आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, ३० सप्टेंबर, २०२०

ऑक्सिजन सिलिंडर किट चे दान


 महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे अध्यक्ष मा. सत्यजितदादा तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त उरण विधानसभा युवक काँग्रेस कमिटी तर्फे उरण मधील कोरोणा चा वाढत्या प्रादुर्भाव पाहता सध्या रुग्णांना बेड मिळणे कठीण झाले आहे ऑक्सिजन अभावी रुग्णाचे मृत्यू होत आहेत, ही बाब लक्षात घेत उरण विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष रोहित श्रीकांत घरत यांनी आमन पॉलीक्लिनिक उरण येथे ऑक्सिजन सिलिंडर किट चे दान केले. ह्यावेळी उरण विधानसभा युवक उपाध्यक्ष लंकेश ठाकूर, जिल्हा सरचिटणीस जितेश म्हात्रे, सरचिटणीस हितेण घरत, शहराध्यक्ष अब्दुल सिलोत्री, मौलाना अबरार सीलोत्री, नूर सोंडे, असिफ खोत उपस्थित होते.

महात्मा गांधी जयंती दिनी उरण सामाजिक संस्थेचे घर बैठे आंदोलन.

उरण (विठ्ठल ममताबादे )-उरण तालुक्यात एकही अत्याधुनिक व सुसज्ज असे रुग्णालय नसून अनेक वर्षांपासून रुग्णालयची समस्या प्रलंबित आहे.उरणमध्ये सुसज्ज व अत्याधुनिक सेवासुविधांनी युक्त असे रुग्णालय त्वरित उभारण्यात यावे यासाठी उरण तालुक्यात  सर्वप्रथम उरण सामाजिक संस्थेने लढा उभारला व त्यासाठी वेळोवेळी शासकीय दरबारी  पाठपुरावा सुद्धा केला. उरण मध्ये त्वरित  हॉस्पिटल व्हावे यासाठी नेहमी पाठपुरावा करणाऱ्या उरण मधील उरण सामाजिक संस्थेतर्फे  उरण तालुक्यात मंजूर झालेल्या जागेवर तातडीने रुग्णालय उभारावे या प्रमुख मागणीसाठी  दि 2/10/2020 रोजी  महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून घर बैठे आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांना उरण सामाजिक संस्थेच्या वतीने प्राध्यापक राजेंद्र मढवी व सीमा घरत यांनी दिले आहे. 

उरण सामाजिक संस्थेच्या प्रयत्नामुळे आणि तत्कालीन आमदार विवेकानंद पाटील, आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या पाठपुराव्यामुळे उरण तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयासाठी प्लॉट नंबर -1, सेक्टर 15 A, द्रोणागिरी उरण येथे  5983 चौ. मी  भूखंड 2013 साली मंजूर झालेला आहे. मात्र आतापर्यंत या बाबतीत शासनाने चालढकलचे धोरण अवलंबिले आहे. आजपर्यंत उरण मधील विविध अपघातात 800 हुन अधिक व्यक्तींना योग्य व त्वरित उपचाराअभावी आपला जीव गमवावा लागला आहे.मोठ मोठे ऑपरेशन साठी मुंबई, नवी मुंबईला जावे लागते. हार्ट अटॅक सारख्या जीवघेणा रोगामुळे तसेच  योग्य वेळेत उपचार होत नसल्याने इतर विविध रोगांच्या  व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तरीही शासनाचा या जनतेच्या महत्वाच्या समस्येकडे जाणून बुजून दुर्लक्ष होत आहे.जनभावना लक्षात घेऊन सदर समस्या त्वरित सुटण्यासाठी व सरकारचे या महत्वाच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी उरण सामाजिक संस्थेतर्फे महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून दि 2/10/2020 रोजी सकाळी 11 ते 12 या एका तासाच्या दरम्यान घरातच बसून  "घरबैठे मागणी आंदोलन" आयोजित केले आहे. उरण मधील जास्तीत जास्त नागरिकांनी या आंदोलनात कोरोनाचे शासनाचे नियम पाळून सहभागी व्हावे असे आवाहन उरण सामाजिक संस्थेमार्फत करण्यात आले आहे

नवी मुंबई महापालिकेने कोविड सेंटरमधील महिला सुरक्षा वाढवावी व व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून द्यावेत -सुहासिनी नायडू यांची मागणी


नवी मुंबई /विरेंद्र म्हात्रे 
-कोविड सेंटरमध्ये राज्यभरात महिलांच्या अत्याचारविषयी अनेक घटना घडलेल्या दिसून येत आहेत. नवी मुंबईत पालिका कोविड सेंटरची क्षमता वाढवत आहे. तर अनेक नव्या कोविड सेंटरची उभारणी करण्यात येत आहे. यात महिलांसाठी वेगळी व्यवस्था असली तरी त्यांच्या सुरक्षिततेविषयी सीसीटीव्ही कॅमेरे लावणे गरजेचे आहे. त्यामुळे महिलांचा कुटुंबाला सोडून इथे राहण्याची मानसीकता तयार होईल व महिला निश्चिंत होतील. यासोबत सध्या कोविड सेंटर तसेच ऑक्सिजन बेडची क्षमता पालिका वाढवत आहे. मात्र शहराला खरी गरज आयसीयू व व्हेंटिलेटर्स बेडची आहे. खासगी रुग्णालये पालिकेच्या याच कमतरतेचा फायदा उठवू लागली आहेत. त्यामुळे पालिकेने आयसीयू व व्हेंटिलेटर्स बेड वाढवणे गरजेचे आहे. या पत्राची दखल घेत आपण कारवाई कराल अशी आशा बाळगते.

हेची फळ काय मम तपाला असा पश्चाताप नको !

     घरच्या हलाकीच्या परिस्थितिशी झुंज देत अथक परिश्रमातून पदव्युत्तर शिक्षणाबरोबर शिक्षणातील पदविही प्राप्त केली जेणेकरून आपले आपल्या कुटुंबाचे दिवस सुखा समाधानाचे येतील हे स्वप्न उराशी बाळगून. ज्याकडे प्रतिभा, साक्षात शारदेचा वरदहस्त आहे, ज्याच्या लेखणीतून कथा, कादंबर्‍या जन्माला येताहेत नव्हे ज्याच्या साहित्य कृतीला साहित्य अकादमी सर्वोच्च पुरस्कार प्राप्त झालाय असा जत तालुक्यातील निगडी खुर्दचा उगवता युवा लेखक नवनाथ गोरे आज टिचभर पोटासाठी दुसर्‍यांच्या शेतात रोजंदारी करतोय ही बातमीच क्लेशदायक आहे नव्हे ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल.

    खर म्हणजे असे प्रतिभावंत हे समाजासाठी आदर्श ठरावेत, भावी पिठीसाठी अनुकरणीय व्हावेत, त्यांची यशवी जीवन गाथा समाजासाठी प्रेरणादाई व्हावी परंतु तेच तारे जगण्यासाठी धडपडताहेत हे चित्र काही भविष्यासाठी आशादाई नाही. युवा कलाकार, खेळाडू, लेखक, पदवीधर ही समाजाची संपत्ति असते, श्रीमंती असते. परंतु आजही अनेक प्रतिभावंत विशेषता  ग्रामीण भागातुन आपल्या हलाकीच्या परिस्थितिशी, जगण्यासाठी  झुंजत आहेत. ही रत्न समाजात मानाने जगली पाहिजेत, त्यांच्या ज्ञानाचा, कलेचा उपयोग समाजासाठी करून घेता आला पाहिजे भावी पिढीसाठी. त्यासाठी त्यांचं जीवनमान उंचावणे हे शासनाचे एक नैतिक कर्तव्य ठरते. आणि म्हणूनच गाव, जिल्हा, तालुका पातळीवरील स्थानिक  प्रशासनाने अशा रत्नांचा शोध घेवून शासन दरबारी त्यांची शिफारस केली पाहिजे, शासनाच्या नजरेत आणून दिली पाहिजेत. शासनानेही अशांची प्राधान्याने दखल घेवून त्यांच्या पेशाप्रमाणे नोकरीत सामावून घेवून सुखी समाधानी जीवन देण्यास सहकार्य करावयास हवे म्हणजे ही माणस निराश होणार नाहीत, त्यांना पश्च्यातापाची पाळी येणार नाही तर त्यांचे योगदान आपल्या समाजाला भरभरून मिळेल मात्र अशा  संपत्तीला संपन्न ठेवणे शासना बरोबरच समाजाचेही कर्तव्य ठरते.


-विश्वनाथ पंडित

जिजामाता मार्ग, ठाणे   

गायक एस पी बालसुब्रह्मण्यम यांचे निधन रसिकांना चटका लावणारे.

   

  हिंदी चित्रपटसृष्टीला कोणाची नजर लागली हेच समजेना.  एका पाठोपाठ एक कलाकार रसिकांना सोडून चालले आहे. कोरोनामुळे आशालता यांचे नुकतेच निधन झाले त्यांच्या निधनातून रसिक सावरत नाही तोच  कोरोनाने आणखी एका गुणी कलाकाराला रासिकांपासून हिरावून नेले.  हिंदी चित्रपटातील जेष्ठ पार्श्वगायक एस पी बालसुब्रह्मण्यम हे गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने आजारी होते. शुक्रवारी त्यांनी अंतिम श्वास घेतला. ७४ वर्षाचे एस पी बालसुब्रह्मण्यम हे रसिकांचे आवडते गायक होते. ४ जून १९४६ रोजी त्यांचा जन्म आंध्रप्रदेश मधील  नेल्लोर येथील मेहुआ या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव श्रीपती पंडितराध्युला बालसुब्रमण्यम असे होते. एस पी बालसुब्रह्मण्यम यांचे वडील हरिकथा गायक होते. आंध्रप्रदेशमधील  हे पारंपरिक लोकसंगीत आहे. त्यात कविता, कथा, गाणी नृत्य यासर्व प्रकारांचा समावेष असतो. एस पी यांचे वडील नाटकांतूनही काम करीत. एस पी यांना दोन भाऊ व एक बहीण आहेत. मोठे होऊन इंजिनिअर व्हावे अशी त्यांची इच्छा होती पण ती पूर्ण होऊ शकली नाही.  लहानपणापासून गायनाची आवड असल्याने त्यांनी गायनातच करियर करायचे असे ठरवले. १९६४ साली त्यांना गायनाचे पहिले पारितोषिक मिळाले. त्यानंतर त्यांचे नाव सर्वदूर पसरू लागले. सुरवातीला त्यांनी आपल्या मातृभाषेत म्हणजे तेलगू भाषेत गाणी गायली. नंतर त्यांनी कन्नड, तामिळ या दाक्षिणात्य भाषेतही गायला सुरवात केली. सुरवातीला दाक्षिणात्य भाषेत गाणी गाणारे एस पी हे दक्षिणेतील मोहम्मद रफी  म्हणून ओळखले जात. नंतर त्यांनी हिंदीतही गायला सुरवात केली. एस पिंच्या आवाजातले हम बने तुम बने हे एक दुजे के लिये या चित्रपटातील गाणे खुप गाजले.एक दुजे के लिये या पहिल्याच चित्रपटातील पार्श्वगायनासाठी त्यांना राष्ट्रिय पुरस्काराने गौरविण्यात आले.  या चित्रपटातील गाण्याने त्यांचे हिंदी चित्रपट सृष्टीत बस्तान बसले. ते आघाडीचे गायक म्हणून ओळखले जाऊ लागले. पत्थर के फुल, हम आपके है कौन, बागी, साजन, रोजा आदी चित्रपटातील त्यांची गाणी खूप गाजली. सलमान खानचा पहिला चित्रपट मैने प्यार किया साठी त्यांनी सलमानचा आवाज बनून गाणी गायली. या चित्रपटातील त्यांची सर्व गाणी गाजली.  सलमान खान याला सुपरस्टार करण्यात एस पि यांचा वाटा खूप मोठा होता. सलमान खानच्या अनेक गाण्यांना त्यांचाच आवाज असे. सलमान खान आणि एस पी हे जणू एकाच नाण्याचे दोन बाजू होते. ९० च्या दशकात त्यांनी गायलेली सर्वच गाणी लोकप्रिय झाली.  एस पी यांनी १६ भाषांमधून ४० हजारांहून अधिक गाणी गायली. ८ फेब्रुवारी १९८१ रोजी सकाळी ९ ते रात्री ९ अशा १२ तासात तब्बल २१ कन्नड गाणी रेकॉर्ड करून त्यांनी विश्वविक्रम केला जो गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकोर्डमध्ये नोंदला गेला. एस पी बालसुब्रह्मण्यम यांनी गेली पाच दशके आपल्या आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या आवाजाची मोहिनीच अशी होती की जो त्यांचा आवाज ऐकेल तो त्यांच्या आवाजाच्या प्रेमात पडे. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. त्यांना तब्बल अर्धा डझन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. शिवाय फिल्मफेअर, स्क्रीन असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. भारत सरकारनेही त्यांना  पद्मभूषण हा मानाचा पुरस्कार देऊन गौरवले आहे. रसिकांचे आवडते आणि रसिकांच्या मनात आदराचे स्थान असणाऱ्या या गायकाचे असे अकाली निधन रसिकांना चटका लावून जाणारे आहे. एस पी बालसुब्रह्मण्यम यांना भावपूर्ण श्रद्धांजली! 


-श्याम बसप्पा ठाणेदार ,दौंड जिल्हा पुणे 

निरर्थक वाद

         जगातील सर्वात मोठी आणि यशस्वी लीग म्हणून जीच्याकडे पाहिले जाते त्या इंडियन प्रीमियर लीग चा तेरावा हंगाम दुबई, शारजा व संयुक्त अरब अमिरातीत सुरु आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांविना खेळली जाणारी ही लीग यावर्षीही लोकप्रिय होत आहे. आयपीएल ही जितकी क्रिकेटसाठी प्रसिद्ध आहे तितकीच ती वादासाठीही प्रसिद्ध आहे. आयपीएल आणि वाद हे जणू समीकरणच बनले आहे. या हंगामात तरी हे समीकरण बदलेल अशी अपेक्षा होती पण हा  हंगामही याला अपवाद ठरला नाही. भारताचा माजी सलामीवीर विक्रमादित्य फलंदाज  , जेष्ठ समालोचक सुनील गावसकर आणि भारताचा कर्णधार विराट कोहली याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्यातील वादाने मागील आठवडा गाजवला. अनुष्काचा पती रॉयल चॅलेंज बंगळुरू चा कर्णधार विराट कोहली हा सलग दोन सामन्यात अपयशी ठरल्यावर समालोचन करणारे सुनील गावसकर यांनी म्हटले की विराट हा जगातला सर्वोत्तम फलंदाज आहे त्याची ही कामगिरी निराशाजनक आहे.  जितका तुम्ही जास्त सराव कराल तितकी तुमची कामगीरी उत्तम होऊ शकते याची त्याला नेमकी कल्पना आहे. हे तो जाणतो. आता लॉक डाउन च्या काळात त्याला हा सराव मिळाला नाही लॉक डाऊनमुळे प्रत्यक्ष मैदानात जाऊन सराव करता न आल्याने त्याने अनुष्काचा बॉलिंगवर सराव केला. त्याची चित्रफीत आपण पाहिली पण त्याने काही होणार नाही त्याला मैदानावर आणखी सराव करावा लागेल. स्टार स्पोर्ट चॅनलवर हिंदीत हे समालोचन चालू होते. सर्वांनी ते ऐकले. त्यात गावसकर यांनी अभिरुची सोडून कुठलेही भलते सलते विधान केले नाही. त्यात महिलांचा अवमान करणारा कोणताही भाग नव्हता. गावसकरांना ओळखणारे कोणीही सांगेल की ते महिलांचा अवमान करणाऱ्यांपैकी नाही. महिलांप्रति त्यांनी नेहमीच आदर व्यक्त केला आहे.  लॉक डाऊनमध्ये विराट कोहली यानेच  इन्स्ट्राग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता त्यात अनुष्का त्याला बॉलिंग करीत असल्याचे दिसते. त्या व्हिडीओच्या अनुषंगानेच गावसकर यांनी ती टिपणी केली. पण अनुष्काला ही टिपणी मात्र चांगलीच  झोंबली. तिने सरळ गावसकरांवर टीका करताना त्यांना थेट स्त्री वादाचा कोर्टात उभे केले. तिने इन्स्ट्राग्रामवर स्टोरी पोस्ट करीत गावसकरांना काही प्रश्न केले. त्यातला पहिल्या प्रश्नात  अनुष्का म्हणते की मिस्टर गावसकर तुम्ही तुमच्या टिप्पणीतून दिलेला संदेश अभिरुचीहीन आहे. पतीच्या अपयशाला तुम्ही पत्नीला जबाबदार धरता. मुळात अनुष्काला कसला राग आला तेच प्रेक्षकांना समजेना कारण गावसकर यांनी महिलांचा अवमान करणारे कोणतेही वक्तव्य केले नाही की त्यांनी विराट कोहलीच्या अपयशाला अनुष्काला जबाबदार धरले. मुळात हा वादाचा विषय नव्हता पण आजच्या सोशल मीडियाच्या युगात अर्थाचा बेअर्थ करून त्यावर चर्चा करायची, वाद उकरून काढायचा आणि सामोरच्या व्यक्तीला ट्रोल करायचे याची स्पर्धाच लागली आहे.माध्यमांना आपला टीआरपी वाढवण्यासाठी असे वाद हवेच असतात.  तिखट मिठाची फोडणी टाकून असे वाद रंगवले जातात पण त्यातून काहीही साध्य होत नाही. उलट दोन व्यक्ती मध्ये द्वेष पसरवला जातो. पण त्यातून चांगल्या व्यक्तीची प्रतिमा भंजन होते याचे भान कोणाला राहत नाही.  गावसकरांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर तरी हा वाद थांबेल अशी अपेक्षा करुया. अशा निरर्थक वादापेक्षा आयपीएलमध्ये क्रिकेटवरचा चर्चा व्हावी. अशी अपेक्षा क्रिकेटप्रेमी व्यक्त करीत आहे.


-- श्याम बसप्पा ठाणेदार ,दौंड जिल्हा पुणे 

जाचक अट रद्द करा

    कोरोनाचे संक्रमण वाढू नये, सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून लॉक डाऊनच्या पहिल्या दिवसांपासून पोलीस जीवाचे रान करीत आहेत. त्यामध्ये आतापर्यंत अनेक पोलिसांचा  बळी गेला आहे. अनेकांना कोरोनाची बाधा झाली आहे. गेल्या सहा महिन्यांतील बाधित पोलिसांच्या आकडेवारीकर नजर टाकली तर ती चिंताजनक आहे. राज्यातील २२ हजार ६२९ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली असून त्यापैकी ३ हजार १९० पोलिसांवर सध्या उपचार सुरु आहे. २४१ पोलिसांचा कोरोनाने बळी गेला आहे. पोलिसांचे काम नेहमीच जोखमीचे राहिले आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखणे असो की कोणताही बंदोबस्त पोलीस आपला जीव धोक्यात घालून काम करीत असतात. कोरोनाच्या महामारीत तर पोलिसांचे काम खूपच वाढले आहे. कोरोनाच्या  महामारीत स्वतःचा जीव धोक्यात घालून पोलीस काम करीत आहेत.  कोरोनाच्या महामारीत जे पोलीस कर्मचारी, अधिकारी आपला जीव धोक्यात घालून लोकांचा जीव वाचावीत आहेत त्या पोलिसांचा  कर्तव्य बजावताना जर मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबियांची जबाबदारी सरकारने घ्यायला हवी पण सरकार आता ही जबाबदारी झटकू पाहत आहे की काय अशी शंका येते.  कोरणामुळे मृत्यू झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती  मात्र  आता अनुदान मिळवण्यासाठी कोरोनाच्या कामावर तैनात असल्याचे प्रमाणत्र सादर करण्याची अट घालण्यात आली आहे. २९ मे रोजी सरकारने पोलिसांना कोरोना योद्धा घोषित केले त्याअंतर्गत पोलिसांना ५० लाखांचा विमा कवच देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अनेक मृत कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना ही मदत जाहीरही झाली मात्र १८ सप्टेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार विमा मिळवण्यासाठी मृत कर्मचारी, अधिकारी कोरोना प्रतिबंधक कामावर तैनात असायला हवे अशी नवी अट घालण्यात आली या अटीमुळे अनेक पोलीस कर्मचारी , अधिकाऱ्यांचे  कुटुंबिय अनुदानापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. सरकारने जारी केलेली ही नवी अट त्वरित रद्द करुन सर्व पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना दिलासा दयावा. 

-श्याम बसप्पा ठाणेदार, दौंड जिल्हा पुणे 

रेल्वे प्रशासनाने हलगर्जीपणा बंद करावा आणि सर्व सामान्यांसाठी लोकल सेवा सुरु करावी - अनंत हुमणे


     गेल्या सहा महिन्यांपासून लोकल सेवा बंद आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन जनतेने देखील प्रशासनाला साथ दिली. आज अत्यावश्यक सेवा म्हणून ठराविक लोकल सेवा चालू आहेत. त्यामध्ये सर्व सामान्य नागरिकांना प्रवास करण्यास मनाई आहे.
शिवराज्य कामगार हक्क संघटना महाराष्ट्र राज्य सलग्न पोलीस सेवा संघटना महाराष्ट्र राज्य ही संघटना संस्थापक,अध्यक्ष श्री.प्रकाश डोंगळे सर यांच्या मार्गदर्शना खाली गेल्या चार लॉकडाउन पासून सतत पोलीस खाते व सामान्य नागरिकांसाठी कोणत्याही प्रकारे मानधन न घेता सेवा करत आहे. पोलीस खात्याला बंदोबस्तासाठी सदैव मदत करत असून जनतेचे सुख-दुःख व इतर अनेक सामाजिक क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी संघटना अहोरात्र सक्रीय  आहे. अशा सेवाभावी कार्य करत असलेल्या संघटनेतील पदाधिकारी व सदस्य यांना काही ठराविक रेल्वे स्थानकावर प्रवास तिकीट नाकारले जात आहे. सरकारकडून कोणत्याही प्रकारे मानधन न घेता संघटना पोलीस खाते व नागरिकांची अहोरात्र सेवा करत असताना संघटनेतील सेवेकरी कर्मचारी वर्गाला लोकलचे तिकीट किंवा मासिक प्रवास पास नाकारले जात आहे. अशावेळी अापण योग्य तो निर्णय घेऊन संघटनेच्या सर्व सदस्यांना त्यांच्या ओळख पत्रावर रेल्वे प्रवासाकरता मासिक पास उपलब्ध करुन देणे या संदर्भात आम्ही केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयलसाहेब यांना ईमेल द्वारे पत्र पाठवून कळविले होते. पोलीस सेवा संघटनेचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख अनंत हुमणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे व्यक्तीशः रेल्वे अधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा करुन सुद्धा त्यांनी अद्याप योग्य तो निर्णय घेतलेला नाही. DRM ऑफिसमध्ये पत्रव्यहार करा असे सांगण्यात आले.
          तरी रेल्वेच्या संबंधित अधिकारी वर्गाने याबाबत योग्य अशी दखल घ्यावी. लोकल सेवा ही फक्त अत्यावश्यक म्हणून काम कारणाऱ्यांसाठी आहे मग लोकल प्रवासी एवढे वाढले कसे. ह्या कडे रेल्वे प्रशासन यांचा लक्ष नाही का.अनेक लोकांनी  बोगस ओळख पत्र बनवून घेतले आणि खोटे ओळख पत्रावर प्रवास करत आहेत.ज्यांची ओळख आहे त्यांनी बोगस कार्ड बनवले पण सर्वसामान्य माणसाचा काय? त्यांनी बस साठी दोन तास लाईन मध्ये उभे राहायचे का? लोक बेरोजगार झाले आहेत त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. प्रशासनाने योग्य ति दखल घेऊ लोकल गाड्या वाढवून व  नियम बनवून सर्व सामान्य नागरिकांसाठी सुद्धा लोकल सेवा सुरु करावी..

सोमवार, २८ सप्टेंबर, २०२०

'लेखणी बोलते तेव्हा' समूह आयोजित जल्लोष ३०० उपक्रमांचा कार्यक्रम संपन्न.

बातमीदार - राज पवार

विरार ( पालघर )   लेखणी बोलते तेव्हा समूह आयोजित जल्लोष ३०० उपक्रमांचा विशेष कार्यक्रम जल्लोषात साजरा झाला. ३०० उपक्रमांच्या यशामुळे समूह प्रशासक  कवी निलेश हेंबाडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कवी प्रदीप ऐंगडे काव्यमनी प्रयागदिप उपस्थित होते.

            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री प्रिया गावडे यांनी केले तर ग्राफिक्सकार कवयित्री अश्विनी चव्हाण यांनी उत्तम ग्राफिक्स केले. जल्लोष ३०० उपक्रमामध्ये ३३ कवींनी सहभाग घेतला होता. शरयू कुलकर्णी, कालिंदी वाणी, राज पवार,सरोज गाजरे, स्नेहा पंडित, वंदना बिरबटकर, रुपाली पाटील, रविंद्र गिमोणकर,संजना वितुरकर, चंद्रशेखर कानकाटे,अमोल खटावकर, रंजना बोरा,अमोल पवार, वैशाली वर्तक, स्वप्ना चौधरी,संध्याराणी कोल्हे, विद्या आसावा, वेदांती पाटील, संगीता ढोमसे, कल्पना देशमुख, आप्पा तरे, सुनंदा चौधरी, अंजली तरे, जान्हवी कुंभारकर, अरविंद कुळकर्णी, नेहा धारुळकर,माधुरी दायमा, दिनेश मोहरील, चंचल भंडारी,जितेश कायरकर, सुजाता जाधव, लक्ष्मण शेडगे, राजेंद्र वाणी,यांनी हिरवा चुडा, काका, माझी लेखणी यावर उत्तम चारोळ्या सादर केल्या.

                   लेखणी बोलते तेव्हा समूहाचे प्रशासक निलेश हेंबाडे यांनी आभार प्रदर्शन केले. राष्ट्रीय गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

विरार शिवसेनेच्या वतीने गरजु नागरीकांना पुन्हा जिवनावश्यक वस्तुंचे वाटप..कोरोना संकट काळी मदतीचा हात

नालासोपारा : विरार शहरात देखील कोरोना या संसर्गजन्य रोगामुळे सगळीकडे लॉकडाऊन करण्यात आले आहे. या काळात बहुतांश कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असल्याने मागील मार्च महिन्यात लाँकडाऊन झाल्यापासुन शिवसेना शहर उपप्रमुख श्री.उदय अरुण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख प्रविण आयरे, उप विभाग प्रमुख संतोष राणे, सुनिल चव्हाण, शाखाप्रमुख तुकाराम भुवड यांनी विभागातील कोणतेही कुटुंब उपाशी राहु नये यासाठी कोरोना काळात मनवेलपाडा, कारगिलनगर येथे विविध भागात जाऊन रोज सकाळ-संध्याकाळी 300 नागरीकांना खिचडीचे वाटप करण्यात येत होते तसेच कोकण नगर परिसरात सेनिटायझर वाटप, Arsenic Album च्या गोळ्यांचे वाटप, गणेशोत्सव काळात मनवेलपाडा तलाव शेजारी नेत्र तपासणी शिबीर तसेच उदय जाधव यांच्या शिवसेना "मातोश्री" संपर्क कार्यालय येथे शेकडो गरजु कुटुंबाना जिवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले.

       महामारीच्या काळात महागाई वाढत असल्याने कोरोना बरोबरच कांदाने देखील नागरिकांच्या डोळ्यातुन पाणी काढायला सुरूवात करताच शिवसेनेच्या वतीने विभागातील नागरीकांना अत्यंत स्वस्त दरात कांदे उपलब्ध करून देण्यात आले किंबहुना अत्यंत गरजु असलेल्या काही चाळ-कमिटींना मोफत कांदे उपलब्ध करून देण्यात आले तसेच वसई तालुक्यातुन गणेशोत्सवाला आपल्या गावाला जाणारे चाकरमान्यांची संख्या लक्षात घेता मुख्यमंत्री व परिवहन मंत्री मंत्री यांना पत्रव्यवहार करून कोकणात जाण्यासाठी एस.टी बस सुरू करण्याबरोबरच वसई तालुक्यात खाजगी ट्रव्हल्स कडुन नागरीकांची होणारी लुट थांबवण्यासाठी एकदर निश्चित करून देण्यास विनंती करण्यात आली व ती मान्य देखील देखील झाली.

        वाढत्या कोरोना रूग्णांना रक्ताची कमतरता भासत असल्याने शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री मान.श्री.उध्दवजी ठाकरे यांच्या अावाहनाला प्रतिसाद देत भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन देखील "मातोश्री" संपर्क कार्यालय येथे करण्यात आले होते तसेच "सरला रक्तपेढी" च्या माध्यमातुन शेकडो रूग्णांना रक्तपुरवठा करण्यात आला व कोविड रूग्णांना रूग्णवाहिका उपलब्ध करून कोविड सेंटर मध्ये हलविण्यास मदत करण्यात आली.

      पण लाँकडाऊन काही संपत नसल्याचे लक्षात घेऊन मागील 15 दिवसांपासुन पुन्हा एकदा गरजु नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी मनवेलपाडा गाव येथील आई एकवीरा इमारत, जय जिवदानी काँलनी, सि.एम.नगर, कारगिल नगर, आश्रया बार मागील इमारती, गणेश चौक, सह्याद्री नगर, विवा जांगीड काँम्प्लेक्स, महाकाली मंदिरच्या मागील एकता नगर, टेपाचा पाडा, राजा नगर, जयदिप शाळेच्या मागील परिसर तसेच कोकण नगर, आई-बाबा नगर या भागातील सोसायटी व चाळ कमिटींचे पदाधिकारी यांच्या मार्फत अत्यंत गरीब व गरजु अशा 200 नागरिकांची यादी मागवुन त्या गरजु नागरिकांना आपल्या कार्यालयात न बोलवता श्री.उदय जाधव यांनी शिवसेना पदाधिकारींसह स्व:ता त्या नागरीकांच्या घरी जाऊन विभागातील शिवसैनिक, युवासैनिक व महिला आघाडीने जिवनावश्यक वस्तुंचे वाटप केले.

       पुढील येत्या आठ दिवसात मनवेलपाडा विभागातील 250 रिक्षावाले तसेच कोरोना काळात विरार शहरातल्या मनवेलपाडा विभागातील नागरीकांच्या मालमत्तेच्या सुरक्षिततेची जबाबदारी स्विकारलेल्या सोसायटींच्या सुरक्षा रक्षक यांना देखील मदत म्हणुन अन्न-धान्य वाटप केले जाणार आहे.

         आतापर्यंत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला आघाडीच्या सौ.रोशनी रा.जाधव, सौ.साक्षी उ.जाधव, शाखाप्रमुख मंगेश मोरे, चंद्रकांत सावंत, गणेश जाधव, पियुष घडशी, उपशाखा प्रमुख:- प्रकाश गोरिवले, मिलिंद बेंडल, योगेश आंग्रे, प्रदिप मोरे, विनोद गावकर, प्रकाश चावडा, गटप्रमुख: राजेश जाधव, दिनेश खळे, अमोल चाचे, बंड्या गुरखे, अरविंद दामुष्टे, गणेश चिल्ले, दिनेश मोरे, प्रशांत देवळेकर, संतोष साळुंखे युवासेनेचे राहुल नानकर, रोहित कदम, निखील आंग्रे, वैभव कदम, दुर्वैश देसाई, संदिप गोसावी, सुरज हातणकर, ओमकार वर्मा, आकाश मुळे महिला आघाडीच्या प्रतिक्षा गुरव, सुनिता मुळे, रजनी कोठावळे, मंगल गायकवाड, प्राची घडशी आदि शिवसैनिक, युवासैनिक व महिला आघाडी यांनी परिश्रम घेतले.

राष्ट्रवादी पदवीधर संघ आयोजित राज्यव्यापी रक्तदान महाअभियान

बातमीदार: राजेश चौकेकर

नालासोपारा: दि.२७ सप्टेंबर २० रोजी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात येणाऱ्या काळात रक्ताची मोठी गरज भासू शकते. अशा परिस्थितीमध्ये कुणीही रुग्ण हा रक्त न मिळाल्यामुळे दगाऊ नये असा मानस ठेवून राष्ट्रवादी पदवीधर संघ पालघर जिल्ह्यात रक्तदान करण्याचे एक महाअभियान मा.सुनील पाटील साहेब, प्रदेशाध्यक्ष (राष्ट्रवादी पदवीधर संघ)मा.शिवाजी पाटील साहेब.प्रदेश उपाध्यक्ष (राष्ट्रवादी पदवीधर संघ) यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यव्यापी रक्तदान महाअभियान नालासोपारा येथे आयोजित करण्यात आले. या रक्तदान महाअभियानाला कोरोनाच्या महामारीत देखील रक्तदात्यांचा चांगला प्रकारे प्रतिसाद मिळाला.  

    सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मनोज म्हात्रे जिल्हाध्यक्ष ओ.बी.सी. सेल (वसई-विरार शहर जिल्हा)हेमंत कहार कार्याध्यक्ष ओ.बी.सी. सेल (वसई-विरार शहर जिल्हा)नितीन म्हात्रे वसई तालुका अध्यक्ष रा काँ. पा. वसई-विरार शहर जिल्हा विशेष सहकार्य रमेश भारती राष्ट्रवादी कामगार युनियन अध्यक्ष देवेंद्र शिरोडकर जिल्हा उपाध्यक्ष ओ.बी.सी. सेल (वसई-विरार शहर जिल्हा) राष्ट्रवादी कामगार युनियन पालघर जिल्हाध्यक्ष संदेश पवार राष्ट्रवादी कामगार युनियन पालघर जिल्हा उपाध्यक्ष राम सिसोदिया राष्ट्रवादी कामगार युनियन नालासोपारा विधानसभा क्षेत्र अध्यक्ष रितेश सोलंकी जिल्हा सचिव ओ.बी.सी.सेल राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी(वसई-विरार शहर जिल्हा)मनोज पाटील सुरेंद्र भोईर श्री रवी यादव हरीश कोटकर राज जाधव आणि आदी बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित सर्व कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादी पदवीधर संघ पालघर जिल्हाध्यक्ष निलेश जोशी यांनी आभार मानले.

जागतिक पर्यटन दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग आणि एमटीडीसीच्या (MTDC) विविध उपक्रमांचे लोकार्पण संपन्न

मुंबई / प्राजक्ता  चव्हाण.

    जागतिक पर्यटन दिनानिमित्त म्हणजे रविवार, दिनांक २७ सप्टेंबर २०२० रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नाशिक येथील पर्यटक संकुल ग्रेप पार्क आणि खारघर येथील एमटीडीसीच्या (MTDC) रेसिडेन्सीचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ही उपस्थित होते. तसेच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि राज्यमंत्री आदिती तटकरे, खासदार श्रीरंग बारणे हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सामील झाले होते. छायाचित्रांमध्ये नाशिक येथील पर्यटक संकुल ग्रेप पार्क येथील ज्यात एक तलाव, बोट क्लब आणि काही व्हिला आहेत. या बोटींमध्ये जेट स्की तसेच बनाना बोट आहेत. तसेच खारघर येथील एमटीडीसीच्या रेसिडेन्सी यामध्ये अनेक खोल्या, वसतिगृह, एक व्यवसाय केंद्र असून खारघरजवळ बिझनेस स्टे करण्यासाठी उत्तम प्रकारे डिझाईन केलेले आहे.

  यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ आणि इतर मान्यवर यांच्यासमवेत एमटीडीसीच्या दोन हॉटेल्सचे लोकार्पण ही झाले. आदित्य ठाकरे आणि अदिती तटकरे हे जागतिक पर्यटन निर्देशांकाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याने उंच उडी घेण्यासाठी तसेच राज्यात पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार आणि महसूल मिळवून देण्यासाठी वचनबध्द आहोत. असे यावेळी स्पष्ट केले. तसेच यांनी महाराष्ट्र पर्यटन डेटा बँकचे विमोचन करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर उपस्थित मान्यवरांना पर्यटन विभागाच्या आगामी प्रकल्पांची माहिती ही दिली.

सुप्रसिद्ध चित्रकार सौ.प्रिया पाटील यांना राष्ट्रीय पारितोषिक

 

मुंबई / लक्ष्मण राजे-   

        संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या भगवान गौतम बुद्धांच्या तत्वज्ञानावर, चित्रकार प्रिया पाटील यांनी केलेल्या बोधी चिन्हांच्या पेंटिंग शो मध्ये महाकारुण्य  दिसले त्याविषयी सांगताना प्रसन्न खळखळून हसत प्रिया पाटील उत्तरल्या, हा  माझ्या आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा शो ! लँडस्केप नंतर काही वेगळं करायचं ठरवलं!  आणि भगवान गौतम बुद्धांचा चेहरा न काढता, त्यांनी दिलेल्या अष्टांग मार्गाच्या, आठ चिन्हांवर मी काम केलं, आणि नेहरू सेंटरला  भव्य प्रदर्शन भरवले! तिथे मला राष्ट्रीय पारितोषिक मिळालं! पहिल्यांदा मला कळलं की लोकांना माझं काम फार आवडलंय! त्यानंतर मी केरळ, ललित कला अकादमीतही गेले. लोकांनी मला असंख्य प्रश्न विचारले,' हे रंग असे का? ते चित्र असं का? असे अनेक प्रश्न विचारले , मी इतकी घाबरले होते, पण श्री.प्रमोद पाटील माझे पती! नेहमी माझ्या सोबतच असतात, म्हणून मी त्या प्रश्नानां सहजपणे उत्तरे दिली. मी  नेहमी चित्रकलेच्या विषयावर भरभरून बोलत असते. एकदा तर साक्षात भगवान बुद्धांवर पी.एच.डी केलेले एक विद्वान सद्गृहस्थ आले होते, त्यांनी मला खूप प्रश्न विचारले! या चित्रांमध्ये तुम्ही भगवान गौतम बुद्धांना वेगळ्या रूपात कसे दाखवले ? मग मी त्यांना पाकिस्तानात पेशावरला असं पेंटिंग अस्तित्वात आहे. त्याची माहिती दिली सोमय्या कॉलेज मधल्या प्राध्यापकांकडे काही लेक्चर्स अटेंड केले. भगवान गौतम बुद्धांचा! राजा ते बुद्धत्वाचा प्रवास पाहून एका चित्रात रेखाटला! एक्झिबिशन पाहून परत जाताना त्यांनी अभिप्राय पुस्तकात 'विद्रोही आर्टिस्ट' म्हणून रिमार्क दिला! अमेरिकेहून आलेले एक साठीचे गृहस्थ म्हणाले,' तुम्ही नक्की प्रिया पाटीलच आहात ना? नाही, मला वाटलं खूप वयस्क, म्हातारी अनुभवी, बाई असेल! पण तुम्ही तर सुंदर! तरुण आहात, छान! हे का हिरव्या पानावर बुद्धांच्या संदेशा खाली कॅलिग्राफी करून, खरी पिंपळाची पाने चिटकवली! किती तरी रसिकांनी वृक्षाच्या छायेत वावरल्या सारखं वाटलं! अशी पोचपावती दिली! 


          नेहरू सेंटर मधल्या डोळ्यांचे पारणे फेडणार्‍या बोधचिन्हांच्या या शो ला अनेक मान्यवर  उपस्थित होते, ही बाब निश्चितच मला अभिमानास्पद वाटते असेही प्रिया पाटील यांनी सांगितले. पुढे त्या हसत हसत म्हणाल्या! पेंटिंगची बरीच प्रदर्शन मुंबईत जहांगीर आर्ट गॅलरी तसेच पुणे, गोवा , केरळ येथे आयोजित केली होती. पुणे येथे प्रदर्शन भरविण्यात आले असताना त्यांनी मला आवर्जून फोन करून पत्रकार लक्ष्मण राजे तुम्ही हे प्रदर्शन बघायला जरूर या असे निमंत्रण दिले होते . त्यावेळी पुण्यात गेल्यावर मी त्यांना अनेक प्रश्न विचारले. तुमच्या चित्रांमध्ये गहिरे घनरंग तुम्ही जास्त वापरतात! असं का ? यावेळी प्रिया पाटील हसतच म्हणाल्या ! मला लाल रंगाच खूप आकर्षण आहे! चित्रांमध्ये सृष्टीचे सगळे रंग आले पाहिजेत! असं मला अगदी मनापासून वाटतं! पण त्याहून मला हळद-कुंकू फार आवडते. लाल काळा हिरवा पिवळा हे रंग माझ्या पेंटिंग मध्ये जास्त दिसतात म्हणून तर पंजाब मधली सांची!मधुमती! वारली संस्कृती चित्र! यांचे प्रदर्शन मी जहांगीर आर्ट गॅलरीत भरवलं! मला बॉम्बे आर्ट सोसायटीचे राष्ट्रीय पारितोषिकही मिळालं! राजस्थानी पारंपारिक चित्रकला, जी खरं तर महाराष्ट्रातून स्थलांतरित झालेली कला आहे. गाय चित्तारलेलं जे चित्र श्रीनाथा च्या मागे पडद्यावर असतं! म्हणून त्याला पिछवाई म्हणतात! दक्षिणेत लेदरवर शॅडो कलर मध्ये केलेलं काम! नायिका या चित्रावर काम करताना! मला स्वतःचा चेहरा दिसला! आणि मग मी नायिका तशीच चित्तारली! पुढे स्वयमसिद्धा चित्रकार प्रिया पाटील यांनी सांगितले, माझे खरे गुरू माझा पिताच! पण स्वकर्तुत्वावर आपणही काही करावं यावर माझा आत्मविश्वास अटळ आहे. आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून अशा कितीतरी महिला असतील ज्यांना काही करून दाखवायचे असेल? अशा महिलांसाठी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून प्रिया पाटील यांनी "चित्रांगणा" ही संस्था निर्माण केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून प्रिया पाटील यांनी चित्रकलेची आवड असणाऱ्या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या चित्रकला प्रदर्शनात दोनशे महिला सहभागी झाल्या होत्या. सामाजिक भान जपणाऱ्या प्रिया पाटील यांनी आयोजित केलेल्या या  चित्रकला प्रदर्शनात त्यावेळी सात दिवस मोठमोठे कलाकार आले होते. चित्रकला आणि शिल्पकलेचे डेमोज ठेवले होते.चित्रकला आणि शिल्पकलेच्या या प्रदर्शनाला सात दिवस अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली आणि महिलांनी काढलेल्या पेंटींगचे कौतुक केले.तसेच प्रिया  पाटील यांनी प्रदर्शनात सहभागी झालेल्या सर्व महिलांना मार्गदर्शन केले आणि वर्षभर इतकं काम करा की तुम्हाला आर्ट गॅलरी पर्यंत पोहचता आलं पाहिजे असा संदेश दिला.या प्रदर्शनात एक घडलेला  एक मनाला चटका लावून जाणारा हळवा किस्सा त्यांनी सांगितला. एका कॅन्सर ग्रस्त महिलेने चित्रागंणा मध्ये सहभाग घेतला होता.ती म्हणाली!गेली पस्तीस वर्षे जे.जे.स्कूल आॅफ आर्ट मध्ये काम करून जो आनंद मला मिळाला नाही तो आनंद चित्रांगणा प्रदर्शनात मिळाला, आणि मी धन्य झाले हे सांगताना तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. पैसा काय करायचा आहे, त्यापेक्षा हा आनंद मला मोलाचा वाटतो. शेवटी काय मला माझे माहेर, सासर, पती ,मुलगी, यांचं पाठबळ मिळाले म्हणूनच मी या चित्रकलेच्या प्रवासात मोठ्या प्रमाणात यश संपादन केले आहे , असे चित्रकार प्रिया पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या चित्रकार सौ.प्रिया पाटील यांचे राजकीय, सामाजिक ,शैक्षणिक सांस्कृतिक, साहित्य ,कला , क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी मनःपुर्वक हार्दिक अभिनंदन केले आहे. तसेच चित्र कलेच्या क्षेत्रातील पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध गीतकार अभिलाष यांचे निधन

 

मुंबई : लक्ष्मण राजे 

     ‘इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना…’ या लोकप्रिय प्रार्थनेने प्रसिद्ध झालेले गीतकार अभिलाष यांचं निधन झालं आहे. ते ७४ वर्षांचे होते. गेल्या अनेक महिन्यांपासून ते पोटाच्या आजारामुळे त्रस्त होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. आज सकाळी चार वाजता त्यांच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात आले.

    अभिलाष यांच्या पत्नी नीरा यांनी दिलेल्या माहितीनुसार मार्च महिन्यात त्यांच्या पोटातील आतड्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या शस्त्रक्रियेमुळे त्यांना प्रचंड त्रास होत होता. या त्रासामुळे दिवसेंदिवस त्यांच्या शरीरात कमजोरी येती गेली. परिणामी उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.

      अभिलाष हे बॉलिवूड मधील एक नामांकित गीतकार होते. १९८३ साली ‘अंकुश’ या चित्रपटासाठी त्यांनी ‘इतनी शक्ति हमें देना दाता’ ही प्रार्थना लिहिली होती. या प्रार्थनेमुळे ते प्रचंड लोकप्रिय झाले. जवळपास आठ भाषांमध्ये भाषांतर करण्यात आलेली ही प्रार्थना आजही तितकिच लोकप्रिय आहे. ‘इतनी शक्ति हमें देना दाता’ या प्रार्थने शिवाय त्यांनी ‘सांझ भई घर आजा’, ‘आज की रात न जा’, ‘वो जो खत मुहब्बत में’, ‘तुम्हारी याद के सागर में’ ‘संसार है इक नदिया’, ‘तेरे बिन सूना मेरे मन का मंदिर’ यांसारख्या अनेक सुपरहिट गाण्याची निर्मिती केली. तसेच ७०-८०च्या दशकातील अनेक चित्रपटांचे संवाद देखील त्यांनी लिहिले. अभिलाष यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. बाॅलिवूड मधील अनेक मान्यवरांनी तसेच चाहत्यांनी  त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

जेएनपीटीच्या कंटेनर टर्मिनलचे खासगीकरण रोखण्यासाठी शरद पवार साहेब यांना साकडे.

उरण (विठ्ठल ममताबादे) -केंद्र सरकारने  पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी ) तत्वावर जेएनपीटीच्या कंटेनर टर्मिनलचे   खासगीकरण करण्याचे सूतोवाच केल्याने संतप्त झालेल्या  कामगारांच्या वतीने जेएनपीटीचे कामगार विश्वस्त दिनेश पाटील, भूषण पाटील, रवि पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते  प्रशांत पाटील  आणि सौ. भावना ताई घाणेकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस चे अध्यक्ष शरद पवार साहेब यांची मुंबई येथे भेट घेऊन केंद्र सरकारचे धोरण कामगार  आणि प्रकल्पग्रस्तांच्या विरोधी असल्याचे एका सविस्तर निवेदनाद्वारे स्पष्ट केले .

      जेएनपीटी प्रकल्पाकरिता ज्यांच्या जमिनी सरकारने संपादित केल्या त्यांना अद्याप पूर्ण न्याय मिळाला नाही. विकसित जमिनीचे अद्याप वाटप झाले नाही. अनेक प्रकल्पग्रस्त रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत .गेली एकतीस वर्षे जेएनपीटीचे कामगार कंटेनर टर्मिनल यशस्वीरीत्या चालवीत आहेत. जेएनपीटीकडे पुरेसा निधी, यंत्रसामुग्री, मनुष्यबळ  आणि मूलभूत सोयी सुविधा असतांना त्यामध्ये अधिक सुधारणा करण्याऐवजी हे टर्मिनल खासगी उद्योगाला देऊन सरकार राष्ट्रीय अर्थव्यवस्था आणि सुरक्षेला गंभीर धोका पोचवित आहे.महाराष्ट्रातील व्यापार गुजरातकडे वळवीत आहे .  येथील ग्रामपंचायतींना कर देण्याची जबाबदारी टाळली जात आहे . सामाजिक दायित्व पार पाडले जात नाही .असे अनेक मुद्दे प्रशांत पाटील, दिनेश पाटील, भूषण पाटील, रवी पाटील यांनी उपस्थित केले  . या सर्व  मुद्य्यांवर  या भेटीमध्ये सविस्तर चर्चा झाली. प्रस्तावित मेजर पोर्ट  ऑथॉरिटी बिल राज्यसभेत मंजूर होता कामा नये यासाठी पूर्ण तयारी करण्याचेही  या चर्चेमध्ये ठरले. कामगार आणि प्रकल्पग्रस्तांची बाजू सर्व सामर्थ्यानिशी केंद्र सरकारपुढे मांडण्याची ग्वाही शरद पवार साहेब यांनी दिली . या भेटीमुळे खासगीकरणाचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे

उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशन तर्फे मेडिकल कॅम्पचे आयोजन


उरण (विठ्ठल ममताबादे)- उरण मेडीकल वेल्फेअर असोशीएशन तर्फे उरण तालुक्यातील पिरवाड समुद्रकिनारी असलेले  ठाकुरवाडी-पीरवाडी येथे मेडीकल कॅम्प चे आयोजन करण्यात आले या कॅम्प मध्ये मास्क, व्हिटॅमिन सी, एनर्जी पावडर आदी मेडीसन चे वाटप करण्यात आले या वेळेस असोशिएशनचे डाॅ सुरेश पाटील,कार्यक्रमाचे अध्यक्ष डाॅ मनोज भद्रे-वैद्यकीय अधीक्षक इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय उरण, उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष- डाॅ विकास मोरे, माजी अध्यक्ष डाॅ संजीव म्हात्रे, डाॅ घनःश्याम पाटील , डाॅ अजय कोळी, डॉ प्रशांत बोन्द्रे,डाॅ अजय लहासे,कोविड झोनल ऑफिसर संतोष पवार, प्राध्यापक राजेंद्र मढवी, हरेश ठाकुर- सरपंच ठाकुरवाडी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.या वेळी 250 हुन जास्त व्यक्तींना मास्क तसेच इतर महत्वाचे मेडिकल साहित्य वाटण्यात आले.सर्वांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी झाल्याने सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे सांगत असोसिएशनचे सेक्रेटरी डाॅ सत्या ठाकरे यांनी उपस्थितांचे व या उपक्रमास प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष हातभार लावणाऱ्या सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगतां केली.

आदर्श वार्ताहर -अंक 18 वा (16 ते 30 सप्टेंबर 2020)

 











आदर्श वार्ताहर -अंक 17 वा (1 ते 15 सप्टेंबर 2020)

 








आदर्श वार्ताहर -अंक 16 वा (16 ते 31 ऑगस्ट 2020)

 








रविवार, २७ सप्टेंबर, २०२०

गणेश जनसेवा मंडळ सामाजिक संस्थेच्या माध्यमातुन विविध यशस्वीपणे राबविण्यात आले सामाजिक उपक्रम

मुंबई/ लक्ष्मण राजे-

     डोंबिवली स्टेशन वरुन सकाळी एका ठराविक वेळी ट्रेन पकडणे हे नित्याचेच झाले होते.तीच ट्रेन,तीच बसण्याची जागा,त्याच परिचित व्यक्ती,ओळख वाढत गेली की एक छान मैत्री  जमते.संध्याकाळचीही तीच परिस्थिती ,ऑफिस सुटल्यावर सकाळचेच मित्र संध्याकाळच्या ठरलेल्या ट्रेनने डोंबिवलीत एकत्र स्टेशनवर उतरणे , तसेच डोंबिवली स्टेशन समोर असलेल्या हॉटेल मध्ये बसणे , चहा कॉफी आणि गप्पा हे नित्याचेच होते. या कालावधीत मौजमजा केली,पार्ट्या केल्या,पिकनिक केल्या, सर्व मित्रांनी जीवाची मुंबई केली.पण हे सर्व करत असताना आपण समाजाचे काही देणे लागतो याची जाणीव झाली, आणि सामाजिक बांधिलकी जाणीव ठेवून  आपटे यांच्या नेतृत्वाखाली व प्रदीप जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश जनसेवा मंडळाची स्थापना करण्यात आली.गणेश जनसेवा मंडळ या सामाजिक संस्थेच्या अध्यक्षपदी आपटे आणि  प्रदीप जोशी यांची सेक्रेटरीपदी निवड करण्यात आली. या दोन्ही अनुभवी, प्रतिभावंत व्यक्तीरेखांच्या अधिपत्याखाली गणेश जनसेवा मंडळाची वाटचाल सुरू झाली.यात संजय वगळ,अशोक लंगडे, शिवराम चव्हाण, गजानन जोशी,शाम जोशी, ज्ञानेश्वर माळवदकर, सत्यवान मुसळे, जी.आर.जोशी, विजय मेंढे, प्रमोद जोशी, विजय वगळ, खंदारे वकील, उदय, कुर्डुरकर, डॅडी अशा अनेक व्यक्ती जोडल्या गेल्या. गणेश जनसेवा मंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमां संदर्भात आपटे , जोशी यांच्या घरी मिटींग होऊ लागल्या.सकारात्मक विचारांची देवाण-घेवाण झाली, चर्चा झाली. त्यानंतर गणेश जनसेवा मंडळाच्या अनेक कार्यक्रमांना उपक्रमांना सुरुवात झाली. त्यात नागरिकांसाठी मोफत आयुर्वेदीक आरोग्य शिबिर, देवदर्शन, दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार , महिलांसाठी कौटुंबिक हळदीकुंकु समारंभ असे अनेक सामाजिक उपक्रम मंडळाच्या माध्यमातून यशस्वीरीत्या राबविण्यात आले.अशी तीस वर्षे गेली, आता त्यातील काही मित्र आणि गणेश जनसेवा मंडळाचे सभासद वयोमानानुसार सेवा निवृत्त झाले आहेत.त्यांची मुल मोठी झाली,चांगल्या नोकरीत व्यस्त आहेत.तसेच गणेश जनसेवा मंडळाच्या या गोतवळयातील मुलांची लग्न झाली,त्यांना मुल झाली.आता हेच मित्र आपल्या मुलांसोबत,नातवंडे, सुनाच्या संसारात आनंदाने रमत आहेत. सर्वांची कारकीर्द समाधानकारक व यशोशिखरावरच आहे.प्रत्येक जण आपापल्या परीने काम,धंदा, व्यवसाय, नोकरी यात यशस्वी झालेले आहेत. आपल्या या सामाजिक कार्यात आपल्या घरातुनही तेवढाच बहुमोल महत्त्वाचा कौटुंबिक पाठींबा मिळाला हे नसे थोडके !  सध्याच्या कोरोना संसर्गामुळे आमच्या भेटीगाठी होत नाहीत. परंतु सर्वांनींच दैदीप्यमान व गौरवशाली यश संपादन केलेल आहे. हे सांगाव तेवढ थोडच आहे.शेवटी काय,सरले ते दिवस आणि आता उरल्या फक्त आठवणी , पण आता मात्र पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरुवात झाली आहे. सर्व सभासद गणेश जनसेवा मंडळाच्या वतीने सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.असे मनोगत गणेश जनसेवा मंडळाच्या वतीने प्रवक्ते गुरुनाथ तिरपणकर यांनी व्यक्त केले. 



भाजपा तर्फे स्व.पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी

उरण (विठ्ठल ममताबादे)-भारतीय जनता पार्टीचे जनक व संस्थापक स्व. पंडित दिन दयाळ उपाध्याय ह्यांच्या जयंती निमित्त व तसेच पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी ह्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली उरण तालुक्यातील पिरकोन येथे स्व.पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती आणि वृक्षारोपण असे दोन्ही उपक्रम संयुक्तिक पणे साजरे करण्यात आले.भाजपा पिरकोनमधील कार्यकर्ते ह्यांनी उत्स्फूर्तपणे ह्या कार्यक्रमात सहभाग घेतला. 

    उरण तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावंड, जेष्ठ कार्यकर्ते दीनकर म्हात्रे, ज्येष्ठ कार्यकर्ते पांडुरंग गावंड, सामाजिक कार्यकर्ते नरेश गावंड, ग्राम पंचायत सदस्य विनायक पाटील, ओबीसी सेलचे सचिव प्रमोद म्हात्रे  , गजानन गावंड, कमलाकर गावंड, नितीन गावंड, वैभव गावंड , सुनील घरत , कु. प्रकाश गावंड , सुजित पाटील आणि असंख्य कार्यकर्ते ह्यांनी ह्या कार्यक्रमास उत्स्फूर्तपणे हजेरी लावली.स्व. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी करण्याबरोबरच वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमातून पर्यावरण वाचविण्याचा संदेश देण्यात आला .

चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांना मानवंदना ...

उरण -(विठ्ठल ममताबादे)-  25 सप्टेंबर 2020 रोजी  चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांच्या स्मृतींना 90 वर्ष पूर्ण होत आहेत. विद्यार्थी दशेतील 13 वर्षीय वरद खुशाली विलास या पिरकोन गावातील लहान चित्रकाराने आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांना मानवंदना दिली आहे.  भारतीय स्वातंत्र्य संग्रामात अनेकांना हौतात्म्य पत्करावे लागले. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले, परंतु हे स्वातंत्र्य काही एका दिवसात मिळालेले नाही, यासाठी 150 वर्षे लढा करावा लागलेला होता. वरद खुशाली विलास या विद्यार्थ्यांने कोरोना काळातील सक्तीच्या विश्रांती पासून ते 3 सप्टेंबर 2020 या त्याच्या 13व्या वाढदिवसा पर्यंत भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांची 50 चित्रे पुर्ण करून भारतमातेसाठी ज्यांनी लढा देऊन आपणांस स्वातंत्र्य मिळवून दिले, त्या थोर क्रांतिकारकांचे स्मरण घडवून आणले, विशेषतः पुढच्या पिढीला हा इतिहास फक्त पुस्तकातील रकाने न राहता देशाच्या निर्मितीचा आदर्श व्हावे, असा संदेश जणू त्याच्या चित्रकलेच्या छंदातून मिळत आहे. 

        पूर्वीचा कुलाबा आणि आजच्या रायगड जिल्ह्यातील चिरनेर या गावाजवळील अक्कादेवीच्या जंगलात 25 सप्टेंबर 1930 रोजी जंगल सत्याग्रह झाला. त्यावेळी पोलिसांनी जो स्वैर गोळीबार केला होता, त्यामुळे जंगल सत्याग्रहाकरीता जमलेल्या सत्याग्रहीं पैकी आठ सत्याग्रहींना आपला प्राण गमवावा लागला. त्या स्मृतींना आज 90 वर्षे पूर्ण होत आहेत. चिरनेर येथील हुतात्मा स्तंभाजवल 25 सप्टेंबर रोजी  जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येते. वरद खुशाली विलास या पिरकोन गावातील विद्यार्थ्याने हुतात्मा आलू बेमट्या म्हात्रे - दिघोडे, हुतात्मा आनंदा माया पाटील - धाकटी जुई, हुतात्मा धाकू गवत्या फोफेरकर - चिरनेर,हुतात्मा नाग्या महादू कातकरी - चिरनेर, हुतात्मा रघुनाथ मोरेश्वर न्हावी - कोप्रोली, हुतात्मा रामा बामा कोळी - मोठी जुई, हुतात्मा हसुराम बुध्या पाटील - खोपटे, हुतात्मा परशुराम रामा पाटील - पाणदिवे या आठ हुतात्म्यांची चित्रे रेखाटण्याचा प्रयत्न करून आपल्या विद्यार्थीदशेत कलेच्या माध्यमातून मानवंदना दिली आहे. 

राज्य सरकारला वैद्यकीय साहित्याचा पुरवठा पुन्हा सुरू करा; खासदार बारणे यांची केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे मागणी

उरण (विठ्ठल ममताबादे) -महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. राज्यात दिवसाला नवीन 23 हजार कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद होत आहे. त्यामध्ये फक्त पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरात दिवसाला पाच हजार रुग्णांची नोंद होत आहे. यामुळे राज्याला केंद्राच्या मदतीची मोठी आवश्यकता आहे. असे असताना केंद्र सरकारने 1 सप्टेंबरपासून महाराष्ट्राची व्हेंटीलेटर्स, पीपीई किट, टेस्टींग किट, एन 95 मास्क आदींची मदत पुर्णपणे थांबविली आहे. हे अत्यंत चूकीचे आहे. केंद्र सरकारने तात्काळ ही वैद्यकीय मदत महाराष्ट्र सरकारला देण्यास पुन्हा सुरू करावी, अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे.

         खासदार बारणे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले आहे. महाराष्ट्रात दिवसाला नवीन 23 हजार कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद होत आहे. या कठीण परिस्थितीत दिलासादायक बाब म्हणजे राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 72 टक्के आहे. राज्य सरकार अगोदरच आर्थिक संकटात आहे. केंद्र सरकारकडून जीएसटीचा परतावा राज्याला अद्याप मिळाला नाही.  या वैद्यकीय उपकरणासाठी आणखी मोठा भार राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने ही वैद्यकीय मदत महाराष्ट्र सरकारला देण्याची आवश्यकता आहे. त्याची मागणी राज्य सरकार देखील सातत्याने करत आहे

       केंद्र सरकारची वैद्यकीय टीम कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अनेकदा महाराष्ट्रात आली आहे. त्यानंतरही केंद्र सरकारकडून राज्य सरकारला अपेक्षित सहकार्य मिळत नाही. कोविड आयसोलेशन सेंटरसाठी राज्य सरकारला आर्थिक आणि वैद्यकीय साहित्यांच्या मदतीची आवश्यकता आहे. राज्य सरकारने कोरोना रुग्णांची वाढ होत असलेल्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात जम्बो कोविड सेंटर उभारले आहेत. याकरिता केंद्र सरकारची मदत मिळाली. तर, राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या आणखी कमी होईल. केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने जास्तीत-जास्त वैद्यकीय साहित्याची मदत महाराष्ट्र सरकारला देण्यात यावी. जोपर्यंत महाराष्ट्रातील कोरोनाचे सर्व रुग्ण बरे होत नाहीत. तोपर्यंत वैद्यकीय मदत सुरू ठेवण्यात यावी अशी विनंती खासदार बारणे यांनी केली आहे.

उरण बस आगारातील विविध समस्याविषयी शेकापच्या वतीने शहर चिटणीस शेखर पाटील यांनी दिले निवेदन.

 

उरण (विठ्ठल ममताबादे)- उरण तालुक्यातील बस आगाराच्या विविध समस्या संदर्भात उरण तालुका शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने उरण बसआगारचे  व्यवस्थापक सतीश मालचे यांच्या सोबत उरण पंचायत समिती कार्यालयात एका महत्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी उरण पंचायत समितीचे सभापती ऍड सागर कडू,उपसभापती शुभांगी सुरेश पाटील, महिला आघाडीच्या अध्यक्षा सीमा घरत, शहर पदाधिकारी नारायण पाटील उपस्थित होते.उरण शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने शहर चिटणीस शेखर पाटील यांनी पक्षाच्या वतीने डेपो मॅनेजर सतीश मालचे याना निवेदन सादर केले.यावेळी कोरोना काळात एस टी सेवा मर्यादित स्वरूपात सुरू असल्याबद्दल डेपो मॅनेजर सतीश मालचे यांचे गुलाबपुष्प देऊन आभार मानण्यात आले. उरण आगरातून पूर्वीच्या प्रमाणे बस सुरू करणार असल्याचे डेपो मॅनेजर यांनी मान्य केले पनवेल दादर बेलापूर ठाणे पेण व उरण तालुक्यातील ग्रामीण भागात एस टी ची सेवा पुर्ववत करावी  यामुळे कामगार व प्रवाशी  यांच्या समस्या दूर होतील, करंजा ते मोरा अशी मिनी बस सेवा सुरू करावी याचा लाभ सर्वसामान्यांना, प्रवासीवर्गाला होईल,  एस टी आगारातील  असुविधा याकडे  शेखर पाटील यांनी लक्ष वेधले यामध्ये  बाथरूम अस्वछता,  पिण्याचे पाणी नसणे,  पुरेशी लाइट नसणे,नादुरुस्त पंखे  या समस्या दूर करण्याचे सांगितले.  उरणचे सभापती ऍड सागर कडू यांनी आगाराचे इन गेट सुरू करण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत यामुळे इन व आऊट गेट मुळे चारफाटा येथील वाहतूक कोंडी ला आळा बसले त्याबद्दल आगार प्रमुख यांनी सभापती यांचे आभार मानले.आगारात सुलभ शौचालय , कॅन्टीन ,पे आणि पार्किंग,आगारात देखभाल  करण्यासाठी वाचमन नियुक्ती   या सर्व समस्या बाबत उरण डेपो मॅनेजर यांनी सकारात्मक पावले उचलण्याचे मान्य केले  यावेळी स्थानक प्रमुख शांताराम म्हात्रे  व  शेकाप पदाधिकारी उपस्थित होते.या बैठकीमुळे व शेकापने केलेल्या पाठपुराव्यामुळे बस आगारातील समस्या आता सुटण्यास मदत होणार आहे.

खबरदार ! थोबाड आवरा ! सभ्यतेने इतरांना पत्रकारिता करू द्या !

        इतर चाय बिस्कुट पत्रकार आणि आपण कोणता चहा पिता? कोणती बिस्किटे खाता ?हे सगळे जाणतात इतरांना हिणवण्याचा अधिकार आपणास कुणी दिला? मुळात न्यायालयाने सांगूनही पत्रकारितेची कोणतीही आचारसंहिता न पाळणारे रिपब्लिकन चँनल व अर्णब गोस्वामी ,यांचा व पत्रकारितेच्या नीतिमूल्यांशी  काही देणे घेणं आहे अस दिसत नाही . मूळात याला पत्रकारिता म्हणायची का हा सवाल आहे ? चँनल हाती आहे म्हणून कुणावरही काहीही बोलायचं,अरेरावी करायची,आव दादागिरीचा आणि ताव असायचा सभ्यतेचे!हे अगोचरधाडस कुठून आलं हे विचारतोय देश आणि आमचा महाराष्ट्र!

     बातमीदारी करताना आक्रस्ताळेपणा कशासाठी ? बाईट घेण्यासाठी अंगावर जाऊन प्रश्न विचारणे कशासाठी न्यायाधीश आहात का हे? कुणीतरी चँनलवर येतं काही सांगत, मग अर्णवजी सांगतात,साबित हो गया की ये दोषी है,इसका खून हुआ है...एनसीबीच्या तपासातील नावं ,माहिती बाहेर का जाते? का  काही व्यक्तींना लक्ष्य करुन अब्रूवर आँनलाईन चिखलफेक सुरु आहे ?२०१७ च्या मोबाईल चॅटवर दीपिका पदूकोणची चौकशी होणार !ठीक !..पण या चँनलसोबत इतरही चँनल्स जी काही याविषयावर बातमीदारी करत आहेत,हे पाहून... आश्चर्य वाटते! चौकशी होणार आहे...गुन्हेगार साबीत नाही झालेत ! मग आपणास परवाना आहे का अशाप्रकारे मिडिया विकृत ट्रायलचा?

                                                                    शीतल करदेकर 
अध्यक्ष- नँशनल युनियन आँफ जर्नालिस्टस् महाराष्ट्र


       सर्वोच्च न्यायालयाने सरकारला ,प्रेसकौन्सिलला विचारणा केली की चँनल्सवर काही नियंत्रण आहे की नाही यावर प्रेस कौन्सिलने चँनल्ससाठीही नियम असल्याचे सांगितले.भारतीय दंडविधानातील, विनयभंग, चारित्र्यहनन,समाजात विद्वेष निर्माण करणे,तेढ निर्माण करणे,गैरसमज पसरवणे हे सगळे आहेतच ना. याबाबत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करताना लक्षात घेऊन स्वतःचे आचरण व संहिता ठरवणे आवश्यक आहे..हे ज्यांना पायाभूत ज्ञान नाही अथवा कळूनही सगळे कायदे नियम पायदळी तुडवून मिडिया म्हणून घुसखोरी करत असतील तर ती पत्रकारितेला लागलेली कीड आहे असंच म्हणावं लागेल.सत्य समाजासमोर आणताना आपण जर एकांगी,पूर्वग्रहदुषित बातमीदार आणि दोषारोपण करत असाल तर ही कसली पत्रकारिता ? ही तर दलालखोरी !

      अशी पत्रकारिता लोकशाहीचे लचके तोडणारी,जनतेच्या हक्काची पायमल्ली करणारी असतेदि २४ सप्टेंबर २०२० रोजी मुंबईत एनसीबी कार्यालयाबाहेर जे घडलं ते भयंकर होतंएक पत्रकार नसलेला चँनलवर गेस्ट म्हणून येणारा व्यक्ती आणि सर्कस करणारा प्रदीप भंडारी यांनी तुच्छतेने जे वक्तव्य इतर पत्रकारांना पाहून केले ते निषेधार्ह आहेच. म्हणून सर्वप्रथम जाहीर निषेध!

     मुंबईत देशभरातून पत्रकार येतात आपलं काम करतात, मग कालच असं का घडलं ? काय उद्देश यांचा मुंबईत दंगल करणे,वातावरण बिघडणे,मग सरकारवर चिखलफेक करणे... हा उद्देश आहे का ? हीच सुपारी?

     अरे हो अख्खा नारळ ! स्टुडियो, चँनल सगळं प्रायोजित आहे का हे शोधायला हवं! प्रारंभापासून जीवघेणा माज सुरु आहे यांचा.. मुंबईत चँनल चालवता...चालवा ! अभिव्यक्तीच्या नावाखाली हे थैमान घालणं जास्त काळ चालणार नाही.चँनल्समधे टीआरपीसाठी स्पर्धा असते पण इतका द्वेष आणि पत्रकारांना हिणवण्याचे काम कुणीही करु नये.हे पत्रकारितेच्या सभ्यतेचे बसत नाही. महत्त्वाचे म्हणजे हे महाराष्ट्रात चालत नाही,चालणार नाही.

   आवरा... थोबाड !सभ्यतेने  इतरांना पत्रकारिता करु द्यात !नाहीतर एक दिवस जनताच अशांची थोबाडं काळी करेल!

 



विविध क्षेत्रातील मान्यवरांचा उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव



अंबरनाथ ( शैलेश सणस )-छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती महोत्सव समिती अंबरनाथ ,आगरी सेना अंबरनाथ, मी अंबरनाथकर सामाजिक संघटना ,शिवबा सरकार व माळी समाज सेवा संघ यांच्या सौजन्याने अंबरनाथ शहर मुंबई, ठाणे, कल्याण व महाराष्ट्रातील covid-19 या महामारीच्या आपत्तीजनक परिस्थितीत आपला कार्यभार सांभाळणारे डॉक्टर, नर्स वैद्यकीय स्टाफ, शासकीय निमशासकीय कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव या सामाजिक संस्थेच्या वतीने सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. कार्यक्रमास स्वागता अध्यक्ष म्हणून सन्माननीय उमेश दादा गुंजाळ माजी नगरसेवक  उपस्थित होते. कार्यक्रमात पाहुणे म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्माननीय संजय धुमाळ ,तसेच सन्माननीय संजय भेंडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुप्त विभाग ,डॉ. गणेश राठोड,किशोर सोर खाते ,आतिश पाटील, नगरसेवक सन्मा.सचिन पाटील ,डॉक्टर तुषार बाविस्कर आदी  मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सन्माननीय विलास आंग्रे सर यांनी केले .तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंबरनाथ शिक्षक सेनेच्या अध्यक्षा डॉ. भारती झोपे यांनी केले  तर आभार प्रदर्शन सौ. प्रतिभाताई महाजन यांनी केले.टीम द युवा चे अध्यक्ष योगेश चलवादी यांनी आपल्या मनोगतात सर्व समित्यांचे आभार मानले व आम्हाला प्रोत्साहन दिल्याबद्दल त्यांविषयी ऋण भावना व्यक्त केली. डॉक्टर गणेश राठोड यांनीआपल्या मनोगतात  अशा या उल्लेखनीय कार्याचा गौरव केल्यामुळे आम्हाला एक वेगळी प्रेरणा आणि आत्मबल व समाज सेवेविषयी आणखीनच प्रोत्साहन मिळाले असे सांगितले .तसेच कार्यक्रमाचे पाहुणे संजय धुमाळ यांनी कोविड-१९ काळामध्ये घडलेल्या काही  प्रेरणादायी प्रसंगांचे वर्णन केले .समाजाकडून तसेच अंबरनाथकरांकडून मिळालेले सहकार्य व योगदान यामुळे आमच्यामध्ये एक नवचैतन्य निर्माण होऊन आणखीन कामात उत्साह निर्माण झाला असेही सांगितले. कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष उमेशदादा गुंजाळ यांनी सर्व समित्यांच्या कार्याचा गौरव करून वेळोवेळी समाजकार्यासाठी नेहमी आपल्याला सहकार्य करू असे आश्वासन दिले तसेच आपण केलेले कार्य हे खरोखरच उल्लेखनीय असून तुम्हाला म्हणजे सर्व समित्यांना पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा  दिल्या.

शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२०

शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना सरावासाठी उपयुक्त वेबसाइट आणि अँड्रॉइड अ‍ॅप

मुंबई /लक्ष्मण राजे- महाराष्ट्रातील विद्यापीठांनी एटीकेटी चाचण्यांसह अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाइन घेण्याचे ठरविले आहे. तसेच येथून पुढील बऱ्याच परीक्षा ऑनलाइनच घेतल्या जातील. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या तयारीबरोबरच परीक्षेला सामोरे जाण्याची भीती आणि उत्सुकताही लागून राहिली आहे.

    प्राइम सॉफटेक सोल्यूशन्स प्रा. लि. च्या पायल दोशी यांनी “मायक्लास अ‍ॅडमिन” ऑनलाईन प्लॅटफॉर्म उभा केला असून तो शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन एमसीक्यू आधारित परीक्षा आयोजित करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. त्यांच्याकडे मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य आणि इतर अंतिम वर्षासाठी तसेच स्पर्धा आणि प्रवेश परीक्षेचा प्रीलोड डेटाबेस असून त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना व शिक्षकांना नक्कीच होईल. शाळा, महाविद्यालय व शिक्षक ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी त्यांचे प्रश्न अपलोड करू शकतात. हयाचा उपयोग चाचणी तसेच सेमीस्टर परीक्षा घेण्यासाठी होतो. या परीक्षा वेळेवर आधारित असतात आणि सॉफ्टवेअरद्वारे टेस्ट पेपरचे स्वयंचलितपणे मूल्यमापन केले जाते. त्यामुळे चाचणीचा पेपर संपताच त्यांचे गुण कळतात व त्वरित निकाल लावता येतो. अधिक माहिती www.myclassadmin.com वर उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेच्या सरावासाठी PREXAM हा अँड्रॉइड अ‍ॅप प्ले स्टोअरवर उपलब्ध केला असून www.prexam.com हया वेबसाइटवर सुद्धा पाहता येईल. यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षांसाठी सराव करण्यास मदत होईल. ही ऑनलाइन साधने नक्कीच शैक्षणिक समुदायाला दिलासा देणारी ठरतील.




समाज सेविका दीपा सूर यांच्या हेल्पिंग टीमचे भारतीय चित्रकला आणि हस्तकलेचे वेबक्रेझ ऑनलाईन व्हरच्युअल प्रदर्शन संपन्न

ठाणे / लक्ष्मण राजे- 

    मीरा रोड पूर्व येथील समाज सेविका दीपा सूर यांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून हेल्पिंग टीम या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून साकार केलेले भारतीय संस्कृतीतील चित्रकला आणि हस्तकलेचे वेबक्रेझ आॅनलाईन व्हरच्युअल प्रदर्शन दिनांक १८,१९,२० सप्टेंबर २०२० रोजी संपन्न झाले . या तीन दिवसांच्या वेबक्रेझ आॅनलाईन व्हरच्युअल प्रदर्शनात भारतीय संस्कृतीतील चित्रकला आणि हस्तकलेच्या वस्तुंची मांडणी करण्यात आली होती. समाज सेविका दीपा सूर यांनी हेल्पिंग टीमच्या सर्व सभासदांना आणि इतर अनेक लोकांना भारतीय चित्रकला हस्तकलेच्या विविध प्रकारच्या वस्तुसह सहभागी होण्यासाठी बहुमोल सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली होती. या वेबक्रेझ आॅनलाईन व्हरच्युअल प्रदर्शनातुन मिळणारे संपुर्ण आर्थिक उत्पन्न समाज सेविका दीपा सूर यांनी मुंबईतील परळच्या टाटा कॅन्सर हाॅस्पिटल मधील कॅन्सरग्रस्त रूग्णांच्या मदतीसाठी दिले. हेल्पिंग टीमच्या पुढील सामाजिक उपक्रमाच्या अधिक माहिती साठी समाज सेविका दीपा सूर यांच्या 918879684441 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.



■ मुंबई तुंबई- निसर्गाचा इशारा ■

       मुंबईचे भौगोलिक महत्व आणि मुंबईला लाभलेल्या विस्तीर्ण समुद्र किनाऱ्याचे  महत्व शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी ओळखून मुंबई इंग्रजाकडून विकत मागितली होती धूर्त इंग्रजानी ती दिली नाही.तीच मुंबई आज रहायला ,जगायला आणि सांगायला ही महाग झाली आहे .एवढी महाग की अंगावर कफन घेऊन दफन,दहन होण्याएवढी जागा सुद्धा इथे काही कोटीत मिळते.(कोटीने करोडोंचे घर गाठले आहे)त्याच मुंबईतल्या दक्षिण मुंबईतल्या कुठल्यातरी तरी कोपऱ्यात अगदी समुद्राला लागून ,लागून कसलं समुद्रात भर टाकून समुद्राच्या छाताडावर भर टाकून जे काही उभं राहील त्यातल्याचं कुठल्या तरी दक्षिण मुंबई ,प्रॉपर मुंबई नावाच्या मुंबईत आम्ही रहातो आज त्याच मुंबईतल्या दादर, लोअर परेल, वरळी व अन्य काही ठिकाणी पाणी भरले,एरव्ही समुद्र फिरायला जाणारे आम्ही आज समुद्र स्वतः भेटायला घरात आला म्हणून आनंद साजरा करायचा की समुद्र  निसर्ग दारात येऊन इशारे  देतोय त्याबद्दल शहाण व्हावं. सात  बेटांची मुंबई,हो मुंबई सात बेटांचीच नंतर तिचं पोट फुगत गेलं. अगदी पाचव्या मुंबई पर्यँत पोहोचूनही मुंबईकर थांबला नाहीच,याला स्पिरिट म्हणून जोरजोरात कौतुक कराव की मुंबई बाहेर जाण्याची वेळ अस्सल खऱ्या मुंबईकरावर आली म्हणून खेद व्यक्त करावा.

      आजच्या पहाटेच्या साखर झोपेत समुद्र घरात घुसला सार दारे -खिडकी अगदी जमिनीतूनही तांडव करत सारं घर पाणीमय करून गेला.तळमजल्यावरील अनेकांना आपली घरे सोडून पहिल्या दुसऱ्या मजल्यावर स्थलांतर व्हावं लागलं,वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाली घरातल्या वस्तूंचे नुकसान झाले.याला जबाबदार कोण?प्रगती प्रगती म्हणत आपण माणसे कापलेली शेपुट पुन्हा बसवायला निघालो आहोत.समुद्रात भर टाकून जे काही बांधता आलं ते बांधत निघालो आहोत.कित्येक फूट खाली जमिनीला खोदत अक्षरशः भगदाडे पाडत आम्ही निघालो आहोत.  याच मुंबईत निसर्गाने कोट्यवधी वर्षे खपून बनवलेली झाडे ,डोंगर ,नद्या ,पर्वत  आपण सागरी रस्ते टोलेजंग इमारती मेट्रो प्रकल्पा साठी नष्ट करत निघालो आहोत.मिठी सारखी नदी गटार गंगा म्हणून केव्हा वाहू लागली हे ही आपल्याला कळलं नाही की कळलेलं वळल नाही.मिठी जवळ उभं राहून गाण म्हणून ही मिठीच्या गटार गंगेच रडगाणं अजून संपलं नाही.विकास विकास म्हणत आम्ही मिठी सारख्या अशा अनेक नद्यांना  गमावून बसलो आहोत.  निसर्गाची जैवविविधता  नष्ट करणे हे आपल्या प्रगतीचे सूत्र असेल तर निसर्ग कसा काय माफ करू शकतो. जमीन पोखरून अक्षरशः जमिनीला कंगाल करून मेट्रो, सारखा प्रकल्प , मुंबईच्या जीवावर उठलेला,निसर्गाच्या जीवावर उठलेला प्रकल्प परदेशी लाड पुरवायच्या नादात आम्हीच मुंबईच्या माथी मारून बसलोय. परदेशी अनुकूल हवामान तिकडच्या  मेट्रो ला पोषक आहे म्हणून आम्ही इकडे मेट्रो प्रकल्पाचा नंगानाच सुरू केला, परदेशात कपडे काढून ते नाचले की आपल्याकडे ते ग्रेट भारी,फॅशन वगैरे अस काही तरी असत, तेच परदेशी मेट्रोच फॅड इकडे उतरवताना मुळातच दमट असलेलं मुंबईच वातावरण इथली भौगोलिक परिस्थिती,प्रकल्प उभी रहाणारी जमीन तिचा कस हे काहीही लक्षात न घेता.मूठभर लोकांच घर भरण्यासाठी अख्खी मुंबई ,संपूर्ण मुंबई नावाचं घर तुम्ही  बुडवायला निघालेले आहात.

     याच मेट्रो प्रकल्पासाठी मुंबईच्या संपूर्ण अंगात टोलेजंग इमारती उभ्या करण्यासाठी मुंबईच्या जीवावर उठलेले मेट्रोचे खांब मुंबईच्या देहावर कधी न भरून येणारे वार करत उभे करण्यात आले,ते कमी म्हणून तीन मजली खालून मेट्रोचे जाळे पसरून मुंबईला पोखरल सर्व दिशेने.

     मुंबई माझी म्हणत म्हणत आज ती कोणाची ही राहिलीच नाही.कितीही विकासाच्या गप्पा मारल्या तरी विकास पोटापाशी येऊन थांबतो.मुंबईच भरभरून भरलेलं,ओसंडून वहाणारं पोट आज फुटीच्या मार्गावर आहे.लूटमार करणारे गोरे टोपिकरांकडून निघून गेले आज आपलेच लूटमार करत निघाले आहेत.माणसाला लुटणारा माणूस निसर्गाला लुटत निघाला आहे. अस्मितेच्या नावाखाली इथला मराठी माणूस वर्षानुवर्षे मते देत गेला आणि मत घेणारे  त्याला येनकेन प्रकारे वर्षानुवर्षे त्याला लुटत आले.इथल्या मराठी माणसावर पद्धतशिरपणे  बाहेर जाण्याची वेळ कोणी आणली,हे सर्वश्रुत आहे; मी सांगण्याची गरज नाही.आणि उद्योगधंद्याच्या रूपाने आर्थिक राजधनीची आर्थिक गणिते तोडायला टपून बसलेल्या लांडग्यांच्या कळपाची ही तुम्हाला चांगलीच महितीपूर्वक जाणीव आहे.निवडणूक येतात तेव्हा इथल्या माणसाची अस्मिता  जागवली जाते, निवडणूक झाल्या की या अस्मितेचं विकासमय बारस करून तिला गोंडस बासनात गुंडाळून ठेवलं जातं; पुढच्या निवडणुकीपर्यंत.तोवर इथला माणूस मागच विसरतो. पोटाची भूक माणसाला बरच काही करायला आणि विसरायला लावते तसेच काहीसे...

     मुंबई सर्वांना सामावून घेते म्हणत म्हणत मुंबईला सहिष्णुतेचे लेबल लावून दिल चिकटून की झालं.हो मान्य मुंबई सर्वांना सामावून घेते पण तिने किती सामावून घ्यावं. सामावून सामावून घेता तिचं पोट फुगून आता तेच पोट फुटीच्या मार्गावर आहे.आज समुद्र थेट घरात शिरला माणसे अस्वस्थ झाली.आधीच उल्हास  त्यात फाल्गुन मास या म्हणीप्रमाणे आधीच कोरोनाचा विषाणूरुपी अज्ञानरुपी आगडोंब उसळला असताना त्यात हा पाण्याचा महापूर.बीडीडी पुनर्विकासाची माजी आणि विद्यमान मुख्यमंत्र्यांना घाई त्याच डिलाईल रोड बीडीडी चाळीत आज पाणी घुसले आहे जनजीवन विस्कळीत  झाले आहे. तिकडे बघायला त्यांना ना त्यांच्या मंत्रीपुत्राला वेळ आहे.जनजीवन विस्कळीत होणे म्हणजे काय हे एसीत बसून नाही कळायच. तुंबई होणारी मुंबई नेहमीचीची झाली आहे, आता आम्हा मुंबईकरांना .तुम्हाला त्याची लाज नाही आणि आम्हाला  इलाज नाही.सागरी रस्ता ,मेट्रो भुयारी रेल्वे प्रकल्प मुंबईला आणि पर्यायाने निसर्गाला समुद्राला मारक ठरत आहे ठरले आहेत. गिरीश राऊतांसारखी माणसे सतत जीव तोडून होणाऱ्या या विध्वंसाबद्दल जनजागृती करत आहे .समाजप्रबोधन करत आहेत.दरवर्षीप्रमाणे आपटून आपटून घोषणा केलेली पावसाळी पाण्याची निचरा व्यवस्था या ही वर्षी मोडीत निघाली आहे.

           आज समुद्र घरात घुसला ,पाणी घरात आलं हा इशारा तर देत नाही आहे समुद्र.निसर्ग सावध करतोय! आपली वाटचाल विनाशाकडे चालू झाली आहे.समुद्र व्यापक आहे त्या अथांग अवाढव्य पसरलेल्या समुद्राच्या काठावर चिमुकली मुंबई तग धरून उभी आहे.पाण्याला अडवता येत नाही ते वाट मिळेल तिथे प्रवाहित होत. आजही तेच झालं.पाणी घुसल .

     आज पाणी घरात घुसल, निसर्ग इशारावजा कानमंत्र देऊन देऊन गेला,जागे व्हा.आज घरात आलो, गळ्यापर्यंत पोहोचलो उद्या नाकातोंडात गेलो तर त्याला जबाबदार आम्ही माणूसच...काढून काढून गायीचं दूध संपलं आता बैलाचही दूध काढत सुटलेलो आम्ही,आमची प्रगती निसर्गाच्या मुळावर आलीये. उध्वस्त होण्याच्या पलीकडचा उध्वस्तपणा  आपण करून ठेवला आहे. असेच कधीतरी,पाणी पुन्हा येईल समुद्राने चोहोबाजूंनी  वेढलेल्या मुंबईच्या बाहेर पडणे ही मुश्किल होईल.तेव्हा वेळ गेलेली असेल.तेव्हा तुमच्या घोषणेला ,विकासाला,प्रगतीला कस्पटासमानही किंमत रहाणार नाही..

    नैसर्गिक समुद्र बुझवत जाणाऱ्या सागरी मार्ग हा  मुंबईच्या येथील माणसाच्या,येथील निसर्गाच्या जीवावर उठलेला आणि विनाशाच्या सर्वोतोपरी अंगाने जाणारा प्रगतीचा आलेख आहे.त्याचा प्रवासच अधोगतिकडे सुरू आहे.

मुंबई मेरी जान,माझी मुंबई अरे आम्ही अभिमानाने म्हणतो ,देशाची आर्थिक राजधानी असणारी ,उपयुक्त असे प्रसिद्ध बंदर असणारी मुंबई .तीच मुंबई ,तिचा निसर्ग तुम्ही तुमच्या राजकीय  अनास्थेने विद्रुप करत निघालेले आहात. जागोजागी जखमांचा बाजार आणि बेजार झालेली मुंबई ....आणि मग अस कधीतरी समुद्रालाच बाहेर येऊन सांगावं लागत .मुंबई जखमी आहे हो मुंबई जखमी आहे.

©®




-अनुज केसरकर 

Anujkesarkar1@gmail.com

संपूर्ण कुटुंबाची करा तपासणी, कोरोना हरवण्‍याची घ्‍या घबरदारी

 माझे कुटुंब, माझी जबाबदारी


कोरोनाविरुध्‍द लढण्‍यासाठी राज्‍य शासनाने १५ सप्‍टेबर २०२० पासुन ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही महात्‍वाकांक्षी मोहीम महाराष्‍ट्रभर राबविण्‍यास सुरुवात केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आज राज्‍याच्‍या सर्वच भागांत मोठया प्रमाणावर वाढताना दिसत आहे. संसर्गाची साखळी खंडीत करण्‍याची आवश्‍यकता आज प्राधान्‍याने  निर्माण झाली आहे. यासाठी १५ सप्टेंबरपासून राज्‍यभरात राबविण्यात येत असलेली ही मोहिम कोरोनाच्या नियंत्रणासाठी अधिक प्रभावी ठरणार आहे. घरोघरी जाऊन करण्‍यात येणा-या या सर्व्‍हेक्षणात संशयित कोरोना रुग्‍ण, मधुमेह, ह्रदयविकार, किडणी आजार, लठठपणा, कोमॉर्बिड अवस्‍थेतील रुग्‍ण शोधण्‍याचे महत्‍वपूर्ण काम करण्‍यात येत आहे. कोरोनाच्‍या पार्श्‍वभुमीवर सर्व्‍हेक्षणाव्‍दारे आरोग्य शिक्षण साधणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे. या मोहिमेद्वारे कोरोना व विविध आजारांचे रुग्‍ण शोधुन काढणे, लोकांना कोरोना विषाणूसोबत जगायला शिकवणे व त्यासाठी काही नियम व मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. घरोघरी करण्‍यात येत असलेल्‍या हया सर्व्‍हेक्षण मोहिमेव्‍दारे लोकांमध्‍ये आजाराबाबत अधिकाधिक जनजागृती करुन भिती कमी करण्‍याचा उददेश आहे. कोरोनाविरुद्धचा लढा आता घराघरांत पोहोचणार असून लोकप्रतिनिधी व नागरिक यांच्या सहयोगाने ही मोहिम राबविण्‍यात येत आहे. कोरोना आटोक्‍यात आणण्‍यासाठी आरोग्‍य यंत्रणा गेल्‍या ५-६ महिन्यांपासून अहोरात्र मेहनत घेत आहेत. मात्र आपले आव्हान अजून संपलेले नाही. लॉकडाऊन काळात कोरोनाची लाट ब-याच अंशी थोपविण्‍यात आली होती. आता हळूहळू सर्व व्‍यवहार खुले करत लॉकडाऊनकडून अनलॉककडे वाटचाल सुरु आहे. परप्रांतात गेलेले लाखो मजूर पुन्हा राज्यात आले आहेत. त्‍यामुळे संसर्गाचा धोका तिव्र झालेला आहे. कोरोनाची वाढती संख्या पाहता कोरोनासोबत कसे जगायचे ते आता शिकावे लागणार आहे. त्‍यामुळे माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेव्‍दारे रुग्‍ण शोधुन काढण्‍याबरोबरच आरोग्‍य जनजागृती हा महत्‍वाचा उददेश ठेवण्‍यात आलेला आहे. लोकसहभागाने राबविण्‍यात येत असलेली ही मोहीम परिणामकारक होणे गरजेचे आहे. राज्‍यातून कोरोना हददपार करण्‍यामध्‍ये या मोहिमेचा फार मोठा वाटा असणार आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिक यांच्या योगदानाद्वारे राबविली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यातील महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत क्षेत्रातील लोकप्रतिनिधींच्या सहकार्यातून शासकीय यंत्रणा प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचणार आहे. यासाठी प्रत्येक मतदारसंघात पथके नेमण्यात येणार आहेत. ही पथके महिनाभरातून किमान दोन वेळा आपल्या कार्यक्षेत्रातील कुटुंबापर्यंत पोहोचणार आहेत. यात कुटुंबातील ५० पेक्षा जास्त वय असणा-या व्यक्तीला आरोग्याविषयी काही तक्रार असल्यास त्यांना आरोग्य विभागाच्या माध्यमातून पुढील उपचार दिले जाणार आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात स्वसंरक्षण महत्त्वाचे असून प्रत्येकाने आरोग्यविषयक छोट्या गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी. बाहेर जाताना मास्क वापरा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, वारंवार हात धुवा, सॅनिटायझरचा वापर करा, खेळती हवा असणा-या ठिकाणी थांबा, अंतर राखा, सार्वजनिक वाहतूक किंवा स्वच्छतागृहांचा वापर करताना काळजी घ्या अशा सूचना लोकांना व्‍यक्‍तीशः प्रत्‍यक्ष भेटीतुन सरकारी यंत्रणांव्‍दारे करण्‍यात येणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागांत वाढत आहे. मुंबई, पुणे, ठाणेइ. शहरामधील या आजाराची रुग्‍णांच्‍या तुलनेने स्‍थीर होत असली तरी इतर जिल्‍हे आणि ग्रामीण भागामध्‍ये कोवीड रुग्‍ण मोठया प्रमाणात आढळून येत आहेत.  ग्रामीण जनता अजुनही प्रतिबंधात्‍मक काळजी घेत नसल्‍याने संसर्गाचा फैलाव वेगाने पसरत आहे. राज्यात पुन्हा टाळेबंदी करण्याची वेळ येऊ नये यासाठी कोरोनामुक्‍तीत लोकसहभाग आवश्‍यक झाला आहे. कोरोनाचे संकट वाढत असताना ‘पुनश्च हरिओम’ म्हणत जनतेचे आयुष्य पूर्वपदावर आणण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. कोरोनाच्या या संकटात कुटुंबाचे आर्थिक गणित अस्थिर झाले आहे. ते गणित जुळवण्याच्या दृष्टीने राज्य शासनाचे प्रयत्‍न सुरु असुन एकीकडे कोरोना मुक्‍ती तर दुसरीकडे अर्थव्‍यवस्‍था सुधारण्‍याचे दुहेरी आव्‍हान राज्‍य सरकारसमोर आ वासुन उभे आहे. राज्य सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या छायेत आहे. हे संकट वरचेवर गडद होत चालले आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली असली तरी मृत्‍यूदर कमी असल्‍याने परिस्‍थीती नियंत्रणात आहे. त्‍यामुळे जनतेने घाबरण्याचे अजिबात कारण नाही. माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेव्‍दारे विविध आजारांचे रुग्‍ण उपचारांच्‍या कक्षेत येणार असल्‍याने मोहिमेचा चांगला परिणाम येत्‍या काळात दिसुन येईल. रुग्‍णसंख्‍या आटोक्‍यात आल्‍याने संसर्ग कमी होण्‍यास मदत होणार आहे. त्‍यामुळे राज्‍यातील कोरोना संसर्गाला कलाटनी देणारी ही मोहिम ठरेल अशी आशा आहे. दिनांक १५ सप्‍टेंबर ते २५ ऑक्‍टोबर २०२० या कालावधीत दोन टप्‍प्‍यात महाराष्‍ट्रभर ही मोहिम राबविण्‍यात येत आहे. मोहीमेची पहिली फेरी दिनांक 15 सप्‍टेंबर ते १० ऑक्‍टोबर २०२० या कालावधीत तर  दुसरी फेरी दिनांक १२ ऑक्‍टोबर ते 24 ऑक्‍टोबर २०२० या कालावधीत होत आहे. पहिला फेरीचा कालावधी २२ दिवसांचा असेल तर दुस-या फेरीचा कालावधी १२ दिवसांचा असेल. दुस-या फेरीमध्‍ये कुटुंबाची नावे लिहिण्‍याची आवश्‍यकता नसल्‍यामुळे कालावधी कमी करण्‍यात आला आहे. राज्‍यातील सर्व महानगरपालिका,नगरपालिका, नगरपंचायत,ग्रामपंचायत, कटकमंडळे इ. ठिकाणी ही मोहिम राबविली जात आहे. मोहिमेअंतर्गत राज्‍यातील गावे, वाडी, पाडे इ. मध्‍ये राहणा-या प्रत्‍येक नागरीकाची तपासणी करण्‍यात येत आहे. गृहभेटीसाठी  एक आरोग्‍य कर्मचारी आणि 2 स्‍वयंसेवक (एक पुरुष व एक स्‍त्री) असे तीघांचे पथक  स्‍थापन करण्‍यात आले आहे.  एका पथकाचे १ दिवसात ५० घरांना भेटी देण्‍याचे नियोजन असेल. पथकामध्‍ये समाविष्‍ट कर्मचा-यांना कोरोना दूत असे संबोधण्‍यात येत आहे. त्‍यांना आवश्‍यक साहित्‍य उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेले आहे. मोहिमेचा दैनंदिन अहवाल पाठविण्‍यासाठी शासनाकडून एक अॅपदेखील विकसीत करण्‍यात आले असुन त्‍यायोगे अॅंड्रॉईड फोनव्‍दारे दररोज गृहभेटीची माहिती ऑनलाईन भरण्‍यात येत आहे. पहिल्‍या गृहभेटीमध्‍ये प्रत्‍येक घरात शिरण्‍यापूर्वी दाराबाहेर सोयीच्‍या ठिकाणी Sticker लावण्‍यात येत आहेत . घरामध्‍ये गेल्‍यानंतर कुटुंबातील सदस्‍यांची यादी करुन सदस्‍यांचे तापमान मोजण्‍यात येईल व त्‍याची नोंद करण्‍यात येईल. ताप असणा-या व्‍यक्‍तीस खोकला, घशात दुखणे,थकवा इ. लक्षणे आहेत का याची माहिती घेण्‍यात येईल. ताप असणा-या व्‍यक्‍तीचे SpO2 पल्‍स ऑक्‍सीमीटर द्वारे तपासण्‍यात येईल. घरातील प्रत्‍येकास मधुमेह, हदयरोग, कर्करोग, किडणी आजार, अवयव प्रत्‍यारोपन, दमा इ. आजार आहेत का याची माहितीदेखील घेण्‍यात येत आहे. कुणाला ३८’C इतका किंवा त्‍यापेक्षा जास्‍त ताप असल्‍यास किंवा SpO2 ९५% पेक्षा कमी असल्‍यास रुग्‍णांस जवळच्‍या Fever Clinic मध्‍ये संदर्भीत करण्‍यात येईल. संदर्भीत करताना रुग्‍णास संदर्भ चिठ्ठी देण्‍यात येईल तसेच कोवीड-१९ प्रतिबंधाच्‍या सुचना रुग्‍ण व घरातील सर्व नातेवाईकांना देण्‍यात येतील. घरातील कोणत्‍याही व्‍यक्‍तीस मधुमेह, उच्‍चरक्‍तदाब, किडनी आजार, Organ transplant, लठ्ठपणा, दमा किंवा इतर मोठे आजार असल्‍यास त्‍यांची SpO2 तपासणी पुन्‍हा करुन खात्री करण्‍यात येईल. अशा रुग्‍णांचे  तापमान ३7’C पेक्षा जास्‍त असेल तर त्‍यांना ताप उपचार केंद्रात संदर्भीत करण्‍यात येईल. ताप, SpO2 95 पेक्षा कमी,  Co-morbid Condition या तीन पैकी कोणतेही २ लक्षणे आढळल्‍यास अशा व्‍यक्‍तीस High risk संबोधून त्‍वरीत रुग्‍णवाहिका बोलावून जवळच्‍या सरकारी ताप उपचार केंद्रात संदर्भीत करण्‍यात येईल. घरातील सर्व व्‍यक्‍तींची तपासणी पूर्ण झाल्‍यावर दारावर असलेल्‍या Sticker वर गृह भेटीची तारीख/वेळ, सर्वे करणा-या पथकाचा क्रमांक पथकातील सदस्‍यांची अध्‍याक्षरे आणि Co- Morbid व्‍यक्‍ती असल्‍यास तशी नोंद करण्‍यात येईल व त्‍यानंतर पुढील घरास भेट देण्‍यासाठी पथक निघुन जाईल. गृहभेटीच्‍या दुस-या फेरीत कुटुंबातील सदस्‍यांची माहीती पहिल्‍या फेरीत घेतलेली असल्‍यामुळे दररोज ७५-१०० घरे करण्‍यात येतील. घरातील सर्व व्‍यक्‍तींची नावे, वय इ. माहीती तसेच Co-morbid conditionsची माहीती पहील्‍या फेरीत घेतलेली असल्‍यामुळे दुस-या फेरीमध्‍ये सर्वाचे तापमाण व ताप असल्यास SpO2 मोजण्‍यात येईल. पहील्‍या फेरीच्‍या वेळी गैरहजर असणा-या घरातील व्‍यक्‍तींची Co-morbid Condition साठी चौकशी करण्‍यात येईल. अनलॉक कालावधीमध्‍ये जनतेमध्‍ये जागरुकता यावी आणि कोवीड-१९ आजाराचा प्रसार होऊ नये यासाठी शास्‍त्रशुध्‍द माहीती व योग्‍य वेळी निर्णय घेण्‍याची क्षमता वाढविणे आवश्‍यक आहे. त्‍यामुळे गृहभेटीदरम्‍यान कोविड नसलेल्‍या, कोविड पॉझीटिव्‍ह व कोविड होऊन गेलेल्‍या व्‍यक्‍ती अशी विभागणी करुन त्‍यांना आवश्‍यक प्रतिबंधात्‍मक दक्षता घेण्याबाबत आरोग्‍य पथकामार्फत संदेश देण्‍यात येतील. यामध्‍ये सतत मास्‍क घालून रहावे,  दर २-३ तासांनी साबणाने स्‍वच्‍छ हात धुवावे, सॅनिटायझरचा वापर करावा, नाक, तोंड, डोळे यांना हात लाऊ नये, ताप आल्‍यास तसेच सर्दी/खोकला/घसा दुखणे, धाप लागणे, खूप थकवा येणे अशी लक्षणे दिसल्‍यास त्‍वरीत जवळच्‍या Fever Clinic मध्‍ये जाऊन तपासणी करुन घ्‍यावी, मधुमेह, हृदयविकार, किडणी आजार, लठठ्पणा इ. असल्‍यास दररोज तापमान मोजावे व उपचार सुरु ठेवावेत त्‍यात खंड पडू देऊ नये असे संदेश देऊन कोवीड-१९ मधुन बरे झालेलया व्‍यक्‍तीस प्‍लाझमा दान करावयाचा असलयास SBTC Website ची माहीती देण्‍यात येईल.

 
                 वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई


        या मोहिमेच्‍या संनियंत्रणाची जबाबदारी विभागीय स्‍तरावर विभागीय आयुक्‍त, जिल्‍हास्‍तरावर जिल्‍हाधिकारी, मुख्‍य कार्यकारी अधिकारी, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी, जिल्‍हा शल्‍य चिकीत्‍सक यांचेकडे महानगरपालिका स्‍तरावर पालिका आयुक्‍त, मुख्‍य वैदयकीय अधिकारी तर तालुका स्‍तरावर तालुका आरोग्‍य अधिकारी यांचेकडे सोपविण्‍यात आलेली असुन त्‍यांचेकडे जबाबदा-याचे वाटप करण्‍यात आले आहे. मोहिमेसाठी आशा / ए.एन.एम. त्‍यांना दिलेल्‍या टॅब वा स्‍मार्टफोनच्‍या मदतीने व इतर कर्मचारी स्‍वत:च्‍या Android Mobile वरुन दररोज मोहीमेचा अहवाल सादर करतील. त्‍याचप्रमाणे या मोहिमेदरम्‍यान एक बक्षिस योजनादेखील राबविण्‍यात येत आहे. सदरील बक्षिस योजना व्‍यक्‍ती आणि संस्‍थांसाठी असतील. व्‍यक्‍तींसाठीच्‍या योजनांमध्‍ये निबंध स्‍पर्धा, पोष्‍टर स्‍पर्धा,आरोग्‍य शिक्षण मेसेजेसच्‍या स्‍पर्धा इ. घेण्‍यात येतील तर संस्‍थांसाठी वेगवेगळया संस्‍थांच्‍या कामकाजानुसार बक्षिसे देण्‍यात येतील ज्‍याचा जनजागृतीसाठी चांगला उपयोग होईल.
       राज्‍य शासनाने जाहीर केलेली माझे कुटुंब माझी जबाबदारी ही महात्‍वाकांक्षी योजना प्रत्‍येक घरापर्यंत पोहोचणारी असुन त्‍यातुन कोविड व इतर आजाराचे रुग्‍ण शोधुन काढुन त्‍यांना उपचारांच्‍या कक्षेत आणण्‍यास मदत होणार आहे. या मोहिमेच्‍या यशस्‍वीतेतुन सध्‍या राज्‍यावर गडद झालेले कोरोनाचे ढग दुर होतील अशी आशा करण्‍यास हरकत नाही.

माझे कुटुंब माझी जबाबदारी, आरोग्‍य सेवा आपल्‍या दारी

संपूर्ण कुटुंबाची करा तपासणी, कोरोना हरवण्‍याची घ्‍या घबरदारी



समाजसेवक कृष्णा कदम यांचा हभप विठोबाआण्णा मालुसरे स्मृती सन्मान पुरस्काराने गौरव

मुंबई (शांताराम गुडेकर )स्वातंत्र्यसेनानी आणि तत्कालीन कुलाबा जिल्हा कृषी सभापती वै.हभप विठोबाआण्णा मालुसरे यांच्या जन्मशताब्दी ...