉलीक्लिनिकचे हे तिसरे वर्ष असून क्वीन्स केअर क्लिनिक यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या आरोग्य शिबिराचा नागरिकांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा. असे आवाहन आयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी 9702790472 व 8828164848 या नंबर वर संपर्क साधावे.

आराध्य पाटीलने केले 7 वर्षात 14 किल्ले सर


उरण-
उरण तालुक्यातील पागोटे येथील रहिवाशी शिवभक्त कु.आराध्य विवेक पाटील हा RK फाऊंडेशन जे एन पी टीच्या स्कुलमध्ये इयत्ता इयता 2 री मध्ये शिकत असून आराध्यला लहानपणापासून त्याचे वडील विवेक चंद्रकांत पाटील हे त्याला छत्रपती शिवरायांच्या गोष्टी सांगत असत व मराठ्या मावळ्यांचे शौर्य पराक्रम त्यांच्या गोष्टी त्याला सांगत होते आणि ते त्याच्या मनात रुजत गेलं व वयाच्या ४ थ्या वर्षी त्यांनी स्वराज्याची राजधानी रायगड सर केला आणि तिथूनच त्यांला प्रेरणा मिळाली व गड किल्ल्यांची आवड निर्माण झाली आत्ता पर्यत ७ वर्षाच्या या वयात त्यांनी १४ किल्ले सर केले आहेत आणि या पुढे ही त्याला छत्रपती शिवरायांच्या इतिहास व मराठ्या मावळांचा इतिहास व गड कोट किल्ल्यांची माहिती मिळावी या साठी सतत तो उत्साही असतो.आत्तापर्यंत आराध्यने रायगड,कुलाबा,शिवनेरी,प्रतापग ड, लोहगड ,सिंहगड, सुधागड, द्रोणागिरी,अवचितगड,पद्दुमदुर्ग,भोरपगड, मर्दनगड,जेजुरीगड, कर्नाळा हे किल्ले सर केले आहेत.मोबाईल गेम्स व टीव्हीच्या जगात आराध्य मात्र छत्रपती शिवरायांच्या गड कोट किल्ल्यांचा इतिहास जानण्याचा  प्रयत्न करत आहे.आराध्यचे हे शौर्य पाहुन, त्याची शिवभक्ती पाहून त्याच्या या कार्याचे अनेकांनी कौतुक केले आहे.

सी सी डी येल : सेलिब्रेटी क्रिकेट सामन्यांचे आयोजन

मुंबई :  पैशासाठी तर सर्वचजण क्रिकेट खेळतात, पण तुम्ही कधी सेलिब्रिटींना एखाद्या सामाजिक कार्यासाठी निस्वार्थ भावनेने क्रिकेट खेळताना पाहिले आहे का? सेलिब्रिटी म्हटलं की ते एखाद्या कार्यक्रमासाठी लाखभर रुपये सुपारी म्हणून घेतात असा जनसामान्यांचा गैरसमज असतो. परंतु हाच गैरसमज खोडून काढत आपल्या लाडक्या मराठी कलाकारांनी एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे.

३ स्टार इंटरटेनमेंट आणि राशी स्टुडिओ प्रस्तुत आणि मॅजेस्टिक एअरवेस प्रायव्हेट लिमिटेड सादर करत आहे... CCDL . या सेलिब्रिटी क्रिकेट डोनेशन लीगमध्ये अनेक मराठी अभिनेते सहभागी होणार आहेत. एकही रुपये मानधन न घेता या कार्यक्रमातून मिळणारे पैसे मदतनिधी म्हणून बालकाश्रमांना देण्यात येणार आहेत.  

    संजय खापरे, कमलेश सावंत,  विजय पाटकर, अंशुमन विचारे, अंगद म्हसकर, प्रभाकर मोरे, सुदेश म्हशीलकर, जयवंत भालेकर, अतुल आगलावे, कैलास वाघमारे, अंकुर वधावे, प्रणव रावराणे, ओम जंगम, नयन जाधव, कांचन पगारे, संदीप जुवेटकर, महेश कोकाटे, आनंद मयेकर, जयवंत वाडेकर, दिगंबर नाईक अभिजित चव्हाण, अनिकेत केळकर, सनी मुणगेकर,असे एकाहून एक सरस अभिनेते खेळणार आहेत 

      ज्या ज्या संस्था लहान मुलांच्या शिक्षणाची तरतूद करतात आशा लाभार्थी संस्थांना यातून मदत दिली जाणार आहे. त्या पैकी नमस्ते फाउंडेशन ,फॅमिली होम,तर्पण फाउंडेशन, मंगेश भगत प्रतिष्ठान अशा संस्था आहेत. ५ ओव्हरच्या या  खेळल्या जाणाऱ्या या सामन्याचे थेट प्रक्षेपण यु ट्यूब आणि इन केबल चॅनल वर लाईव्ह दाखवले जाणार आहे . कोविडच्या नियमाचे सर्व प्रकारे पालन करून हे सामने होणार आहेत त्यामुळे या सामन्यासाठी प्रेक्षक उपलब्ध असणार नाहीत. 

 विजेत्या संघास आकर्षक ट्रॉफी आणि सर्व खेळाडू आणि मान्यवरांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. हे सर्व सामने दादर पूर्व येथील पुरंदरे मैदानावर होणार  आहेत.  २५ नोव्हेंबर  रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत खेळवले जाणार आहेत. 

जय भीम: एक प्रवास अंधाराकडून प्रकाशाकडे...

" जय भीम " प्रदर्शनापूर्वीच नावावरून चर्चेत आलेला, तामिळ, तेलगू, हिंदीसह पाच भाषांमध्ये अमेझॉन व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकताच प्रदर्शित झालेला एक संवेदनशील व सत्यघटनेवर आधारित हृदयस्पर्शी चित्रपट! चित्रपटाचे कथानक कसे आहे ? गीत-संगीत, दिग्दर्शन, अभिनय कसा आहे? हे सांगून चित्रपटाचे परीक्षण करण्यासाठीचा हा शब्दप्रपंच नाहीये.  तर हा चित्रपट पाहून झोप येत नसल्यामुळे मनामध्ये उठलेले विचारांचे काहूर पेनाद्वारे कागदावर उतरवून ते शांत करण्याचा हा खटाटोप आहे. तसे तर सेक्सपिअरने म्हटले होते की , नावात काय आहे ? त्यामुळे या चित्रपटाचे नाव ' जय-भीम ' असते काय किंवा इतर कुठले असते काय ? काहीही फरक पडला नसता कारण ही कलाकृतीच अशी आहे जी प्रेक्षकांच्या हृदयाला भिडणार होती. त्यांच्या मनाला स्पर्शून जाणारच होती. तर काहींच्या गाडीला हिरव्या मिरच्या ! त्याही लिंबा शिवाय झोंबवणारच होत्या. ( लिंबामुळे मिरच्यांचा तिखटपणा कमी होतो ना, म्हणून..) 

      चित्रपटाचे दोन पैलू आहेत किंवा दोन भाग आहेत ज्यावर पहाणारा विचार करतो. एक आहे सामाजिक आणि दुसरा कायदेशीर. साधारणपणे कथानक म्हणण्यापेक्षा 1993 मध्ये घडलेली ही सत्य घटना अशी आहे की, तामिळनाडूमधील इरुला या साप उंदीर पकडणाऱ्या आदिवासी जमातीतील राजा कन्नु व इतर दोन युवकांना पोलिसांनी चोरीच्या खोट्या आरोपाखाली विनापरवाना विना न्यायालयीन आदेश, मनमानीपणे अटक केली होती. त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबियांवर अमानुष अत्याचार केले होते. गुराढोरांप्रमाणे विवस्त्र करून मारहाण करत त्यांना त्यांनी न केलेला चोरीचा गुन्हा राजकीय दबावापोटी तसेच वरिष्ठांना खूष करण्यासाठी त्यांच्याकडून कबूल करून घेण्याचा निंदनीय प्रकार अगदी पोलीस स्टेशनमध्ये बेदरकारपणे सुरू होता!

      त्या तिघांना प्रचंड कस्टोडियल टॉर्चर करण्यात आले. अगदी त्यांना निवस्त्र करून काठ्या लाटांनी बदडण्यात आले. या अमानुष मारहाणीत त्या तिघांपैकी एक म्हणजे राजा कन्नू  दुर्दैवाने मृत्यू पावला. एक प्रकारे हा कस्तोडियल मर्डरच होता. परंतु तो लपविण्यासाठी,  ' संशयित अपराधी पोलीस स्टेशन मधून पळून गेले ' असा धादांत खोटा बनाव पोलिसांनी रचला होता.

     एकीकडे त्यांचे कुटुंबीय, खासकरून राजाकन्नूची गरोदर पत्नी संगिनी व त्यांचे कुटुंबीय परेशान होते, चिंताग्रस्त होते. त्या तीघांमधील दोघे सख्खे भाऊ होते तर एक त्यांचा मेहुणा होता म्हणजे तिघेही एकाच परिवारातील होते त्यामुळे त्यांच्या परिवाराचे सदस्य ते कुठे आहेत ? अशी विचारणा व आर्त विनवणी पोलिसांना करत होते तर दुसरीकडे पोलीस उलट त्यांच्यावरच दबाव आणून, त्यांना धमकावून, मारहाण करून हे तिघे कुठे पळून गेले आहेत ? त्यांना तुम्ही कुठे लपविले आहे ?असा उलट सवाल करीत होते! राजा कन्नूची गरोदर पत्नी संगिनी रानोमाळ दारोदार भटकत आपल्या पतीचा, दिराचा व नणंदेच्या पतीचा शोध घेत होती. ती पोटोशी होती तरीही भले मोठे पोट घेऊन ती याच्या त्याच्याकडे मदतीची याचना करीत होती परंतु कोणीही अगदी तिचा समाजही तिच्या मदतीला येत नव्हता. परंतु असे म्हणतात ना की  ' ज्याचे कोणी नसते त्याचा परमेश्वर असतो आणि तो कधी कोणत्या रूपात मदतीला धावून येईल हे सांगता येत नाही ' झालेही तसेच ! त्यांच्याच आदिवासी पाड्यावर,  एक सामाजिक कार्यकर्ती जिचे नाव मैत्रा असे असते, ती प्रौढ शिक्षणाचे वर्ग घेत असते. ती या पाड्यावरील किंवा वस्तीवरील सर्वांना ओळखत असते. तिला हे माहीत असते की, गायब झालेले किंवा गायब केलेले तिघेजण आणि त्यांचा पूर्ण परिवार आणि पाडा हा अत्यंत प्रामाणिक, कष्टाळू व नम्र आहे. ही मंडळी असे काम करूच शकत नाही त्यामुळे तिच्या मनामध्ये यांच्याविषयी एक सहानुभूती असते. ती स्वतः संगिनी सोबत या तिघांचा शोध घेते. या त्या कार्यालयात, पोलीस स्टेशनमध्ये जाते परंतु कुठूनही कसलीही मदत मिळत नाही. सर्व करून थकल्यानंतर ती संगिनीला घेऊन ॲड. के. चंद्रू यांच्याकडे जाते आणि इथून पुढे कहानीला एक  नाट्यमय वळण प्राप्त होते.

     ॲड. के. चंद्रू जे या सत्य घटनेचे खरे नायक आहेत त्यांच्याविषयी थोडे थोडे समजून घ्या त्यांच्याविषयी म्हणजे खऱ्या ॲड के. चंद्रूंविषयी म्हणतोय मी ! चित्रपटातील नायक सूर्या विषयी नाही. खरे ॲड के. चंद्रू ज्यांची व्यक्तिरेखा दाक्षिणात्य सुपरस्टार सूर्याने साकारली आहे ते विद्यार्थी दशेपासूनच कार्ल मार्क्स व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी झपाटलेले एक मानवाधिकार रक्षक वकील आहेत. ॲड के. चंद्रू सुरुवातीला चेन्नई म्हणजे त्या वेळच्या मद्रास उच्च न्यायालयात वकिलीची प्रॅक्टिस करत होते. पुढे ते याच न्यायालयाचे म्हणजे चेन्नई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून सेवानिवृत्त झाले ! न्याधिशाच्या आपल्या कार्यकालात त्यांनी तब्बल शहाण्णव हजार केसेस निकाली काढल्या ! एक पारदर्शक प्रामाणिक न्यायाधीश म्हणून त्यांचा लौकिक आहे ! न्यायदानाच्या क्षेत्रात त्यांना प्रचंड सन्मान आहे. त्यांनी न्यायाधीश असताना कधीही आपल्या सोबत सुरक्षारक्षक किंवा अंगरक्षक बाळगले नाहीत ! एव्हाना त्यांना न्यायालयात वकिलांनी किंवा इतर कुणी माय लॉर्ड किंवा मी लॉर्ड म्हटलेलेही आवडत नसे ! एक न्यायाधीश म्हणून त्यांची जेवढी कारकिर्द प्रसिद्ध आहेत त्यापेक्षा अधिक प्रसिद्ध आहे त्यांची वकील म्हणून कारकीर्द ! या आदिवासींवरील खोट्या आरोपाची, अटकेची व पुढे बेपत्ता झाल्याची केस ते लढतात. यापूर्वी सांगितल्याप्रमाणे संगिनी मैत्राच्या माध्यमातून ही केस ॲड. के. चंद्रु यांच्याकडे घेऊन गेली. संपूर्ण कहाणी कथा ऐकल्यानंतर ॲड. के. चंद्रु स्तब्ध झाले आणि त्यांनी ही केस लढण्याचा निर्णय घेतला. मानवाधिकारांच्या केसेसमध्ये त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी एक रुपयाही शुल्क घेतलेले नाही हे विशेष ! आणि ही बाब समाजसेवी मैत्राला ठाऊक होती म्हणूनच ती राजा कन्नूच्या गरोदर पत्नीला म्हणजे संगिनीला घेऊन ॲड. चंद्रूंकडे गेली होती.

      केसमध्ये विक्टिमच्या बाजूने कुठलाही पुरावा नसताना आणि दुसरीकडे सर्व काही पूर्वनियोजित आणि कागदोपत्री वेल इस्टॅब्लिश, वेल प्लॅनड, सुनियोजित व वजनदार सक्षम, पावरफुल असूनही केवळ सत्याच्या जोरावर ॲड. के. चंद्रू यांनी ही केस ( हिबीस कॉर्पस केस ) आपल्या कठोर परिश्रमाने, अभ्यासाने, बुद्धीने  निर्भीडपणे लढली. मानवतेसाठी, मानवाधिकारासाठी आणि त्या अबला गरोदर महिलेसाठी लढली. केवळ लढलीच नाही तर सर्व प्रकारच्या दबावाला झुगारून जिंकून दाखविली ! त्या बाईला व तिच्या होणाऱ्या बाळाला आणि असलेल्या मुलीला थोडासा का असेना,  काही प्रमाणात का असेना परंतु न्याय मिळवून दिला !

       हे होते चित्रपटाचे कथानक आणि साधारणपणे ॲड. चंद्रू यांची ओळख. आता चित्रपट पाहिल्यानंतर मनामध्ये जे प्रश्न निर्माण होतात, जे बेचैन करतात ते हे की, जर डॉ.  बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेली राज्यघटना आज अस्तित्वातच नसती तर गोरगरीब कमजोर निर्बल अशिक्षित मागासवर्गीय जनतेच्या हितांचे, त्यांच्या अधिकारांचे रक्षण कसे झाले असते ? अधिकारांचे सोडा त्यांच्या जीवाचे, त्यांच्या इज्जतीचे, त्यांच्या माणूसपणाचे,    रक्षण कसे झाले असते ? त्यामुळे चित्रपट पाहिला की एकच बाब मेंदुवर पुन्हा पुन्हा आघात करते ती ही की,  बाहुबलींच्या या देशात, ताकतवान लोकांच्या या देशात भीमाचा कायदा आहे म्हणूनच आदिवासी, दलित, विमुक्त भटक्या जमाती, मागासवर्गीय, गोरगरीब, महिला, बालके, अनाथ, अपंग लोक सुरक्षित आहेत ! आता हा भाग निराळा की हा पीडित शोषित दूर्लक्षित वर्ग कायद्याची मदत घेण्यास किती सक्षम आहे ? प्रत्यक्षात कायदा नेमका कुणासाठी काम करतो ? कायदा, शासन, प्रशासन, खासकरून पोलिस यंत्रणा व न्याय व्यवस्था वरील गोर गरीब वंचित मागास उपेक्षित दुर्लक्षित जनसमूहाच्या हक्क अधिकारांचे रक्षण करण्यासाठी किती कटिबद्ध आहे ? या व्यवस्थांचा लाभ घेण्यासाठी ही जनता किती सबळ व सक्षम आहे ? हा चिंतनाचा व संशोधनाचा विषय जरी असला तरी या यंत्रणा अस्तित्वात आहेत याचे श्रेय डॉ. बाबासाहेबांना जाते आणि त्यासाठी सर्वांनी त्यांच्याप्रती कृतज्ञ असलेच पाहिजे.

     मनापासून चित्रपट पाहणारा प्रत्येक जण चित्रपट संपल्यानंतर खिन्न होतो, उदास होतो, निराश होतो आणि काही वेळाने पुन्हा एकदा त्याच्या मध्ये एक प्रकारची उर्जा, एक प्रकारची शक्ती देखील संचारते ! आत्मविश्वास येतो की आपल्या रक्षणासाठी कोणीतरी (काहीतरी) आहे! याचा व्यवस्थित उपयोग करून घेतला, तो करून घेण्यासाठी शिक्षण घेतले, सक्षम बनले तर अन्याय होणार नाही, केला जाणार नाही व झालाच तर त्याचा प्रतिकार करून न्याय मिळवता येऊ शकतो ! अशाच प्रकारची शक्ती माझ्या मध्येही संचारली आणि म्हणूनच मी दोन शब्द लिहिण्याचा निर्णय घेतला. मला असे वाटते की सर्व या वंचित आणि कमजोर घटकांनी कसल्याही परिस्थितीमध्ये, कुठलेही कारण न सांगता, प्राप्त परिस्थितीवर मात करून, जमेल तसे (हवे तर भलेही एक वेळ उपाशी राहण्याची वेळ आली तरी बेहत्तर) परंतु  शिक्षण आणि तेही उच्च शिक्षण मात्र घेतलेच पाहीजे. त्यातही कायद्याचे शिक्षण घेणे अत्यंत आवश्यक आहे. सोबतच आपण अधिकाधिक शासनामध्ये प्रशासनामध्ये  जाणे अत्यंत गरजेचे आहे. आपण समाज म्हणून तर एकजूट झालेच पाहिजे परंतू सोबतच मतदार म्हणून देखील एकजूट होणे काळाची गरज आहे. आपल्यातील तपास अधिकारी, प्रशासकीय अधिकारी व वकील मंडळी यांनी आपल्या कर्तव्याप्रती प्रामाणिक व समाजाप्रती संवेदनशील व सहानुभूतीपूर्ण असले पाहिजे. परंतु प्रश्न असा आहे की आज मागासवर्गीयांमधील वंचितांमधील म्हणजे आपले म्हणवणारे किती वकील आपल्याच लोकांवरील अन्याय-अत्याचारा विरोधातील केसेस मोफत लढतात ? वकिलीचा धंदा करणाऱ्या आपल्याच लोकांना सामाजिक बांधिलकी व सेवाभाव समजून सांगावा तर कसा व कोणी ? आणि मग समाजाने तरी आपल्याच समाजातील डॉक्टर वकील आधिकारी झालेल्या लोकांचा अभिमान तरी का बाळगावा ? संगिनी न घाबरता, न डगमगता आणि कुठल्याही प्रकारच्या आर्थिक आमिषाला बळी न पडता लढली ! हातात एक आणि पोटात एक अशी दोन लेकरे सोबत घेऊन लढली ! परंतु आज आपण काय पाहतोय ? दुर्दैवाने कितीतरी पोरी बायका, त्यांचा परिवार पैशापुढे अन्याय-अत्याचाराला, इज्जतीला, अस्मितेला गौण स्थान देतात ! पैसे घेऊन तडजोड करतात ! हे दुर्दैवी वास्तव कसे काय नाकारता येऊ शकेल ? याने शोषकांचे आत्मबल वाढते. काळ सोकावतो. समाजमन बोथट होते व परिणामी जेव्हा अशा दुर्दैवी अन्याय अत्याचारकारक घटना घडतात तेव्हा त्याचे इतर समाजाला,  प्रसारमाध्यमांना विशेष वाईट वाटत नाही ! 

      आज समाजसेवक भरपूर आहेत ! समाजसेवी संस्था भरपूर आहेत परंतु मैत्री सारखी समाजसेविका जी आदिवासी पाड्यावर वस्त्यांवर जाऊन शिक्षणासारखे पवित्र कार्य मोफत करते ! आशा समाजसेविका किंवा समाजसेवक किती आहेत ? पेरूमल स्वामींसारखे निर्भिड प्रामाणिक व अंतरात्म्याचा आवाज ऐकणारे आय. जी. किंवा पोलीस अधिकारी किती आहेत ? हे असे काही तीव्र धारदार व टोकदार प्रश्न आहेत जे ' जय भीम ' विचारतो ! ' जय-भीम ' एक आरसा आहे जो यंत्रणा व समाजाची वास्तवता किंवा सत्य प्रतिमा दाखवतो ! जी पाहण्याचे आपल्यात हिम्मत नाही ! वास्तव स्वीकारण्याची ताकद नाही आणि पाहिलेच तर शरमेने मान खाली झुकविण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही कारण आपल्याला आपल्या मनासारखे, मनाच्या समाधानासाठी खोटेनाटे का असेना परंतु स्वतः काढलेले किंवा कोणाकडून काढून घेतलेले किंवा डाऊनलोड केलेले चित्र मोठ्या थाटाने आणि फुशारकीने फ्रेम करून भिंतीवर लावण्याची व रात्रंदिवस तेच पाहण्याची सवय होऊन गेली आहे ! परंतु आपण हे विसरतो की हे चित्र जे आपण फ्रेम केलेय ते सत्य नाहीये ! सत्य चित्र प्रचंड व्याकुळ करणारे आहे.

      ' जय भीम ' सत्यावरचा भ्रामक पडदा उठवतो. शासन प्रशासनातील व्यक्तीसापेक्षता भ्रष्टाचार बेकायदेशीरपणा झुंडशाही ठोकशाही या कटू वास्तवाचे शवविच्छेदन करतो. पोलीस हेच सर्वात मोठे गुंड आहेत हे परखडपणे आणि निर्भीडपणे जगासमोर आणतो. पोलीस कायदा आणि न्यायव्यवस्था कुणासाठी आहे ? किती गोर गरीब मागासवर्गीय व अशिक्षित तथा अल्पशिक्षित लोक आपल्या इज्जतीचे, मोडक्यातोडक्या संसाराचे, आपल्या मानवी अधिकारांचे रक्षण या सर्व यंत्रणांचा लाभ घेऊन करण्यास सक्षम आहेत असा खडा व रोखठोक सवाल विचारतो. ' जय भीम ' झणझणीत अंजन घालतो त्या माध्यमांच्या डोळ्यात, त्या सर्वच व्यवस्थांचा डोळ्यात ज्या देशांमध्ये कायद्याचे राज्य आहे! स्वातंत्र्य, लोकशाही, राज्यघटना आहे असे म्हणतात त्यांच्या !

     अशा प्रकारे ' जय भीम ' एक कहाणी आहे सामाजिक विषमतेची शोषणाची भेदभावाची आणि सर्व क्षेत्रातील मागास घटकांची. जय-भीम व्यथा मांडतोय कायद्याच्या निरंकुश अनिर्बंध व खोट्या दूरोपयोगाच्या बळी ठरत असलेल्या मागासवर्गीयांची! 'जय-भीम ' एक कहाणी आहे गरिबीतही प्रामाणिकपणे परिश्रमाने मोठे होऊ इच्छिणाऱ्या कष्टाळू लोकांची आणि त्यांचे पाय ओढणाऱ्या, त्यांना पुन्हा दलदलीमध्ये ओढत आणणाऱ्या निष्ठुर समाजव्यवस्थेची ! जय-भीम प्रेम कहानी आहे झोपडीतील पती पत्नींची ज्यांचे स्वतःचे हक्काचे पक्के घर बांधणे हेच अंतिम स्वप्न आहे जे पुरे करण्यासाठी घाम गाळून, पै पै जमा करतात परंतु दुर्दैवाने ते पुरे होऊ शकले नाही ! जय भीम कहाणी आहे खऱ्या अर्थाने समाजसेवा कशी करावी हे सांगणाऱ्या मैत्राची आणि एका जिगरबाज वकिलाची ! एक असा वकील जो प्रामाणिक आहे ध्येयवेडा आहे. त्याची कायदा व न्याय यावर असीम निष्ठा आहे. जो निर्भिड आहे. ही कहाणी आहे भ्रष्ट व लबाड तसेच पूर्वग्रहदूषित पोलीस यंत्रणेची जी राजकारण्यांच्या व वरिष्ठांच्या दबावाखाली काम करते.  सत्याला असत्य आणि असत्याला सत्य म्हणून सादर करते ! जी खर्‍या गुन्हेगारांना सोडून खोट्यांना गुन्हेगार बनविते ! अथवा गुन्हेगार सिद्ध करते! त्यांच्या चारित्र्याला कलंकित करते. ही कहाणी आहे उच्च-निचतेने बरबटलेल्या सामाजिक विषमतेची ! ' जय-भीम ' कहाणी आहे एका कधीही न संपणाऱ्या लढ्याची!!

     ' जय-भीम ' ओरडून सांगतोय की, औद्योगीकरण, यांत्रिकीकरण, कायदे यामुळे असंख्य जमातींचे असंख्य  महत्त्वपूर्ण समाजोपयोगी पारंपारिक व्यवसाय गेले आहेत. त्यांचे रोजगार संपुष्टात आले आहेत. बेरोजगारी वाढली आहे व परिणामी त्यांच्या पदरी निराशा व हताशा आली आहे परंतु दारिद्र्यातही प्रामाणिकपणे कष्ट करून ते स्थिती परिवर्तन करू पाहणाऱ्या जमातींवरील  ' गुन्हेगारीचा ' ' अस्पृश्यतेचा ' कलंक अद्यापही संपुष्टात आलेला नाही. पोलीस यंत्रणा, न्यायव्यवस्था व संपूर्ण समाज मनच आजही या जमातींना त्यांच्या पारंपारिक व्यवसायावरून जातीवरून ओळखत बोलवत व हिणवत आहे. त्यांचे शोषण करीत असल्याचे त्यांना तुच्छ मानत असल्याचे, जातीवाचक बोलत असल्याचे ' जय भीम ' ओरडून ओरडून सांगतोय.

    जय-भीम प्रकर्षाने दाखवून देतोय की, अजूनही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही या देशांमध्ये लाखो-करोडो आदिवासी दलित विमुक्त आणि भटक्या जमातींमधील लोक बेघर भूमिहीन आहेत! एवढेच नाही तर त्यांच्याकडे त्यांच्या जातीचे, त्यांच्या ओळखीचे पुरावे देखील नाहीत! त्यांच्याकडे त्यांचे स्वतःचे शौचालय तर सोडा त्यांच्यासाठी हक्काची स्मशानभूमी देखील नाही ! त्यांचे शासन प्रशासनात प्रतिनिधित्व तर सोडा त्यांना किमान मतदान करण्याचा मतदार म्हणून अधिकार देखील नाही ! ' जय भीम ' ओरडून सांगतोय की लोकशाही गणराज्य असणाऱ्या या देशांमध्ये अजूनही एक वर्ग पारतंत्र्यातच आहे ! त्यांच्यापर्यंत ना लोकशाही ना राज्यघटना पोहोचली आहे!!

     दुर्दैवाने ही बाब सवर्णांच्या किंवा सनातन्यांच्या तर सोडा कारण त्यांना ती लक्षात घ्यायचीच नाही परंतु आदिवासी दलित आणि विमुक्त भटके यांच्या देखील लक्षात येत नाही! देशात खरी समस्या ' धर्म ' नसून ' जात ' आहे जोवर जातींमधील विषमता उच्चनीचता संपुष्टात येत नाही तोवर धर्माचे निरर्थक भूषण बाळगणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे. जर धर्म मजबूत करायचा असेल तर जातीयता संपुष्टात आणली पाहिजे. ब्रिटिश कालीन क्रिमिनल ट्राईब्ज ॲक्ट संपुष्टात येऊन तयार झालेल्या हॅबिच्युअल ऑफेंडर्स ॲक्ट खाली पोलिस यंत्रणेकडून वारंवार खोट्या बनावट केसेस केल्या जातायेत ! निष्कारण पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनातून ठराविक जमातींना अडकवले जातेय ! या पाठीमागे त्यांचा हेतू सॉफ्ट टार्गेटला टारगेट करणे हा असतो. आपले अपयश लपविण्यासाठी, मिडीयाला व वरिष्ठांना शांत करण्यासाठी तसेच पदोन्नतीतचे बक्षीस मिळविण्यासाठी आणि नसलेली कर्तव्यदक्षता दाखविण्यासाठी  देशभरातील अनेक निरपराध जमातींच्या खास करून विमुक्त म्हणजे डीनोटिफाईड जमातींच्या हजारो- लाखो लोकांना जाणीवपूर्वक लक्ष करून त्यांचे शोषण केले जाते. हे दाहक वास्तव या ' जय-भीम ' च्या माध्यमातून प्रकर्षाने समोर आले आहे! मग ते कोणी स्वीकारो अथवा ना स्वीकारो. महान समाजसेविका तथा साहित्यिक स्वर्गीय महाश्वेतादेवींसह अनेक विमुक्त भटक्या चळवळीमधील सामाजिक कार्यकर्ते मागील पाऊण शतकांपासून हा काळा कायदा बरखास्त करण्याची मागणी करीत आहेत परंतु सरकार मात्र आश्वासनांपलीकडे काहीही देत नाही! तुमचा विश्वास बसणार नाही परंतु आपल्या देशात दररोज सरासरी पाच कस्टोडीयल डेथ्स होतात म्हणजे दररोज सरासरी पाच लोक पोलीस स्टेशनमध्ये कस्टोडी दरम्यान मरतात!

     सनातनी व सवर्ण सतत ' जात संपली पाहिजे ' म्हणून बोंबा मारत असतात परंतु बोलताना मात्र जातीवरूनच बोलत असतात ! वागणूक देताना मात्र जातीवरूनच देतात ! आणि रोटीबेटी व्यवहार करताना देखील जात डोळ्यासमोर ठेवूनच करतात ! हे या लोकशाहीप्रधान घटनात्मक देशाचे वास्तव आहे. असा देश ज्या देशांमध्ये तेहतीस कोटी देव आहेत ! त्या देशाचे हे वास्तव आहे.  असा देश जिथे स्त्रीला देवी म्हटले जाते परंतु त्याच देशातील आदिवासी दलित विमुक्त भटक्या जमातींमधील महिलांची वस्त्रे उतरवताना ना पोलीसांना ना सवर्णांना  देवी-देवतांची आठवण होते! अशा देशातील हे वास्तव आहे आणि वास्तव हे नेहमी कटू असतेय. आपण हे समजून घेतले पाहिजे की यांच्या लेखी किंवा यांच्या तोंडी जात संपली पाहिजे म्हणजे, ' आरक्षण संपले पाहिजे ' मागास जाती जमातींचे ' कायदेशीर संरक्षण संपले पाहिजे ' असे यांना म्हणायचे असतेय. 

   ' जय-भीम ' चित्रपट केवळ खोट्या केसेसमध्ये अधिवासी दलीत विमुक्त भटक्या जमातींमधील  निरपराधांना अडकवून त्यांचे कसे शोषण केले जातेय एवढेच सांगत नाही तर मानवाधिकारांच्या होत असलेल्या उलंघनाचे, जातीय विषमतेच्या दाहक वास्तवाचे सत्य उलघडून दाखवतोय आणि धर्म श्रेष्ठत्वाचा माजही उतरवतोय! जातीय विषमतेमुळे धर्माचे पारिपत्य होते, धर्म लयास जातो, धर्मांतरे होतोत हे वास्तव समजून सांगतोय. बहुसंख्य बहुजनांच्या आपल्या देशात समता न्याय संधी व प्रतिष्ठा मात्र अद्यापही अल्पसंख्यांक आहे ! त्यामुळे जागे व्हा, काल्पनिक मोठेपणाच्या व प्रतिष्ठेच्या मागे धावण्यापेक्षा वास्तवाचा स्विकार करून परिस्थिती परिवर्तनासाठी आपल्या लोकांना न्याय मिळावा यासाठी आपले शक्य तेवढे योगदान द्या हे सांगतोय. " चोर सोडून संन्याशाला फासावर लटकविणारा हा क्रुर कायदा म्हणजे 

   " हॅबिच्युअल ऑफेंडर्स ॲक्ट " बरखास्त होणे अत्यंत आवश्यक आहे, जो खोट्या केसेसमध्ये ठराविक जमातींच्या लोकांना अडकविण्याचा पोलिसांना एक प्रकारे परवानाच देतोय हे सांगतोय.

    भलेही भिमाचा म्हणजे डॉ. बाबासाहेबांचा किंवा त्यांच्या जीवनचरित्राचा व ' जय भीम ' चित्रपटाचा दूर दूर पर्यंत संबंध नसला तरी चित्रपट निर्मात्यांनी केवळ प्रसिद्धीसाठी बाबासाहेबांच्या नावाचा गैरवापर केला आहे हा सनातन्यांचा किंवा काही वाट चुकलेल्या बुद्धीवाद्यांचा आरोप तकलादू आहे असे मला वाटते. मला असेही म्हणावे वाटते की त्यांना " जय भीम "  म्हणजे काय ?  याचा अर्थच व्यवस्थित समजलेला नाही.  ' जय-भीम ' म्हणजे कायदा न्याय संघटन सहकार्य संघर्ष व शिक्षण ! जिथे जिथे या बाबी येथील तिथे तिथे भीम येईलच...

     चित्रपटाच्या नावाला विरोध करणारे मूर्ख नसून चलाख आहेत ! कारण ' भीम ' नावातच एवढी शक्ती आहे की चांगल्या चांगल्यांची फाटते ! जरी चित्रपटाचे नाव ' जय भीम ' आहे परंतु म्हणून चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद हा केवळ नावामुळे मिळतोय असे म्हणणे म्हणजे एका सुंदर कलाकृतीचा अपमान ठरेल. वास्तव घटनेवर आधारित कथानकावर दिग्दर्शकासह सर्व कलाकारांनी प्राण ओतून निर्माण केलेला हा सिनेमा कोण्या दुसऱ्या शिर्षकाखाली प्रदर्शित झाला असता तरी प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलाच असता यात शंका नाही परंतु जेव्हा चित्रपटाचा आत्मा व प्रेरणाच ' भीम ' आहे तेव्हा तो त्यापासून वेगळा करताच कसा येईल?

     ' जय भीम ' चा अर्थ चित्रपटाच्या शेवटी खूप व्यवस्थित समजून सांगितला आहे. तो आपण समजून घेणे खुप गरजेचे आहे. " जय भीम म्हणजे एक प्रकाश जो अंधाराकडून सन्मानजनक प्रकाशाकडे नेतो. जय भीम म्हणजे प्रेम ! जो दुःखितांचे मायेने अश्रू पुसतो, सहकार्य करतो व दुःखात साथ देतो. सनदशीर व कायदेशीर मार्गाने अन्यायाचा प्रतिकार व न्यायाचा आग्रह म्हणजे जय भिम ! लाखो दुःखी पिडीत अन्याय अत्याचार ग्रस्त शोषित जनतेचे अश्रू म्हणजे जय भिम !

 "जय भीम "  म्हणजे एक प्रवास....  अंधारातून प्रकाशाकडे!! 


-बाळासाहेब धुमाळ

मो. 9421863725

आठवणीत रंगला १९८८-८९ च्या दहावीच्या बॅचचा ३५ वर्षांनी स्नेह मेळावा

        आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा..!शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई -वडिलांनंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याच...