आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, ३० जून, २०२०

एस.एन.डी.टी महिला विद्यापीठच्या समाजकार्य विभागाच्या विद्यार्थिनीची लोकसहभागातून पर्यावरण सेवा

मुंबई /लक्ष्मण राजे :
      पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या पोचाडे गावतील एस.एन.डी.टी महिला विद्यापीठच्या समाजकार्य विभागात शिकत असलेल्या कु. विजया गवळी ह्या विद्यार्थिनीने तिच्या गावातील आदिवासी बांधवांना एकत्र करुन सुमारे विविध प्रकारच्या ३० प्रजतींचे वृक्षारोपण करून एक वस्ती पातळीवर कार्य करण्यचा वस्तुपाठ घालुन दिला आहे.
     सध्या लॉकडाउन च्या काळात समाजकार्य अभ्यास्क्रमात समुदाय संघटन ह्या विषयातून वस्ती पातळीवर कसे कार्य करायचे हे विजया गवळी शिकली होती परंतु तिच्यातील सामजिक कार्यकर्ता तिला स्वस्थ बसू देत नव्हता . तिने सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून ह्या सामजिक उपक्रमाला मूर्त स्वरूप देण्याचा निर्णय घेतला.
ह्या सामजिक उपक्रमात क्षेत्रकार्य पर्यवेक्षक श्री. रत्नाकर खैरे ह्यांनी तिला वेळोवेळी मार्गदर्शन केले.समाजकार्य अभ्यास क्रमाचे वैशिष्ट म्हणजे समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी तसेच संवेदनशील विषयांवर अभ्यास करुन उपाय योजना करणे आणि विभागा तर्फे विद्यर्थिनिंना सतत प्रोत्साहन दिले जाते असे विभागप्रमुख प्रा. डॉ. आशा पाटील यांनी व्यक्त केले.

तर सुखावेल विठुराया ....

"आषाढी एकादशी" ( निमित्त विशेष लेख... 



       यंदा पंढरी दुमदुमणार नाही. चंद्रभागेच्या तीरावर ओसंडून वाहणारी गर्दी दिसणार नाही. वातावरणात निरव शांतता असेल. प्रथा-परंपरा पाळल्या जातीलही , पण त्याला तितकंसं महत्त्व नाही. ते उगीच आपले नित्याचे सोपस्कार. त्यापलीकडे जाऊन आज विशेष काही घडायला हवं. तरच पंढरीचा पहिला वारकरी, कुणाचा विठुराया - तर कुणाची विठाई मनोमन सुखावेल.
       वाचायला थोडं विचित्र वाटेल. आधीच कोरोनाच्या भीतीने धर्मस्थळांची कवाडं बंद झालीत. संकटकाळी जिथे नवस-सायास करायला गर्दी व्हायची ती सगळी ठिकाणं शांत झालीत. अशावेळी भक्तांविना भगवंत काय कामाचा? असंही वाटू शकेल क्षणभर. पण त्यात काही तथ्य नाही. चराचरात व्यापलेल्या परमेश्वराला एका मूर्तीत सीमित बघण्याचा करंटेपणा आपण कशाला करायचा? त्यापेक्षा या निमित्ताने का होईना पण आपणच आपल्या समजुती तपासून पाहायला नको का?
पंढरपूरचा विठोबाच मुळात भक्त पुंडलिकाच्या भेटीसाठी युगानुयुगे ताटकळत उभा असलेला देव. पुंडलिकाला काही आई-वडिलांच्या सेवेतून उसंत मिळत नाही, आणि आपल्या या सावळ्या विठ्ठलाला विटेवरून खाली उतरायची सोय नाही. भक्ताच्या बंधनात अशा प्रकारे बद्ध असलेल्या - विठ्ठलाच्या दर्शनासाठी हजारोंच्या जथ्थ्याने कामधाम मागे सोडून गर्दी करावी, हा विरोधाभासच नाही का? भक्ती खरी असेल. अंतरातून हाक उमटली असेल, तर तोच धावत येईल आपल्यापाशी. आणि तसे नसेल तर हजारो मैल चालत जाऊन तरी काय साधणार आहोत आपण?
        'कांदा मुळा भाजी । अवघी विठाई भाजी ।।' म्हणणारे सावता माळी असोत, वा थेट विठू माऊलीलाच दळण-कांडण करायला लावणारी नामयाची जनी असो; आपल्या संत परंपरेने कर्मातील भक्तीच अधोरेखित केली आहे. आपले कर्तव्य-कर्म निष्ठेने करीत जावे, तेच आपले हरीभजन. निरंतर सचोटीचा, सहृदय व्यवहार हीच उपासना. बाकी कर्मकांडाची गरजच काय? हाच तर त्या गाथेचा न बुडणारा मतितार्थ. 
      दुर्दैवाने आज प्रतिकांचीच प्रतिमा इतकी मोठी झाली आहे की, त्यामागचं तथ्य नजरेआड व्हावं. ज्यांनी आयुष्यभर बुवाबाजी - भोंदूगिरीवर ओरखडे ओढले, पुढे जाऊन त्यांनाच चमत्काराचे ग्रहण लागले. विचार मागे पडला आणि व्यक्तिमाहात्म्य वाढले. त्याबद्दल कधीतरी थोडे थांबून विचार करण्याची गरज होती. आज काळाच्या फटकाऱ्यात वारी भोवतीचा कोलाहल थोडासा शांत झालाय. ही कदाचित आपल्यासाठी अंतर्मुख होण्याची एक संधीच आहे. 
   वारी ही तशी शतकानुशतकांची परंपरा. 'ज्ञानदेवें रचिला पाया। तुका झालासे कळस।' अशी भागवत संप्रदायाची व्याप्ती सांगितली जाते. पण वारी तर त्याही आधीपासून प्रचलित आहे. स्वतः ज्ञानेश्वरांचे वडील सुद्धा वारीला जात असल्याचे सांगितले जाते. पण ती वारी निराळी होती. प्रपंचापोटी जागोजागी विखुरलेल्या भावंडांनी घराच्या ओढीने धावत यावे, इतकी सोज्वळता त्यात होती. पंढरीचा वास, चंद्रभागेस्नान, आणिक दर्शन विठोबाचे', बस्स इतकंच. काही मागणं नाही, किंवा दाखवणंही नाही. प्रवासाच्या फारशा सुखसुविधा नसतानाही ही वारी चालत राहिली. कारण, ही वारी जेवढी पाऊल वाटांनी चालत गेली, त्याहून कैकपटीने अधिक ती अंतःकरणातून उजळत राहिली. 'देव भावाचा भुकेला', त्यात कसा खंड पडणार?
     अलीकडे मात्र वारीचा इव्हेन्ट झाला होता. आजही मनातून वारी चालणारे अनेक असतील, पण त्यांच्यापेक्षा बाजारबुणग्यांचाच जास्त कोलाहल झाला होता. 'एक तरी वारी अनुभवावी' म्हणतात, पण इथे नेमका तो 'अनुभूतीचा धागा'च विसविशीत होऊ लागला होता. भक्तीचं नुसतंच प्रदर्शन मांडण्याकडे अनेकांचा कल होता. प्रपंचात अनेकदा ऐहिक बडेजावाला भुलून धावत सुटतोच आपण, पण परमार्थातही तसेच वागून कसे चालेल? कदाचित म्हणूनच विठुरायाने यंदा पंढरीचे दरवाजे लावून घेतले. पण म्हणून त्याने आपल्याकडे पाठ फिरवली, असा याचा अर्थ होत नाही. 'संगे गोपाळांचा मेळा' घेऊन उभा असलेला लेकुरवाळाच तो. त्याला माहीत आहे, कुणाला कसं जागं करायचं?  पाठीत धपाटा घालते, म्हणजे आईचं प्रेम आटलं असं समजण्याचं कारण नाही. पंढरपूरच्या देवळाचे द्वार बंद असेल, पण चराचरातून तो आपल्या साथीस आहे. आपल्या आजूबाजूलाच विखुरलेला आहे, म्हणून तर आपण अजूनही टिकून आहोत. आता फक्त आपण त्याला ओळखू शकलो, म्हणजे अंतरीची वारी सफल झाली समजायचं. मग तो ही सुखावेल, नाही का?

- सृष्टी उन्मेष गुजराथी



रविवार, २८ जून, २०२०

सौंदर्याचे मापदंड बदलायला हवेत

फेअर अँड लव्हलीची जाहिरात आपण लहानपणापासून पाहत आहोत. फेअर अँड लव्हलीची क्रीम लावली की सावळा वर्ण असलेली व्यक्ती काही दिवसांत गोरी होती असा त्या जाहिरातीचा अर्थ आहे. गेली कित्येक वर्ष ही जाहिरात आपण पाहत आहोत. या जाहिरातीला भुलून लाखो लोक या क्रीमचा वापर करतात. प्रत्येक घरात ही क्रीम वापरली जाते. पण ही क्रीम वापरल्याने कोणी सावळ्या वर्णाची व्यक्ती गोरी झाल्याचे एकही उदाहरण नाही. मध्यंतरी या जाहिरातीवर बंदी आणा अशी जनहित याचिकाही दाखल झाली होती पण ही जाहिरात आणि कंपनीचा दावा कायम होता. पण मागील महिन्यात अमेरिकेत एका कृष्णवर्णीय व्यक्तीला गौरवर्णीय पोलिसांकडून ठार मारण्यात आले तेंव्हा या घटनेचा तसेच वर्णभेदाचा निषेध म्हणून संपूर्ण जगात आंदोलने होऊ लागले भारतातही आंदोलने झाली. या घटनेने अखेर हिंदुस्थान लिव्हर या कंपनीला जाग आली आणि तिने आपल्या फेअर अँड लव्हलीच्या जाहिरातीतून फेअर हा शब्द काढण्याचा निर्णय  घेतला. उशिरा का होईना पण हा निर्णय घेतल्याबद्दल हिंदुस्थान लिव्हरचे अभिनंदन करायला हवे. मार्केटचा फंडा म्हणून त्यांनी ती जाहिरात केली असली तरी त्यामुळे अनेकांची फसवणूकझाली आहे तसेच सावळ्या वर्णाच्या व्यक्तींच्या मनात एकप्रकारचा न्यूनगंड निर्माण  झाला आहे.  आपल्याकडील लोकांना गोऱ्या रंगाचे पूर्वीपासून आकर्षण आहे. खरंतर आपला देश हा सावळ्या रंगांच्या लोकांचा देश आहे. युरोपियन लोक तर आपल्याला सरळ सरळ ब्राउन किंवा ब्लॅक सुद्धा म्हणून मोकळे होतात. इंग्रज तर आपल्याला ब्लॅक इंडियन म्हणून हिनवत होते. इंग्रज गेले पण आपल्याला गोऱ्या रंगाचे वेड लावून गेले आजही हे वेड कमी व्हायला तयार नाही. गोरं म्हणजेच सुंदर असा समज आपल्याकडे आढळतो म्हणूनच  लग्नासाठी मुलांची पहिली अट असते ती म्हणजे मुलगी गोरी हवी. त्यामुळे सावळ्या वर्णाच्या अनेक मुलींची लग्ने लवकर जमत नाही ही आपल्या देशातील वास्तविकता आहे. गोऱ्या रंगांना आपल्याकडे इतके अवास्तव महत्व दिले जाते की सावळ्या रंगांच्या मुलांमुलींना आपल्यात काही उणीव आहे असे वाटू लागते. खरंतर सावळ्या रंगावर फीचर्स जास्त उठून दिसतात. पण आपल्याकडे गोऱ्या रंगाची इतकी क्रेझ आहे की लोक आपल्या त्वचेचा रंग उजळण्यासाठी खूप प्रयत्न  करतात.  फेअर अँड लव्हली क्रीम लावणे हा त्याचाच एक भाग. वास्तविक फेअर अँड लव्हलीची जाहिरात हा मार्केटचा फंडा होता त्याचा आणि गोरेपनाचा काही संबंध नव्हता हे आतातरी लोकांनी लक्षात घ्यावे. त्वचेच्या सौंदर्यापेक्षा मनाचे सौंदर्य महत्वाचे आहे.  त्यामुळेच काळा, सावळा, गोरा हे केवळ रंग आहेत त्याचा माणसाच्या दिसण्याशी  आणि बुद्धिमत्तेशी काही संबंध नाही. तसे असते तर एकही कृष्णवर्णीय मुलगी सौंदर्य स्पर्धेत पहिली आली नसती. मिस युनिव्हर्स व मिस इंडिया यासारख्या सौंदर्याच्या मापदंड असणाऱ्या स्पर्धा अनेक कृष्णवर्णीय मुलींनी जिंकल्या आहेत. भारतीय लोकांनी आतातरी सौंदर्याचे आपले मापदंड बदलायला हवेत. लोकांनी आतातरी हे मनापासून  स्वीकारायला हवे


- श्याम बसप्पा ठाणेदार
 दौंड जिल्हा पुणे 

कल्याण पूर्व मध्ये मनसे महिला आघाडीतर्फे ऑनलाईन चित्रकला स्पर्धेच्या विजेत्यांचा सत्कार व ट्रॉफीचे वाटप






प्रकाश संकपाळ :

कल्याण - कोरोनामुळे मुले त्रस्त झाल्याने मनसेच्या प्रभाग क्रमांक ९६च्या शाखाध्यक्षा सौ.सुरेखा जगताप यांच्या माध्यमातून स्थानिक मुलांना दिलासा देण्यासाठी व त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिनांक १४ जून,२०२० रोजी प्रभाग क्रमांक ९६ च्या वतीने मनसेने ऑनलाईन चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते.यामध्ये शेकडो मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

या स्पर्धेत सहभागी होणारे  स्पर्धक घरातच बसून स्पर्धेत सहभागी झाले होते.

      सध्या कोरोनाचा काळ आहे. लॉकडाऊनमुळे स्थानिक मुलं घरात बसून निश्चितच कंटाळले होते,घरात राहून कोरोनाशी लढा देत होते. या मुलांना विरंगुळा व्हावा आणि त्याच्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळावा याहेतूने  मनसेच्या महिला आघाडी शाखाध्यक्षा सौ.सुरेखा जगताप यांनी ऑनलाईन चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती
    विजेत्या स्पर्धकांचा सत्कार करून त्यांना उत्तेजनार्थ बक्षीस व ट्रॉफीचे वाटप करण्यात आले.यशस्वी स्पर्धकांमध्ये प्रसाद गुंजाळ,रुद्र पांडे,रतनेश पांडे,अनुप गौड ,शर्वरी कदम, शैरी फर्नांडिस,अम्रुत अम्बुल्कर कनिष्क कांबळे,प्राची डोईफोडे,ओम डोईफोडे, चंचल कारंडे,पायल भागवत,ध्रुव शेठ, वैष्णवी मयेकर,शुभम मयेकर, रुद्र जगताप,श्री जगताप, ग्रिष्मा हसबे,खुशी गुप्ता, श्रेया भालेराव, श्रुति भालेराव,आयुष्य गुप्ता व  जान्हवी गायकवाड यांचा समावेश होता.
यावेळी मुलांना आर्सेनिक आल्बम गोळ्या,उत्तेजनार्थ बक्षीस आणि प्रथम क्रमांकास ट्रॉफी अशा स्वरूपात वाटप करण्यात आले.
     या कार्यक्रमाप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्षा सौ.स्वाती कदम, जिल्हा सहसचिव श्रेया भांबीड, विभाग अध्यक्षा सुधा शहा,शाखाध्यक्षा ज्योती बनकर,मनीषा गुंजाळ,शाखाध्यक्ष विनायक पाटिल व गणेश गुंजाळ तसेच इतर नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन शाखाध्यक्षा सौ.सुरेखा जगताप यांनी केले होते.

शुक्रवार, २६ जून, २०२०

आदर्श राजा -छत्रपती शाहू महाराज

आज २६ जून, राजर्षी शाहू महाराजांची जयंती. आजच्याच दिवशी १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव तर आईचे नाव राधाबाई. कोल्हापूर ( करवीर) संस्थानचे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर महाराणी आनंदीबाई यांनी कोल्हापूरच्या गादीचे वारसदार म्हणून त्यांना १७ मार्च १८८४ रोजी दत्तक घेतले कारण  चौथे छत्रपती शिवाजी यांना मुलबाळ नव्हते. दत्तक घेतल्यावर त्यांचे छत्रपती शाहू महाराज असे नामकरण करण्यात आले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर २ एप्रिल १८९४ रोजी ते कोल्हापूरच्या गादीवर विराजमान झाले. राज्याभिषेक झाल्यानंतर १९२२ पर्यन्त म्हणजे २८ वर्ष ते कोल्हापूर संस्थानचे राजे होते. छत्रपती शाहू महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढे चालवला. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच त्यांनी राज्यकारभार केला म्हणूनच ते राजर्षी बनले. ते खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते होते. बहुजन समाजाला मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढून, तत्कालीन रूढी परंपरा नाकारून त्यांनी कोल्हापूर संस्थांनामध्ये अनेक सामाजिक सुधारणा केल्या. शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षण प्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. शिक्षणाचे महत्व ओळखणारे देशातील पहिले राजे हे छत्रपती शाहू महाराज हेच  होते. राज्यातील निरक्षर, गरीब,दलित,  अस्पृश्य या बहुजन समाजातील लोकांना शिक्षण दिले तरच सर्वांगीण विकास होईल हे ओळखून त्यांनी समाजातील वंचित, दुर्लक्षित वर्गातील मुलांसाठी वसतीगृहे काढली. विविध जाती धर्मातील मुलांसाठी त्यांनी २२ वसतीगृहे स्थापली त्यात शेकडो मुले शिकली. शिक्षण क्षेत्रात मुलींची संख्या वाढली पाहिजे या हेतूने त्यांनी मुलींना ४० रुपये स्कॉलरशिप सुरू केली. ब्रिटिश सरकार शिक्षणावर वार्षिक ८० हजार रुपये खर्च करीत असताना कोल्हापूर संस्थानचा शिक्षणावरील वार्षिक खर्च हा एक लाख इतका होता. यातच शाहू महाराजांची शिक्षणाविषयी किती तळमळ होती हे दिसून येते.अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी त्यांनी सुवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरावण्याची दृष्ट पद्धत रद्द केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला करावा यासाठी शिक्षण देणाऱ्या पाटील शाळा, तंत्रे व कौशल्ये शिकवणाऱ्या शाळा त्यांनी सुरू केल्या. मागासलेल्या लोकांना प्रगतीच्या प्रवाहात आणायचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे हा व्यापक विचार डोळ्यासमोर ठेवून ६ जुलै१९०२ रोजी कोल्हापूर संस्थानात मागास जातींना ५० टक्के जागा राखीव ठेवल्या म्हणूनच त्यांना आरक्षणाचे जनक असे म्हणतात. शाहू महाराज्यांच्या या निर्णयाला तेंव्हा खूप विरोध झाला पण विरोधाला न जुमानता त्यांनी  या आरक्षणाची कठोर अंमलबजावणी केली. शाळा, दवाखाने, पाणवठे, अशा  सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यांशी समतेने वागावे त्यांच्याशी कोणीही भेदभाव करू नये असा आदेश त्यांनी काढला. १९१७ साली विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. त्यांनी देवदासीची घातक प्रथा बंद केली. बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी १९१६ साली निपाणी येथे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. जातिभेदाची प्रथा नष्ट व्हावी म्हणून त्यांनी कोल्हापूर संस्थानात आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहास कायदेशीर मान्यता दिली. इतकेच नाही तर आपल्या चुलत बहिनेचे लग्न धनगर समाजातील यशवंतराव होळकर याच्याशी लावून दिले. छत्रपती शाहू महाराजांनी स्पिनींग अँड व्हीविंग मिल, शाहूपुरी व्यापारपेठ, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था, राधानगरी धरणाची उभारणी, शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देणे असे अनेक उपक्रम आपल्या संस्थानात राबवले. त्यांनी शेतीच्या आधुनिकीकरणासाठी संशोधनाला पाठींबा दिला. नगदी पिके आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी त्यांनी किंग एडवर्ड ऍग्रीकल्चर इन्स्टिट्यूट ची स्थापना केली. चित्रकला, लोककला, संगीत, साहित्य, नाट्य,  कुस्ती या क्षेत्रातील कलावंतांना त्यांनी राजश्रय मिळवून दिला. शाहू महाराज आणि डी बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध सर्वश्रुत आहे. बाबासाहेब मॅट्रिकमध्ये असताना आणि नंतर कोलंबिया युनिव्हर्सिटीत शिकत असताना त्यांनी बाबासाहेबांना स्कॉलरशिप दिली. २० आणि २१ मार्च२०२० रोजी माणगाव येथे अस्पृश्यता निवारण  परिषदेत शाहू महाराजांनी बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करून कोल्हापूरच्या राजवाड्यात त्यांना जेवणाचे निमंत्रण दिले. डॉ बाबासाहेबांनी मूकनायक हे साप्ताहिक सुरू केले पण आर्थिक अडचणीमुळे पुढे ते बंद करावे लागले. जेव्हा हे शाहू महाराजांना समजले तेंव्हा त्यांनी २५०० रुपयांची आर्थिक मदत देऊन हे साप्ताहिक पुन्हा सुरू केले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा समर्थपणे घेऊन जाण्याचे कार्य करणारा एक मानवतावादी राजा म्हणून शाहू महाराजांची इतिहासात नोंद आहे. व्यापक दूरदृष्टीच्या या राजाने त्याकाळी राजेशाही असूनही सामाजिक बंधुभाव, समता, दलित व उपेक्षितांचा उद्धार, शिक्षण, शेती,उद्योगधंदे, कला, क्रीडा, आरोग्य या क्षेत्रामध्ये जे कार्य केले आहे तसे कार्य आजवर कोणालाही करता आले नाही. त्यांचे कार्य आजच्या आणि येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक आहे. आज त्यांचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो एकप्रकारे ही त्यांच्या कार्याला दिलेली मानवंदनाच आहे. जयंतीदिनी  छत्रपती शाहू महाराजांना विनम्र अभिवादन! 

-श्याम बसप्पा ठाणेदार 
दौंड जिल्हा पुणे

गुरुवार, २५ जून, २०२०

समत्व ट्रस्ट ठाणेच्या वतिने अंत्रवली व हेदली गावी जिवनावश्यक वस्तुचे वाटप ; ट्रस्टचे अध्यक्ष संतोष कांबळे यांच्या हस्ते ६५ कुटुंबिंयाना केले वाटप


मुंबई(शांत्ताराम गुडेकर/संदेश जिमन )


             अंत्रवली गावचे सुपुत्र समत्व ट्रस्टचे अध्यक्ष हे ट्रस्टच्या माध्यमातुन तालुक्यात वेग वेगळे ऊपक्रम राबवुन सामाजिक बांधिलकी जपत असतात. प्रतिवर्षी गरजु शालेय विद्यार्थ्याना मोफत वस्तुचे वाटप या ट्रस्टच्या माध्यमातुन करत करतात.मुलाना गणवेश , छत्री ,वह्या ,पुस्तके दप्तर आदी बरोबर अगदी काही मुलांची शैक्षणिक फी भरण्याचे कामही ही संस्था करते. सध्या कोरोना सारख्या महामारीने संपुर्ण देश त्रस्त झाला असुन अनेकाना आपल्या नोकर्‍या गमवाव्या लागल्याने बहुसंख्य चाकरमानी गावी आले आहेत . कामधंदा नसल्याने गावी आल्याने एकवेळ जेवणाची पंचाईत झाली असल्याने अनेकजण चिंतेत आहेत. अशाच अंत्रवली व हेदली गावातील ६५ चाकर मानी कुटुंबाना जिवनावश्यक वस्तुचे वाटप करुन या संस्थेने सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यावेळी ट्रस्ट चे अध्यक्ष संतोष कांबळे, नरेंद्र खानविलकर, गणपत दाभोलकर ,रुपेश कांबळे आणि रेश्मा वाझे उपस्थित होते

नगराध्यक्षांची साद, पेणकरांचा प्रतिसाद : आजपासून पेणमध्ये चार दिवस कडकडीत बंद ; कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पेणकर सज्ज

पेण  -

 ६० दिवसांच्या लॉकडाऊनच्या काळात पेणमध्ये एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही मात्र सरकारने लॉकडाऊनचे नियम शिथिल केले आणि गेल्या १५ दिवसांपासून पेण शहरामध्ये कोरोनाचे अनेक रुग्ण सापडले त्यामुुुळे समस्त पेणकरांमध्ये दहशतीचे वातावरण झाले आहे. तरीही मात्र काही नागरिक पेेेेेणमध्ये विनाकारण गर्दी करत आहेत. 
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी काही सुजान पेणकर जनता कर्फ्यूची मागणी करीत होते. मात्र सरकाने दिलेल्या अटी आणि नियमामुळे जनता कर्फ्यू जाहित करु शकत नव्हते. मात्र पेण नगरीच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी पुढाकार घेऊन आज गुरुवार दिनांक २५ जून पासून रविवार दिनांक २८ जून पर्यंत पेणमध्ये आपण स्वयंस्फूर्तीने बंद पाळूया असे जनतेला आवाहन केले. त्यावाहनाला पेणमधील सर्व व्यापाऱ्यांनी साथ देऊन आज चांगल्या प्रकारे जनता कर्फ्यूचे पालन केलेले दिसत होते.

यावेळी नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी शहरातील नागरिकांनी आणि सर्वच स्तरातील व्यापाऱ्यांनी, दुकानदारांनी आवाहनाला जी साथ दिली त्याबद्दल सर्वांचे आभार मानून पुढील तीन दिवस देखील असेच सहकार्य करून कोरोनाची शहरातील साखळी तोडून कोरोनाला पेणमधून हद्दपार करुया असे सांगितले.

बुधवार, २४ जून, २०२०

बळीराजाच्या मागे संकटाची मालिका

कोकणातील बळीराजाच्या मागे लागलेली संकटाची मालिका काही केल्या थांबेना. लॉक डाऊन आणि निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याने हतबल झालेल्या कोकणातील बळीराजाच्या पुढे आणखी एक नवे संकट आले आहे. कोकणातील बळीराजाने पावसाळा सुरु होण्यापूर्वीच आपल्या शेतात भातरोपांची लावणी केली होती. कोकणातील बळीराजा भात बियाणांची लावणी करून पावसाची वाट पाहत असताना ३ जून रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने सर्वांचे कंबरडे मोडले. निसर्ग चक्रीवादळात समुद्राला आलेल्या भरतीत समुद्राचे खारे पाणी शेतात शिरल्याने भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात समुद्राचे खारे पाणी शिरल्याने भात बियाणे वाया गेल्याने संपूर्ण हंगामच हातचा गेला आहे त्यामुळे बळीराजा चिंताक्रांत झाला आहे. समुद्राचे खारे पाणी सुमारे साडे तीनशे हेक्टर शेतात शिरल्याने तेवढी जमीन नापीक होण्याची भीती निर्माण झाली आहे. खाडीचे पाणी शेतात येऊ नये म्हणून खारभूमी विभागाकडून खाडीच्या मुखाजवळ स्वयंचलित दरवाजे लावण्यात येतात. भरती ओहोटीच्या वेळी समुद्राचे खारे पाणी शेतात शिरू नये हे दरवाजे लावण्यात येतात पण निसर्ग चक्रीवादळात यातील काही दरवाजे तुटल्याने समुद्राचे खारे पाणी थेट शेतात शिरले. कर्ज काढून बळीराजाने भात बियाणे आणले होते आता हातचा हंगाम गेल्याने हे कर्ज कसे फेडायचे तसेच हा हंगाम गेल्याने घर संसार कसा चालवायचा या विवंचनेत कोकणातील बळीराजा सापडला आहे. बळीराजाला या विवंचनेतून बाहेर काढायचे असेल तर सरकारने कोकणातील बळीराजाला मदतीचा हात द्यावा. ज्या शेतकऱ्यांचा शेतात समुद्राचे खारे पाणी शिरले आहे अशा शेतकऱ्यांना सरकारने नुकसान भरपाई द्यावी. 

-श्याम बसप्पा ठाणेदार 
दौंड जिल्हा पुणे

मार्गदर्शन महत्वाचे !


नागरिकांची रोग प्रतिकार शक्ति वाढावी यासाठी रोग प्रतिबंधक उपाय म्हणून ग्रामीण भागातील गाव, वाडी, वस्त्यांवर ग्रामपंचायत, सामाजिक संस्था, व्यक्ति यांच्या कडून गोळ्यांचे वाटप केले जाते उपक्रम उत्तम, स्वागतार्ह, आवश्यकच आहे यात वाद नाही. परंतु होतय काय की अनेक वृद्ध, अशिक्षित ग्रामस्थांचा गैरसमज झालेला ही आढळूण येतोय की दिलेल्या गोळ्या तीन दिवस घेतल्या की माझ्यापाशी करोना येणारच नाही, त्याचा प्रादुर्भाव होणार नाही अर्थात हे अशिक्षितपणामुळे घडते आहे किंवा न समजल्यामुळे आणि म्हणूनच गोळ्या वाटप करणार्‍या स्वयंसेवकानी, कर्मचार्‍यांनी अशा वृद्ध, अशिक्षित ग्रामस्थाना समजेल, पटेल, उमजेल अशा भाषेत सांगावयास हवे, पटवून द्यायला हवे की आम्ही देत असलेल्या गोळ्या फक्त शक्ति वाढविणार्‍या आहेत, कोरोना जवळ येऊ नये म्हणून शासनाने दिलेले नियम पाळलेच पाहिजेत, शक्यतो बाहेर पडू नका आणि जावच लागलं तर नाका तोंडाला मास्क, रुमाल लावूनच बाहेर पडा आदि मार्गदर्शन त्यांना समजेल तो पर्यन्त करावयास हवे असे वाटते.  

-विश्वनाथ पंडित
जिजामाता मार्ग,  ठाणे  

पुणे जिल्हा रुग्णालयात ७५ वर्षीय महिलेची कोरोनावर मात

सद्यस्थितीत राज्यात कोरोनाचे जवळपास एक लाख चाळीस हजारांच्या आसपास रुग्ण असून बरे होणाऱ्यांची संख्यादेखील सत्तर हजारांच्या घरात आहे. म्हणजेच महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट ५०टक्के आहे. जवळपास आठ लाख चाचण्यांतून एक लाख चाळीस हजार पॉझिटिव्ह अहवाल म्हणजे पंधरा टक्क्यांच्या जवळपास आहेत. त्यामुळे निगेटिव्ह रिपोर्टची संख्यादेखील चिंतेचे कारण नसल्याचेच दर्शवते. उपचार घेत असलेले बहुतांश रुग्णदेखील सौम्य व कोणतेही लक्षण दिसत नसलेलेच आढळून येत आहेत. हे रुग्णदेखील लवकरच बरे होऊन घरी परतणार आहेत. त्यामुळे कोरोनाबाबत जास्त काळजी नसावी. तसेच या आजाराचा फार धसका घेणेदेखील बरे नव्हे. मात्र आवश्यक प्रतिबंधात्मक दक्षता ही घ्यायलाच हवी. सर्वसाधारणपणे ज्यांची प्रतिकार शक्ती चांगली आहे असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. मुंबई ठाण्यासारख्या मोठ्या शहरांत ही रुग्णसंख्या व मृत्यूचे प्रमाणही मोठे आहे. असे असले तरी राज्यातील सर्वच महानगरपालिकांमध्ये कोरोना व संशयीतांना रोखणे आव्हानात्मक ठरत आहे. यातच वयोवृद्ध, विविध आजारांचे रुग्ण यांना कोरोनाची लागण झाली तर त्यांना त्यातून बरे करण्याचे मोठे आव्हान आरोग्य यंत्रणांसमोर उभे ठाकते. पुण्याच्या शासकीय जिल्हा रूग्णालय येथेदेखील कोरोना रूग्णाकरीता विशेष वार्ड तपासणी ऊपचार सुविधा उपलब्ध करणेत आली आहे़. मागील आठवड्यात अतिदक्षता विभागातील चार रुग्ण ठणठणीत बरे होवून घरी सोडण्यात आले, यात एका ७५ वर्षाच्या महिलेचा समावेश आहे. एक महिन्यापूर्वी या महिलेस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यावेळी तिला निमोनिया आणि डायबिटीस चा त्रास होता, त्यातच तिला कोरोनाची लागण झाली. अशा परिस्थितीत तिला २५ दिवस अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले, नंतर तिला ७ दिवस जनरल वॉर्ड मध्ये ठेवण्यात आले आणि अखेर कोरोनावर मात करून तिला घरी सोडण्यात आले. याबद्दल रुग्णालयीन अधिकारी कर्मचाऱ्यांचे कौतुक करायलाच हवे. तात्पर्य इतकेच की कोरोना झाला म्हणजे मृत्यू अटळ हा समज डोक्यातून काढून टाकायला हवा. तुमचे वय कितीही असो, तुम्हाला लक्षणे असोत नसोत, तुमची रोगप्रतिकार शक्ती चांगली असली की कोरोना तुम्हाला अधिक काळ जखडून ठेवू शकत नाही. त्यामुळे कोरोनाबधित व्यक्तींनो, अजिबात मानसिक दडपण न घेता योग्य आहार, पथ्ये व दक्षता घेऊन लवकर या आजारावर मात करून बरे व्हा. तसेच भविष्यात या आजाराची लागण होऊ नये म्हणून आवश्यक काळजी मात्र घ्यायलाच हवी. 


-वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

महिला उत्कर्ष समिती च्या रायगड जिल्हा अध्यक्षपदी रेखा घरत यांची निवड

पनवेल /प्रतिनिधी :

पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीची काल  प्रमुख पदाधिकाऱ्यांसह ई व्हर्च्युअल माध्यमातून चर्चा करून नवीन पदाधिकारी निवड प्रक्रिया पार पाडली.   उरण येथील समाजसेविका व वरिष्ठ कार्यकर्त्या  मा. रेखा घरत यांच्या नावावर रायगड जिल्हा अध्यक्ष पदासाठी   सर्वानुमते शिक्का मोर्तब करण्यात आले. या वेळी पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे, सचिव डॉ. वैभव पाटील, महीला उत्कर्ष समिती अध्यक्षा डॉ. स्मिता पाटील, कार्याध्यक्षा मा. श्रुती उरणकर, सचिव दिव्या लोकरे, नवी मुंबई अध्यक्षा सुजाता कडू  यांच्यासह इतर पदाधिकारी चर्चेत सहभागी झाले होते.
    यावेळी रेखा घरत यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

सोमवार, २२ जून, २०२०

पेण मनसेच्या वतीने चीनने केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध : चीनच्या राष्ट्राध्यक्षांचा बॅनर जाळला ; स्वदेशी वस्तूच वापरण्याचे नागरिकांना केले आवाहन





पेण :दिपक लोके

   मागील आठवड्यात भारत चीन मध्ये झालेल्या चकामकीमध्ये आपल्या देशाचे 20 जवान शहीद  झाल्याने भारतीय नागरिकांमध्ये चीन विरोधात कमालीचे वातावरण निर्माण झाले आहे. संपूर्ण देशभरात विविध स्तरातून चीनचा निषेध केला जात असतानाच आज पेण मनसेच्या वतीने देखील चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा बॅनर जाळून चीनच्या विरोधात घोषणाबाजी करून बॅनर वरील फोटोला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चपलांचा मार दिला.तसेच यावेळी शहीद भारतीय जवानांना श्रद्धांजली देखील वाहण्यात आली.

  यावेळी सहभागी झालेल्या काँग्रेसच्या नंदा म्हात्रे यांनी चीनला आपण कितीही व्यापार दिला,कितीही त्यांचा पाहुणचार केला तरी त्यांनी त्यांची जात दाखवलीच त्यामुळे चिनी वस्तू वापरू नका, आर्थिक फटका बसल्याशिवाय ते सुधारणार नाहीत असे त्या म्हणाल्या.

   तर मनसेचे जिल्हा सचिव रुपेश पाटील यांनी आपल्या स्वदेशी वस्तू वापरल्या तर आपल्या देशाची अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल. सीमेवर जे जवान आपल्या संरक्षणासाठी खंबीरपणे उभे आहेत या जवानांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी त्यांना आपण साथ देऊया असे सांगितले.

पेणमध्ये विविध संस्थांनी एकत्र येऊन दिली शहीद जवानांना श्रद्धांजली : चिनी वस्तूंचा वापर टाळण्याचे नागरिकांना केले आवाहन ; चीनच्या राष्ट्राध्यक्षांचा जाळला प्रतिकात्मक पुतळा, तर चिनी मोबाईल फोडून केला निषेध


पेण: दिपक लोके

भारत -चीन सीमेवर झालेल्या चकमकीत आपल्या देशाचे 20 जवान शहीद झाल्यानंतर त्याच्या निषेधार्थ चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्यासाठी आणि शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज पेणमध्ये सह्याद्री प्रतिष्ठान, महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय, निशब्द क्रियेशन आणि साप्ताहिक गर्जा रायगड यांनी पेणमधील नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. यावेळी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून चीनच्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला. तसेच आजपासून आम्ही चिनी वस्तू वापरणार नाही अशी शपथ घेऊन पेणमधील भारतीय जवान विशाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पेणकरांनी शहीद भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी चिनी कंपन्यांचे असणारे मोबाईल देखील फोडण्यात आले.
   यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष समीर म्हात्रे ,मंगेश नेने,सचिन टेकाडे,संतोष पाटील नगरसेवक यांनी पेण मधील नागरिकांना स्वदेशी वस्तूंचा वापर करून देशाची अर्थव्यवस्था बळकट करा आणि चिनी वस्तूंचा वापर टाळून चीनची अर्थव्यवस्था खिळखिळी करा असे आवाहन केले आणि पेण मधील व्यापाऱ्यांना देखील चिनी वस्तू विकू नका,स्वदेशी वस्तूच विका त्या आम्ही विकत घेऊ असे सांगितले.

प्रेरणा फाउंडेशन आयोजित विकलांग मुले व मुलींसाठी ऑनलाईन राज्यस्तरीय कथा कथन स्पर्धा संपन्न


बदलापूर /प्रतिनिधी :

प्रेरणा  फाउंडेशन ठाणे  महाराष्ट्र राज्य रजि. 564/एफ 38784/बदलापूर/ठाणे /महाराष्ट्र. अनेक विकलांग मुले व मुलींना  एकत्रित आणून त्यांना देखील एका व्यासपीठ मिळावे या उद्देशाने प्रेरणा फाउंडेशन तर्फे  विकलांग मुले व मुलींसाठी ऑनलाईन राज्यस्तरीय बोध कथा कथन स्पर्धेचे आयोजन केले गेले. 
   प्रत्येकाच्या अंगामध्ये एक कला असते. ती  कला बाहेर येणे गरजेचे असते. या कोरोना व्हायरस मुळे आपल्या कामाची गती मंदावली आहे. या लॉकडाऊन काळात ही या मुलांना प्रोत्सहन मिळावे एका हक्काचे व्यासपीठ मिळावे या करिता या स्पर्धेचे आयोजन प्रेरणा फाउंडेशन च्या अध्यक्षा दिप्ती (प्रेरणा) गांवकर यांनी दि. 20 जून 2020 रोजी केले होते. ही स्पर्धा दोन वयोगटात घेण्यात आली वयोमर्यादा 4 ते 10 व वयोमर्यादा 11 ते 17 या वयोगट मध्ये घेण्यात आली.  या  ऑनलाईन कथा कथन स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून सर्व मुलांनी  भाग घेऊन उस्फुर्त प्रतिसाद दिला. खूप छान छान छान बोध कथा सुंदर आवाजात म्हणून दाखवल्या. "मेहनतीशिवाय कोणतेही फळ नाही", "इच्छा तेथे मार्ग", "गर्वाचे घर खाली" ईत्यादी संदेश देत कथांचे सादरीकरण केले. प्रेरणा फाउंडेशन कमिटी व परीक्षकांचे मन गहिवरून व डोळे भरून आले. 
   या अशा ऑनलाईन कथा कथन स्पर्धेचा निकाल हा कसा काढावा हा मोठा प्रश्न उभा राहिला. सगळ्या बोध एकापेक्षा एक सरस होत्या.  सर्वांना ए ग्रेड एक्सलंट या प्रमाणे निकाल देण्यात आला. व प्रेरणा फाउंडेशन अध्यक्षा (दिप्ती) प्रेरणा गांवकर व सचिव वैभव कुलकर्णी व परीक्षक खंडू कोटकर यांनी त्यांच्या बोध कथा सादर करून संदेश देऊन मुलांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी प्रेरणा फाउंडेशन च्या अध्यक्षांना ऑनलाईन सन्मानपत्र सचिव वैभव गोविंद कुलकर्णी यांनी बनविण्याचे सहकार्य केले. या कार्यक्रमासाठी खजिनदार गुरुनाथ तिरपणकर यांनी  सहकार्य केले. हिरामण कचरू सरांनी सहाय्यक व परीक्षक म्हणून सहकार्य केले.

सेलिब्रिटींचे प्रश्न आणि आमची उत्तरे "आपल्या हक्काच्या सिक्रेट्स ऑफ अध्यात्म या यूट्यूब चैनलवर प्रसारीत..!


मुंबई -(महेश्वर भिकाजी तेटांबे)

     सिक्रेट्स ऑफ अध्यात्म हे यूट्यूब चैनल चालू करण्याचा उद्देश प्रसिद्धी एवढाच सीमित नव्हता. कारण प्रसिद्ध होण्यापेक्षा सिद्ध होणे हे केव्हाही श्रेष्ठ असते, याची जाणीव मला अध्यात्माने केव्हाच करविली होती .आज अथक प्रयत्नाने मी या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या समोर सिद्ध होत आहे. वेद, उपनिषदे, पुराणे वेगवेगळ्या ऋषी सविता यांचा अभ्यास करून या सगळ्या गोष्टी आपण आपल्या आयुष्यात कशा पद्धतीने अवलंबू आणि आजच्या वैज्ञानिक युगात अध्यात्माचा वापर करून आपले जीवन कसे परिपूर्ण करू याचा विचार करून  सौ.काजल किरण कुडाळकर उर्फ (ताई कुडाळकर) या आपल्या समोर प्रक्षेपित होणार आहेत .आम्ही अत्यंत वेगळा असा अध्यात्मिक कार्यक्रम घेऊन आपल्यासमोर येत आहोत. कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे कि,  सेलिब्रिटींचे प्रश्न आणि आमची उत्तरं... या कार्यक्रमात सेलिब्रिटी त्यांच्या मनातील  रूढी, परंपरा ,सण, समारंभ,  श्रद्धा, अंधश्रद्धा, अध्यात्म याबाबतीत प्रश्न विचारणार आहेत आणि सौ काजल किरण कुडाळकर या सगळ्यावर शास्त्रीय दृष्ट्या विचार करून उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहेत. हा कार्यक्रम जितका मनोरंजनात्मक होईल त्याहून जास्त तो बोधात्मक असेल आणि त्यामुळे आपल्याला एक वेगळी दृष्टी मिळेल यासाठी सौ. कुडाळकर (ताई कुडाळकर) प्रयत्नशील असतील यांत वाद नाही. त्यांच्या समस्त टीमचा या चॅनल मागे सिंहाचा वाटा आहे. त्याचप्रमाणे पती निर्माते किरण कुडाळकर, डायरेक्टर आर्यवीर विश्वनाथ , एडिटर आणि असिस्टंट डायरेक्टर विशाल साळवे, एडिटर अमन कोहरी, मुलगा कॅमेरामन, फोटोग्राफर आणि  डिझायनर सिद्धेश कुडाळकर, निवेदक श्रद्धा मोहिते ,मृणाली जांभळे , समर्थ म्हात्रे आणि इतर अनेकजण.. तसेच माझे कुटुंबीय आणि मित्रमंडळी या माझ्या प्रवाहात सोबत आहेतच. ॥ एकमेकास सहकार्य करू अवघे धरू सुपंथ।। याची आज खऱ्या अर्थाने प्रचिती जाणवली. तेव्हा पुन्हा एकदा समस्त प्रेक्षक वर्गाला  अभिवादन करून  आपल्यासमोर लवकरच येत आहे. "  सेलिब्रिटींचे प्रश्न  आणि आमची उत्तरे "आपल्या हक्काच्या सिक्रेट्स ऑफ अध्यात्म या यूट्यूब चैनल वर  




जंतुनाशक फवारणी आणि अर्सेनिक गोळ्यावाटप ....!



मुंबई :(महेश्वर भिकाजी तेटांबे)

दि . २१ जून रोजी  अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ आणि अनुगामी लोकराज्य महाभियान (अनुलोम) संस्थेमार्फत नेहरुनगर पोलिस स्टे., माहीम पोलिस स्टे. टिळक नगर पोलीस स्टेशन येथे जंतुनाशक फवारणी आणि अर्सेनिक गोळ्यावाटप करताना श्री. किरण खानोलकर, दिलीप शिरसाट, करण गायकवाड, रुपेश जाजोरिया तसेच नेहरूनगर, टिळक नगर  सायन चुनाभट्टी,  कुर्ला पूर्व , माहीम या परिसरातील सर्व मेडिकल दुकानात, रेशन दुकान, सुपर मार्केट शॉप या ठिकाणी सुद्धा जंतुनाशक फवारणी करण्यात आली..!


करोनाची "घरोघरी चाचणी" मोहिमेला सुरवात श्री.राजेंद्र घोरपडे यांची माहिती



बदलापूर /प्रतिनिधी :

     दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन हि साखळी तोडण्यासाठी आणि शहर सुरक्षित ठेवण्यासाठी बदलापूर शहरात पालिकेतर्फे घरोघरी जाऊन चाचणी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेला शहरातील सर्वानी सक्रिय सहकार्य करावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा बदलापूर पालिकेचे प्रशासक जगतसिंग गिरासे यांनी केले आहे.  
     पालिकेच्या खाते प्रमुखांची बैठक जगतसिंग गिरासे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी या योजनेची सविस्तर माहिती जगतसिंग गिरासे यांनी अधिकाऱ्यांना समजावून सांगितली. शहरातील सर्व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक संस्था, आजी माजी लोकप्रतिनधी यांना जगतसिंग गिरासे यांनी वरील आवाहन केले. मुख्याधिकारी दीपक पुजारी, जयेश भैरव, डॉ. राजेश अंकुश, डॉ. हरेश पाटोळे, राजेंद्र बोरकर, प्रवीण वडगाये, दशरथ राठोड, किरण गवळे, सुरेंद्र उईके, सिद्धार्थ पवार, विलास मुठे, प्रतीक्षा सावंत आदी अधिकारी उपस्थित होते. 
    दहा दिवसांची हि विशेष मोहीम असेल. यात दोन सदस्यांची एक टीम अशा शंभर टीम तयार करण्यात येतील असे प्रशासक जगतसिंग गिरासे यांनी सांगितले. या टीमच्या सदस्यांना थर्मामीटर पासून सर्व साहित्य पुरविण्यात येईल. प्रत्येक टीम सदस्यांनी रोज 90 घरांमध्ये जाऊन तपासणी करायची आहे. घरोघरी जाऊन तपासणी झाल्यावर त्याचा अहवाल टीम सदस्यांनी आपल्या वरिष्ठांना सादर करायचा आहे. सर्व अधिकाऱ्यांनी एकमेकांशी समन्वय ठेऊन याची माहिती घ्यायची आहे. कोणाला काहीही अडचण आल्यास किंवा आणखी काही समस्या निर्माण झाल्यास थेट मुख्याधिकारी अथवा माझ्याशी संपर्क साधावा असेही जगतसिंग गिरासे यांनी सांगितले. या टीम मध्ये बहुतांशी शहरातील शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. या शिक्षकांना पगार मिळतो. मात्र या विशेष मोहीम राबविताना त्यांना विशेष प्रोत्साहन भत्ता देण्याचा आपला प्रस्ताव असल्याचे जगतसिंग गिरासे यांनी सांगितले. 
    शहरातील सर्व आजी माजी लोकप्रतिनधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते, सामाजिक शैक्षणिक संघटनांचे पदाधिकारी सदस्य आणि सर्व नागरिकांनी या टीम सदस्यांना सहकार्य करायचे आहे. या टीम सदस्यांना पालिकेचे ओळख पत्र देण्यात आले असल्याने नागरिकांनीही या सदस्यांना सर्व माहिती देऊन सहकार्य करावे असे कळकळीचे आवाहन प्रशासक जगतसिंग गिरासे यांनी केले आहे. 

विक्रोळी पूर्व टागोर नगर परिसरात डॉ.आंबेडकर रूग्णालयात दहा खाटांचे सुसज्ज आय. सी. यु. विभाग कार्यान्वित


मुंबई(शांताराम गुडेकर )

       विक्रोळी टागोर नगर परिसरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर रूग्णालयात १० खाटांचे सुसज्ज आय. सी. यु विभाग नुकताच सूरू करण्यात आला आहे. सदर या आय.सी. यु विभागाचे उद्घाटन स्थानिक नगरसेवक व स्थापत्य समिति अध्यक्ष (उपनगर)उपेंद्र सावंत यांचे हस्ते करण्यात आले. या ठिकानी ह्दय रोग, मलेरिया,डेंगू, उच्च रक्तदाब, मधुमेह हे रूग्ण व ईतर गंभीर रूग्ण यांना तातडीने औक्सिजन पुरवठा व वेंटिलेटर ची सूविधा उपलब्ध होणे करता या विशेष सुसज्जित विभागाची निर्मिती करण्यात आली. याचा लाभ गोर गरीब रूग्ण यांना नक्कीच होईल.खाजगी रूग्णालयात ह्या सूविधांचा दर लाखोंच्या घरात जातो त्यामुळे गरीब रूग्ण यांना राजावाडी घाटकोपर व लोकमान्य टिळक सायन हॉस्पिटल शिवाय पर्याय नाही.अशा आणीबाणी काळात रूग्ण दगावले आहेत म्हणुन हे डॉ. आंबेडकर रूग्णालयातील आय. सी. यु.विभाग याचे निर्माण महत्वपूर्ण आहे. कोविड-१९  या रूग्णांना ईथे ईलाज केला जाणार नाही असे नगरसेवक उपेंद्र सावंत व रूग्णालयाच्या प्रमूख वैद्यकीय अधिकारी डॉ. पद्मश्री अहिरे यांनी सांगितले.या उद्घाटन समारोह प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रसेन कदम, प्रधानपरिचारिका मांजरेकर,प्रमूख परिचारिका तांबे, प्रमूख आय.सी.यु. परिचारिका भार्गव यांची उपस्थिति होती.

रविवार, २१ जून, २०२०

अभिनेते विवेक ओबेरॉय यांच्या हस्ते ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक लक्ष्मण राजे यांचा कोविड योध्दा १९ सन्मानपत्राने गौरव

मुंबई /प्रतिनिधी :  

     जगातील वैश्विक कोरोना महामारी पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन संकटात सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून वृत्तपत्र लेखक लक्ष्मण राजे यांनी महाराष्ट्रातील विविध सामाजिक संस्थाच्या माध्यमातून मराठी नाटक , चित्रपट सृष्टीतील असंख्य कलाकार , तंत्रज्ञ अशा गरजुंना , तसेच बेघर गोरं गरिबांना अन्नदान , रेशन कीट आणि मास्क वाटप केले आहे . त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेऊन मानवाधिकार सुरक्षा संघाचे प्रमुख अभिनेते विवेक आॅबेराय यांच्या हस्ते वृत्तपत्र लेखक लक्ष्मण राजे यांचा कोविड योध्दा १९ सन्मान पत्राने गौरव करण्यात आला . तसेच सांस्कृतिक कलादर्पण ,  जाॅय सामाजिक संस्था , ईगल फाऊंडेशन , शब्दाक्षर , आणि इतर अनेक सामाजिक संस्थांच्या वतीने वृत्तपत्र लेखक लक्ष्मण राजे यांना कोविड योध्दा १९ सन्मानपत्राने गौरविण्यात आले आहे .  कोविड योध्दा सन्मानपत्र प्राप्त झाल्याबद्दल वृत्तपत्र लेखक लक्ष्मण राजे यांना अनेक पत्रकार सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदनीय हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत .



स्पंदन’च्या दिवाळी अंक स्पर्धेच्या सन्मानपत्राचे ऑनलाइन वितरण ; धगधगती मुंबई दिवाळी अंकाला "उत्कृष्ट अंकाचा" पुरस्कार

मुंबई (शांत्ताराम गुडेकर )

         पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने दिवाळी अंक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या स्पर्धेतील उत्कृष्ट दिवाळी अंकांना ऑनलाइन सन्मानपत्रांचे वितरण करण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रातून या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला. यंदा या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे.संयोजक डाॅ.संदीप डाकवे म्हणाले, की या वर्षी कोरोनामुळे सदर कार्यक्रम करता येणार नसल्यामुळे सहभागी दिवाळी अंकांना प्रोत्साहन देण्यासाठी ई प्रमाणपत्र पाठवण्यात आले आहे. सदर अंकांमध्ये दै.सकाळ, दै.तरुण भारत बेळगांव, दै.लोकमत, दै.प्रभात, दै.मुक्तागिरी, दै.पुण्यनगरी या दैनिकांनी आपला सहभाग नोंदवला आहे. त्यांचाही सन्मान करण्यात आला.

           धगधगती मुंबई, सहयाद्री दर्शन, गुंफण, कृष्णातीर, देवाभिमान, कुबेर याही दिवाळी अंकांना उत्कृष्ट दिवाळी अंकाचे सन्मानपत्र देवून गौरवण्यात आले.स्पर्धेसाठी आलेल्या दिवाळी अंकामधून एक दिवाळी अंक ट्रस्टने संग्रही ठेवला आहे. तर उरलेले दोन दिवाळी अंक विविध ग्रंथालयांना दिले आहेत.सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रम नेहमी राबवत असलेल्या स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने साहित्यिक चळवळीला बळकटी देण्यासाठी हा उपक्रम राबवला असल्याचे मत ट्रस्ट चे संस्थापक/अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे यांनी सांगितले आहे.

JNPT तील व्यावसायिक गाळे(दुकाने)स्थानिक प्रकल्पग्रस्त, अपंग व्यक्ति, महिला मंडळ, बचत गटांना द्यावीत - उरण मधील मनसेची आग्रही भूमिका : मनसे रायगड जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांनी दिले JNPT ला निवेदन

उरण -(विठ्ठल ममताबादे)

    देशातील सर्वात मोठे प्रकल्प असलेल्या JNPT बंदरात सर्वांसाठी JNPT ने भव्य असे शॉपिंग सेंटर उभारले आहे परंतु कित्येक वर्षे झाली शॉपिंग सेंटर मधील ही व्यावसायिक गाळे(दुकाने)बंद असल्याने येथील स्थानिक भुमीपुत्र असलेल्या बेरोजगार कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच करोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन व संचारबंदी लागू झाल्याने सर्व सामान्यांचे खूप मोठे हाल झाले आहेत. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या एकूण 60 गाळे पैकि काही मोजकेच गाळे सुरु आहेत बाकिचे 40 ते 45 गाळे बंद आहेत त्यामुळे हे बंद असलेले गाळे उरण मधील स्थानिक भुमीपुत्र,अपंग, बचत गट, महिला मंडळ यांना चालवायला द्यावेत, करोनाच्या काळात बेरोजगांराना JNPT ने मदतीचा हात द्यावा अशी मागणी मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांनी JNPT प्रशासनाकडे पत्रव्यवहार तसेच प्रत्यक्ष भेट देउन केली आहे.

      JNPT ची स्थापना होवून आज 30 वर्षे झाली JNPT ने प्रकल्पग्रस्त व कर्मचा-यांसाठी टॉउनशिपची उभारणी केली.कर्मचा-यांसोबत टॉउनशिप मध्ये JNPT अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच अनेक वरिष्ठ अधिका-यांची निवासस्थाने देखील आहेत. या सर्वांसाठी JNPT ने भव्य असे शॉपिंग सेंटर उभारले आहे. या शॉपिंग सेंटर मध्ये सर्व सुविधांनी युक्त असे 60 गाळे(दुकाने) असावित असे धोरण JNPT प्रशासनाचे होते.  ताजी फळे, भाजी, अंडी, दर्जेदार किराणा सामान तसेच बँक, ATM, सलून, खाद्य पदार्थाची दुकाने यासाठी सुद्धा शॉपिंग सेंटर मध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहे. परंतु दुर्दैवाने आज 60 गाळे असलेले शॉपिंग सेंटर मधील सुमारे 40 ते 45 गाळे गेली कित्येक वर्षे बंद अवस्थेत आहेत. दोन बँका व दोन दुकाने सोडली तर कुठल्याही प्रकारची व्यवस्था हया शॉपिंग सेंटर मध्ये नाही. त्यामुळे सुमारे 70% कर्मचा-यांनी आपली निवासस्थाने सोडून दूसरीकडे राहण्यासाठी गेले आहेत. राहीलेल्या कर्मचा-यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आपल्या दैनंदिन जीवनावश्यक वस्तुच्या खरेदीसाठी उरण मध्ये जावे लागते. योग्य व्यवस्थापन नसल्यामुळे व पात्रता नसलेल्या अधिका-यांकडे शॉपिंग सेंटरची व्यवस्था व जबाबदारी दिल्यामुळे आज ही बिकट परिस्थिती उदभवली आहे.

     सध्या देशात तसेच महाराष्ट्रात लॉकडाऊनमुळे प्रचंड बेरोजगारी वाढली आहे. उरण तालुक्यातील हजारो तरुणांच्या नोक-या लॉकडाऊन मुळे गेल्या आहेत. बहुतेक सर्व CFS व खाजगी कंपनीचे कामकाज अर्ध्यावर आले आहे. तरि या सर्व परिस्थितिचा विचार करून उरण मधील सर्व स्थानिक भुमीपुत्र असलेल्या प्रकल्पग्रस्तांना लॉकडाऊनच्या काळात उभारी देण्यासाठी JNPT च्या शॉपिंग सेंटर मधील गाळे नाममात्र दराने चालवायला द्यावेत. यावेत यामध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्त, अपंग व्यक्ति, महिला मंडळ, बचत गटांना प्राधान्य देण्यात यावे अशीही मागणी यावेळी मनसेच्या वतीने रायगड जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांनी JNPT प्रशासनाकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी JNPT अध्यक्ष संजय सेठी,  विद्यमान आमदार महेश बालदि, जिल्हाधिकारी रायगड, JNPT उपाध्यक्ष श्री वाघ तसेच दिनेश पाटिल(विश्वस्त JNPT), कॉमरेड भूषण पाटिल(JNPT विश्वस्त)यांना लेखी पत्रव्यवहार करून ही समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेवट पर्यंत या विषयाचा पाठपुरावा करणार असून उरण तालुक्यातील तसेच रायगड जिल्ह्यातील सर्व लोक प्रतिनिधींनी या मागणीसाठी JNPT प्रशासनाकडे पाठपुरावा करावा जेणे करून स्थानिक प्रकल्पग्रस्तांना याचा फायदा होईल असे मत अतुल भगत यांनी या निवेदनातून व्यक्त केला आहे.

राज्यातील युट्युब चॅनलला शासकीय मान्यता द्यावी- पत्रकार सुरक्षा समितीची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी


सोलापूर /प्रतिनिधी :

      जगाच्या पाठीवर कोरोना या रोगाने धुमाकूळ घातला असून त्याचा प्रादुर्भाव देशात व राज्यात मोठया प्रमाणात वाढला आहे अश्या कठीण व बिकट परिस्थितीत युट्युब चॅनल च्या संपादक व पत्रकारांनी अत्यंत महत्वाची भूमिका बजावली आहे युट्युब चॅनल चे संपादक व पत्रकार वेगवेगळ्या भागात फिरून कोरोना रोगाबाबत वार्तांकन करून सर्व सामान्य माणसाच्या व देशाच्या  भल्यासाठी आपले कुटुंब व संसार बाजूला ठेवून जनजागृती साठी आपली भूमिका अहोरात्र पार पाडत असून अश्या युट्युब चॅनल  च्या संपादक व पत्रकारांना कोणताच आर्थिक आधार नसल्याने व शासन दरबारात नोंदणी नसल्याने केंद्र सरकार व राज्य सरकार च्या पत्रकारांसाठी असलेल्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नसल्याने युट्युब चॅनल च्या संपादक व पत्रकारांची अवस्था अत्यंत दयनीय व गंभीर झाली असून या युट्युब चॅनल माध्यमातून अनेक युवा तरुण संपादक व पत्रकार आपले नशीब आजमावून पाहण्याचा प्रयत्न करत आहेत 
     महाराष्ट्र राज्यात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून जनतेच्या मनात प्रचंड भीती व दडपण निर्माण झालं आहे कोरोना बाबत केंद्र सरकार व राज्य सरकार जरी वेगवेगळ्या  उपाययोजना करत असलेतरी राज्यातील युट्युब च्या संपादक व पत्रकारांनी आपला जीव धोक्यात घालून आपले राष्ट्रीय कर्त्यव्य पार पाडले असून सरकार व जनता यामधील दुवा म्हूणन प्रमुख भूमिका प्रामाणिक पणे बजावली आहे या बाबत सरकार ने गांभीर्याने विचार करायला हवा कोरोना रोग जीवघेणा आहे याची माहिती असताना देखील राज्यातील युट्युब च्या संपादक पत्रकारांनी आपल्या जीवाची बाजी लावून  केंद्र सरकार, राज्य सरकार  पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन महापालिका प्रशासन यांनी जनतेला दिलेल्या सूचना, आदेश, निर्देश आपल्या युट्युब च्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडली आहे 
   तरी मुख्यमंत्री महोदयांनी राज्यातील युट्युब चॅनल ला शासकीय मान्यता देण्यात यावी अशी मागणी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी केली आहे

अभिनेत्री नम्रता गायकवाडचा एक हात मदतीचा


मुंबई -(लक्ष्मण राजे )

    "मानव सेवा हीच ईश्वर सेवा" या उक्तीप्रमाणे अभिनेत्री नम्रता गायकवाडने मराठी चित्रसृष्टीतील सगळ्या कलावंत-तंत्रज्ञ यांची ह्या लॉकडॉऊनच्या काळात थोड्या फार प्रमाणात झालेली गैरसोय दूर व्हावी म्हणून,कलाकार (सिनिअर/ज्युनिअर)लेखक/दिग्दर्शक (सह दिग्दर्शक)/कॅमेरामन (असिस्टंट)/संकलक/कला दिग्दर्शक(सहाय्यक)/नृत्य दिग्दर्शक (सहाय्यक)/मेकअप मन(सहाय्यक)/हेअर ड्रेसर/स्पॉट बॉय आणि इतर या अनुषंगाने येणारे सगळेच कलाकार/तंत्रज्ञ यांना अन्नधान्याचे कीट वाटप केले . सगळ्या जनतेला आज मदतीची आवश्यकता आहे.पण ज्या कलाक्षेत्राने मला भरभरून दिले,ज्या कलाकार/तंत्रज्ञाने प्रत्येक कलाकृती उत्कृष्ट दर्जाची व्हावी म्हणून प्रयत्न केले,त्यांचा आर्थिक दर्जा सध्याच्या लॉकडॉऊनचा काळात खालावला गेला आहे.


      रेड झोन/कॉरेन्टाईन ह्या मुळे सगळं बंद असल्यामुळे घरात अन्नधान्याचा तुटवडा भासू लागलाय.ही त्यांची अडचण ओळखून मी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून हे सामाजिक मदत कार्य करते आहे असं मनोगत तिने व्यक्त केले .
  अभिनेत्री नम्रता गायकवाड   स्वराज्य, वंशवेल, कॅम्पस कट्टा, झरी, विजय असो, बेधडक अशा अनेक दर्जेदार चित्रपटातून चमकली आहे . पण सध्या पूर्णवेळ  गरजूंना अन्नधान्य कीटची मदत वाटप करण्यासाठी नम्रता , कार्यकारी निर्माते राजेंद्र सावंत आणि टीम यांच्या सहकार्याने अहोरात्र झटत आहे . तिने सामाजिक कार्यात खारीचा वाटा उचलला आहे . अभिनेत्री नम्रताने केवळ मानवसेवा करण्याच्या भावनेतून मदत वाटप हे व्रत अंगिकारले आहे.

आरोग्य भवन येथे जागतिक योग दिन संपन्न





मुंबई -(वैभव पाटील )

      आज २१ जून म्हणजे जागतिक योग दिवस. दरवर्षी हा दिवस भारतासह जगभरात योगविषयक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र यंदा कोरोना विषाणूचे सावट पाहता सामाजिक अंतर कायम राखत सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता लोकांना घरच्या घरी विविध अँपच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने हा दिवस साजरा करण्याच्या सूचना केंद्र शासनाने दिलेल्या आहेत. तशा प्रकारच्या सूचना राज्याच्या आरोग्य विभागानेदेखील सर्व जिल्ह्यांच्या आरोग्य यंत्रणांना निर्गमित केलेल्या आहेत. या दिवसाचे औचित्य साधून राज्य आरोग्य विभागाचे मुख्यालय असलेल्या आरोग्य भवन मध्ये हा दिवस शुक्रवार दिनांक १९ जून २०२० रोजी किमान अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सिंग चे पुरेपूर पालन करत साजरा करण्यात आला. आरोग्य भवनच्या तळमजल्यावरील मुख्य सभागृहात राज्याचे आरोग्य आयुक्त डॉ अनुप कुमार यादव, आरोग्य सेवा संचालक डॉ साधना तायडे, वित्त संचालक श्री रवींद्र शेळके, अति अभियान संचालक डॉ सतीश पवार, सहसंचालक डॉ विजय कँदेवड व इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या योग दिनाच्या ह्या कार्यक्रमाप्रसंगी दीपप्रज्वलन, पूजन, प्रास्ताविक, आयुक्तांचे मनोगत, ऑनलाईन व्याख्याने व योगाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयुष सहा संचालक डॉ सुभाष घोलप यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ वृषाली यांनी केले. शरीर व मनाला आरोग्यदायी ठेवण्याचे तंत्र योग साधनेत असल्याचे मत आयुक्तांनी व्यक्त करत सर्वांनी नियमित योगाचे प्रकार व आसने करत योग आपल्या दैनंदिन जीवनात अंगीकारण्याचे आवाहनदेखील केले. यावेळी "योगाच्या माध्यमातून कोरोनाशी लढा" या विषयावर लोणावळ्याच्या कैवल्यधाम या जगप्रसिद्ध योग प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ शरद भालेकर आणि "सध्याच्या परिस्थितीत योगाचे महत्व" या विषयावर कैवल्यधामचे प्रोफेसर व प्रसिद्ध योग प्रसारक डॉ सतीश पाठक यांनी आपल्या व्याख्यानाद्वारे उपस्थितांशी ऑनलाईन संवाद साधला. त्यांनी आपल्या सर्वांसाठी उपयुक्त अशा व्याख्यानातून सर्वांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर मुंबईच्या सायन येथील आयुर्वेद महाविद्यालयाचे योग प्रशिक्षक डॉ गोरक्षनाथ आव्हाड व ठाणे येथील योग प्रशिक्षक व सल्लागार डॉ मधूमिता परांजपे यांनी उपस्थितांकडून योगाची काही प्रात्यक्षिके करवून त्यांना प्रशिक्षण दिले. कैवल्यधाम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शरद भालेकर यांचे २० मिनिटांचे ऑनलाईन व्याख्यान खालील लिंकवर पाहता येईल. https://www.facebook.com/kdhamyoga/videos/621602521729583/


शनिवार, २० जून, २०२०

एम.डी.केणी विद्यालय भांडुप(पुर्व)येथील गरजू विद्यार्थी-विद्यार्थींनींना डाँ.प्रशांत शिंदे यांचे सहकार्य ; १०० मुलांना जीवनावश्यक वस्तुंचे गुरुजन शिक्षण प्रसारक मंडळतर्फे वाटप




मुंबई(शांत्ताराम गुडेकर )

         गुरुजन शिक्षण प्रसारक मंडळ संचालित एम.डी केणी विद्यालय भांडुप(पूर्व) शाळेची स्थापना १९९३ साली प्रिं. परमेश्वर शिंदे सरांनी केली.सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून गेली २७ वर्ष ज्ञानदानाचे पवित्र कार्य येथे अखंडपणे सुरू आहे या शाळेत अतिशय गरीब कुटूंबातील कागदाच्या घरात राहणारी मुले शिक्षण घेत आहेत शाळेत वर्षभर अनेक उपक्रम राबविले जातात मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाते सामाजिक संघटना, शिक्षक, संचालक मुलांना सर्वतोपरी मदत करीत असतात. सध्याचा कोरोना अडचणीच्या काळात शाळेतील १०० हुन गरजु मुलांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.यावेळी संस्थापक संचालक डॉ. प्रशांत शिंदे, संचालक शशिकांत माने मुख्याध्यापिका प्रोयुशा भोसले व सर्व गुरुजन उपस्थित होते.भविष्यातही या विधार्थीना जमेल तसे सहकार्य आम्ही करतच राहू असा विश्ववास यावेळी संचालक मंडळाने व्यक्त केला. 

वाडा तहसील विभागाकडून एनयुजेएमच्या समन्वयाने पत्रकारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

 पालघर /प्रतिनिधी :

पालघर जिल्ह्यात नेशनल युनियन आॅफ जर्नालिस्ट महाराष्ट्राच्या  वाड्यातील पत्रकारांना शासनाकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून लाॅकडाऊनमध्ये पत्रकारांची घरची परिस्थिती हलाखीची झाली आहे. एनयुजे  ही पत्रकारांचे न्याय हक्कासाठी  लढणारी संघटना असल्याने अशा संकट प्रसंगी पत्रकारांना  मदत करणे हे एकीचे लक्षण असल्याचे नेशनल युनियन आॅफ जर्नालिस्ट महाराष्ट्राच्या अध्यक्षा शीतलताई करदेकर यांना सांगितले.
     नेशनल युनियन आॅफ जर्नालिस्ट महाराष्ट्राच्या कोषाध्यक्ष वैशाली आहेर यांच्या पुढाकारानेने वाडा तहसीलदार उध्दव कदम यांच्या हस्ते एनयुजे महाराष्ट्र पालघर जिल्ह्याचे सचिव अनिल पाटील यांच्या उपस्थितीत वाडा  एनयुजेएमचे पत्रकारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. 
या आधी एनयुजेमहाराष्ट्र च्या पुढाकाराने पालघर तालुक्यातील कमारे ग्रामपंचाय हद्दीतील ५५ आदिवासी गरीब बांधवांना पालघर तालुका तहसीलदार यांच्या मदतीने जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले. तसेच सफाळे येथील बीड जिल्ह्यातील मजुर अडकले होते. एनयुजेंमहाराष्ट्रने परवानगीसाठी मदत देऊन त्यांच्या  त्यांच्या वाहतूकीचा मार्ग  मोकळा करून दिला होता.

नामदेव समाजोन्नती परिषदेचे रक्तदान दुसऱ्यांदा शिबीर संपन्न




पुणे/प्रतिनिधी :

   आज संपुर्ण जगात, देशात व महाराष्ट्र राज्यात कोरोना रोगाने थैमान घातले आहे. त्यावर शासन योग्य ते काम करत आहे. याकरिता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी सध्या महिनाभर पुरेल इतकाच रक्ताचा साठा शिल्लक असून त्यानी जनतेला रक्तदान करण्यासाठी नुकत्याच केलेल्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देत शुक्रवार दि. 19 जुन 2020 रोजी नामदेव समाजोन्नती परिषद पुणे शहर अध्यक्ष यांनी नागेश पेठ नामदेव शिंपी समाज संस्था व शिवसेना प्रभाग क्र.16, कसबा मतदार संघ यांच्या सहकार्याने समस्त नामदेव शिंपी दैव मंडळ, कसबा पेठ येथे रक्तदान शिबिराचे दुस-यांदा आयोजन केले. पहिल्या रक्तदान शिबिरात 61 बॉटल व आज 56 असे मिळून 117 जणांनी आतापर्यत स्वेच्छेने रक्तदान केलं व भविष्यातही अजून अशी शिबिरे आम्ही भरवू असे समाजसेवक व पुणे शहर अध्यक्ष संदीप लचके यांनी सांगितले. याकरिता पी.पी. ग्रुपचे सदस्य व ओम ब्लड बॅक, मंगळवार पेठ ,पुणेचे डाॅ. सदाशिवराव कुंदेन व त्यांचे  सहकारी यांचे बहुमोल सहकार्य मिळालेे.
     याप्रसंगी नामदेव समाजोन्नती परिषदेचे पुणे विभागाचे उपाध्यक्ष मा. संजयराव नेवासकर यांच्यासह रक्तदात्यांनी रक्तदान केले.नामदेव समाजोन्नती परिषदेचे विश्वस्त अँड. ज्ञानेश्वर पाटसकर, ना.स.प. पुणे शहर सचिव सुभाष मुळे, नागेश पेठ नामदेव शिंपी समाज संस्थेचे अध्यक्ष प्रशांत सातपुते, सुभाष पांढरकामे, महेश मांढरे, विशालभाऊ पोरे, दिंगबर क्षीरसागर, योगेश मांढरे, शंकर पाथरकर, अक्षय मांढरे, राहुल सुपेकर, अथर्व सातपुते यांचे  सहकार्य लाभले.

विक्रोळी -भांडुपला रेल्वे थांबण्यासाठी युवा सेनेचे निवेदन

मुंबई /प्रतिनिधी :

  अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी तब्बल तीन महिन्यानंतर  15 जून पासून पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गांवर  रेल्वे सेवा सुरु झाली आहे. सध्या या तिन्ही मार्गांवर प्रत्येकी साधारण 130 फेऱ्या धावत आहेत. मात्र या पैकी सध्या मध्य रेल्वेच्या गाड्या मुलुंड नंतर थेट घाटकोपरला थांबतात. वास्तविक नाहूर, भांडुप, कांजूरमार्ग, विक्रोळी याठिकाणी अत्यावश्यक सेवेत काम करणारे अनेक कर्मचारी(कोरोना योद्धा ) आहेत. परंतु वरील पैकी कुठल्याही  स्थानकात गाडी थांबत नसल्याने अत्यावश्यक सेवेतील या कर्मचाऱ्यांना  मनस्ताप सहन करावा लागत असून रेल्वेने सुरु केलेल्या रेल्वे फेऱ्यांचा त्यांना  काहीच  फायदा मिळताना दिसत नाही. 
    तेव्हा राष्ट्रकर्तव्य प्रथम मानणाऱ्या या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना नाहक त्रास होऊ नये यासाठी भांडुप -विक्रोळी स्थानकात रेल्वे गाडी थांबवन्याबाबतचे निवेदन  विक्रोळी विधानसभेतील युवा सेना सहसचिव योगेश पेडणेकर यांनी मध्य रेल्वेच्या रेल प्रबंधक कार्यालयातील अधिकारी (  D.R.M) श्री शलभ गोयल यांना दिले आहे.
 रेल्वे प्रशासन या निवेदनाचा विचार जरून योग्य तो निर्णय  लवकर घेईल अशी अपेक्षा पेडणेकर यांनी व्यक्त केली आहे. 



शुक्रवार, १९ जून, २०२०

विक्रोळी विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना एक हात मदतीचा




मुंबई /प्रतिनिधी :

     इच वन व टिच वन संस्थेच्या माध्यमाद्वारे बॅरिस्टर नाथ पै शिक्षण प्रसारक मंडळ ( रजि. )मुंबई संस्थेच्या वतीने विक्रोळी विद्यालय शाळेतील गरजूंना मदत करण्यात आली .संस्थेचे सचिव मा. श्री. गणेश बटा , संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. अजय चोपडेकर , मुख्याध्यापक श्री. भिवा येजरे , सौ. मनस्वी कोयंडे यांच्या प्रयत्नाने व एच वन टिच वन या संस्थेच्या मदतीने नुकतेच विक्रोळी  पूर्व येथील विक्रोळी विद्यालयातील गरीब व गरजू कुटुंबाना जीवनावश्यक किराणा सामान महिनाभर पुरेल इतके तांदूळ,गहू पीठ,बेसन पीठ,तूरडाळ,साखर,चहा पावडर,तेल,मिरची पावडर,गरम मसाला, हळद, मीठ,जिरे,लाईफ बॉय साबण अशा जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
    या शाळेच्या विद्यार्थ्यांना आॅनलाईन माध्यमातून दररोज अभ्यास देत असताना शिक्षकांच्या लक्षात आले की सध्या लॉकडाउन सुरू असून अनेक कुटुंबांचे मासिक उत्पन्न अत्यंत तुटपुंजे असल्यामुळे अशा लोकांना दैनंदिन गुजराण करण्यास आटापिटा करावा लागत आहे. अशा या कुटुंबांची ही अन्नधान्याची गरज लक्षात घेऊन बॅरिस्टर नाथ पै शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई( रजि. ) संस्थेने इच वन व टिच वन संस्थेच्या माध्यमातून विक्रोळी विद्यालयातील सध्या मुंबईत असलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना  अन्न धान्य रेशन वाटप करण्यात आले. या गरजु लोकांना क्षणाचाही विचार न करता मदत देण्यासाठी संस्थेने त्वरीत पाऊल उचलले .
या सामाजिक उपक्रमाचे शाळेतील विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि या  विभागातील समाजसेवकांनी शाळेचे व संस्थेचे आभार  मानले . या पुढेही शाळेच्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी  संस्थेने शाळा व आजूबाजूचा परिसर निर्जंतुकीकरण करण्यासाठी आवश्यक असलेलं सर्व साहित्य खरेदी करण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापकांनी पालकांना दिली. 



मुंबईतील अद्भुत ठिकाण - ग्लोबल विपश्यना पॅगोडा


मुंबई ही खरेतर अनेक आश्चर्यांची खाणच आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या ह्या शहरात अनेक उपनगरे असून प्रत्येक उपनगरात काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण वास्तू किंवा स्थळ पाहायला मिळते. मुंबईची सीमाच इतकी विस्तीर्ण आहे की प्रत्येक मुंबईकराने यातील प्रत्येक वास्तू पाहिलीच असेल असे छातीठोकपणे सांगणे धारिष्ट्याचे ठरेल. अशाच एका अद्भुत स्थळाला मी माझे कार्यालयीन सहकारी व आयुष विभागाचे सहायक संचालक डॉ घोलप यांचेसह नुकतीच भेट दिली. बोरिवली पश्चिमेला असलेल्या गोराई खाडीच्या पलीकडे उभे आहे, मुंबईतील एक आधुनिक आश्चर्य आणि ते म्हणजे ग्लोबल विपश्यना पॅगोडा. सध्या लॉकडाऊन थोडासा अनलॉक कडे सरकतोय. मात्र तरीदेखील सर्व पर्यटनस्थळे, प्रशिक्षण केंद्रे बंदच आहेत. त्यानुसारच इतर पर्यटन स्थळांसारखे ग्लोबल विपश्यना पॅगोडादेखील पर्यटकांसाठी पूर्णपणे बंदच आहे. त्यामुळे आम्हीदेखील तेथे पोहोचलो तेव्हा पूर्णपणे शुकशुकाटच होता. डॉ घोलप यांनी पॅगोडा संस्थेतील त्यांचे परिचित श्री अगरवाल यांना संपर्क साधून आगामी प्रशिक्षण सत्रासाठी नियोजनात्मक बाब म्हणून संस्था पाहण्यासाठी विनंती केली व त्यानुसार शनिवारी झालेली आमची ही भेट पूर्वनियोजित होती. 



      मुंबईतील सुप्रसिद्ध ठिकाण एस्सेल वर्ल्ड च्या बाजूलाच साधारणतः दहा वर्षांपूर्वी निर्माण झालेली ही वास्तू खरेतर अद्भुत कलेचा नमुनाच आहे. आम्ही त्या ठिकाणी पोहोचून श्री अगरवाल यांना संपर्क केला. त्यानुसार सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझरचा वापर करत आम्ही वास्तूत प्रवेश केला. पॅगोडा म्हणजे खरंतर, आपल्या भारतीय बौद्ध स्तुपाचेच एक वेगळे रूप. बौद्ध धर्म भारताबाहेर जसजसा आशिया खंडात पसरत गेला, तसतसे जपान, म्यानमार या ठिकाणी बुद्धांनी सांगितलेल्या विपश्यनेसाठी ध्यानधारणेसाठी विशिष्ट वास्तुविशेषांची निर्मिती केली गेली. भारतात ज्याप्रमाणे स्तूप, विहार निर्माण झाले, तसेच अन्यत्र पॅगोडांची निर्मिती झाली. भारतातील स्तूप घुमटाकार होते, परंतु अन्य देशांतील पॅगोडा आकाशाला गवसणी घालणारे उंच उंच. त्याच धर्तीवर मुंबईतील बोरिवलीत अरबी समुद्रातील गोराई खाडीत उभा राहिलेला हा ग्लोबल विपश्यना पॅगोडादेखील आकाशाला गवसणी घालणारा आहे.  म्यानमारमधील श्वाडॅगन पॅगोडाची प्रतिकृती म्हणजेच हा ग्लोबल विपश्यना पॅगोडा. श्वाडॅगन पॅगोडाची उंची ३३० फूट आहे, तर ग्लोबल विपश्यना पॅगोडाची ३२५ फूट. दोघांचा सोनेरी रंग मात्र सारखाच आहे, लांबून पॅगोडा पाहताना सुवर्णमंदिराचा भास होतो, याचा घुमट अवकाशात घुसत असल्याचेदेखील भासते. त्यामुळेच गोराईचा हा पॅगोडा, केवळ मुंबईच नाही, जागतिक आश्चर्याचाच नमुना आहे. कारण फक्त दगडांपासून बांधण्यात आलेला हा जगातील सगळ्यात मोठा पॅगोडा आहे. तसेच हा डोम बांधताना कुठल्याही प्रकारच्या खांबांचा, अथवा लोखंड-स्टीलचा आधार घेण्यात आलेला नाही. चहापाणी झाल्यावर अगरवाल यांनी आम्हाला संपूर्ण परिसर दाखवत या सर्व इतिहासाची इत्यंभूत माहिती दिली. प्राचीन भारतीय वास्तुशैलीत ज्याप्रमाणे प्रचंड आकाराचे दगड केवळ खाचांनी एकमेकांशी जोडले जायचे, त्याचप्रमाणे दगड रचून हा डोम उभारण्यात आला आहे. विशेष म्हणजे मध्यभागी असलेला वजनदार डोम जमिनीपासून ९० फुटांवर असून त्याला कुठल्याही प्रकारचा आधार दिलेला नाही. ग्लोबल विपश्यना पॅगोडामध्ये बुद्धांच्या प्रतिमा इतक्या विलक्षण आहेत की त्यावरील तेज त्यांच्या जिवंतपणाची जाणीव करून देतात. या परिसरात अनेक मुर्त्या, प्रतिमा, बोधपर फलक, पवित्र असा पिंपळ वृक्ष, फळ व फुलझाडे, उद्याने असून त्याचे निरीक्षण करत आम्ही सभोवताली एक फेरफटका मारला. या ठिकाणी विपश्यना करण्यासाठी मोठे सेंटर असून त्या ठिकाणी विपश्यना करण्यासाठी जगभरातून अनेकजण येत असतात. दहा दिवसांचे विपश्यनेचे प्रशिक्षण वर्ग याठिकाणी भरत असून त्याची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने केली जाते. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे प्रशिक्षण वर्ग बंद आहेत. भारत आणि जगभरात प्रसिद्ध असलेले विपश्यनागुरू सत्यनारायण गोएंका यांच्या मार्गदर्शनाखालीच हे सेंटर उभारण्यात आले आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार येथे विपश्यनेचे वर्ग चालतात आणि हा पॅगोडा सर्व जातिधर्माच्या लोकांसाठी खुला आहे. पॅगोडाचा परिसर इतका मनमोहक आहे की पाहताक्षणीच आम्ही त्याच्या मोहात पडलो. प्रवेशद्वारापाशी असलेली ८० मेट्रिक टन वजनाच्या मार्बलपासून बनवलेली बुद्धमूर्ती साडेएकवीस फूट उंचीची असून जाताक्षणीच लक्ष वेधून घेते. त्याशिवाय बोधिवृक्ष, अशोकस्तंभ, धम्मचक्र अशी बुद्धांशी संबंधित प्रतीकेही इथे पाहायला मिळतात. त्याशिवाय चित्रमालिकेतून बुद्धचरित्र मांडणारे कलादालन व पुस्तकालयदेखील इथे आहे जे बंद असल्यामुळे आम्हाला पाहता आले नाही. दरवर्षी लाखो लोक या ठिकाणाला भेट देतात. ग्लोबल विपश्यना पॅगोडाच्या कळसाची उंची साधारणतः ९९ मीटर इतकी आहे. या पॅगोडाचा घुमट २८० फूट व्यासाचा असून हा जगातील सर्वात मोठा डोम आहे. आजवर विजापूरचा इतिहासप्रसिद्ध गोल घुमट सगळ्यात मोठा ‘स्तंभविरहित घुमट’ म्हणून प्रसिद्ध होता, परंतु कुठलाही स्तंभ किंवा लोखंडाचा वापर न करता उभारण्यात आलेला ग्लोबल विपश्यना पॅगोडाचा डोम गोल घुमटापेक्षा तिप्पटीने मोठा आहे. डोमच्या बांधणीसाठी तब्बल २५ लाख टन बेसॉल्ट आणि जोधपुरी लाल दगडांचा वापर करण्यात आलेला असून त्यांच्या जोडणीसाठी इंटर लॉकिंग पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. या डोममध्ये एकाच वेळी तब्बल आठ हजार माणसे ध्यानधारणेला बसू शकतात.


 निरनिराळ्या बॅचेसमध्ये इथे ऑनलाईन नोंदणीद्वारे विपश्यना वर्ग चालत असून प्रशिक्षणार्थीना इथे राहण्याची व जेवणाची सोय उपलब्ध आहे. निवासासाठी इथे अनेक खोल्यादेखील आहेत ज्याची स्वच्छता व व्यवस्था तारांकित हॉटेल्सला लाजवेल अशी आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी सर्व सेवा ही मोफत उपलब्ध करून दिली जात आहे. केवळ मर्जीने अथवा दानशूर व्यक्तींकडून सहाय्य स्वीकारले जाते. एका दिवसासाठी भेट देणाऱ्या पर्यटकांना पॅगोडा परिसर पूर्णपणे पाहता येतो ज्यासाठीदेखील कुठलेही शुल्क नाही. उद्यान, उपहारगृह यांचा गरजेनुसार वापर करता येतो. दहा दिवस कोर्स केलेले प्रशिक्षणार्थी कधीही या ठिकाणी एक दोन दिवसांसाठी येऊन ध्यानधारणा आनापणा करू शकतात. मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात शांत, निसर्गरम्य असे हे विपश्यना केंद्र ध्यानधारणेसाठी व मनःशांतीसाठी उत्तम ठिकाण आहे. आज विविध आजारांनी ग्रस्त लोक औषधोपचाराने आपले शरीर बरेदेखील करतील मात्र मनाचे आजारपण दूर करण्यासाठी विपश्यनेपेक्षा चांगला पर्याय असू शकत नाही. दुपारी बाराच्या सुमारास पोहोचलेलो आम्ही तब्बल अडीच तास दुपारी अडीच वाजेपर्यंत या परिसराची सोशल डिस्टन्स व प्रतिबंधात्मक काळजी घेत भटकंती केली. अगरवाल यांच्या आग्रहाखातर येथील सात्विक जेवणाचादेखील आम्ही आस्वाद घेतला व तीनच्या सुमारास नवी मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झालो. लॉकडाऊन उघडल्यावर ह्या विपश्यना केंद्राला व अद्भुत स्थळाला भेट देण्याचा आपणदेखील अवश्य प्रयत्न कराल याची खात्री आहे. 


-वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा बसवावी

 भारतीय हवामान खात्याने यावर्षी समाधानकारक व सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे.वरुन राजाच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेल्या  सर्वांसाठीच ही आनंदाची वार्ता आहे. राज्यातील काही भागांत मान्सूनचे दमदार आगमनही झाले आहे. गेल्या काही वर्षात पडलेल्या अपुऱ्या पावसामुळे देशातील बहुतांश भागात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा भागात तर भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वनवन भटकावे लागत होते. अशा वेळी हवामान खात्याने व्यक्त केलेला अंदाज दिलासादायक असाच आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस पडणार असल्याने पावसाचे पाणी वाया न जाता जास्तीतजास्त पाण्याची बचत कशी होईल याचे नियोजन आत्तापासूनच करायला हवे. पावसाच्या पाण्याचा थेंब थेंब वाचवला पाहिजे. नदी, विहीर, तलाव बंधारे यात जास्तीजास्त पाणी साठा कसा होईल याचे नियोजन सरकारी पातळीवर होणे गरजेचे आहे. नागरिकांनीही पावसाचे पाणी वाचवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले पाहिजे. घर, सोसायटी, शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, याठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसवली पाहिजे. जेणेकरून ते पाणी जमिनीत साठवले जाईल. पावसाचे पाणी वाहून वाया जाण्यापेक्षा ते पाणी ते पाणी झाडे,शेती,परसबाग, बगिच्यात पोहचले पाहिजे. पाण्याचा थेंब न थेंब महत्वाचा आहे. पाण्याची जितकी बचत आपण करणार तितके पाणी आपल्याला पुढे वापरायला मिळणार आहे. कारण पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती आहे. पाण्याची बचत ही आता काळाची गरज बनली आहे.


-श्याम बसप्पा ठाणेदार 
दौंड जिल्हा पुणे

गुरुवार, १८ जून, २०२०

ड्रॅगनने लादलेले युद्ध


भारत आणि चीनच्या लष्करात प्रथमच १९७५ नंतर चकमक झाली. भारताचे केवळ तीनच नाही, तर कमीत कमी २० सैनिक हुतात्मा झाल्याचे आता स्पष्ट झाले. सोमवारी रात्री उशिरा ही चकमक होऊनही मंगळवारी रात्री उशिरापर्यंत या बातमीला सरकारकडून अधिकृत दुजोरा दिला जात नव्हता. अखेर भारतीय लष्कराने उशिरा वीस जवान हुतात्मा झाल्याचे मान्य केले. गलवान खोऱ्यातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात आले. उंचावरच्या गलवान खो-यात  गंभीररित्या जखमी झालेल्या १७ जवानांना उपचारासाठी खाली आणण्यात आले; परंतु उंचावरच्या ठिकाणाच्या तपमानामुळे जखमींचा मृत्यू झाला. त्यामुळे या घटनेत २० भारतीय सैनिक हुतात्मा झाल्याचे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले. एकीकडे वाटाघाटी करायच्या आणि दुसरीकडे अचानक हल्ला करायचा, ही चीनची रणनीती आहे. गेल्या आठवड्यात चीनने सामंजस्यातून मार्ग काढण्याचे जाहीर केले आणि दुसरीकडे चीनच्या अन्य प्रांतातून अक्साई चीनमध्ये सैन्याची जमवाजमव केली जात होती. गेल्या पाच मे पासून सुरू असलेल्या संघर्षाला आता युद्धाचे वळण लागले आहे. या हल्ल्यात १६ बिहार रेजिमेंटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष बाबू, तामीळनाडूच्या रामानाथपूरम जिल्ह्याचे रहिवासी जवान पलानी तसेच झारखंडच्या साहिबगंज जिल्ह्यातील डिहारी गावाचे कुंदन ओझा यांनाही हौतात्म्य आले. चीनचेही पन्नास सैनिक ठार झाल्याचे सांगितले जाते; परंतु चीन ते मान्य करायला तयार नाही. पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यामध्ये भारतीय लष्कर आणि चीनच्या सैनिकांमध्ये सोमवारी रात्री ही झटापट घडून आली.  भारताने सीमा ओलांडल्याचा दावा चीनने केला आहे, तर चीनचे सैन्य गलवान खो-यात अडीच किलोमीटर आत घुसले होते, असे सांगितले जाते.  प्रत्यक्ष सीमारेषेवर गेल्या दीड महिन्यांपासून असणारा तणाव कमी करण्यासाठी दोन्ही बाजूंकडून माघार घेतली जात असताना ही घटना घडली. भारत आणि चीन यांच्यामध्ये तीन हजार ४८८ किलोमीटर लांबीची सीमा रेषा आहे. यातील बहुतांश सीमा विवादित असून, त्यावर चर्चा सुरू आहे. दोन्ही सैन्यामध्ये १९७५ मध्ये अरुणाचल प्रदेशातील तुलुंगला येथे चकमक झाली होती, त्यात भारताचे चार सैनिक हुतात्मा झाले होते. त्यानंतर प्रथमच दोन्ही देशांच्या सैन्यात चकमक होऊन त्यात जीवितहानी झाली. गलवान खोऱ्यासह पूर्व लडाखमधील पॅन्गाँग सरोवर, डेमचोक आणि दौलत बेग ओल्डी येथील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर मे महिन्याच्या सुरुवातीपासून दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने आहेत. या भागामध्ये भारताकडून रस्त्यांची ६६ कामे सुरू असून, काही धावपट्ट्याही विकसित करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. या कामांमुळे पॅन्गाँग सरोवर आणि परिसरात भारतीय लष्कराला वेगवान हालचाली करणे शक्य असल्यामुळे या कामांत अडथळे आणण्यासाठी चीनच्या सैन्याकडून या भागात घुसखोरी सुरू  आहे. लष्करी अधिकाऱ्यांच्या वरिष्ठ स्तरावरील चर्चेनंतर तणाव कमी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सोमवारी रात्री साडेअकरा वाजल्यानंतर गलवान खोऱ्यामध्ये चीनचे सैनिक ट्रकमधून आले. त्यांना भारतीय सैनिकांनी अडविल्यानंतर ते माघारी जाण्यास तयार नव्हते आणि त्यातूनही घटना घडली. सुमारे दोन ते तीस तास ही चकमक झाली. यानंतर मंगळवारी सकाळी दोन्ही बाजूंच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये घटनास्थळी चर्चा झाली.

    संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचा चीनवर किती अंधविश्वास होता, हे नंतर स्पष्ट झाले. दोनच दिवसांपूर्वी दोघांनीही चीन आणि नेपाळसोबतचा तणाव लवकरच निवळेल असे सांगितले होते. सिंह यांनी तर पाकव्याप्त काश्मीर भारतात विलीन होईल, असे सांगितले. नेपाळसारख्या छोट्या राष्ट्राने चीनच्या सल्ल्याने भारतीय सीमेवर गोळीबार केला, त्यात एक शेतकरी ठार झाला. आता तर चीननेच थेट हल्ला केला. आता या घटनेनंतर राजनाथ सिंह  यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या घटनेची माहिती दिली. तसेच, पूर्व लडाखच्या परिस्थितीचा आढावा घेतानाच परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, संरक्षण प्रमुख जनरल बिपीन रावत आणि तिन्ही दलांच्या प्रमुखांबरोबर बैठक घेतली. लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनीही आपला पठाणकोटचा नियोजित दौरा रद्द केला. एकीकडे भारतीय लष्कर सामंजस्याची भूमिका गेऊन चीनला वारंवार माघारीचे आवाहन करीत असताना चीनने मात्र भारतीय लष्कराने १५ जूनपासून दोन वेळा सीमोल्लंघन केल्याचा कांगावा केला. भारतीय सैन्यानेच चीनच्या सैनिकांवर पहिल्यांदा हल्ला केल्याचा कांगावा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने केला. चीन सरकारचे वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सच्या संपादकांनी चीनची जीवितहानी झाली असल्याचे मान्य केले आहे. भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिल्यानंतरही चीनची हेकेखोरी कमी झाल्याचे दिसत नाही. चीनच्या सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सने चीनच्या संयमाला कमजोरी समजू नये, असा इशारा दिला आहे. चीनला भारतासोबत संघर्ष करण्याची इच्छा नाही; मात्र आम्ही भारताला घाबरत नसल्याचेही त्यांनी सांगितले. भारतासोबत तणाव वाढल्यानंतर 'ग्लोबल टाइम्स'ने सातत्याने भारतविरोधी भूमिका घेतली होती. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनच्या जीवितहानीबाबत अधिकृत माहिती देण्यास नकार दिला. भारताने एकतर्फी कारवाई करून तणावात भर घालून सीमा प्रश्न आणखी जटील करू नये, असे आवाहन परराष्ट्र मंत्रालयाने केले. भारतीय जवानांनी चीनच्या हद्दीत घुसून चिनीवर सैन्यावर हल्ला केला असल्याचा उलटा आरोप केला आहे. मागील महिन्यापासून लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाला आहे. चिनी सैन्याने भारताच्या हद्दीत घुसखोरी केल्यानंतर दोन्ही देशांचे सैन्य आमनेसामने उभे ठाकले होते. तणाव निवळण्यासाठी दोन्ही देशांतील लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू होतीत; मात्र सोमवारी दोन्ही बाजूने सैन्यांमध्ये चकमक घडली असली. भारताने पहिला हल्ला केल्यानंतर चीनने त्याला प्रत्युत्तर दिले आहे. या चकमकीत दोन्ही बाजूंचे जवान जखमी झाले असल्याचे चीनने म्हटले आहे.

     भारत आणि चीनच्या दरम्यान लडाख सीमेवरील तणाव आणखीच वाढला आहे. चीनच्या सैनिकांनी भारतीय जवानांवर खिळे असलेल्या काठ्यांनी हल्ला केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पीपी१४-१५-१७ वरून चीन पुन्हा माघारी फिरणार असल्याचे ठरले; मात्र चिनी फौजांनी माघार घेण्यास नकार दिला. भारतीय जवानांनीदेखील चीनच्या सैन्याला समजवण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान दोन्ही सैन्यांमध्ये वाद वाढला आणि चिनी फौजांनी हल्ला केला आहे. चिनी फौजांनी भारतीय जवानांवर दगडफेक केली. त्याशिवाय लोखंडाच्या वस्तू. खिळे असलेल्या काठ्यांनी भारतीय सेनेवर हल्ला केला. भारतीय सैन्यानेच चीनच्या सैनिकांवर हल्ला केला. त्याच्या प्रत्युत्तरात भारतीय जवानांना प्राण गमवावे लागले असल्याचे चीनने म्हटले आहे. सीमावाद हा चर्चेतूनच सोडवण्यात येणार असल्याची भूमिका चीनने मांडली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे, की भारतीय सैनिकांनी दोन वेळेस सीमा ओलांडून चिनी सैनिकांना उकसवण्याचा प्रयत्न केला. भारतीय जवानांची ही कृती दोन्ही देशांमध्ये झालेल्या सहमतीविरोधात आहे. दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये शारीरिक संघर्ष झाला. भारताने आपल्या जवानांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक असून त्यांच्या या कृतीमुळे सीमा प्रश्न आणखी जटील होऊ शकतो. भारताने चीनच्या 'वन चायना प्रिन्सिपल' धोरणाला आव्हान देणे म्हणजे आगीशी खेळ असल्याचा इशारा ग्लोबल टाइम्सने दिला आहे. भारतीय राजकीय रणनीतीकारांकडून चीनच्या या धोरणाला विरोध करण्याचा सल्ला सरकारला देण्यात आला आहे. यामध्ये भारताचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अरविंद गुप्ता यांचाही समावेश आहे. भारतातील राजकीय रणनीतीकारांनी चीनविरोधात पावले उचलण्याबाबत सरकारला काही सूचना केल्या आहेत. यामध्ये भारताने हाँगकाँगमध्ये लोकशाही, तैवानसोबत आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या मुद्यावर सहकार्याचे संबंध निर्माण करणे आणि चीनचे नेते भारताच्या दौऱ्यावर आल्यानंतर तिबेटच्या नागरिकांसोबत चीनविरोधी आंदोलन करावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. या सूचनांवर अंमल केल्यामुळे चीनला अडचणी आणता येईल का, चीनला पराभूत करण्याचा पर्याय मिळाला आहे, असे भारतीय तज्ञांना वाटते का, असा प्रश्नही ग्लोबल टाइम्सने विचारला आहे.

-भागा वरखडे 
(लेखक जेष्ठ पत्रकार आहेत )

नवभारत हायस्कूल कुसूर* येथे मोफत ई लर्निग किट, लॅपटॉप आणि प्रिंटर वाटप कार्यक्रम संपन्न ; साई एज्युकेअर फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम...!

वैभववाडी - कुसूर गावातील माध्यमिक शाळा, नवभारत हायस्कूल येथील विद्यार्थ्यांसाठी साई एज्युकेअर फाउंडेशन (रजि.) या संस्थेतर्फे (CSR Initiative...