आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, ३१ जुलै, २०२०

गोड गळ्याचे अजरामर गायक मोहम्मद रफी

       हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वश्रेष्ठ गायक मोहम्मद रफी यांचा आज स्मृतिदिन. आजच्याच दिवशी म्हणजे ३१ जुलै १९८० रोजी रसिकांना दुःख सागरात लोटून मोहम्मद रफी  पैगंबरवासी झाले. मोहम्मद रफी म्हणजे भारतीय सिने संगीत क्षेत्रातील अजरामर व्यक्तिमत्व. भारतीय गीत, संगीत विषयाचा इतिहास मोहम्मद रफी यांच्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. मोहम्मद रफी यांचा जन्म २४ डिसेंबर १९२४ रोजी अमृतसर जवळील कोटला सुलतान सिंह येथे झाला.तिथेच त्यांचे बालपण गेले.  मोहम्मद रफी आणि संगीत यांचा दुरान्वये संबंध नव्हता. त्यांच्या घरातील कोणताही व्यक्ती  संगीत क्षेत्राशी संबंधित नव्हता. ते लहान असताना आपल्या भावाच्या केश कर्तनलयात आपला फावला वेळ घालवीत. तेंव्हा त्या दुकानाच्या परिसरात एक फकीर आपल्या पहाडी आवाजात गाणी गाताना  रफी यांना दिसायचा. मग हा लहानगा रफी त्यांच्या मागे मागे त्यांची गाणी  ऐकत फिरायचा. ऐकलेली गाणी मग तो आपल्या भावाच्या केश कर्तनालयाच्या दुकानात बसून गायचा.  येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्याचे कौतुक वाटायचे. आपल्या भावाचे होणारे हे कौतुक पाहून त्यांचा भावाने  त्यांना उस्ताद अब्दुल वाहिद खान  यांच्याकडे त्यांना संगीताचा अभ्यास  करण्यासाठी पाठवले. तिथेच त्यांनी संगीताचे प्राथमिक धडे गिरवले. मोहम्मद रफी यांच्या आवाजात गोडवा होता. त्यामुळे त्यांनी गायलेली गाणी लोकांना आवडायची. मोहम्मद रफी यांचा पहिला जाहीर कार्यक्रम वयाच्या अवघ्या  १३ व्या वर्षी लाहोर मध्ये झाला.१९४५ साली गाव की गोरी या चित्रपटात त्यांनी आपले पहिले गाणे गायले.  या दरम्यान त्यांनी दोन चित्रपटात भूमिकाही केल्या. १९४७ मध्ये फाळणीनंतर त्यांनी भारतात राहण्याचा निर्णय घेतला. १९५१ मध्ये संगीतकार नौशाद यांनी बैजू बावरा या चित्रपटात  त्यांना गाण्याची संधी दिली. या संधीचे त्यांनी सोने केले. या चित्रपटातील सर्व गाणी लोकप्रिय झाली.  बैजू बावरा च्या गाण्यांनी रफीजींना मुख्य गायकाच्या रुपात कला क्षेत्रात कायमस्वरूपी स्थान मिळवून दिले. मग मात्र त्यांनी मागे वळून पाहिले नाही.  या चित्रपटानंतर  त्यांना अनेक चित्रपटात गाणी गाण्याची संधी मिळाली. आपल्या जादुई आवाजाने त्यांनी रसिकांवर मोहिनी घातली. त्यांचे गाणी लोकप्रिय होऊ लागली. १९४७ ते १९७० च्या दरम्यान रफीजींनी चित्रपट क्षेत्रात आपल्या जबरदस्त गायनाने चांगला जम बसवला. १९६० चे दशक तर रफीजींचेच होते. १९६० सालीच चौदहवी का चांद या चित्रपटातील शीर्षक गीतासाठी त्यांना फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला.या दशकात त्यांनी गायलेली सर्वच गाणी सुपरहिट झाली. त्यांनी हिंदी भाषेबरोबरच उर्दू, पंजाबी, मराठी आणि तेलगू भाषेत देखील गाणी गायली.गैरफिल्मी, गझल, भजन, क्लासिकल, सेमी क्लासिकल या सर्व प्रकारात त्यांनी गाणी गायली.  आपल्या ३५ वर्षाच्या गायनाच्या कारकिर्दीत रफीजींनी ४००० च्या वर गाणी गायली. रफीजींनी अशोक कुमार, देवानंद, दिलीप कुमार,प्रदीप,विश्वजित,परीक्षित साहनी, बलराज साहनी, भारत भूषण, पृथ्वीराज कपूर  आय एस जोहर, शम्मी कपूर, गुलशन बावरा,जगदीप, गुरुदत्त, गुलशन बावरा, जॉय मुखर्जी, जॉनी वाकर, तारिक हुसेन, नवीन निश्चल, फिरोज खान, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र , जितेंद्र, मनोज कुमार, फिरोज खान, रणधीर कपूर, राजकपूर,  शशी कपूर,  ऋषी कपूर, राजेंद्र कुमार, राजेश खन्ना, विनोद मेहरा,  सुनील दत्त, संजय दत्त,  संजय खान, संजीव कुमार,  आदी सर्व प्रमुख अभिनेत्यांना आपला आवाज दिला. रफीजींना देश विदेशातील अनेक पुरस्कार मिळाले. रफीजींनी आपल्या जादुई आवाजाने मागील चार पिढ्यांना मंत्रमुग्ध केले आहे.  त्यांनी आपला स्वतःचा वेगळा असा चाहता वर्ग निर्माण केला. त्यांची गाणी आजही लोकप्रिय आहेत. अशा या महान भारतीय गायकाचा आवाज ३१ जुलै १९८० रोजी स्तब्ध झाला.  आज रफिजी जरी आपल्यात नसले तरी त्यांच्या आवाजाने ते आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. मोहम्मद रफी यांना स्मृतिदिनानिमित्ताने विनम्र अभिवादन..! 

-श्याम बसप्पा ठाणेदार 
दौंड जिल्हा पुणे 

पहिल्या पावसाच्या आठवणी..


     पुन्हा ढग दाटून येतात., 
        पुन्हा आठवणी जाग्या होतात. ........

ढग दाटून आल्यावर अनेकांच्या मनावर आठवणींचा पाऊस हमखास होतो. पावसाची एक तरी आठवण प्रत्येकाच्या मनात घट्ट धरून ठेवलेली असते.  पाऊस म्हटलं की, मनसोक्त भिजणे आलेच. त्यचबरोबर डोळ्यां  समोर दिसतात..... गरमागरम चहा , कॉफी  कांदा भजी, आणि मिरची यांचा आस्वाद घेणे म्हणजे एक सूखद अनूभव असतो. पावसासोबत अनेक चांगल्या आठवणी निगडीत आहेत.  मुसळधार पाऊसात मला भटकंती करायला खुप  आवडते. पावसाळा मला नेहमीच शाळेच्या दिवसांची आठवण करुन देतो.  माझं घर आणि शाळेचा प्रवास हा शाळेच्या बसने व्हायचा. शाळेतून घरी येतांना मी खिडकीत जागा पकडून पाऊस न्याहळत असे.  भिजण्यासाठी मी कधीकधी बस चूकवून मस्त ओलं होणे पसंत करायची. घरच्यांनाही माहित असल्यास काही ओरडा बसत नसे. मैत्रींणीं सोबत कणिस खाण्यात एक वेगळीच मजा येते.  परततांना एकमेकींच्या अंगावर पाणी उडवणे, भिजणे खूपच छान होते.  नंतर सर्दीचा भयंकर त्रास ही सहन करत असू. मला पाऊस हवाहवासा वाटतो.   पाऊस म्हणजे जणू काही जवळीक मैत्रीच .पावसात होणारा चिखल आणि अंगावर नकळतपणे उगवलेले शिंतोंडे जरी फारसे आवडत नसले तरी त्यावेळेस प्रियच होते. शाळेतून येताना जवळ छत्री असूनही ती न उघडता मैत्रिणीच्या घोळक्यात भिजण्याची मजा निराळीच होती. मला वाटतं पाऊस न आवडणारे दुर्मिळच असतील. पावसाच्या पाण्यावर सोडलेल्या कागदाच्या होड्या आजही आठवतयं.  जेवढं पावसात भिजणं आवडतं तेवढेच खिडकीतून न्याहाळणं पण तितकेच आवडतं. आजही पावसात मनसोक्त भिजण्याचा आनंद घेतो तसेच मुसळधार पावसात लाॅग ड्रायव्हला जाण्याचा आनंद लुटत असतो. यात काही वयाचे बंधन नसतेच.. आनंद महत्त्वाचा..असतो.

    -सौं. स्नेहा मुकुंद शिंपी
      नाशिक 

सहाय्यक महानगरपालिका चिटणीस अजित दुखंडे यांचे निधन

  

मुंबई-   (  महादेव गोळवसकर )
     मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील महापालिका चिटणीस कार्यालयात अजित दुखंडे, सहाय्यक महानगरपालिका चिटणीस (कनिष्ठ) पदावर कार्यरत होते . दिनांक २९ रोजी नेहमी प्रमाणे सकाळी कार्यालयात आले.हजेरी पटावर स्वाक्षरी करून आपल्या जुन्या इमारती मधील कार्यालयाकडे निघाले अर्ध्यावाटेवर पोहचले कार्यालया बाहेर असलेल्या बाकावर बसले म्हणून कार्यालयातील कर्मचारी जवळ आले .तेव्हा त्यांना म्हणाले मला अस्वस्थ वाटत आहे.महेश लिंगायत,सुशील पवार,राजू मोरे , वैभव दळवी ,चंद्रकांत पवार,पंकज जाधव,समीर सुर्वे यांनी दुसऱ्या  मजल्यावरील दवाखान्यात जाऊ डाॅक्टरांना माहिती दिली. डाॅक्टरांनी श्वास घेण्यास ञास होतो आहे.  म्हणून कोरोना उपचारासाठी नायर रूग्णालयात दाखल करण्यास सांगितले. तेव्हा रुग्णवाहीकेसाठी आपत्कालीन नियंत्रण कक्षात सहकारी पोहचले तेव्हा त्यांना तेथील अधिकार्यांनी १०८ क्रमांक रुग्णवाहीकेची मदत घेण्यास सांगितले. रुग्णवाहीकेसाठी ताटकळत राहावे लागले. तासाभरात रूग्णवाहीका उपलब्ध झाली. तोपर्यंत सत्यवान नर यांनी नायर रुग्णालयात जाऊन वैद्यकीय अधिकार्यांना भेटून दुखंडे यांना दाखल करण्याचे सोपस्कार  पुर्ण केले होते. त्यांच्या वर तातडीने वैद्यकीय अधिकार्यांनी उपचार सुरू केले. कोरोना तपासणी केली  असता अहवाल निगेटीव्ह आला.
              दरम्यानच्या काळात दहावी चा निकाल लागला  दुखंडे यांची मुलगी जान्हवी ८०% गुण मिळवून उत्तीर्ण झाली असे सत्यवान नर यांनी त्यांना सांगितले . तेव्हा त्यांनी नर यांना सांगितले घरी फोन करून सांगा घरात पैसे ठेवले आहेत पुढे घेऊन या. दुखंडे याच्यावर उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या निधनाची बातमी चिटणीस कार्यालयात पोहचली तेव्हा संपूर्ण कार्यालय शोकाकुल झाले. रुग्णवाहिका वेळीच उपलब्ध झाली असती तर वेळेत वैद्यकीय उपचार सुरू झाले असते तर कदाचित प्राण वाचले असते असे मुख्यालयातील कर्मचाऱ्यांना  वाटते.
         अजित दुखंडे कोकणचे सुपुत्र होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील आरे त्याचे गाव.त्यांचा जन्म दिनांक ८ फेब्रुवारी १९७२ झाला.मुंबई महानगरपालिका चिटणीस कार्यालयात ते दिनांक १सप्टेंबर १९९८ रोजी सेवेत दाखल झाले होते. त्यांच्या पश्चात त्यांची आई ,पत्नी,मुलगी जान्हवी आणि तीन भाऊ आहेत. दुखंडे यांचे सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान होते. सुस्वभावी, मनमिळाऊ, लोकांच्या कोणत्याही प्रसंगात मदतीला धावून जाणे अशी त्यांची ओळख. भारतीय जनता पार्टीचे नेते श्री. मधु चव्हाण यांचे निकटवर्तीय होते. महापालिका चिटणीस कार्यालयाच्या सेवेत दाखल होण्याआधी ते भा .ज.प.पक्ष कार्यालयात कार्यरत होते. त्यांचा अनेक नगरसेवक,आमदार, खासदार यांच्याशी सलोख्याचे संबंध होते. दुखंडे यांच्या निधनाची माहिती मिळताच भायखळा विधानसभा आमदार श्रीमती यामिनी यशवंत जाधव , मधु चव्हाण  घटना स्थळी हजर होत्या. चिंचपोकळी, भायखळा विभागातील सर्वच पक्षांचे नेते, नगरसेवक, कार्यकर्ते, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. संपूर्ण परिसरात शोकाकुल वातावरण होते. 

        


   

पहिलेपणा - एक सुखद भावना



         प्रत्येकाच्या आयुष्यात या पहिलेपणाच्या घटना असतातच.  आपण जेव्हा मागे वळून पहातो तेव्हा या घटना आपल्याला आठवतातच.  वयाचे एक वर्ष पूर्ण होईपर्यंत प्रत्येक यशाचं आई-वडील व घरातील इतर थोर मंडळींकडून मोठ्या प्रमाणात कौतुक होत असे.   जेव्हा आपण पहिल्यांदा 'हुंकार' देतो तो आनंद आपल्याला जाणवत नाही.  पहिल्या हुंकाराला साक्ष साहजिकच आपली आईच असते.  आपले आई-वडील, काका-काकू तसेच इतर ज्येष्ठ मंडळी यांच्या चेहऱ्यावर जी आनंदाची छटा उमटते व हास्याचा बहर येतो तो आपल्याला आठवत नाही पण आई-वडिलांसाठी ती चिरस्मरणीय घटना असते.  स्वतःच्या स्वतः उठून बसणे ही क्रियाही लक्षात रहाणारी असते.  गळ्यातून बोबडा का होईना पण पहिला शब्द जेव्हा बाहेर पडतो तो क्षण आपण जगत असलो तरी त्याचा आनंद बाकीचे मंडळी जास्त घेतात.  या गोष्टीचा आनंद फार मोठ्या प्रमाणात घेतला जातो.   त्यानंतरचा मोठा आनंद म्हणजे पहिले पाऊल.  लहान बाळ उठून बसले म्हणजे चालणारच.  पण बाळाने पहिले पाऊल टाकले तो दिवस सर्वांच्या तोंडी आज बाळाने पहिले पाऊल टाकले हाच असतो.  दाराला लावलेला अडसर ओलांडून पलीकडे पाऊल टाकलेले असते तोही क्षण फार कौतुकाने सांगितलं जातो.  बाळाला प्रथमच गोळी, चॉकलेट, बिस्कीट इत्यादीची चव लागल्यावर बाळ ते मागून घेते ही गोष्ट सुद्धा उत्साहाने सांगितली जाते.  नंतर बाळाचा पहिला वाढदिवस मोठ्या दणक्यात साजरा केला जातो.  भरपूर प्रमाणात छायाचित्र काढली जातात.  परिस्थितीनुरूप चलतचित्रणही केले जाते.  जन्मभर सांभाळाव्या अशा या आठवणी असतात.  यथावकाश एखाद्या चांगल्या शाळेत नाव नोंदवून शाळेचा पहिला दिवसही चांगल्या प्रकारे साजरा केला जातो.  शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे साहजिकच आई-वडिलांनी मुद्दाम सुट्टी घेतलेली असते.   शाळेत ठोकळ्यावर ठोकळे चढवून मनोरा करतो व तो मनोरा उभा राहाताच टाळल्या पिटून आनंद व्यक्त करतो कारण आपण पहिल्यांदाच त्यात यशस्वी झालेलो असतो.  या सगळ्या पहिलेपणाच्या घटना असतात पण अजाण वय असल्यामुळे त्या लक्षात राहत नाहीत.  आई-बाबानी या आठवणींना मनात जपून ठेवलेले असतात आणि कालांतराने मुलासमोर / मुलीसमोर त्या उलगडून सांगतात. 
        यथावकाश आपल्या मनाची जडणघडण होण्यास सुरवात होते.  विचार परिपक्व होण्यास नुकतीच सुरवात झालेली असते.  आपण स्वतंत्रपणे विचार करू शकतो ही जाणीव पहिल्यांदाच झालेली असते.  वयाप्रमाणे हळूहळू शारीरिक बदल होण्यास सुरवात होते.  प्रत्येक बदल आरशात पहिल्यांदा आपलेच डोळे पहातात.  हा पहिलेपणाचा आनंद विलक्षण आकर्षक असतो.  विशिष्ठ वय झाले की चेहऱ्यावर पुटकुळ्या अथवा तारुण्यपिटिका येतात व महत्त्वाचे म्हणजे पहिल्या प्रथम त्या आपल्यालाच जाणवतात.  पहिल्यांदाच आलेल्या  तारुण्यपिटिकेबरोबरच आपण वयात आल्याची जाणीव आपल्याला होते.  शरीरात होणाऱ्या बदलांकडे जरा निराळ्या रीतीने पहिले जाते.  हे बदल आरशात बघून निरखण्याची ओढ शांत बसू देत नाही.  या वयाला पौगंडा अवस्था असे सर्रास म्हटले जाते.  वयात आल्यावर शरीरात बदल होणे हे निसर्गचक्र आहे.  हे निसर्गचक्र कोणीही बदलू शकत नाही किंवा थांबवूही शकत नाही.  ओठांवर मिसरूड फुटणे त्याचबरोबर गालांवर / हनुवटीवर दाढी येणे हा हा निसर्गक्रमच आहे.   आरशात पाहतांना मिसरूड फुटल्याची जाणीव पहिल्यांदा आपल्यालाच होते.   हा आनंद प्रत्येक पुरूष काही विशिष्ठ वयात घेतच असतो.  मिसरूड फुटल्याचा आनंद समवयस्क मित्रांबरोबर घेण्याचे ते वय असतात.   साधारणतः काही दिवसाच्या अंतराने प्रत्येकाला मिसरूड फुटलेले असते अथवा फुटणार असते.  पण हा पहिलेपणाचा आनंद मित्रांबरोबरच घेण्याचे ते वय असते. मुलींच्या बाबतीतही वयोमानाप्रमाणे बदल घडत असतात पण त्याची चर्चा करणे उचित नाही.  त्यांच्यात होणारे बदलाचा आनंद त्यांना समवयस्क मैत्रीणींबरोबरच वाटत असेल तर त्यात काहीच चूक नाही. असो.   या बदलांमुळे मिळणारे समाधान नेहमीच आनंद द्विगुणित करणारे असते.   तसेच सर्व छान छान दिसू लागते.  प्रत्येक गोष्टीचा आनंद घेण्याकडे कल वाढू  लागतो.   तसेच विविध प्रकारची आकर्षणे त्याचबरोबर मोह आयुष्यात पहिल्यांदाच निर्माण होण्याचे वय.  शाळेत पहिल्यांदा परीक्षा देतांना जी उत्सुकता मनात निर्माण होते अथवा जो आनंद मनात निर्माण होतो तो खरोखरच सुखावणारा असतो.  आपण काही वेगळे करू शकतो  मनोमन पटते.   अर्थात ते वयच तसे असते की थोड्याशा का होईना पण त्या यशानेही हुरळून जाण्यात धन्यता मानली जाते.  अशा वेळेस शाळेकडून / पालकांकडून त्याला चार गोष्टी सांगून तसेच त्याची समजूत काढून  त्याच्यात / तिच्यात निर्माण झालेली 'ग' ची बाधा पहिल्यांदा काढली गेली पाहिजे.  
         आपण आतापर्यंत निसर्गचक्राप्रमाणे लाभलेल्या बदलांचा विचार केला.   प्रत्येक बदल निसर्गबरहुकूम झाल्यामुळे त्याचा आनंद त्या त्या वेळेस पुरेपूर घेतला गेला.  साधारणतः वयाच्या १५ व्या वर्षाप्रमाणे  निसर्गचक्राप्रमाणे लाभलेल्या पहिलेपणाचा आनंद घेता येतो.  शालेय जीवन संपल्यावर पहिलेपणाचा कस लागतो.  शालेय जीवनातील महत्त्वाची शालांत परीक्षा पहिल्यांदा देतांना साहजिकच मनात थोडी धुकधुक, हुरहूर असते.  शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर कोणी महाविद्यालयात प्रवेश घेतात तर कोणी व्यवसायाभिमुख शिक्षणाला पसंती देऊन त्या त्या प्रकारच्या संस्थेत प्रवेश घेतात.   शालेय जीवन संपवून पहिल्यांदाच आपण खऱ्या अर्थाने जीवनातील महत्त्वाच्या टप्प्यावर उभे असतो.  शालेय जीवनात स्पर्धा त्यामानाने सीमित असते पण महाविद्यालय /  व्यवसायाभिमुख शिक्षण यात स्पर्धा खूपच अटीतटीची असते आणि पहिल्यांदाच या स्पर्धेला आपण तोंड देणार असतो.  यात शिक्षण घेणारे शाळेतील विद्यार्थी / विद्यार्थिनींपेक्षा खूपच जास्त प्रमाणात असतात.   पहिल्यांदाच महाविद्यालयात /  व्यवसायाभिमुख शिक्षण संस्थेच्या प्रांगणात प्रवेश करतांना थोडे का होईना पण मनावर दडपण आलेले असते.   मनात पहिल्यांदा एकच विचार येतो की उच्च शिक्षण घेऊन आपली कारकीर्द घडवायची किंवा व्यवसायाभिमुख शिक्षण घेऊन आवडीच्या व्यवसायात नैपुण्य प्राप्त करून यशाचे शिखर गाठायचे याकरता प्रचंड मेहनतीची गरज असते.  कारकीर्द घडविण्याच्या पहिल्या टप्प्यावर आपली विद्वत्ता दाखवून यशस्वी होण्याचा मान मिळवणे ही प्रत्येकाची / प्रत्येकीची इच्छा असते.  साहजिकच पहिल्यांदाच अनोळखी विद्यार्थी / विद्यार्थिनींसमवेत शिकण्याची वेळ असल्यामुळे थोडे अवघडल्यासारखे होते.  अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वयाच्या विशिष्ठ टप्प्यावर निसर्गनियमाप्रमाणे प्रेमभावना नकळत निर्माण होते.  पहिले प्रेमही याच टप्प्यावर आकार घेऊ लागते.  याचाच अर्थ प्रेमाच्या पहिलेपणाचा अनुभव, जाणीव, मनाची तरलता,  भावनिक गुंतागुंत या भावनाही याच टप्प्यावर मनावर गारूड करून जातात.   
      त्यामुळेच पहिल्यांदाच अशी जाणीव होते की शालेय जीवनात पहिला येणार / येणारी महाविद्यालय /  व्यवसायाभिमुख शिक्षण घेतांना प्रथम क्रमांकांनी उत्तीर्ण होईलच याची शाश्वती कोणालाही देता येणार नाही.   एव्हढे मात्र खरे की पहिल्या प्रथम जाणीव होते की उच्च शिक्षण घेऊन आपली कारकीर्द घडवायची किंवा व्यवसायाभिमुख शिक्षण घेऊन आवडीच्या व्यवसायात नैपुण्य प्राप्त करून यशाचे शिखर गाठायचे याकरता प्रचंड मेहनतीची गरज असते.  कारकीर्द घडविण्याच्या पहिल्या टप्प्यावर आपली विद्वत्ता दाखवून प्रथम येण्याचा मान मिळवणे ही प्रत्येकाची / प्रत्येकीची इच्छा असते. 
       जसजशी परिपक्वता वाढत जाते त्याप्रमाणात पहिला येण्याचा मान मिळवणे यामागील प्रचंड मेहनत तसेच विद्वत्ता याची फार जवळून ओळख करून घ्यावी लागते.   महाविद्यालय /  व्यवसायाभिमुख शिक्षण घेतांना पहिल्याच प्रयत्नात प्रथम क्रमांकांनी उत्तीर्ण झाल्यावर समाजात जो मान मरातब मिळतो ती अवीट भावना मनातील एका कोपऱ्यात जपून ठेवलेली असते.  समाजात / व्यवसायात फार अदबीने नाव घेतले जाते.  अशावेळेस आपण पहिल्यांदा एव्हढे मोठे यश मिळविले आहे ही भावनाच सुखावून जाते.  पहिला येणे ही भावना काय असते हे कोणत्याही स्पर्धेतील खेळाडूंना विचारले तर ते त्याचे महत्त्व फार चांगल्या रीतीने पटवून देऊ शकतील.  धावण्याच्या स्पर्धेतील धावपटूच सांगू शकतो की पहिला येणे ही काय भावना आहे ते.  पण हेही महत्त्वाचे आहे की तो पहिल्यांदा या शर्यतीत सहभागी झाला तेव्हा त्याची भावना काय होती किंवा त्याने मनाशी काय ठरविले होते.  
         तसेच एखाद्या वाद विवाद स्पर्धेत पहिल्यांदा भाग घेतल्यावर जो आनंद मिळतो तो शब्दात वर्णन करणे कठीण आहे.  त्यातच प्रथम क्रमांक मिळविला तर त्याच्या विद्वत्तेचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होते.  तीच गोष्ट लेख, कथा, कविता अथवा इतर साहित्य या बाबतीत सांगता येईल.  आयुष्यात पहिल्यांदा हातून काही लिखाण झाले तर ती फार अभिमानाची गोष्ट वाटते.  बक्षिसे मिळो अथवा न मिळो पण मी पहिल्यांदाच काही लिहिले आहे याचा आनंद पुढील लिखाणाला स्फूर्ती देणारा ठरतो.  स्पर्धेत पहिले बक्षिसे मिळणे म्हणजे तुमचा शब्दसंग्रह, भाषेवरील प्रभुत्व,  विचार मांडण्याची कला इत्यादी गोष्टींना त्या त्या क्षेत्रातील प्रथितयश व्यक्तींनी दिलेली पावती / शाबासकी असते.  अशा पहिल्या आलेल्या व्यक्तींचे गोडवे गायले जातात.  त्यांचा यथोचित मानसन्मान ठेवला जातो.  
        शेवटी एव्हढेच सांगता येईल की प्रथम पुरस्कार मिळविणे अथवा पहिला नंबर पटकाविणे यापेक्षाही पहिल्यांदा प्रयत्न करणे हे जास्त समाधान देणारे असते.  यास आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे.  काही वयस्कर मंडळींकडून असेही सांगितले जाते की प्रथम क्रमांक मिळवणे हे जरी यशस्वितेचे गमक असले तरी पहिल्यांदा जेव्हा प्रयत्न केला त्यात या यशाचे मूळ आहे. 

-मिलिंद कल्याणकर 
नेरुळ, नवी मुंबई 

साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

          

     आज लोकशाहीर व समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांची जयंती. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात १ ऑगस्ट १९२० रोजी भाऊ शिदोजी शिंदे व वालुबाई यांच्यापोटी अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला. म्हणजे हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. अण्णाभाऊंची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची व गरिबीची होती. त्यामुळे अण्णाभाऊ शिक्षण घेऊ शकले नाही. अण्णाभाऊ फक्त दीड दिवस शाळेत गेले. पुढे आण्णाभाऊंचे कुटुंब मुंबईला गेले. तेथील झोपडपट्टीतच ते लहानाचे मोठे झाले. अण्णाभाऊ हे मातंग समाजातले, हा समाज त्यावेळेच्या  विषमतावादी  संस्कृतीत तळाशी असणारा समाज  त्यामुळे अण्णाभाऊंनाही या विषमतावादी संस्कृतीचे, जातिभेदाचे चटके सहन करावे लागले. याच विषमतावादी संस्कृतीचा अण्णांना राग होता. आम्हीही माणसे आहोत आम्हालाही स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार आहे असे ते म्हणत हा अधिकार मिळत नसल्याने ते पेटून उठले. १९४४ साली त्यांनी लाल बावटा पथक स्थपन केले आणि बघता बघता ते शाहीर झाले. माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची झालिया काहिली....ही त्यांची लावणी खूप गाजली. त्यांनी लिहिलेल्या  लावण्या, पोवाडे खूप गाजले. अण्णाभाऊ जरी दीड दिवस शाळेत गेले असले तरी ते जगात महान साहित्यिक म्हणून ओळखले जाऊ जातात. अण्णाभाऊंनी आपले उभे आयुष्य चिराग नगरच्या झोपडपट्टीत घालवले. तिथेच एकापेक्षा एक अशा दर्जेदार कलाकृतींची निर्मिती झाली. ग्रामीण भागातील पददलित व लाचारीचे जीवन जगणारी माणसे, अन्यायाविरुद्ध पेटून उठणारी माणसे त्यांनी आपल्या खास शैलीतून उभी केली. फकिरा सारखा जन्माने मातंग असणारा नायक, एक अजस्त्र ताकदीचा व धैर्याचा महामेरू भारतीय स्वातंत्र्याच्या रणांगणात दिन दलितांच्या व उपेक्षितांच्या वतीने लढणारा नायक म्हणून त्यांनी फकिरा मध्ये उभा केला. फकिरा ही कादंबरी म्हणजे त्यांच्या साहित्य कलेचा कळस आहे. ही कादंबरी आजही लोकप्रिय आहे. बेस्ट सेलर म्हणून विकली जाणारी ही कादंबरी अनेक विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आहे. मास्तर, माकडीचा माळ, भुताचा माळ, गुलाम,  वारणेचा वाघ, चिराग नगरची भुते, चित्रा या त्यांच्या कादंबऱ्या देखील खूप लोकप्रिय झाल्या. त्यांनी ३५ कादंबऱ्या, ३ नाटके, ११ लोकनाट्ये, १३ कथासंग्रह आणि ७ चित्रपट कथा लिहिल्या. जगातील २७ भाषांमध्ये अण्णाभाऊंच्या साहित्याचे भाषांतर झाले आहे. १९५७ मध्ये झालेल्या दलित साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांचे योगदान अनन्यसाधारण असे आहे.  संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्यांनी कामगार जागा करून त्यांची एकजूट संघटना निर्माण केली. डॉ बाबासाहेब आंबेडकरांना ते आपला गुरु मानत. डॉ आंबेडकरांच्या महानिर्वानानंतर त्यांचे कवन जग बदल घालुनी घाव,  सांगून गेले मज भीमराव... प्रसिद्ध झाले. फकिरा ही कादंबरी अण्णाभाऊंनी डॉ आंबेडकरांच्या विचारांना अर्पण केली होती. गोरगरीब, दिन दलितांच्या मनावर आपल्या लेखणीने अधिराज्य गाजवणाऱ्या या महान लोकशाहिराचे निधन १८ जुलै १९६९ रोजी झाले. हे वर्ष लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे या वर्षाचे औचित्य  साधून केंद्र सरकारने त्यांना मारोणोत्त भारतरत्न किताब देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करावा. साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! 

-श्याम बसप्पा ठाणेदार 
 पुणे 

गुरुवार, ३० जुलै, २०२०

संजीवनी हेल्थ केअर चॅरीटेबल ट्रस्टची सामाजिक बांधिलकी



ठाणे /प्रतिनिधी :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कोव्हिड -19 चा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी जास्तीत जास्त संशयितांची कोव्हिड तपासणी होणे गरजेचे आहे. महापालिकेने 18 ॲन्टिजेन टेस्टिंग सेंटर सुरु केले असून त्या केंद्रामार्फत संशयित रुग्णांची ॲन्टिजेन टेस्ट विनामुल्य केली जाते. महापालिकेच्या 10 तापाचे दवाखान्यात देखील संशयित रुग्णांची विनामुल्य ॲन्टीजेन टेस्ट करण्यात येते लक्षणे असणा-या संशयित रुग्णांची आर.टी.पी.सी.आर.टेस्ट केली जाते. 
अधिकाधिक टेस्टींग होऊन कोव्हिड साथीला आळा बसावा याकरीता महापालिका क्षेत्रातील,  "फॅमिली डॉक्टर कोव्हिड फायटर" या मोहिमे अंतर्गत महापालिकेकडे सुमारे 75 खाजगी डॉक्टरांनी सहभाग दर्शविला असून संजीवनी हेल्थ केअर चॅरीटेबल ट्रस्ट रजी.च्या सेक्रेटरी मनिषा गांगुर्डे यांनी आतापर्यंत 30 महिला,पुरुष यांना डोंबिवली पश्चिम विभागात तपासणी सर्व्हे साठी रोजगार मिळवून दिला आहे तसेच शास्त्रीनगर हेल्थ केअर च्या आरोग्य अधिकारी डॉक्टर स्मिता व आरोग्य कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली सोबत राहून यशस्वीपणे सर्व्हे राबवत आहेत.स्वयंसेवक घरोघरी जाऊन नागरिकांचे थर्मल स्क्रिनींग व पल्स ऑक्सिमिटरचा वापर करुन ऑक्सिजन पातळी तपासण्याचे काम करुन महापालिकेस बहुमोल सहकार्य करीत आहेत. आपल्या परिसरातील कोव्हिड रुग्णांची संख्या कमी व्हावी याकरीता संजीवनी हेल्थ केअर सोबत संभाजी ब्रिगेड कल्याण डोंबिवली महानगर अध्यक्ष शिवश्री प्रभाकर भोईर हे देखील या कार्यात सहकार्य करीत आहेत. कल्याण डोंबिवली कोरोना विषाणू मुक्त होवून नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी आपण सर्वांनी या वेळी एकत्र येवुन लढा देवून कल्याण डोंबिवली महापालिकेला सहकार्य करावे असे संजीवनी हेल्थ केअर च्या मनीषा गांगुर्डे यांनी आवाहन केले आहे.

जोगेश्वरीतील श्री समर्थ विद्यालयचा 100 टक्के निकाल


मुंबई /वार्ताहर : जोगेश्वरी पूर्व बान्द्रेकरवाडी स्थित श्री समर्थ शाळेचा यंदाचा दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला आहे.शाळेतून पहिला येण्याचा मान वैष्णवी सत्रे या विधार्थिनीने 94.80% गुण मिळवून प्राप्त केला तर सकपाळ प्रतिभा 93.60% व नार्वेकर सायली 90 % गुण मिळवून अनुक्रमे दुसरी व तिसरी आली.शाळेचा निकाल 100 टक्के लागल्याने शाळेचे सर्वसर्व डॉ महादेव वळंजू यांनी सर्व विधार्थी वर्ग व शिक्षक वृंद यांचे अभिनंदन केले असून शाळेनं प्राप्त केलेल्या घवघवीत यशाबद्दल समाधान व्यक्त केलं.

समाजसेवक चेतन दादा गायकर यांच्या प्रयत्नाने नागरी वस्तीतील समस्येचे निवारण


 
               
 अंबरनाथ( शैलेश सणस ) : जावसई गाव चोंडीपाडा शेलारचाळ येथील नागरी लोकवस्ती लगत रहदारीच्या रस्त्यात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी  साठून  गाळ व शेवाळ तयार झाले होते .  या  साचलेल्या पाण्यातील वाटेवरून   नागरिकांना ये जा करताना  खूप त्रास सहन करावा  लागत होता . याबाबत तिथल्या नागरिकांनी फोनद्वारे कळवले असता  समाजसेवक चेतन दादा गायकर यांनी  नागरिकांना मदतीचे आश्वासन देऊन तेथील परिसराची पाहणी केली . देवा ग्रुप फाउंडेशन, शिवसेना व युवासेनेच्या माध्यमातून   गायकर यांनी प्रयत्न करताना  जागेच्या मालकाशी बोलून त्यांना होत असलेला त्रास समजावून सांगितला असता त्यांनी  ही सहकार्य करण्याचे  आश्वासन दिले व बाजूलाच असलेलं काँक्रीटपायवाट तोडून खाली ड्रेनेजपाईप टाकून पाणी जाण्यास  वाट बनून दिली व तोडलेले काँक्रीट पुन्हा सिमेंट च्या सहाय्याने बंद करून घेतले . तसेच नागरिकांचे आरोग्यधोक्यात येऊ नये यासाठी नालेसफाई करून घेतली .  परिसरातील लोकांचा रहदारीचा रस्ता सुरक्षित करून दिला . 

रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद



उरण -(विट्ठल ममताबादे)
       पालवी सामाजिक संस्था, भेंडखळ,  विजय विकास सामाजिक संस्था, नवघर जरिमरी नवरात्र उत्सव मंडळ, भेंडखळ आणि नवतरुण मित्र मंडळ, पाणजे यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक आरोग्य केंद्र भेंडखळ येथे आयोजित रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.सर्वोदय हॉस्पिटल घाटकोपर येथील समर्पण ब्लड बँक च्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात 65 रक्तदात्यांनी रक्तदान केले.  उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन केले.
 याप्रसंगी रायगड जिल्हा परिषद सदस्य विजय भोइर, सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार, भेंडखळ ग्रामपंचायत उपसरपंच लक्ष्मण ठाकूर,कृष्णा ठाकूर, रतन ठाकुर, सदस्या संध्या ठाकूर,नीलम भोईर, सोनाली ठाकूर, सुचिता ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते .
       थॅलेसेमिया पेशंट करता आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरास समर्पण ब्लड बँकेच्या डॉक्टर पल्लवी जाधव, शिला वाघमारे राजेश कावळे, स्नेहल कांबळे या डॉक्टरांनी तर लक्ष्मण नाईक, कुणाल शेडेकर, नितीन जाधव, प्रकाश नवले आदींनी सहभाग घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  विजय भोईर,चंद्रविलास घरत,किरण पाटील, सतीश घरत, विकास भोईर, शैलेंद्र ठाकुर, किरण घरत, राकेश भोईर, जन्मेंजय भोईर,कौशिक भोईर, संकेत ठाकुर,मिलिंद पाटील, समिर भोईर, शरद म्हात्रे, संजय ठाकुर, लिलेश्वर ठाकुर, दीपक भोईर,  सागर कडु,हेमंत पाटील,दर्शन पाटील, दिपेश पाटील, विक्रम पाटील, लंकेश ठाकुर, प्रांजल भोईर, विवेक म्हात्रे, आदित्य घरत, निर्मला म्हात्रे, पुष्पांजली घरत, प्रगती घरत, राजश्री घरत आदी सदस्यांनी मेहनत घेतली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनिल ठाकुर यांनी केले.कार्यक्रमासाठी भेंडखळ ग्रामपंचायतीचे विशेष सहकार्य लाभले.यावेळी रक्तदात्यांना विजय विकास सामाजिक संस्थेच्या वतीने थर्मास चे वाटप करण्यात आले.

नवीन शेवा व हनुमान कोळीवाडा या गावांना प्रॉपट्री टॅक्स मिळणेसाठी माजी आमदार मनोहर भोईर यांची जे.एन.पी.टी. कडे मागणी !!

उरण -(विट्ठल ममताबादे)
      नवीन शेवा व हनुमान कोळीवाडा हि गावे जे.एन.पी.टी. प्रकल्पासाठी पुनर्वसित झालेली असून, हि दोन्ही गावे मिळून मूळ जुने गाव शेवा व शेवा कोळीवाडा असे होते. सध्या अस्तित्वात असलेल्या जे.एन.पी.टी. बंदरामधील जे.एन.पी.टी. प्रशासन भवन, ट्रेनिंग सेंटर, गेस्टहाऊस, पंप हाउस या सर्व इमारती या जुना शेवा गावाच्या हद्दीमध्ये जे.एन.पी.टी. बंदर आल्यानंतर बांधकाम केलेल्या आहेत. 
        जे.एन.पी.टी. बंदरासाठी या दोन्ही गावांना विस्थापित केले असून गावांच्या विकासासाठी उत्पनाचे इतर कोणतेही साधन नाही. पाणीपट्टी, वीजबिल, नालेसफाई व मोकळ्या जागेतील साफसफाई करण्यासाठी ग्रामपंचायतकडे एकही रुपया उत्पनाचा येत नाही.तरी या दोन्ही ग्रामपंचायतिना याआधी दिलेल्या प्रॉपट्री टॅक्स प्रमाणे आताही प्रॉपट्री टॅक्स देण्यात यावा अशी मागणी माजी आमदार मनोहर भोईर यांनी जे.एन.पी.टी. चेअरमन(अध्यक्ष), सह-चेअरमन(उपाध्यक्ष),  मा.चिफ मॅनेजर, जे.एन.पी.टी, 
 यांच्याकडे निवेदनाव्दारे  केली आहे. 
       दरम्यान जे.एन.पी.टी. चे, सह-चेअरमन(उपाध्यक्ष) श्री.उन्मेश वाघ यांच्यासोबत बैठक घेऊन आपण या विषयाकडे तातडीने लक्ष केंद्रित करून नवीन शेवा व हनुमान कोळीवाडा या गावांना प्रॉपट्री टॅक्स मिळावे हि मागणी माजी आमदार मनोहर भोईर यांनी केली. जे.एन.पी.टी. सह-चेअरमन(उपाध्यक्ष) श्री.उन्मेश वाघ यांच्याकडून सदर मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले.

एकलव्य विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून दहावी यशस्वी केली


मुंबई - (प्राजक्ता  चव्हाण)

  गेली २८ वर्षे समता विचार प्रसार संस्थेच्या वतीने, घरातील प्रतिकूल आर्थिक - सामाजिक परिस्थितीशी दोन हात करत. केवळ जिद्द, चिकाटी व मेहनत यांच्या जोरावर दहावी एस. एस. सी. परीक्षेत यश मिळवणाऱ्या आधुनिक एकलव्य विद्यार्थ्यांना एकलव्य गौरव पुरस्कार देण्यात येतो. प्रामुख्याने महापालिकेच्या माध्यमिक शाळेत शिकणारे विद्यार्थी यात असतात. घरात कुणी शिकलेलं नाही. आई - वडील मोल मजुरी करणारे. विद्यार्थ्याला दहावीच्या वर्षी ही क्लास, गाईड, पुस्तकं यांची नीट सोय नाही. अशा विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश असतो. गेल्या दोन वर्षांपासून संस्थेच्या एकलव्य सक्षमीकरण योजने अंतर्गत महापालिका माध्यमिक शाळेतल्या विद्य्यार्थ्यांना नववीत असतांनाच शाळेमार्फत संपर्क करण्यात येतो. त्या मुलांचे दर शनिवारी व रविवारी सर्व विषयांवर तज्ञ शिक्षकाचे मार्गदर्शन वर्ग घेण्यात येतात. यावर्षी कळवा येथील ठाणे महापालिका माध्यमिक शाळा क्र. २, रात्रशाळा क्र. ४९ व मानपाडा येथील शाळा क्र. ७ येथे हे वर्ग आयोजित करण्यात आले होते. या मुलांसाठी व्यक्तीमत्व विकासासाठी आय. पी. एच. संस्थेतर्फे व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. सांस्कृतिक कार्यक्रम, ईद, दिपावली संमेलन, हिरजी गोहिल, क्रिडा महोत्सव, वृक्षारोपण, अभ्यास आणि सहली या सर्व गोष्टी आयोजित केल्या गेल्या होत्या. 
  या मुलांसाठी जानेवारी महिन्यात, पास कसे व्हावे हे शिबिर घेतले गेले होते. कळवा व मानपाडा येथील शाळांप्रमाणे शाळा क्र. १८, कोपरी शाळा क्र. ३ येथेही ही शिबिरे आयोजित करण्यात आले होती. या शिबिरात व वर्षभर शिकवण्यात लतिका सु. मो., मनिषा जोशी,  हर्षलता कदम, उत्तम फलके, शैलेष मोहिले, सुप्रिया कर्णिक, चैताली कदम, सुमेधा अभ्यंकर इत्यादी शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली होती. या मुलांना बेस्ट ऑफ लक करण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात कार्यकर्त्यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या घरी भेटी दिल्या. त्यांना परिक्षेकरिता पेन भेट म्हणून देण्यात आले. 
  हाती आलेल्या निकाल माहितीनुसार, या शाळांचे निकाल अतिशय चांगले लागले आहेत. कळवा रात्र शाळेचा ८६.६ टक्के, कळवा ठा. म. पा. शाळेचा ९१ टक्के आणि मानपाडा ठा. म. पा. शाळेचा ७२ टक्के निकाल लागला आहे. काही विद्यार्थ्यांनी या परीक्षेत आपल्या कष्टाने यश मिळवले आहे.
  श्रुती रमेश केदारे या मानपाड्याच्या शाळेतील विद्यार्थिनीने ८४.८ टक्के गुण मिळाले आहेत. या विद्यार्थिनिला आई वडील नाहीत. ती आत्याकडे राहते. अत्यंत गरीब परिस्थिती. याच शाळेतील श्रुती राजू बावस्कर विद्यार्थिनीने ही ८३.४ टक्के गुण मिळवले आहेत. तिची आई घरकाम करते, वडील वॉचमनचे काम करत होते. अशा हलाखीची परिस्थितीत सुद्धा श्रुती चांगल्या टक्यांनी उत्तीर्ण झाली. जीवन राठोड या मानपाड्याच्या विद्यार्थ्याला ७९ टक्के मिळाले आहेत. त्याचे वडील पेंटर, आई घरकाम करणारी. तसेच कळवा रात्र शाळेच्या सायली विजय दळवी या विद्यार्थिनीला ही ६६.६ टक्के मिळाले. दिवसभर कालहेर येथील गारमेंट कंपनीत काम करून संध्याकाळी ही विद्यार्थी शाळेत शिकत होती. पूजा रमेश सोनवणे या कळवा ठा. म. पा. शाळेतील विद्यार्थीनीला ही आई वडील नाहीत. आजी आजोबांकडे राहत असून, आजोबा वॉचमनचे काम करतात. घरातील सर्व काम करुन तिने ६४ टक्के गुण प्राप्त केले. कळवा रात्र शाळेच्या दीपक थोरात याने दिवसभर केमिकल कंपनीत काम करून, संध्याकाळी शाळा करत ४२ टक्के गुण मिळवले. आई वडील नसल्याने मामाकडे राहून तो शिकतो होता. निशा राजा गुंजाळ या विद्यार्थिनीला सुद्धा ३७.४ टक्के मिळाले आहेत. अंजली पासवान या कळवा ठा. म. पा. शाळेतल्या विद्यार्थिनीने ४६ टक्के मिळाले. तिची आई घरकाम करते आणि वडील पेस्ट कंट्रोलचे काम करतात. अशा या सर्व विद्यार्थ्यांना खरंच मनाचा सलाम.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कुलाबा येथे मोफत सॅनिटायझरचे वाटप तसेच रक्तदान शिबिर संपन्न



मुंबई प्रतिनिधी - प्राजक्ता अरूण चव्हाण.

  कोरोना कोविड - १९ या महामारीच्या काळात रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासत असून माणुसकीच्या नात्याने आपला वाढदिवस साजरा न करता वाढदिवसानिमित्त रक्तदान करा. असे आव्हान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी केले होते. त्यांच्या याच शब्दांचा मान ठेवत, कुलाबा विधानसभेत शिवसेना शाखा क्रमांक २२५ या मांडवी विभागात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न झाले. कुलाबा विधानसभेचे संघटक गणेशजी सानप आणि स्थानिक शिवसेना नगरसेविका सौ. वसुजाताजी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ९ वाजल्यापासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी १०३ नागरिकांनी या शिबिरात आपला उत्साह दाखवून रक्तदान केले. 
  त्याचबरोबर कुलाबा येथील शिवसेना शाखा क्रमांक २२६ च्या महिला उपशाखा संघटक सौ. हर्षा केतन राऊत यांच्या सौजन्याने व शाखाप्रमुख मनोहर पाटील यांच्या सहकार्याने मच्छीमारनगर महिलांना हँड सॅनिटायझरचे ४५० जणांना मोफत वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना दक्षिण मुंबईचे कार्यसम्राट विभागप्रमुख पांडुरंगजी सकपाळ, महिला विभाग संघटक सौ. जयश्रीताई बाळ्ळीकर,  समन्वयक सुनील देसाई, उपविभाग संघटक सौ. बिना दौंडकर आणि युवासेना विभाग अधिकारी प्रथमेश सकपाळ व सर्व शिवसैनिक यांची उपस्थिती दिसून आली.

जॉय ऑफ गिविंगने केले विद्यार्थ्यांना सहकार्य ; १३० विद्यार्थ्यांना दिले जीवनावश्यक अन्न धान्य किट



मुंबई(शांत्ताराम गुडेकर) 

           जॉय सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने आज (दि.३० जुलै) नियोजन केल्याप्रमाणे  श्री समर्थ विद्यालय,बांद्रेकरवाडी, जोगेश्वरी पूर्व येथे आरे आदिवासी पाड्यातुन शिक्षणासाठी येणाऱ्या जवळजवळ १३० विद्यार्थ्यांच्या पालकांना जीवनावश्यक  अन्नधान्य किट(तांदूळ,डाळ,साखर,पोहे,लापशी,साबण व मास्क) वाटप करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आपलं महानगर या लोकप्रिय दैनिकाचे संपादक संजय सावंत उपस्थित होते.गेल्या पाच वर्षपासून या शाळेत शिकणाऱ्या आदिवासी,गोर गरीब व वंचित विद्यार्थ्यांना जॉय संस्थेच्या माध्यमातून मदत करण्यात येत असल्याचे मुख्याध्यापिका निंबाळकर मॅडम यांनी सांगितले.सदर कार्यक्रम यशस्वी व सहकार्य करण्यासाठी जयवंत लाड उपविभागप्रसमुख शिवसेना,सालम जीमचे संस्थापक सूर्यकांत सालम,पश्चिम रेल्वेचे गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त मोटरमन चंद्रशेखर सावंत,श्रीकांत रेडकर,फिलिप रॉड्रिक्स सर,अजित वैद्य,प्रमोद निकते,धनंजय कोरगावकर,अक्षय कदम,दीपक पाटील,प्रियांस हिरवे या सर्वांनी पुढाकार घेतल्याचे जॉय ऑफ गिविंग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश हिरवे यांनी सांगितले. यापूर्वी देखील जॉयच्या माध्यमातून लॉकडाउन काळात असे सामाजिक उपक्रम राबविण्यात आले असून पुढेही वर्षभर हे सर्व काम सुरूच राहणार असल्याचे वक्तव्य गणेश हिरवे  सरांनी व्यक्त केले. संस्थेने राबललेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून पालक वर्गाने संस्थेचे यावेळी आभार मानले. 

वंजारी युवक संघटना उपाध्यक्ष पदी सुदाम घुगे

बदलापूर ( सुधीर कनगुटकर): अखिल भारतीय वंजारी युवक संघटना महाराष्ट्र राज्यच्या उपाध्यक्ष पदावर बदलापूर येथील युवा कार्यकर्ते सुदाम घुगे यांची निवड करण्यात आली आहे.  ह्या निवडीसाठी राष्ट्रीय अध्यक्ष श्री. धनराज गुट्टे स्वतः उपस्थित होते.  सुदाम घुगे यांचा संपूर्ण महाराष्ट्र राज्यात उत्तम संपर्क आहे. सुमारे बारा  वर्षापासून ते समाज सेवेत सक्रीय आहेत. वंजारी सेवा संघ महाराष्ट्र या संघटनेत नऊ वर्ष प्रदेश सरचिटणीस होते. परंतु, संघटनेने घेतलेल्या काही निर्णयामुळे मतभेद झाल्याने त्यांनी राजीनामा दिला व अखिल भारतीय वंजारी युवक संघटनेच्या सोबत जायचा निर्णय घेतला. सुदाम घुगे यांच्या कार्यक्षमतेची दखल घेत त्यांना महाराष्ट्र उपाध्यक्ष पदाची जवाबदारी देण्यात आली आहे. अतिशय मन मिळाऊ स्वभाव व संघटन कौशल्य असलेला उपाध्यक्ष लाभल्याने संघटनेचे कार्यकर्ते आनंदीत झाले आहेत. 
संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा क्षेत्रिय रेल्वे सल्लागार समिती भारत सरकार सदस्य आदरणीय श्री. धनराज गुट्टे यांच्या हस्ते सुदाम घुगे यांचा सत्कार करण्यात आला. 
          या वेळेस रामकृष्ण गिते, भावर्थ दौंड, प्रविण गीते, तुषार फड, विजय केंद्रे, परिक्षीत अटकरे, नितिन दराडे व अण्णा दराडे यावेळी  उपस्थित होते. संघटनेतील वरिष्ठ  पदाधिकाऱ्यांनी सुदाम घुगे यांना पुढील वाटचालीस मंगलमय शुभेच्छा दिल्या.

गरीब-गरजूंना मोफत छत्री वाटपाचा कार्यक्रम संपन्न


मुंबई / वार्ताहर : मा. उध्दवजी बाळासाहेब ठाकरे...शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या  वाढदिवसानिमित्त जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राच्या वतिने  शिवसेना कार्यसम्राट आमदार व माजी राज्यमंत्री श्री. रविंद्र वायकर  यांच्या मार्फत प्रतिवर्षी देण्यात येणाऱ्या व शाखाप्रमुखांना दिलेल्या गरीब-गरजूंना मोफत छत्री वाटप कार्यक्रम शाखा क्र. ७२ च्या वतीने करण्यात आला. गुरुवार दिनांक ३० जुलै  रोजी विभागातील गरीब-गरजू लोकांना छत्र्या देण्यासाठी सेवाश्रम कार्यालय शिवसेना ७२ च्या शाखेत दिपाशा पवार (म.उपविभागसंघटक ) श्री अमर मालवणकर व  सौं. समिक्षा माळी (शाखाप्रमुख व शाखासंघटक) श्री. उमेश कदम सौं छाया राणे (शाखासमन्वयक)  के दासन (उपशाखाप्रमुख) तसेच पुरुष व महिला गटप्रमुख पदाधिकारी, व शिवसैनिक आदी उपस्थित होते.


कोरोना प्रतिबंधासोबतच कोरोनामुळे कोणाचाही मृत्यू होऊ नये हे मुख्य उद्दिष्ट असल्याचे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचे प्रतिपादन


  नवी मुंबई, दादासाहेब येंधे : हॉटस्पॉट क्षेत्रात घरोघरी स्क्रिनींग करून अधिक प्रभावी रितीने रूग्ण शोध मोहिम राबविण्यास व त्यामध्ये लक्षणे आढळणा-या नागरिकांची अँटीजेन टेस्टींग करण्यास आपण सुरूवात केली असून त्यामुळे आज जरी रूग्ण संख्या वाढलेली दिसली तरी कोरोना बाधित व्यक्ती लवकर समजल्याने त्याच्यामुळे पुढे वाढू शकणारा संसर्ग त्याचे त्वरित विलगीकरण करून वेळेतच रोखण्यात आपण यशस्वी होऊ असे सांगतानाच नवी मुंबई महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी कोणत्याही माणसाचा कोरोनामुळे मृत्यू होऊ नये हे आपले मुख्य उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले.

       कोरोना प्रादुर्भाव रोखण्याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येणा-या उपाययोजनांची विभागीय पातळीवर कशा रितीने अंमलबजावणी होते याचा प्रत्यक्ष आढावा घेण्यास महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी सुरूवात केली असून आज नेरूळ विभाग कार्यालयातील आढावा घेताना त्यांनी सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी, नेरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नेरूळ १ व २, कुकशेत आणि शिरवणे या चारही नागरी आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी यांच्या समोर आपली भूमिका स्पष्ट केली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, परिमंडळ १ चे उप आयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार व नेरूळ विभागाचे समन्वय अधिकारी श्री. सतिश उगीले उपस्थित होते.


गंभीर रुग्णांकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश

      मृत्यू दर कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना राबविताना आपल्याला गंभीर स्वरुपाच्या रुग्णांकडे विशेष लक्ष देण्याची गरज असून प्रत्येक वैद्यकीय अधिकारी यांनी आपल्या क्षेत्रातील अशा व्यक्तींच्या नातेवाईकांच्या तसेच तो रुग्ण उपचार घेत असलेल्या रुग्णालयाच्या संपर्कात दूरध्वनीव्दारे दिवसातून किमान एक वेळा रहावे अशा सूचना आयुक्तांनी वैद्यकीय अधिकारी यांना दिल्या. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक तसेच मधुमेह, हायब्लडप्रेशर, ह्रदयरोग अशा इतर आजार असणा-या व्यक्तींकडेही काळजीपूर्वक लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या क्षेत्रातील एकही कोरोनाबाधित रुग्ण दगावता कामा नये हे आपले ध्येय असले पाहिजे अशा शब्दात वैद्यकीय अधिकारी यांना सूचित केले.

कन्टेनमेंट झोनचे सुयोग्य व्यवस्थापन व नियमांचे पालन करणेबाबत स्पष्ट सूचना

      कन्टेनमेंट झोन निश्चित करताना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले पाहिजे व त्यासोबतच विशेषत्वाने ज्या भागात ५ पेक्षा अधिक कोरोनाबाधित सापडतात असे तिस-या श्रेणीचे कन्टेनमेंट झोन निश्चित करताना त्याठिकाणची भौगोलिक परिस्थिती व प्रशासकीय व्यवस्थापन याचा सुयोग्य ताळमेळ राहिल व कन्टेनमेंट झोनचे उद्दिष्ट सफल होईल याचा तारतम्याने विचार करावा असे आयु्क्तांनी स्पष्ट केले. कन्टेनमेंट झोन तयार करताना अत्याधुनिक गुगल मॅप पध्दतीचा प्रभावी वापर करावा असेही त्यांनी सूचित केले.

       कन्टेनमेंट झोन जाहिर करताना त्याठिकाणी पूर्णत: प्रवेश प्रतिबंधित करणे गरजेचे असल्याचे सांगत आयुक्तांनी त्यासोबतच तेथील नागरिकांना औषधे, भाजीपाला, दूध अशा जीवनावश्यक गोष्टी कशा मिळतील याचेही विभाग कार्यालयाने नियोजन करावे असे सांगितले. पहिल्या व दुस-या प्रकारच्या कन्टेनमेंट झोनमधील प्रतिबंधीत बाबींचे पालन करण्यासाठी सोसायटी / वसाहतींचे पदाधिकारी यांच्यावर जबाबदारी सोपवावी तसेच तिस-या श्रेणीचे कन्टेनमेंट झोनमध्ये प्रवेशाठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवावा असेही आयुक्तांनी निर्देशित केले. प्रत्येक कन्टेनमेंट झोनच्या ठिकाणी ठळकपणे दिसेल असा प्रतिबंधित क्षेत्राचा बॅनर प्रदर्शित करावा अशाही स्पष्ट सूचना आयुक्तांनी दिल्या.

नागरी आरोग्य केंद्र क्षेत्रातील खाजगी डॉक्टरांच्या व्हॉट्सॲप समुहाव्दारे रुग्ण शोध मोहिमेला गती

      कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी कोरोनाची लागण झालेली व्यक्ती लवकरात लवकर समजणे अतिशय महत्वाचे असून त्यादृष्टीने नागरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिका-यांनी आपल्या क्षेत्रातील खाजगी डॉक्टरांचा व्हॉट्सॲप समुह तयार करून त्यांच्याकडे येणा-या तापाच्या रुग्णांची माहिती त्वरीत कळवावी व अशा व्यक्तींची अँटीजन टेस्ट त्वरीत करून घ्यावी असेही निर्देश आयुक्तांनी वैद्यकीय अधिकारी यांना दिले. खाजगी डॉक्टरकडील तसेच नागरी आरोग्य केंद्राच्या फ्ल्यू क्लिनीक मधील ताप असलेली एकही व्यक्ती अँटीजेन टेस्ट शिवाय राहू नये असे आयुक्तांनी निर्देशित केले. 

       कन्टेनमेंट झोनची योग्य निर्मिती व अंमलबजावणी करून त्याठिकाणी स्क्रिनींगव्दारे आरोग्य तपासणी आणि अँटीजन टेस्टींगवर भर द्यावा तसेच नागरिकांमध्ये कोरोनापासून सुरक्षिततेबाबत नियमित जनजागृती करावी असे संबंधित अधिकारी यांना सूचित करत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी नवी मुंबई महानगरपालिका कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राबवित असलेल्या उपाययोजनांना नागरिकांनी संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन केले आहे. 

करोनाने जीवनशैली शिकविली !

पावसाळा सुरू झाला की मलेरिया, डेंग्यु, कॉलरा सारखे आदि अनेक साथरोग डोक वर काढतात हा नेहमीचाच अनुभव .
परंतु यंदा या साथीमध्ये घट झाल्याचे वाचनात आले. किंवा प्रमाण तुरळक असल्याचे जाणवते अर्थात कोरोनाच्या धसक्याने म्हणा लहानापासून थोरापर्यंत नागरिक जाणीवपूर्वक घेत असलेली प्रभाग, विभाग, आवार, परिसर येथील सार्वजनिक स्वच्छता, बाहेरून आल्यानंतर शरीर स्वछ करण्याची लागलेली सवय, स्वत:च्या आणि कुटुंबाच्या आरोग्य विषयक सतर्कता, रोगप्रतिकार शक्तीच्या औषदांचा सदुपयोग, आणि मुख्य म्हणजे घरचे जेवणाला अधिकाधिक दिली गेलेली पसंती, विनाकारण भटकत न राहण्याची केलेली सवय, प्रदूषण होणार नाही याची घेतलेली काळजी  या आणि अशा शिस्तबद्ध जीवन शैली माणूस अंगिकारू लागलाय किंवा आत्मसात करतोय त्याचाच परिणाम म्हणजे साथीच्या रोगात दिसून आलेली घट होय. करोनाने शिस्तबद्ध जीवन शैली आम्हास शिकविली असे म्हटल्यास ते चुकीचे होईलच असे नाही. करोना गेल्या नंतर हीच जीवन शैली कायम ठेवणे आपल्याच हातात आहे निरोगी, आरोग्यदाई जीवनासाठी.  

-विश्वनाथ पंडित, ठाणे

बुधवार, २९ जुलै, २०२०

आजीबाईंच्या बटव्यातील कलुप्ती....


जीवनात एकमेकांशी सुसंवाद साधणे खूपच आवश्यक असते.  कारण संवादामुळेच आपण विचारांची , अनेक गोष्टींची माहिती व देवाण घेवाण मिळवू शकतो. त्यामुळे काही अपरिचित बाबींवर तोडगाही निघू शकतो.  त्यासाठी बोलका स्वभाव व काही गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता व आवड हवी तरच शक्य असते. मी मुंबईची असल्याने तेथील दमट व उष्ण हवामान होते. लग्न झाल्यावर नाशिकला ( २५ वर्षा पूर्वी ) आले. नाशिकचे हवामान त्यावेळी अतिशय थंड होते. आधीच दमट व उष्ण हवामानातून आल्याने हे शीत हवामान व वातावरण माझ्या आरोग्यास हानीकारकच ठरत होते.  त्यामुळे मला सर्दीचा  त्रास सुरू झाला.  घरगुती काढा घेऊन तात्पुरते बरं वाटत असे. पण थंडीच्या दिवसांत तर माझी प्रकृती बिघडत असे. माझ्या नाजूक शरिराला हे हवामान खूपच बाधत होते. हळूहळू सर्दी चा त्रास खुपच वाढत गेला. मग घरगुती काढा व्यर्थ ठरत असल्याने मी डॉक्टरांकडून औषधे घेतली. त्या औषधांनी पण तात्पुरतेच बरं वाटतं होते. पुन्हा जैसे थै .. तो सर्दीचा त्रास सुरूच. हिवाळ्यात व पावसाळ्यात नाक गळणं थांबत नसे. त्याचबरोबर शिंकांचा त्रास देखील होत असे. नाक पुर्ण लाल होईपर्यंत त्रास सहन करावा लागत असे. मी या सततच्या सर्दीला खूपच कंटाळी होती. गार पाण्याने व बाहेरील थंड हवेने माझा त्रास वाढतच गेला. नंतर तर मला सायनसचा त्रास सुरू झाला.  धुळ , थंड पदार्थांचे सेवन , हवेतील गारवा , परफ्यूम,  सुवासिक अत्तर यांपासून त्रास होत राहिला. बरेच  आयुर्वेदिक औषधे व उपचार केलेत. पण पाहिजे तसा आराम नाही मिळाला.  एकदा सहज भेटण्यासाठी माझ्या मैत्रिणीकडे गेले. बरयाच दिवसांनी भेटल्याचा आनंद  व मनसोक्त गप्पा झाल्या.  समोर एका खाटेवर एक वयोवृद्ध आजीबाई कापसाच्या वाती करत बसल्या होत्या.  माझा बोलका स्वभाव व वृद्धांशी बोलण्याची आवड असल्यामुळे मी त्यांच्या जवळ जाऊन बसली. कोण,कुठुन आली,कोणाकडे आली ? असे आजींनी चौकशी केली.  आजूबाजूच्या बायका मधूनच येवून  आजींना  काही आजारांवर तोडगा मागताना पाहिले. कोणाला चटका बसला तर आजी चुना लावायला सांगत. कोणाच्या पायांत काटा रूतल्याने त्यावर आजी गुळाचा चटका द्यायला सांगत. पाय सुजल्यवर आजी आंबेहळद गरम करून लावायला सांगत होत्या. थोडक्यात,  प्रत्येक गोष्टींवर आजींकडे  कलुपती होत्या.  आजीबाई आणि बटवा हे समीकरण खूपच मिळते जुळते आहे.  मग मी पण न राहून सतत होणाऱ्या सर्दी वर पर्याय सुचवायला लावला. त्यावर आजींनी लगेच एक साधा सोपा व घरगुती उपाय सांगितला.  एक मोठा ग्लास पाणी गरम करत ठेवायचा. तयात मिठाचे खडे घालून पाणी उकळत ठेवावे.  पाणी एक कपभर होईपर्यंत उकळून घ्यावे.  थंड झाल्यावर एका स्वच्छ बाटलीत भरून ठेवावे. मग हे पाणी डराॅपर च्या साहाय्याने दिवसातुन तिन वेळा तिन थेंब घालावे. एक महिना करून बघ मग फरक पडेल असे आजी स्मितहास्य करून बोलल्या.  मी विचार केला , करून बघायला काय हरकत आहे.  मी घरी आल्यावर तसेच करून पाहिले. एका महिन्यात मला खरचं फरक पडला. आश्चर्य म्हणजे माझी सर्दी व शिंका खूपच कमी झाल्या.  मला खूप आनंद झाला.  मैत्रिणीला फोन करून आजींना धन्यवाद द्यायला सांगितले.  खरचं जुन्या लोकांकडे किती सरळ,  सोपा उपचार असतो. कोणतीही समस्या आरोग्य विषयक असली तर चुटकी सरशी त्यावर रामबाण औषध व उपाय असतो. 

- सौ. स्नेहा मुकुंद शिंपी 

  नाशिक -महाराष्ट्र 
                                  

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन

   २९ जुलै हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. जागतिक स्तरावर वाघांचे संरक्षण व संवर्धन व्हावे म्हणून सेंट पिटर्सबर्ग येथे झालेल्या व्याघ्र परिषदेत २९ जुलै हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून घोषित करण्यात आला. वाघ हा जंगलाचा राजा आहे.  जंगलातील त्याची निर्धास्त चाल आणि गगनभेदी डरकाळी या त्याच्या  वैशिष्ट्यांमुळे वाघ हा सर्वांना आकर्षित करणारा प्राणी आहे. जगभरातल्या कोणत्याही अभयारण्यात जंगलातील सफारीवर गेलेल्या पर्यटकांचे पहिले आकर्षण वाघ दिसण्याचे असते. भारतीय संस्कृतीत  तर वाघाला आदरयुक्त भीतीचे स्थान आहे. वाघाला जंगलाचा राजा असे संबोधले जाते.  वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी असून जनमानसात शौर्य, राजबिंडेपणा, सौंदर्याचे राकटतेचे प्रतीक आहे. म्हणूनच भारतीय संस्कृतीत वाघाला  पार्वतीचा अवतार  असलेली देवी महिषासुर मर्दिनीचे व तिच्या अनेक रुपांचे  वाहन बनवले आहे.वाघ आणि आदिवासी जमातींचा हजारो वर्षांच्या संबंध आहे. वाघांचा कोप होऊ नये म्हणून ते वाघाला देव मानून त्याची पूजा करतात. वाघांच्या अनेक जाती आहेत.  भारतीय पट्टेरी वाघ जगातील वैशिष्ट्यपूर्ण प्राण्यांपैकी एक मानला जातो. भारत हे वाघांचे माहेरघर मानले जाते. भारताप्रमाणेच आफ्रिका आणि आशिया खंडातील इतर देशांतही वाघांचे आस्तित्व आढळते. पूर्वी वाघांची संख्या खूप होती परंतु खेळ, मनोरंजन, वाढत्या लोकसंख्येमुळे वाघांच्या आधीवासावर होणारे मानवी अतिक्रमण तसेच वाघांच्या अवयवांची तस्करी करण्यासाठी वाघांची मोठ्या प्रमाणावर केली जाणारी शिकार यामुळे  दिवसेंदिवस वाघांचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. वाघांचे प्रमाण इतके कमी झाले की एकेदिवशी वाघांची डरकाळी लुप्त होईल की काय अशी भीती निर्माण झाली आहे.  ही भीती अनाठायी नाही  कारण गेल्या काही वर्षात वाघांच्या शिकारीच्या अनेक घटना आपल्या देशात घडल्या आहेत. अवनी वाघिणीची शिकार कोण विसरेल? अवनी प्रमाणेच गोव्यातही दोन वाघांची शिकार करण्यात आली. गेल्या दोन वर्षात अनेक वाघांचे मृतदेह वनविभागाला आढळून आले आहेत. वाघ कमी होणे ही धोकादायक बाब आहे कारण जंगलात वाघ असणे हे समृद्ध जंगलाचे लक्षण समजले जाते. जंगलात असलेल्या  अन्न साखळीत वाघ हा प्रमुख घटक समजला जातो. वाघांमुळे जंगलातील तृणभक्षी प्राणी व वनस्पतींमध्ये समतोल राखला जातो. वाघ नसतील तर तृणभक्षी प्राण्यांची संख्या अनियंत्रित प्रमाणात वाढेल व इतर   निसर्गसंपदेवर या गोष्टीचा ताण पडेल परिणामी निसर्गचक्रच बिघडून जाईल. वाघ जंगलात असणे हे जंगलाच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. वाघ असलेल्या जंगलात साधे लाकुडतोड व जंगलावर अवलंबून असणारे लोक भीतीपोटी जंगलात जात नाही त्यामुळे जंगल सुरक्षित राहते. वाघ नाहीसे झाल्यास जंगलेही नाहीसे होतील आणि जंगल नाहीसे झाल्यास निसर्गचक्रच बिघडून जाईल आणि त्याचे दुष्परिणाम संपूर्ण मानवजातीला भोगावे लागतील तसे होऊ द्यायचे नसेल तर वाघांचे आस्तित्व टिकवले  पाहिजे. आज या आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाच्या दिवशी प्रत्येकाने वाघांचे आस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न करण्याची शपथ घ्यायला हवी.

-श्याम बसप्पा ठाणेदार 
 दौंड जिल्हा पुणे 

मंगळवार, २८ जुलै, २०२०

ताडदेव जनसेवक सुरेश अनंत माने यांचे निधन.

मुंबई / दत्ताराम  घुगे:

ताडदेव-तुळशीवाडी विभागातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, सुरेश अनंत माने यांचे वयाच्या पंच्याहत्तरी वर्षात नायर रुग्णालयात अल्पशा आजारात निधन झाले.सुस्वभावी आणि प्रेमळ, परोपकारी वृत्तीने कार्यरत गोकुळधाम गृहनिर्माण संकुलाणाच्या उभारणीत त्यांचे खूप मोठे योगदान बहुमुल्य होते.माजी आमदार,शहर नगर रचनाकार श्री चंद्रशेखर प्रभू यांचे सुरेश माने खंदे समर्थक होते.
गोपाळ कृष्ण क्रीडा मंडळ या अत्यंत नावाजलेल्या जुन्या संस्थांचे त्यांचे शेवट पर्यंत घनिष्ठ संबंध होते.
त्यांच्या दु: खद् निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सुरेश  माने सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील सुपुत्र होते.


शिवरत्न सेवा संघाने करून दाखवलं ! सहावे रक्तदान शिबीर असूनही ११० रक्तदात्यांचा उस्फुर्त प्रतिसाद ; रक्त संकलन पिशव्यांच्या कमतरतेमुळे अनेकजण रक्तदानापासून वंचित


कांजुरमार्ग / विशेष प्रतिनिधी : 

शिवसेना पुरस्कृत शिवरत्न सेवा संघाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे व आमदार श्री सुनील राऊत यांच्या वाढदिवसानिमीत्त रविवार दि.२६ जुलै रोजी कांजुरमार्ग येथील सेंट फ्रांन्सिस झेविअर्स हायस्कूल मध्ये रक्तदान शिबीर आयोजित केले होते. सदर शिबीरास कांजुरच्या नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देऊन अवघ्या तीन तासांत ११० रक्तदात्यांनी रक्तदान केले. एकट्या कांजुर विभागात या आधी गेल्या दोन महिन्यांत पाच रक्तदान शिबीरे पार पडली होती त्यामुळे या शिबीरास अल्पसा प्रतिसाद मिळेल असा अंदाज अनेकांकडून वर्तवला जात होता. त्यामुळे कांजुर - भांडुपकरांचे लक्ष यावर लागून राहिले होते. पण शिवरत्नच्या शिलेदारांनी हे आव्हान स्विकारले. अपार मेहनत घेऊन सर्वांचे अंदाज मोडून काढीत हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.  रक्तदात्यांना कोणतेही आमिष न दाखवता ह्या रक्तदान शिबीरास एवढा मोठा प्रतिसाद होता की रक्त पिशव्यांच्या कमतरतेमुळे (shortage of blood bags) ५० ते ६० रक्तदात्यांना इच्छा असूनही रक्तदान करता आले नाही. त्यामुळे अखेर मंडळाला हे शिबीर आटोपते घ्यावे लागले. कांजुरच्या नागरिकांनी कोरोना सारख्या महामारीला न घाबरता मोठ्या धाडसाने रक्तदान शिबीरात भाग घेतला त्यासाठी त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
सदर शिबीराचे आयोजन माजी उपविभाग प्रमुख श्री सुधाकर पेडणेकर व माजी शाखाप्रमुख श्री महेश पाताडे यांनी केले होते तसेच व्यवस्थापकीय व विशेष कामगिरी श्री संदेश उपरकर यांच्याकडे सोपवण्यात आली होती. हा  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अभिषेक टेमकर, जीवन देसाई व इतर कार्यकर्त्यांनी  अपार मेहनत घेतली.
या  शिबीरास विभागप्रमुख श्री रमेश कोरगांवकर, आमदार श्री सुनिल राऊत, नगरसेविका सौ.सुवर्णा करंजे, नगरसेवक श्री उपेंन्द्र सावंत तसेच शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी व इतर सन्माननिय व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवरत्न सेवा संघाने केलेल्या ह्या उत्तम कामगिरी बद्दल येथील नागरिकांमध्ये त्यांच्या कौतुकाची चर्चा रंगत आहे. शिवसेनेच्या स्टाईल मध्ये सांगायचं झालं तर शिवरत्नने करून दाखवलं !

डोंबिवली शहरात चोरांचा सुळसुळाट


डोंबिवली प्रतिनिधी : 206,साई पॅराडाईस, विष्णूनगर डोंबिवली पश्चिम येथील बांधकाम व्यावसायिक श्री.किरण केरभाऊ डोंगरे ह्यांचे ऑफिस 26 जुलैच्या रात्री अज्ञात चोरटयांनी फोडून ऑफिसमधील कॉम्पुटरसह, महत्वाचे दस्तावेज तसेच 26300/-रुपये रोख रक्कम असे एकूण 65,000/-रु. किंमतीच्या ऐवज चोरटयांनी गायब केला  आहे.कोरोना महामारीच्या काळात वाढलेली बेकारी आणि बेरोजगारी ह्यामुळेचं डोंबिवली शहरात चोरीचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढत आहे, हेच सदर घटनेवरून दिसून येत आहे डोंबिवली विष्णुनगर पोलीस स्टेशनमध्ये सदर प्रकरणाची तक्रार नोंदवून घेण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक श्री.सी डी.कोळी हे सदर घटनेचा पुढील तपास करत आहेत.

रक्तदान शिबिर यशस्वीरीत्या संपन्न


मुंबई /वार्ताहर : मा.  मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने माननीय परिवहन मंत्री व विभाग प्रमुख  ऍड. श्री अनिल परब  यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन शाखा क्र:- ८३ चे शाखाप्रमुख श्री नरेश कांता सावंत यांच्या आयोजनाखाली आयोजित करण्यात आले होते .सदर शिबीर  विलेपार्ले विधानसभा संघटक माननीय श्री सुभाष कांता सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.  याप्रसंगी विधानसभा महिला संघटक सौ रुपाली शिंदे , विधानसभा उप संघटक श्री समीर साबे, उपविभाग संघटिका सौ उर्मिला सावंत,  महिला शाखा संघटक सौ स्नेहल सुधीर महाडिक ,माजी शाखाप्रमुख श्री गणेश डोईफोडे, कार्यलय प्रमुख श्री सुभाष माळी , उपशाखाप्रमुख श्री सुनील आडेलकर,  मारुती देसाई , कन्हेय्या पटेल , व महिला उपसंघटिका सौ प्रिया कदम अंजली लोखंडे, सौ मीना विजय गौर, उपकार्यालय प्रमुख महेश कोयंडे , गट प्रमुख श्री राहिममुदिन शेख,  नामदेव पांचाळ ,  दिलीप नामे, संतोष तोडणकर, बाळा कांबळी,अशोक मोरे, विजय सुर्वे , शशिकांत गुरव , प्रकाश खाडे , उदय भानजी , अरविंद मुरमुरे , युवासेना दिनेश मांजरेकर  ,किशोर पवार व महिला गटप्रमुख सौ मालती गुप्ता तसेच शिवसैनिक उपस्थित होते

चेंबूर मध्ये पोलीस, पालिका कर्मचारी, पत्रकार व वृत्तपत्र वितरकांसाठी आयोजित आरोग्य शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद





मुंबई / प्रतिनिधी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ड्युटीवर असलेल्या सर्व पोलीस,पालिका कर्मचारी आणि पत्रकारांची आरोग्याची मोफत  आरोग्य तपासणी शिबीर आयोजित  करण्यात आले होते.  निब्बाण शैक्षणिक आणि सामाजिक ट्रस्ट ( नेस्ट ) व राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे ईशान्य मुंबई  जिल्हा अध्यक्ष डॉ.योगेश भालेराव यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस, पालिका कर्मचारी,  पत्रकार व वृत्तपत्र वितरण व वितरक  यांच्या करिता सदर आरोग्य शिबीर चेंबूर येथील रघुनाथ शिसोदे पालीका सभागृहात घेण्यात आले होते. 
         यावेळी झेब्रा फाऊंडेशन अध्यक्ष आशिष गडकरी व भाजप नेते अनिल ठाकूर तसेच वार्ड क्रमांक 119 च्या नगरसेविका मनीषा रहाटे यांच्या हस्ते या शिबिराचे उदघाटन करण्यात आले. या शिबिरात  दोनशे पेक्षा अधिक पोलीस, पालिका कर्मचारी, पत्रकार, विविध वृत्तपत्र कंपनीचे वितरण अधिकारी, वितरक यांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.  या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष धनंजय पिसाळ,गोवंडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब केदारे,चेंबूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एच. जतकर,संस्थेचे अध्यक्षा स्वानंदी तांबे,माजी नगरसेवक किसन मेस्त्री, समाजसेवक धनंजय मेश्राम, ऍड. वैभव जाधव, मटाचे वितरुण व्यवस्थापक नरेश सावंत, हेमंत माचीवले, पत्रकार आनंद श्रीवास्तव, पालिका,शंतनू शेळके,समाजसेवक कुणाल पै,युनियन चे संदीप मोते हे मान्यवर उपस्थित होते. 
        या मान्यवरांनी  उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.नेस्टच्या अध्यक्षा स्वानंदी तांबे यांनी मान्यवरांचे  स्वागत केले.या शिबिरात   उत्तम दर्जाचे हॅन्डग्लोज, मास्क, सॅनीटाईझर, आर्सेनिक अल्बम गोळ्या,  सॅनीटाईझर स्प्रे चे वाटप केले गेले. 

लॉक डाउन काळात रिक्षा व्यवसाय बंद ; जगायचे कसे ?? रिक्षा चालकांचा प्रशासनाला प्रश्न : रिक्षा चालक सापडले आर्थिक संकटात , सरपंच, नगरसेवक,आमदार,खासदार, जिल्हा परिषद सदस्य तसेच शासनाकडूनही मदत नाही ;नवनिर्माण रिक्षा चालक मालक संघटनेची महाराष्ट्र शासनाकडे रिक्षा वाहतूक परवानगीची मागणी.

उरण -(विट्ठल ममताबादे)

       रिक्षा चालकाकडून नवीन परवानासाठी 16000 रुपये, पासिंग व पीयूसीसाठी वर्षाला 2500 रुपये, इन्शुरन्ससाठी 8500 रुपये, मीटर टेस्ट फि वेगळी अशी सर्व रक्कम रिक्षा चालकाकडून सरकार वसूल करते. राज्यात अंदाजे 7 ते 8 लाख रिक्षा आहेत. म्हणजे शासनाने रिक्षा चालकाकडून अब्जावधी रुपये कमविले. परमिट सरकार देणार, मालकाने व चालकाने कोणते कपडे घालायचे हे सरकार ठरविणार,मीटर दर, शेरिंग दर सरकार ठरविणार.म्हणजे चालकाने व्यवसाय कसा करायचा ?  हे सरकार ठरविनार मात्र हे सर्व करताना लॉक डाउन सारख्या कठिन काळात रिक्षा चालकांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे न राहता रिक्षा चालकांना कोणतेही आर्थिक मदत न करता सक्तिने त्यांची रिक्षा बंद ठेवायला भाग पाडून शासनाने समस्त रिक्षा चालकांवर एक प्रकारचा अन्यायच केला आहे. वारंवार रिक्षा चालकांनी रिक्षा चालविण्यास कायदेशीर परवानगी देण्याची मागणी करूनही परवानगी देण्यात येत नसल्याने रिक्षा चालक मालकांचे संसार उघडयावर आले आहे. उपजिविकेचे एकमेव साधन असलेल्या रिक्षा व्यावसायीकांना 1/8/2020 पासून सर्व रिक्षा चालकांना रिक्षा चालविण्यास परवानगी द्यावी अशी मागणी उरण मधील नवनिर्माण रिक्षा चालक मालक सेनेने मुख्यमंत्री, गृहमंत्री,आरोग्य मंत्री, परिवहन मंत्री, रायगड जिल्हयाचे जिल्हाधिकारी, पालकमंत्री, उरणचे तहसीलदार, उरण पोलिस ठाणे यांच्याकडे रितसर पत्रव्यवहार करून केली आहे.मागणी मान्य न केल्यास 1/8/2020 रोजी सर्व रिक्षा चालक काळ्या फिती लावून शासनाचा निषेध नोंदविणार आहेत अशी माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदेश ठाकुर, यूनियन अध्यक्ष दिनेश हळदनकर यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.

      मराठी माणूस हा कोणत्याही क्षेत्रात पाठीमागे नाही. अनेक क्षेत्रात मराठी माणसाने नावलौकिक मिळविले आहे. सध्या मात्र करोना रोगाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक भुमीपुत्र असलेला मराठी माणूस मात्र रोजगारा अभावी खूप मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. कामगार, भाजी, फळ विक्रेते, छोटे मोठे उद्योग धंदे करणारे मराठी स्थानिक माणसावर चारही बाजूने आज संकट ओढवले आहे. त्यातच करोना मुळे 22 मार्च 2020 पासून लॉक डाउन व संचार बंदी असल्यामुळे रायगड जिल्ह्यातील व नवी मुंबईला लागून असलेल्या उरण तालुक्यामध्ये स्थानिक भुमीपुत्र असलेल्या मराठी माणसावर,रिक्षा चालकांवर बेकारीची कु-हाड कोसळली आहे.ही परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या या गोरगरिब रिक्षा चालकांना विविध संकटाशी सामना करावे लागत असून आपला संसार चालविताना नाकी नउ आल्याने उरण मधील रिक्षा चालकांनी शासनाकडे तसेच विविध सामाजिक संस्था, सर्वच राजकीय पक्षाचे नेते पदाधिकारी यांच्याकडे मदतीची अपेक्षा केली होती. मात्र लॉक डाउन काळात ग्रामपंचायत सदस्य,सरपंच,नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार तसेच शासनानेही  रिक्षा चालकांना एक रुपयाचेही मदत केली नाही. शासनाकडून  रिक्षा चालकांच्या खूप अपेक्षा होत्या मात्र अपेक्षा तर सोडाच साधी सहानुभूती लॉक डाउन काळात रिक्षा चालकांना दाखविली गेली नाही. त्यामुळे बिकट परिस्थितीत जीवण मरणाच्या संकटात असलेल्या रिक्षा चालकांनी शेवटी निषेधाचे हत्यार उपसले असून 1/8/2020 रिक्षा वाहतुकिस परवानगी न दिल्यास रस्त्यावर उतरून सोशल डिस्टेन्स पाळून काळ्या फिती लावून शासनाचा निषेध करण्यात येणार आहे. या समस्या बाबत उरण मधील नवनिर्माण रिक्षा चालक मालक सेनेच्या वतीने संघटनेचे सल्लागार पत्रकार विट्ठल ममताबादे यांनी राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, आरोग्यमंत्री, परिवहन मंत्री, रायगड जिल्हयाचे जिल्हाधिकारी या ठिकाणी पत्रव्यवहार करून रिक्षा वाहतुकिस कायदेशीर परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे.

        रायगड जिल्ह्यात असलेल्या व नवी मुंबई शहराला लागून असलेल्या उरण तालुक्यामध्ये रिक्षांची संख्या अंदाजे सुमारे 6000 हुन जास्त आहे. अनेक उच्च शिक्षित, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना शासकीय किंवा  खाजगी कंपनीत काम न मिळाल्याने स्थानिक बेरोजगार मराठी तरुण रिक्षा व्यवसायात उतरले आहे. निदान रिक्षा चालवुन तरि आपले पोट व कुटुंबाचा चरितार्थ चालविता येईल या आशेने नाइलाजाने स्थानिक मराठी तरुण रिक्षा चालवत आहेत मात्र 22 मार्च पासून करोना रोगामुळे संपूर्ण भारतात व महाराष्ट्रातही लॉक डाउन व संचारबंदी लागू झाल्याने इतर सर्वसामान्यांसह रिक्षा चालकही आर्थिक संकटात सापडले. लॉक डाउन काळात रिक्षा चालकांना परवानगी नसल्याने त्यांना विविध संकटाना सामोरे जावे लागत आहे. मुलाबाळांचा शिक्षणाचा खर्च, रिक्षा घेतल्याचा बँकेचा कर्ज त्याचे व्याज, हप्ते, आई वडील पत्नी मुलबाळ यांचा पालन पोषणाचा खर्च, आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यास हॉस्पिटलचा खर्च, गहु तादुळ,रेशन अन्न पाणी आदिचा खर्च भागविण्यासाठी रिक्षा चालकाने पैसे आणायचे कुठून ? या सर्वाचा ताण घरातील कर्ता असलेल्या कुटुंब प्रमुख असलेल्या रिक्षा चालकावर पडत आहे.या रिक्षा चालकांना कोणाचाच आधार नाही. आणि हे स्वाभिमानी रिक्षा चालक प्रामाणिक कष्ट करून आपली गुजराण करत असल्याने कोणापुढे हात पसरु शकत नाही.मात्र करोना रोगाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाउन काळात उरण मधील रिक्षा चालकांनी तहसील व पोलिस प्रशासनाला आपले रिक्षा बंद ठेवून सहकार्य केले.मात्र आता लॉक डाउन वरचेवर वाढत जात असल्याने रिक्षा चालकांची चिंता आता जास्त वाढली आहे. सर्व रिक्षा चालक रिक्षा घेताना वेगवेगळे टॅक्स भरतात. शासनाकडे विविध टॅक्स भरतात त्यामुळे शासनाने सामाजिक बांधीलकी जपत कुठेतरी आमचाही विचार करावा. शासनाने विविध सामाजिक संस्थानी रिक्षा चालकांच्या मदतीसाठी पुढे यावे अशी भावना उरण मधील रिक्षा चालक,नागरिक व्यक्त करत आहेत.अनेक रिक्षा संघटनेने शासनाकड़े पत्रव्यवहार करून रिक्षा चालकांना महीना 10,000 रुपये द्यावेत अशी मागणी केली आहे.पण अद्यापही कोणतेही अनुदान किंवा आर्थिक नुकसान भरपाई रिक्षा चालकांना मिळालेले नाही. कोणताही चांगला प्रतिसाद रिक्षा चालकांना मिळालेले नाही.घोर आर्थिक संकटात सापडलेल्या या स्थानिक भुमीपुत्र असलेल्या मराठी बेरोजगार तरुणांना शासना कडून तसेच विविध सामाजिक संस्थेकडूनही मदतीची,सहकार्याची अपेक्षा आहे.

 " लॉक डाउन काळात शासनाचे बस चालू आहेत, रेल्वे चालू आहेत, विमान सेवा चालू आहेत मग रिक्षा का चालू नाहीत. बस,रेल्वे,विमानात प्रवास केल्याने करोना होत नाही मग रिक्षात बसल्याने, रिक्षातुन प्रवास केल्याने करोना होतो का ? एकाला एक न्याय दुसऱ्याला दूसरा न्याय असे का ? सर्वांना समान न्याय व हक्क द्याना.नक्की शासनाला रिक्षा चालकांना  आर्थिक संकटातुन वाचवायचे आहे की अजुन आर्थिक संकटात जाणून बुजुन लोटायचे आहे ? शासनाने रिक्षा चालकांना 1/8/2020 पासून प्रवाशी  वाहतूक करण्यास परवानगी द्यावी असे आम्ही सर्व रिक्षा चालक मागणी करित आहोत"

-दिनेश हळदनकर
अध्यक्ष नवनिर्माण रिक्षा चालक मालक सेना,उरण

सोमवार, २७ जुलै, २०२०

जागर मंगळागौरीचा...


     श्रावण महिन्यात सण , उत्सव व दिवसांची भरपूर रेलचेल असते.  श्रावणात मंगळवारी मंगळागौर पुजनाची परंपरा व प्रथा आहे.  नवविवाहित तरूणींना सासरहून माहेरी आईकडे येण्यासाठी हा हक्काचा महिना असतो. माहेरी पहिला मंगळवार तर सासरी शेवटचा मंगळवार ' मंगळागौर करण्याची पध्दत आहे.  माहेरी आलेल्या तरूणीचा आनंद मंगळागौरीच्या समारंभात प्रकर्षाने जाणवतो. कसलंही बंधन नाही , भरपूर मौजमजा , खेळ,  गाणी,  विविध पदार्थांचा आस्वाद  आणि रात्री जागरण.. ........ मंगळागौर म्हणजे नुसती धमाल असते. नवविवाहित तरूणी लग्नानंतरची पाच वर्ष मंगळागौरीचं व्रत करतात. पहिल्या मंगळवारी मंगळागौर माहेरी व शेवटचा मंगळवारी सासरी ही रीत आहे. पाचव्या वर्षी आईला छानसे वाण देवून या व्रताचे उद्यापन केले जाते.  मंगळागौरीचे पुजन हे पत्री , फुले,  आघाडा , हळदी, कुंकू लावून,  पंचामृत वाहून केले जाते. देवीच्या नैवेद्यासाठी पुरणाचा स्वयंपाक करतात. या व्रतासाठी आलेल्या सर्व सवाष्णींना देवीचा प्रसाद म्हणून जेवण असते. जेवताना मुकं राहून फक्त स्वयंपाक उत्कृष्ठ झालायं हे खुणवायचं असतं.. अशी रीत आहे.  मग या सवाष्णींच्या भेटवस्तू देऊन ओटी भरतात. संध्याकाळी इतर बायकांना हळदीकुंकू साठी बोलवले जाते. आणि नंतर मनसोक्त खेळ,  गाणी अशी रात्र असते. मंगळागौरची रात्र जागविण्यासाठी झिम्मा,  फुगडीपासून गाठोडे , सून - सासू असे ऐंशी - नव्वद प्रकारचे खेळ आहेत. या खेळाचे  वैशिष्ट्य म्हणजे घरामधलीच वस्तू लागते. उदा - लाटणं , तवा , नारळाच्या करवंटया इत्यादी.वापरल्या जातात. उत्तर रात्री गाणी म्हणणे , भेंड्या खेळणे.आणि नंतर नाव घेण्याचा , अर्थात उखाण्यांचा कार्यक्रम रंगतो. साधारण पहाटे उत्तरपुजा करुन दहीभाताचा नैवेद्य दाखवून , देवीला कवळतात ( हलवतात ).आणि मग तिचे विसर्जन करतात. हळदीकुंकूवाच्या वेळी स्त्रियांना खिरापत , ओटी , अत्तर गुलाब, एखादः फुल किंवा गजरा , पिण्याचस दुध , चहा किंवा सरबत दिले जाते. मंगळागौरीच्या फराळाला  ' धान्य फराळ ' असेही म्हणतात.  यासाठी सर्व वस्तू कच्चाच भाजून घेतल्या जातात.  या फराळात मुख्यत्वे करून मसाले भात , लाडू , उसळ , भाजणीचे वडे , दही , चटणी,  कोशिंबीर इत्यादी पदार्थांचा समावेश असतो. पुऱ्या  व पोळ्यांसाठी कणीक देखील भाजूनच घेतात.

सौ.  स्नेहा मुकुंद शिंपी 
           नाशिक 
               मंगळागौरीची कथा - कुडीन गावात धर्मपाल आपल्या पत्नीसह राहत होता.  त्यांच्याजवळ सर्व सुख होती पण संतती नव्हती, म्हणून ते  अतिशय दु:खी होते. एक योगी पुरुष दररोज त्यांच्या दारासमोरून जात असे. मात्र निपुत्रिक असल्याने त्यांच्याकडून भिक्षा घेत नसे. या दोघांना याचे खूप वाईट वाटत असे. एके दिवशी त्यांनी लबाडीने  भिक्षा दिली. हे कळल्यावर योगी पुरुष खूप रागवला . त्याने शाप दिला.  " तुम्ही मला कपटाने   भिक्षा घातली, आता तर तुम्हाला मुळीच संतती होणार नाही."  हे ऐकताच त्या दोघांनी योगी पुरुषाचे पाय धरले , माफी मागितली आणि उ:शापाची याचना केली.  योगी प्रसन्न झाले आणि म्हणाले.  ' निळे वस्त्र नेसून,  निळ्या घोड्यावर बसून जंगलात जा . ज्या दिवशी घोडा  थांबेल , तिथे जमिन खण. तुला एक देवीची मूर्ती मिळेल. तिची तू सांग्रसंगीत पुजा अर्चना कर. ती प्रसन्न होईल. ' पती - पत्नीने तसेच केले. त्यांच्या आराधनेने देवी प्रसन्न झाली. तिने त्यांना पुत्रप्राप्तीचा वर दिला. मात्र,  तो पुत्र अल्पयूषी असेल हेही सांगितले.  त्यांना पुत्र होताच त्याचे नाव शिव ठेवले.  पुढे त्याची मुंज केली. लग्न करण्यापुर्वी एकदा काशी विश्वेश्वराचे दर्शन घेण्यासाठी हे पिता - पुत्र तिथल्याच धर्मशाळेत उतरलेत. आवारात काही मुली खेळत होत्या.  त्यांच्यात भांडण झाले.  आणि एका मुलीने अपशब्द काढल्यावर , सुशीला नावाच्या मुलीने  लगेच तिला उत्तर देत म्हणाली,'' कुणीही मला अपशब्द बोलू नये. माझी आई मंगळागौरीचे व्रत करते. त्यामुळे सौभाग्य अखंड राहते''. हा संवाद धर्मपालने ऐकला आणि याच मुलीला सून करायचे ठरवले. त्यानुसार सून करून घरीही घेऊन आला. एके दिवशी सुशीलाच्या स्वप्नात मंगळागौरी देवी आली आणि म्हणाली,  '' तुझ्या पतीला दंश करण्यासाठी साप येत आहे.  त्याला पिण्यासाठी थोड  दुध ठेव. ते पिण्यासाठी गेल्यावर तू त्या घड्याचे तोंड कपड्याने बंद कर.आणि तो घडा सकाळी आईला वाण म्हणून दे. "" सुशीलाने देवीने सांगितल्या प्रमाणे तसेच  केले.  सकाळी घडा आईला दिला , त्यात  रत्नाचा हार होता. काही दिवसांनी यमदूत शिवाचे प्राण घेण्यासाठी आल्यावर मंगळागौर देवीने युद्ध केले.  यमदूत पराभूत होऊन माघारी परतला आणि शिवाचे प्राण वाचले व सुशीलाचे सौभाग्य अखंड राहिले. तेव्हा पासून मंगळागौरीचे  व्रत स्त्रिया करतात. 

खांदा कॉलनीत शिवसेना आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीर यशस्वीरीत्या संपन्न



पनवेल /वार्ताहर -
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उध्दव ठाकरे साहेब याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख मा.श्री लीलाधर भोईर यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खांदा काॅलनीतील नागरीकांसाठी थर्मल टेम्परेचर तपासणी आणि ऑक्सिमीटरच्या साह्याने ऑक्सिजन लेवल तपासणी साठी शिबिर ठेवण्यात आले. या शिबिराची सुरुवात खांदा काॅलनीतील सर्वात मोठी सोसायटी असणाऱ्या प्रबोधन सोसायटीतून करण्यात आली.
     या प्राथमिक तपासणी शिबिरादरम्यान शिवसेनेचे खांदा काॅलनीतील शहर प्रमुख सदानंद शिर्के, उप शहर प्रमुख दत्तात्रेय महामुलकर , विभाग प्रमुख जयंत भगत, शाखा प्रमुख विजय कोलते,सचिन धाडवे, उप शाखा प्रमुख विकास गुंड, माजी उप विभाग प्रमुख संजीव गमरे,संजय कांबळे (बाळा), सोसायटीचे खजिनदार शशिकांत सोनावणे, उपाध्यक्ष विजय महागंडे,भास्कर साळवी, राजेन्द्र तारेकर, पुंडलीक म्हात्रे, संतोष जाधव संजय कदम उपस्थित होते

संकल्प ट्रस्टतर्फे एक हात मदतीचा




अलिबाग (प्रतिनिधी) कोरोना व्हायरस कोव्हिडं - १९ वैश्विक महामारी तसेच निसर्ग चक्रीवादळ या दुहेरी आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या व बेरोजगारीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या ग्रुपग्रामपंचायत बोरघर हद्दीतील "गंगेची वाडी" या आदिवासी वाडीत चेंबूर येथील विनोदजी हिवाळे संचालित "संकल्प ट्रस्टने" मदतीचा हात पुढे करत वाडीमधील सर्व ६० परिवारांस राशन किट, कोलगेट, फेसमास्क, सॅनिटरी पॅड अश्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप प्रत्यक्ष वाडीवर जाऊन केले सदर वाटप संकल्प ट्रस्टचे अध्यक्ष विनोद हिवाळे, ट्रस्टचे सदस्य विक्रम हिवाळे, राहुल कटारे, अमोल हिवाळे, मनीष हिवाळे तसेच बोरघर ग्रुपग्रामपंचायतचे माजी सरपंच मधुकर ढेबे, माजी सरपंच पुष्पा लेंडी, जिल्हापरिषद सदस्य मधु पारधी, ग्रामपंचायत सदस्य नारायण पिंगळे, पुरोगामी युवक संघटना अलिबाग सदस्य उत्तम रसाळ यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
      हातावर पोट असणाऱ्या आदिवासी बंधू-भगिनींना लॉकडाऊनमुळे बेरोजगारी व उपासमारीचा सामना करावा लागत असताना संकल्प ट्रस्टने केलेल्या मदतीमुळे साऱ्यांनाच गहिवरून आले सदर वाटपानंतर अध्यक्ष विनोदजी हिवाळे यांनी उपस्थितीतांस कोरोना बचावात्मक उपाययोजना, सोशल डिस्टनसींग व स्वयंम सुरक्षा यावर मार्गदर्शनात्मक माहिती देत उपस्थित लाभार्थी व मान्यवरांचे आभार व्यक्त केले तसेच सदर कार्याचे स्थानिक पातळीवर सुयोग्य नियोजन केल्याबद्दल उत्तम रसाळ तसेच संकल्प ट्रस्टने सदर मदत करावी असे आव्हान केल्याबद्दल प्रवीण रा. रसाळ यांचे विशेष आभार व्यक्त केले.

मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वैद्यकीय वस्तूचे वाटप


मुंबई / वार्ताहर : 

     जोगेश्वरी विधानसभा क्षेत्र शिवसेना आमदार माजी राज्यमंत्री मा.श्री.रविंद्र द.वायकर  व विभाप्रमुख/आमदार मा.श्री.सुनिल प्रभू  यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षप्रमुख माननीय उध्दवजी ठाकरे यांच्या आज २७ जूलै रोजी साजरा होणाऱ्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शाखा क्र.७७ व स्थानिक शिवसेना कार्यसमा् ट नगरसेवक यांच्या माध्यमातून संध्याकाळी ठिक ७.३० वा.स्वप्नपूर्ती श्री गणेश प्रतिष्ठान सभागृहात कोकण नगर विभागातील 1 ते 10 अ,ब,क सोसायटीतील सभासदांना मास्क व साँनेटाइझर व  सोसायटी करिता ५ लीटर  सॅनिटायझर कँन वाटप कार्यक्रंमाचा शुभारंभ स्थानिक शिवसेना नगरसेवक मा.श्री.अनंत(बाळा) नर
,स्थानिक शाखाप्रमुख मा.श्री.नंदकुमार ताम्हणकर व शाखासमन्वयक श्री.उदय हेगिष्टे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
      या  प्रंसगी  स्थानिक उपशाखाप्रमुख श्री.सुनिल म्हसकर, श्री.सुधाकर आयरे, श्री.रामचंद्र धावरे,(अध्यक्ष स्वप्नपूर्ती श्री.गणेश प्रतिष्ठान) श्री.शकंर  शितप,कदम,गटप्रमुख अविनाश रासम,सुर्यकांत पाटील, दिनेश काबंळी, राकेश खामकर,उमेश गायकवाड, दिनेश कुळ्ये, संतोष कोळसुंमकर,मंगेश आंबेकर, श्री.आदित्य थेराडे,प्रकाश सावंत,शिरीष चव्हाण, रोहन बंदरकर,माने(उपशाखा संघटक भा.वि.सेना) श्री.अमरदिप महाडिक(युवासेना उपशाखाधिकारी)तसेच कोकण नगर विभागातील 1ते 10 अ,ब,क, सोसायटीतील कार्यकारिणी पदाधिकारी उपस्थित होते.

गरजूंना देण्यासाठी शाखाप्रमुखांकडे छत्र्या सुपूर्द


मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार व माजी राज्यमंत्री श्री रविंद्र वायकर यांनी जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील गरजूंना मोफत  छत्र्या देण्यासाठी सर्व शाखाप्रमुखांकडे छत्र्या सुपूर्द केल्या.
    याप्रसंगी विधानसभा संघटक विश्वनाथ सावंत, उपविभाग प्रमुख के एल पाठक, जितेंद्र वळवी, जयवंत लाड, बाळा साटम,  शाखाप्रमुख अमर मालवणकर, संदीप गाढवे, प्रदीप गांधी, नंदू ताम्हणकर, मंदार मोरे, नितीश म्हात्रे,  शाखा समन्वयक व स्वीय सहाय्यक उमेश कदम, स्वीय सहाय्यक अनिल म्हसकर आदी उपस्थित होते.

नवभारत हायस्कूल कुसूर* येथे मोफत ई लर्निग किट, लॅपटॉप आणि प्रिंटर वाटप कार्यक्रम संपन्न ; साई एज्युकेअर फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम...!

वैभववाडी - कुसूर गावातील माध्यमिक शाळा, नवभारत हायस्कूल येथील विद्यार्थ्यांसाठी साई एज्युकेअर फाउंडेशन (रजि.) या संस्थेतर्फे (CSR Initiative...